आता तुझा नंबर....
परवा चाळीतल्या मनोजचं लग्न होतं. खरं तर घरातलं पहिलं लग्न म्हणून धूमधडाका करावा, दोन दिवस चाळीत बँड ठेवायचं वगैरे त्याच्या घरच्यांच्या मनात होतं... पण कोपऱ्यात राहणाऱ्या मानसीने मागल्याच आठवड्यात आत्महत्या केली... आयुष्य भरभरून जगणारी वीस वर्षीय मानसी असा आतताईपणा कसा करू शकते? असं नेमकं तीच्या आयुष्यात काय घडलं की तीला जीव द्यावासा वाटावं? घरात कुणाशी भांडण नाही की बाहेर कसलं लफडं नाही. आत्महत्या करताना घरच्यांच्या नावाने कुठली चिट्ठी देखील नाही. त्यामुळे तीचा मृत्यू एक गूढ बनून राहिलं होतं. आणि त्याचमुळे मनोजच्या लग्नाच्या वेळी दारात हळद रंगली नाही की घोड्यावर बसून वाजत गाजत वरात आली नाही.
राणेकाकूंची सुलभा, चाळीशीला आली तरी लग्नाचं ठरत नव्हतं... त्या दिवशी सरू आजी कट्यावर बसल्या होत्या.. मनोजच्या लग्नावरून आपल्याच तंद्रीत चालत येणाऱ्या सुलभाचा त्यांना चुकून पाय लागला.
सॉरी हं आजी, सुलभा नमस्कार करत म्हणाली, माझा चुकून पाय लागला तुम्हाला....
नटून थटून, गजरे घालून आलेल्या सुलभाकडे पाहून सरू आजी म्हणाल्या... आता तुझा नंबर.
आजीच्या तोंडून मिळालेला आशीर्वाद म्हणा किंवा अजून काही असेल.... पण अचानक सुलभाचं लग्न अवघ्या महिन्याभरात ठरलं. होणारा नवरा विधुर होता.. पण बाकी सर्व उत्तम होतं. पहिल्या लग्नापासून त्याला मूलबाळ नव्हतं किंवा घरी सासू सासरे देखील नव्हते. शिवाय सरकारी नोकरी आणि वयाच्या मानाने तो बराच देखणा होता दिसायला. घोडनवरी साठी अजून काय हवं ना? लग्न साध्या पद्धतीने कुठलाही गाजावाजा न करता रजिस्टर व्हावं हे त्याचं ठाम मत होतं...
रजिस्टर लग्न म्हटलं तरी माहेराहुन चार चांगल्या साड्या, बाहेर फिरायला बरे ड्रेस, मंगळसूत्र, दोन बांगड्या, नवऱ्याला पोशाख, अंगठी ह्या गोष्टी करणं क्रमप्राप्तच होतं.
सुलभाच्या लग्नामुळे चाळीत नुसता उत्साह वाहत होता. मनोजचं लग्न गाजवता नाही आलं, निदान सुलभाच्या लग्नात सर्वाना कसर भरून काढायची होती.. खरेदीला ऊत आला होता. चाळीत एक दिवसाआड सुलभाचं केळवण होत होतं कुणाना कुणाच्या घरी...
चहूकडे सनईचे सुर निनादत होते...लग्न अगदी उद्यावर आलं होतं...
त्या दिवशी मैत्रिणीसोबत सुलभा ब्युटी पार्लर मधून येत होती.. आणि अचानक कुणाला काही समजायच्या आत पाठून येणाऱ्या ट्रकची तीला धडक बसली आणि सुलभा ऑन द स्पॉट खल्लास झाली.
चाळीवर परत एकदा सुतक पसरलं. नवऱ्यासोबत लग्न करून सुखी संसाराच्या वाटेवर निघालेली सुलभा अज्ञाताच्या प्रवासाला एकटीच निघाली.
चाळीतल्या बायका पदरात तोंड लपवून अश्रूना वाट मोकळी करून देत होत्या. अचानक असं कसं झालं हो काकू? मानसी गेली. तीच्या धक्यातून सावरत नाही तोपर्यंत सुलभा गेली. बोलता बोलता बायकांना परत परत उमाळे येत होते.
कोपऱ्यात सरू आजी सहा वर्षाच्या पिंकीशी खेळत होत्या.
आजी, माझी आई, वंदना मावशी, राणे आजी एकसारख्या रडत का आहेत? पिंकीने सरू आजीला बालसुलभ प्रश्न विचारला..
मानसी मावशी, आणि सुलभा मावशी बाप्पाच्या घरी गेल्या म्हणून सगळ्या बायका रडत आहेत.. आजी पिंकीला समजावत होत्या..
बाप्पाच्या घरी म्हणजे कुठे? आणि त्याच्या घरी गेल्या म्हणून रडायला कशाला हवं? पिंकीला काहीच कळत नव्हतं..
हो ना त्यात रडायला कशाला हवं? मानसी गेली तेव्हा दोन दिवस आधीच तीला मी सांगितलं होतं आता तुझा नंबर. सुलभाला तर चांगलं महिनाभर अगोदर सांगून ठेवलं होतं... आजी सहजच बोलत होत्या.
बाप्पाच्या घरी सर्वाना जावं लागतं का? पिंकीने थोडं घाबरत विचारलं..
हो एक ना एक दिवस सर्वानाच जायचं आहे...
पिंकीला नेमका अर्थबोध होत नव्हता... तरी तीचा चेहरा एवढासा झाला...
इतक्यात बाजूच्या चाळीत राहणाऱ्या अवनीने पिंकीला आवाज दिला भातुकली खेळण्यासाठी..
भातुकलीचं नाव ऐकून पिंकी धूमदिशी पळाली..
पाठमोऱ्या पिंकीकडे बघत सरू आजी मनातल्या मनात खूनशी हसू लागल्या...आणि बोळकं हलवत तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या....
पिंकी आता तुझा नंबर.....
समाप्त
No comments:
Post a Comment