#झोपाळा.
#सुरेखा_मोंडकर
घर तसं चिमुकलंच होतं. बैठं . आजूबाजूला मर्यादित जागा होती. लगेच कुंपण आणि शेजारी दुसरा बंगला . छोट्या छोट्या बंगल्यांचीच ती वस्ती होती . वरती एक मजला वाढवता आला असता पण सध्या तरी तशी गरज नव्हती . होती तेवढी जागा पुरेशी होती . कुटुंब वाढलं की मग बघू असा विचार होता.
अंगण तसं पिटुकलं होतं . गच्चीत बाग केलेली होती . भिंतीच्या बाजूने अगदी खेटून रांगेने कुंड्या मांडल्या होत्या . नेहाला फुलापानांची कळ्याफळांची आवड होती . त्या हिरवाईत फुलांच्या मनोहर रंगांत सगळं कुटुंब त्यातीलच एक असल्याप्रमाणे मिसळून जायचं. भिंतीपासून दूर सुरक्षित अंतरावर मध्यभागी परीसाठी खेळण्यातला छोटा झोपाळा घसरगुंडी आणि काही लाल निळ्या पिवळ्या ..डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगांची खेळणी मांडली होती .
परी सारखी दादांच्या भोवती गुणगुणत असायची .
त्यांनी काहीही काम काढलं की हिचं आपलं,"दादा मी कलनाल."
दादाही किडूक मिडूक काम तिच्या स्वाधीन करायचे .
रविवारी दिलीप नेहा घरी होते . परी त्यांच्या बरोबर रमली होती . तिची लुडबूड नसल्याने दादा गच्चीतल्या बागेची साफसफाई करीत होते . झाडांची निगराणी करीत होते . कुंड्यांतली माती सारखी करायची . कुठे कीड लागली आहे का हे पाहून किडकी सुकलेली पानं खुडून खताच्या विभागात टाकायची . पाणी फवारायचं .
ते रंगले होते .
निवृत्तीनंतर परीशी खेळण्याव्यतिरिक्त हाच त्यांचा आवडता विरंगुळा होता .निवांतपणे मनापासून त्यांचं काम चाललं होतं.
इतक्यात नेहा आलीच .
" हे घ्या तुमचं शेपूट ! सारखं आपलं दादा कुठेत ? दादा कुठेत ? मला दाद्दांकडे जायचंय ! घ्या ताब्यात तुमचं शेपूट!
"मी शेपूत नैये . मी पली आए पली!"
"हो हो ! समजलं बरं का परीराणी!" परीला दादांच्या हवाली करून जिना उतरता उतरता नेहा म्हणाली,
"दुध पिऊन झालंय तिचं. थोड्या वेळाने दोघेही नाश्ता करायला खाली या."
"दादा , उन्ह वाढतंय बरं का . पुरे झालं बागकाम . आता काय करायचंअसेल ते सावलीत करा . तापू नका उगाच उन्हात!"
माती पाणी बघितल्यावर परीबाईंना कुठे राहावतंय !
दादांना मदत करण्याच्या नादात तिने भरपूर चिखल करून ठेवला . स्वतःला आणि दादांनाही चिखलाने बरबटवून टाकलं . परी उन्हात आहे म्हटल्यावर आता मात्र दादांना उन्हाचा चटका जाणवायला लागला .
" परीराणी चला खाली जाऊया खाऊ खायला."
गच्चीवर कोपऱ्यात असलेल्या नळाखाली दादांनी तिला स्वच्छ धुऊन काढलं. आपल्याच टीशर्टने टिपून घेतलं. तिला झोपाळ्यावर बसवून म्हणाले ,
" इथे बसायचं हं सोन्या ! खाली उतरू नकोस . पाय मातीत माखून घेशील . मी हात पाय धुऊन येतोच तुला उचलून घ्यायला . खाली गेल्यावर फ्रॉक बदलुया तुझा . अज्जिब्बात आता आणखीन मळवून घ्यायचं नाही."
बाग करून उरलेली गच्ची होतीच केवढी ...चौरंगाएवढी. हात पाय धुता धुताच त्यांचं परीशी हितगुज चाललं होतं. परी झोपाळ्यावर मजेत छोटे छोटे झोके घेत दादांना हुंकार भरत होती .
अचानक खळकन काहीतरी तुटल्या मोडल्या सारखा आवाज आला. दादा दचकून मान वर करून बघताहेत तो झोपाळ्याची कडी खट्टाक्कन तुटली होती . परीने मोठे झोके घेतले होते की काय कोण जाणे . मोठे झोके घेण्याएवढं तिचं वय नव्हतं . पाय तेवढे लांब नव्हते . काही कळायच्या आत परी गच्चीच्या बाहेर फेकली गेली होती.
अख्खी दुनिया सर्रकन दादांच्या डोळ्यासमोर उलटीपालटी झाली . त्यांच्या हातपायातलं त्राण गेलं .
भयाकुल आवाजात , " दिलीप! दिलीप !" हाका मारतच त्यांनी लडबडत गोते खात परीच्या दिशेने कशीबशी धाव घेतली .
.
*****
.
"दिलीप !दिलीप!" अशी दादांची हाक ऐकून अंगणात बाईक साफ करीत असणाऱ्या दिलीपने आवाजाच्या रोखाने पाहिलं. तो चमकलाच.
दादा तर गच्चीत बागकाम करीत होते .
ते खाली कधी आले? आपल्याला कसे नाही दिसले?
शेजारच्या बागेच्या कुंपणाच्या बाजूला काय करताहेत?
त्यांच्या हातात निपचित परी होती . त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं.
थरथरत्या केविलवाण्या स्वरात दादांच्या हाका चालूच होत्या .
दिलीप त्यांच्या गेट मधून बाहेर पडून शेजारच्या बंगल्यात दादांच्या दिशेने धावला .
काय गोंधळ चाललाय ते बघायला नेहापण घरातून बाहेर आली .
दादांनी परीचं मुटकुळं दिलीपच्या हातात थोपवलं.
"घाबरू नकोस . काही झालेलं नाही ...
गच्चीवरून पडली .काय कशी नंतर बघू! आज रविवार दवाखाने बंद . तिला मोहनच्या घरी घेऊन जा. तो तिला घरीच तपासेल .लक्षात ठेव काहीही झालेलं नाहीए तिला. फक्त घाबरलीय. नेहा , गाडीची चावी घेऊन ये . परीला काही झालेलं नाही. पळा लवकर . मी बघतो घरातलं काय ते! तिला काहीही झालेलं नाहीये . समजलं..... काहीही झालेलं नाही."
थरथरत्या स्वरात पण ठामपणे; घाबरलेल्या दिलीपला दादांनी पटापट सूचना दिल्या . कापरं भरलेल्या नेहाला ,
"जा, पळ! गाडीची चावी घेऊन ये!" असं सांगून पिटाळलं.
खरोखरच परी व्यवस्थित होती. तिला काहीही झालेलं नव्हतं.
तिला तपासून निरीक्षणासाठी डॉ मोहनने त्यांना थोडावेळ तिथेच थांबायला सांगितलं.
तो पण आश्चर्यचकीत झाला होता . दादांनी तिला चपळाईने झेललं हे ऐकून तर तो थक्कच झाला.
दादांनी आज पर्यंत आहार विहार व्यायाम काटेकोर ठेवून शारीरिक मानसिक तंदुरुस्ती कडक सांभाळल्यामुळेच हे सर्व शक्य झालं ह्यावर सगळ्यांचं एकमत झालं.
पण आजोबा नात दोघेही गच्चीत होते . परी गच्चीवरून खाली पडून जमिनीवर आदळण्याच्या आत दादांनी खाली पोचून तिला कशी झेलली ह्याची काही संगती लागत नव्हती .
तो प्रसंग असा बिकट होता की दिलीपने पण दादांना सर्व घटना विचारली नव्हती .
परीला लवकरात लवकर उपचार मिळणं आवश्यक होतं.
परी आता चांगली हसत खेळत होती.
थोडी धास्तावली होती .
बाल जीवाला गांभीर्य माहिती नसल्याने तशी ठीक होती .
.मोहन मित्रच होता . दादांना पण तपासावं. पडणाऱ्या परीला झेलताना त्यांना काही इजा झालीय का बघावी म्हणून तो पण त्यांच्या बरोबर त्यांच्या घरी आला.
" दादा दादा तुमचं पिल्लू अगदी टकाटक बरं का ! अरिष्ट टळलं." असं ओरडतच दिलीप घरात शिरला .
परी देखील ".. दाद्दा .. दाद्दा.." करत लुटुलुटू घरात झेपावली.
दादा कुठे दिसत नव्हते . नेहाने घरात शोधलं . दिलीप अंगणात बघून आला. घराचं दार उघडं टाकून ते कुठे जाणं शक्यच नव्हतं. परी येई पर्यंत त्यांचाही जीव टांगणीला लागला असणार .
देवासमोर धरणं धरून बसले असणार .. नाही देवघरात पण ते नव्हते.
बहुतेक अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायला गच्चीत तर नाही ना गेले?
तसे जाणार नाहीत ते, जीव उडाला असणार त्यांचा !
सुचणार नाही त्यांना काही .
चैन पडणार नाही .
शिवाय गाडीचा आवाज ऐकून ते खालीच आले असते.
तरी देखील बघावं तर खरं म्हणून नेहा गच्चीत गेली आणि किंचाळलीच .
"दिलीप दिलीप , अरे हे बघ काय!"
सर्वच धावत गच्चीत आले.
दादा गच्चीत पडले होते.
हालचाल होत नव्हती.
मोहनने त्यांना तपासून दु:खाने मान हालवली.
त्यांची प्राणज्योत मालवली होती.
जिन्यावरून दुडक्या चालीने वर येणाऱ्या परीला उचलून नेहा चटकन खाली घेऊन गेली.
दादांना प्राण सोडून दोन तीन तास तरी झाले होते.पडणाऱ्या परीला पकडण्यासाठी धावताना ते पाय घसरून तर पडले नसतील?
मर्मस्थळी मार बसून प्राण गेला असेल!
तिला पडताना बघून हृदयक्रिया तर बंद पडली नसेल?
असं कसं होईल?
त्यांनीच खाली शेजाऱ्यांच्या अंगणात जाऊन परीला झेललं होतं.
मोहनच्या घरी जायचा सल्ला दिला होता
शेजाऱ्यांना काही विचारावं तर ते पंधरा दिवसांच्या ट्रीपला गेले होते.
त्यांच्या घरी कोणी नव्हतं.
दिलीप वेड्यासारखा पुन्हा पुन्हा सर्व घटनेची संगतवार उजळणी करीत होता.
कुठे काही बारकासा दुवा मिळतोय का बघत होता . आपण मोहनकडे गेल्यानंतर काही वेळाने आपली वाट पाहण्यासाठी , दूरवरून आपली गाडी दिसतेय का हे पाहण्यासाठी तर ते गच्चीत गेले नसतील?
तेव्हां अस्वस्थ असल्याने गच्चीत झालेल्या चिखलात पाय घसरून अपघात झाला नसेल ना?
पण शेवटच्या श्वासाचं आणि ह्याचं वेळेचं गणित जुळत नव्हतं.
सगळेच गोंधळले होते. दिलीप भांबावून गेला होता.
परी पडली तेव्हां ते दृश्य बघूनच दादांचं प्राणोत्क्रमण झालं आणि मग त्यांच्या आत्म्याने ......छे!
प्रत्येक घटना शास्त्राच्या कसोटीवर घासून पाहणाऱ्या डॉ. मोहनला हे पटत नव्हतं.
दिलीप नेहा तर हतबुद्ध झाले होते .
दु:खाच्या पहाडाखाली पिचले होते. मती ठप्प झाली होती .
काय झालं कसं झालं..काहीच त्यांना कळत नव्हतं. डोळ्यांनी पाहिलेला साक्षीदार कोणी नव्हता. परी तर इतकी लहान होती की तिला काहीच सांगता आलं नसतं.
तिने हा सगळा प्रसंग विसरणंच तिच्या हिताचं होतं.
दादांनी परीचा जीव वाचवला होता.
स्वतःच्या प्राणांची बाजी लावून... एवढंच खरं होतं.
दिलीपने त्यांच्या हातून परीला घेतलं होतं... एवढंच खरं होतं.
बाकी सर्व काळाच्या उदरात गडप झालं होतं.
मागमुसही उरला नव्हता... एवढंच खरं होतं.
No comments:
Post a Comment