कथा - #वैष्णवी
"आज काय आहे विशेष बातमी?" मी पेपर चाळून पाहू लागलो.
पहिल्या पानावर कुठल्यातरी एका राजकिय पुढार्याचा मोठा फोटो आणि त्याच्या सभेची पुर्ण पानभरुन बातमी होती..मी ती बातमी न वाचता पान उलटले..
मधल्या एका पानावर भारत सरकारच्या 'एनसीआरबी' संस्थेच्या वर्ष २०२० च्या रिपोर्टची बातमी होती, त्यानुसार पुर्ण भारतामध्ये मागील वर्षभरात हरवलेल्या लहान बालकांची संख्या ही एक लाखाच्या पुढे असल्याचे सांगण्यात आलेले होते, विशेष म्हणजे त्यामध्ये मुलींची आकडेवारी ही ७०% अशी लक्षणीय होती..
"म्हणजे जी महत्वाची बातमी पहिल्या पानावर मोठ्या मथळ्याखाली पाहिजे होती, तिला एखाद्या साध्या बातमीप्रमाणे मधल्या पानावर एका छोट्याशा कोपर्यात जागा मिळाली..तरी नशीब बातमी तरी छापली आहे"... मी स्वताशीच बडबडलो.
"अजुन कुठली बातमी आहे पुढे"
एक दोन नव्हे तर तब्बल बेचाळीस लहान बालकांचे अपहरण व खुनाचा आरोप असणाऱ्या 'गावित भगीनी ' ह्या नावाने कुप्रसिद्ध असणार्या महिला कैद्यांनी येरवड्याच्या तुरुंगातून स्वताची सुटका होण्यासाठी अर्ज दाखल केल्याची बातमी सुद्धा छापून आलेली होती. (ज्यांना वीस वर्षापुर्वी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली होती पण अजुनही त्यावर कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही)
"छान..म्हणजे दिवसेंदिवस वाढत चाललेले गुन्हे आणि त्याचे कारण दोन्हीपण एकाच पानावर दिले आहे तर, एवढ्या गंभीर गुन्ह्यांसाठी सुद्धा प्रशासन वेळेवर शिक्षा देणार नसेल तर साहजिकच ही विकृत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणारच आहे."
"अहो, काय बडबडत आहात तुम्ही? ऑफिसला जाण्याचा टाईम झालाय की नाही तुमचा?" ही किचनमधुन माझा डबा घेऊन बाहेर येत म्हणाली.
"जायचेय गं, पण आधी हातातील पेपर तर पुर्ण होऊदे..अरे हे बघ जरा.. आपल्या शेजारच्या 'वैष्णवी' ची पण बातमी आलीय आज पेपरमध्ये.."
माझे लक्ष पानावरील कोपऱ्यातील त्या छोट्याशा बातमीकडे गेले, जेथे त्या जेमतेम पाच वर्षीय बालिकेचा एक लहानसा फोटो आणि गेल्या तीन दिवसांपासून ती बेपत्ता असल्याची बातमी छापून आलेली होती, सोबतच तिच्या पालकांचा संपर्क क्रमांक आणि कोठे आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन पण दिसत होते.
"हो ना, बिचारी..त्या दिवशी इतर मुलांसोबत बागेत खेळत असताना अचानकच कुठे गायब झाली कोणालाच समजले नाही, कोणी म्हणतात, तिला लहान मुले पळवणार्या टोळीने पळवून नेले असेल तर कोणी अजुन काय काय सांगत असतात..पण ती लवकर सापडली तर किती बरे होईल नाही का?" हि म्हणाली.
मी हातातील पेपर आवरुन टेबलवर ठेवून दिला आणि घरातून बाहेर पडलो. सोसायटीच्या पार्किंग मधील कार बाहेर काढून ऑफिसच्या दिशेने निघालो..पण आज सकाळीच मुड पुर्णपणे डिस्टर्ब झाल्यासारखा वाटत होता.
ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर सुद्धा कामात लक्ष लागत नव्हते..काहीवेळ मेल चेक करुन नंतर टाईमपाससाठी ऑनलाईन न्युज सर्च करु लागलो..
"एका लहान बालिकेवर पाशवी अत्याचार करुन तिचा खुन करणार्या नराधम आरोपीस अटक..सदर आरोपी यापुर्वी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षे जेलमध्ये होता आणि नुकताच जामिनावर बाहेर आला होता"
समोर दिसत असलेली ही एक न्युज वाचली आणि माझी छाती धडधडायला लागली. हिंमत करुन मी ती न्युज पुर्ण ओपन केली, ती बातमी दुसर्या शहरातील होती हे पाहून थोडेसे हायसे वाटले..पण बलात्कार, जळीतकांड, निर्घृण हत्या अशा विविध ताज्या बातम्यांनी भरलेले ते न्युज पोर्टल आणखी पुढे वाचण्याची हिंमत झाली नाही..
दिवसभर ऑफिसच्या कामात लक्ष तर नव्हतेच, सायंकाळी लवकरच बाहेर पडलो..घरी येत असताना डोक्यात भरलेला विशेष तणाव दुर करण्यासाठी एका बारच्या बाहेर गाडी थांबवली. इच्छा नसतानाही बळेच आत जाऊन कोणी पाहणार नाही अशा आडोशाला असणार्या एका टेबलावर बसून एक थंड बियरची ऑर्डर दिली.
अर्धी बाटली संपली होती तोच माझ्या टेबलच्या समोरच्या खुर्चीवर कोणीतरी बसलेले मी पाहिले..माझा एक जुना पण सध्या फारसा परिचय नसणारा मित्र होता तो.. दुरुन मला तेथे बसलेले पाहुनच माझ्यासमोर येऊन बसला होता तो..
"काय मग, तु तर म्हणाला होतास तु ड्रिंक वगैरे घेत नाहीस म्हणून" त्याने विचारले.
"नाहीच घेत मी, पण आज जरा टेन्शन आले होते ना, म्हणून थोडे रिलॅक्स होण्यासाठी आलो होतो रे..तुला काही मागवायचे असेल तर सांग, मी पण आत्ताचं आलोय"
त्याने काही तरी ऑर्डर केली.. थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर त्याला मी माझ्या आजच्या टेन्शनचे कारणही सांगुन टाकले.
"तुला सांगतो बर्याच वेळा आमच्या घरातही खेळत खेळत यायची रे ती, तिच्या बोबड्या आवाजात माझ्याशी छान गप्पा गोष्टी करायची..आमच्या घरातीलच एक सदस्य असल्यासारखी वाटायची ती आम्हाला..पण आता ती कुठे असेल? कोणत्या अवस्थेमध्ये असेल? काहीच कल्पना नाही, पण कोणाला काय मिळणार आहे अशा छोट्या मुलीला पळवून नेऊन?" मी हताशपणे बोलत होतो.
"पैसा.. ह्युमन ट्रॅफेकिंगच्या क्षेत्रामध्ये किती पैसा आहे याची कल्पना नाहीये तुला..लहान मुलींना पळवुन नेऊन, दुसर्या शहरांमध्ये किंवा थेट परदेशामध्येही विकणार्या अनेक टोळ्या भारतामध्ये सक्रिय आहेत. वयात आलेल्या मुलींना खोट्या प्रेमामध्ये फसवून आणि लहान मुलींना थेट किडनॅप करून नंतर विकले जाते.. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस भारतीय मुलींची मागणी वाढत चालली आहे, त्यामुळे आपण कल्पना सुद्धा करु शकत नाही एवढा ह्या मार्केटचा विस्तार झालेला आहे."
त्याने त्याच्याजवळ असणारी माहिती मला सांगितली.
"पण अशा पळवून नेलेल्या बालकांचे पुढे ते काय करत असतील रे?" मी विचारले.
"ते मला नाही सांगता येणार, पण मी ऐकले आहे की काही जणांचे ऑपरेशन करुन त्यांच्या शरीरातील पार्ट काढुन घेतात तर काही बालकांना रस्त्यावर भिक मागण्यांसाठी मजबुर केले जाते तर काही मुलींना अनैतिक देहव्यापार व्यवसायाच्या दलदलीत ढकलले जाते.. तुला तर माहीतच आहे मी आधिपासुनच अनेक वाईट व्यसनांच्या आधीन आहे, त्यामुळे मला ह्या सगळ्या विषयी थोडीफार माहिती आहे..
आता मध्यंतरी मला इंटरनेट वर सतत अश्लील व्हिडिओ पाहण्याचे मला व्यसन लागले होते..पण एकेदिवशी एका लहान मुलीचा तसला व्हिडीओ पाहिला आणि नंतर मी ते व्हिडीओ पाहणेच सोडून दिले..कसे काय लोक एवढ्या लहान मुलींसोबत असे कृत्य करु शकतात काय.."
"बास..!" मी माझी उरलेली अर्धी बाटली एका दमात संपवली आणि तडक तेथून उठून बारच्या बाहेर निघून आलो आणि लगेचच कारमध्ये बसून वेगात घराकडे निघालो..
तणाव कमी करण्याच्या उद्देशाने बारमध्ये गेलेलो मी बाहेर पडताना मात्र जास्तच तणावग्रस्त झालो होतो..
आज पहिल्यांदाच माणुस असल्याची पण लाज वाटायला लागली होती.. सातत्याने आज दिवसभरात वाचलेल्या, ऐकलेल्या बातम्या आणि त्यासोबत त्या चिमुरडीचा चेहरा नजरेसमोर येत होता..
"वैष्णवी बाळा, कुठे आहेस तु? तुझ्या आई बाबांना परत कधी भेटशील की नाही? स्वताच्या क्षुद्र स्वार्थासाठी नीचांकी पातळी गाठणार्या माणुसरूपी हिंस्र श्वापदांच्या तावडीत तर सापडली नाहीस ना.. तुझ्यासारख्या अनेक उमलत्या कळ्या आजवर त्यांनी निर्दयीपणे कुस्करुन टाकलेल्या आहेत, आणि अजुनही दररोज नवनवीन सावज शोधत ते आमच्याच आजुबाजुला कुठेतरी वावरत आहेत..आम्ही फक्त हतबलतेने त्यांचे अत्याचार पाहु शकतो आणि मनातल्या मनात दुःखी होऊ शकतो.. तुझ्यासारख्या असंख्य बालकांचे बालपण हिरवून घेणार्या त्या सैतानांचा प्रतिकार करण्याची व त्यांच्या कुकृत्याची शिक्षा त्यांना देण्याची हिंमत आमच्यामध्ये तर कधीच नव्हती पण आम्ही नेमलेल्या सरकार व प्रशासनामध्येही ती नाही..आमची आंधळी न्यायव्यवस्था आणि भ्रष्ट प्रशासन कोणालाही न्याय देऊ शकत नाही, कारण ते व्यस्त आहेत गुन्हेगारांचा मानवाधिकार जपण्यामध्ये, कारण त्यांच्यामते मानवाधिकार फक्त अत्याचारी दुर्जनांनाच असतो, दुर्बल पिडीतांना नाही."
दररोजपेक्षा आज घरी परतायला उशीर तर झालाच होता, पण रात्री झोप लागायलासुद्धा जास्तच उशीर झाला.
"अहो उठा, नऊ वाजुन गेलेत, ऑफिसला जायचे नाही का आज तुम्हाला?" हिने आवाज दिला.
"नाही, आज बरे नाही वाटत मला.."
"बरं, ठिक आहे, मी जाते मग, तुम्ही आराम करा"
"अगं ऐक ना, आपल्या शेजारच्या वैष्णवीचा काही तपास लागला का?"
"नाही हो, तिच्या आईबाबांनी सगळीकडे पाहिले.. पोलीसांनी पण कसुन तपास केला पण तिचा काहीच ठावठिकाणा नाही लागला..कुणास ठाऊक काय झालंय तिच..बरं जाते मी मला उशीर होतोय."
ती तिच्या कामावर निघून गेली..त्यानंतर बर्याच वेळाने मी बेडवरुन उठलो..दुपार निघून गेली होती..आता ऑफिसला जाण्यात काही अर्थ नव्हता..पण घरामध्ये मनही लागत नव्हते..अखेर काही वेळ विचार करुन मी कारची चावी घेऊन घराबाहेर पडलो.
कुठे जायचे होते, कशासाठी जायचे होते, काहीच समजत नव्हते..कितीतरी वेळ समोर रस्ता दिसेल तिकडे जात राहिलो..शहर केव्हाच मागे पडले होते, आता समोर एका छोट्याशा गावात जाण्याचा रस्ता दिसला मी तिकडे गाडी घातली..
त्या गावात बरीच गर्दी दिसत होती..गावात कुठलीतरी जत्रा भरलेली होती..मन रमवण्यासाठी मी पण गाडी साइडला लावून त्या जत्रेमध्ये सामील झालो.
अनेक छोटी छोटी रंगीबेरंगी विविध वस्तुंची दुकाने सजलेली दिसत होती..नवीन कपडे घालुन मिरवणारे आबालवृद्ध व स्त्रिया मोठ्या उत्साहात इकडेतिकडे वावरताना दिसत होते.. आकाशात उंच फिरणारे लहान मोठे पाळणे आणि अनेकविध खेळांचे प्रकार तेथे दिसत होते..एकुणच तेथील वातावरण आणि गडबड गोंगाट पाहुन कालपासून तणावग्रस्त असणारे माझे मन प्रसन्न झाले.
जत्रेमध्ये पुढे चालता चालता अचानक एका गोल फिरणार्या खेळण्यातील लहानशा यांत्रिक घोड्यावर मला ती बसलेली दिसली.. हो तीच..आजवर मी तिला फक्त फ्रॉकवरच पाहिलेले होते, पण आज तिने एखाद्या मुलासारखे कपडे घातलेले होते..तिच्यासोबत तिच्या वयाच्या आणखी तीन मुली पण तेथे खेळत होत्या.. एकसारखे कपडे अंगावर असणार्या.. त्या सर्व मुलींना एकच ड्रेस आवडला असावा का? त्या सगळ्याजणी त्यांच्या खेळामध्ये दंग होत्या..तिला असे अनपेक्षितपणे समोर पाहुन मला खुप आनंद झाला..तिने पण माझ्याकडे पाहून ओळखल्या सारखे स्मितहास्य केले.
"अगं वैष्णवी.! तु इकडे काय करतेस? कोणासोबत आलीस? तिकडे सगळेजण तुझी वाट पाहत आहेत..तुझी आई, बाबा..चल लवकर घरी"
मी तिच्या जवळ जात म्हणालो..पण तिने नकारार्थी मान हलवली..
"परत घरी का नाही यायचे तुला बाळा? तुझ्या बाबांना बोलावून घेऊ का मी येथे? घरी येण्यासाठी काय पाहिजे तुला? सांग मी देतो"
तिने माझ्या पाठीमागे बोट दाखवले..मागे एक फुगे विकणारा व्यक्ती दिसत होता. मी तिला त्या फुगेवाल्याकडे घेऊन गेलो.
"एवढेच ना..किती फुगे हवेत तुला सांग"
मी अनेक रंगीबेरंगी फुग्यांचा मोठा गुच्छ खरेदी करुन तिच्या हातात दिला..तिला ते फुगे पाहुन अत्यानंद झाला.. तिने तो गुच्छ हातात घेऊन उड्या मारत मारत तिच्या मैत्रीणींकडे धाव घेतली..
मी तिच्या मागे निघणारच होतो पण तेवढ्यात..
"साहेब, कोणासोबत बोलत आहात तुम्ही.. फुगे तर आकाशात सोडून दिले त्याचे पैसे तरी द्या की"
समोरचा फुगे वाला मला म्हणाला..त्याच्या चेहर्यावर निराळेच भाव दिसत होते..
मी चमकून मागे पाहिले तर एका क्षणापुर्वी तेथे असणारी वैष्णवी आणि तिच्या मैत्रिणी कोणीही दिसत नव्हते.. यांत्रिक घोड्यांचा पाळणा सुद्धा रिकामा दिसत होता..मी बराचवेळ तेथे कधी त्या रिकाम्या फिरणार्या पाळण्याकडे तर कधी आकाशात उंच उंच जात असणार्या त्या फुग्यांच्या गुच्छाकडे पाहतच राहिलो..
त्या दिवशी जत्रेमध्ये अनुभवलेला तो प्रसंग हा मला झालेला भास होता की वैष्णवीने मला दिलेली शेवटची भेट हे मला आजवर समजले नाही..
पण हरवलेल्या वैष्णवी चे पुढे काय झाले?
तर दरवर्षी अपहरण होत असणार्या एक लाख बालकांचे पुढे नेमके काय होते हे ज्याप्रमाणे कोणालाही समजत नाही, त्याप्रमाणेच वैष्णवीचे पुढे काय झाले हे सुद्धा आम्हा कोणाला समजले नाही..
No comments:
Post a Comment