ऐकीव सत्यकथा होती, त्याला शब्दरूप दिले आहे.
:
अनाकलनीय
:
© सौ आरती अत्रे-कुलकर्णी
लेख आवडल्यास लाईक जरूर करावा. लेख इतरांना वाचण्यासाठी शेअर हे ऑप्शन वापरावे. त्यामुळे लेखांमध्ये नंतर केलेले बदलही शेअर होतात. ह्या लेखाचे सर्व हक्क माझ्याकडे सुरक्षित आहेत. कुठेही शेयर करताना माझ्या नावासह शेयर करा. परवानगीशिवाय कथा/लेख कुठेही पोस्ट करु नये.
:
आताशा मीनल आणि तिच्या सासऱ्यांचे अजिबातच पटेनासे झाले होते. सकाळी नोकरीवर जायची गडबड आणि तेव्हाच सासऱ्यांची पूजेचीही. तिने अनेकदा सांगितले कि "बाबा, मी गेल्यावर पूजा सुरु करा. तुम्ही घरातच असतात आणि आई आहेत ना तुम्हाला काही लागले तर आणून द्यायला." पण नाही. तेव्हाच पूजा, तिथेच स्वयंपाकघरात देवघर. मिनलची डबा, जेवण बनवायची गडबड, ऑफिससाठी घड्याळाचा काटा वेळेवर कधीच गाठता आला नाही मीनलला. मध्येच बाबांच्या सूचना -
"जरा वाटीत गरम पाणी हवंय..."
"नैवेद्याला दूध हवंय..."
"कधी कापसाच्या वातीच संपल्यात..."
तर कधी "दिव्यासाठी तूपच द्या..."
तिच्या सासूबाई असायच्या आजूबाजूला पण मुळात स्वयंपाकघरच इतके लहान! त्यातच ओट्यासाठी मांडलेले एक टेबल, एका बाजूला ५-६ बादल्यात पाणी साठवलेले. घासायची भांडी, भिजवायचे धुणे एका बाजूला ठेवलेले... आणि त्यातच एक काॅटही.
सासूबाईंना आत यायलाही जागा नसायची तर त्या कधी येऊन सासऱ्यांना हवी ती वस्तू देणार? अगतिकपणे मिनलची चिडचिड पहायची आणि नवऱ्याचा चढता आवाज ऐकायचा. त्यांनीही अनेकदा नवऱ्याला सुचवून पाहिले "जरा ती गेल्यावर पूजा सुरु करा. तिच्या वेळेत तिला स्वयंपाकघर मोकळे राहू दे. मला तिला मदत करायची असते पण करताच येत नाही त्यामुळे."
सासऱ्यांना ते काही जमायचे नाही. फिरून आले कि लगेच अंघोळ, मग पूजा, नास्ता आणि मग उरलेला दिवस.. आरामच आराम!
मीनलला हेच आताशा नकोसे झाले होते. जो गोंधळ सकाळचा त्यापेक्षा जास्त गोधळ संध्याकाळचा. टीव्हीचा वाढता आवाज, वेळेतच जेवायला बसायचं, वेळेतच झोपायचं ह्या अटी. बोलताना तीव्र वरचा आवाज, सतत टोमणे... कुठेही जायचे असेल, काही करायचे असेल तर 'परवानगी' घ्यायची. ते सांगतील तीच पूर्व दिशा.
तसं मिनलचं तिच्या सासुबाईंशी पटत असे, त्यांची मदतही होत असे तिला पण त्या स्वतःच इतक्या हतबल असत कि ना नवऱ्यापुढे बोलत ना सूनेपुढे.
:
"महेश, आपण दुसरीकडे रहायला जाऊयात." मिनलने निकराने एकदाचे महेशला सांगून टाकले.
"अगं पण, आताचं कुठे वर्ष होतंय आपल्या लग्नाला. दोघांची नोकरी चालू आहे म्हणून थोडे तरी पैसे बाजूला पडत आहेत."
"हे बघ, संसार सुखाचा हवायं का चिडचिडीचा? तुला तर माहितीचे, आपण आता प्लॅनिंग बंद केलंय, कधीही बातमी येऊ शकते. हे असेच राहिले ना तर मी आताच वेडी होईल..."
"जरा धीराने घे, मिनू. मी पुन्हा समजावतो बाबांना."
"संपलाय धीर माझा....नाही झाली काही बचत तरी चालेल पण आपण वेगळे राहूयात, हे नक्की."
"ह्या बाबांना पण ना...कितीही सांगितले तरी ऐकतच नाही. सगळं आपल्याच मनाचं, मनमर्जी. माझं लग्न झालंय, माझ्या-तुझ्याही काही गरजा आहेत हे समजतच नाही त्यांना."
"म्हणूनच म्हणते, छोटे असले तरी चालेल पण वेगळे घर घेऊन राहुयात. हवे असेल तर इथून जवळच घेऊयात म्हणजे आपले लक्ष राहील आणि अगदीच ते दोघे एकटे पडणार नाहीत."
हे संवाद होता होताही अनेक दिवस झाले होते.
अखेर महेशनेही निर्णय घेतलाच.
:
अगदी थोड्यात पूजा करून महेश आणि मीनल भाड्याच्या घरी रहायला आले. बाबांना फारसे पटलेच नाही आणि आईने तर रडून बोलणेच बंद केले. पण उद्याचाही विचार केला पाहिजे, असे ठरवून त्यांनी निर्णय बदलला नाही. खर्च वाढले तसे कामाचे तासही दोघांनी वाढवून घेतले. कसेबसे घरी आल्यावर जेवणे होईपर्यंत झोपायची वेळ होई.
एक मात्र नक्की, मनाला थोडा शांतपणा मिळाला. दोघांमधला सुसंवाद वाढला. अधूनमधून ते घरी जाऊन आई-बाबांना भेटूही लागले. जीवनात थोडीशी स्थिरता आली.
:
आताशा मीनल जास्तच दमलेली दिसायची. काहीवेळेला तर इतकी थकून जायची कि घरी आल्यावर तिला पडल्यापडल्याच झोपही लागे.
मीनल जरा आजारी होती म्हणून आई भेटायला आली आणि सोबत काही खायलाहि घेऊन आली.
"मीनल, आजूबाजूचे झाले का गं ओळखीचे? कोण कोण आहेत शेजारी?"
"फारसे कोणी नाही माहिती. यायलाच इतका उशीर होतो कि सगळ्यांची दारे बंदच असतात तेव्हा..."
"असं कसं गं ? चौकशी केली होती ना घर घ्यायच्या आधी?"
"म्हणजे एकदा पाहून गेलो आणि सगळे नीट वाटले तेव्हा."
"हे बघ, एकतर इतक्या मोक्याच्या ठिकाणी घर असूनही भाडे फारच कमी आहे. नेमके पावसाळ्यात गळते नाहीतर वर पाणीच चढत नाही, म्हणून अशी घरे कोणी घेत नाही आणि घरमालक काय.. देतात कमी भाड्याने. आपण गरजवंत, घेतो गडबडीमध्ये! "
"तसं काही नाहीये हो आई इथे. माणसे नीट राहतात इथे. मी घरी येते ना तेव्हा टीव्हीचा, बोलण्याचा आवाज येत असतो माणसांचा... दिसतात पण."
"मग ठीक आहे. पण हे बघ, इथे आल्यापासून काही ना काही आजारपण चालूच आहे तुझे... म्हणून म्हणते."
:
इथे रहायला येऊनही ३-४ महिने झाले होते.
मिनलकडे चांगली बातमी होती. महेश आणि मीनल एकदम खुश होते. सुरवातीला एकदमच उलट्यांचा त्रास सुरु झाला आणि आई आठवडाभराची इथेच येऊन राहिली. बाबानी कटकट केली पण कारण समजून गप्प बसले.
मीनल अनेकदा झोपूनच राहू लागली. तात्पुरती कामावरून सुट्टीही घेतली. तिला थोडे बरे वाटावे म्हणून तिची कॉट खिडकीजवळ हलवली. खिडकीतून बाहेर वाहणारी नदी दिसे, तिथे येणारे पक्षी, कधी माणसे असे काही काही तिला दिसू लागले.
रात्री एकदम आवाज आला म्हणून जमिनीवर गादी घालून झोपलेल्या आईची झोप चाळवली. त्यांनी एकदम डोळे उघडून मिनलच्या कॉटच्या दिशेने, आवाजाच्या दिशेने पाहिले. मीनल उठून बसली होती आणि खिडकीतून बाहेर कुठेतरी पहात होती.
"मीनल, काय गं? झोप येत नाहीये का?"
मिनलचे लक्षच नव्हते.
"मीनल....ए मीनल..." असे जरासे मोठ्याने म्हणत त्या उठून कॉटपाशी आल्या.
अजूनही...मिनलचे लक्ष नव्हतेच.
महेशची झोप चाळवली तसे त्यांनी त्याला "झोप तू" असे सांगितले. आता आईनी मीनलला हात लावून हलवले तशी ती एकदम दचकून त्यांच्याकडे पाहू लागली. तिच्या नजरेत ओळखच नव्हती.
"कोण...कोण आहे?" ती एकदम स्वतःला आकसून घेत, अंग चोरत म्हणाली.
"मीनल, अगं मी आहे."
मीनल थोडी शांत झाली आणि तिने खिडकीबाहेर बोट दाखवले. तसे त्यांनी बाहेर पाहिले. तिथे काहीच नव्हते.
"काय आहे?"
"काही माणसे आहेत तिथे. नदीच्या पाण्यात उभे राहून काहीतरी मंत्र म्हणत आहेत...बघा ना"
थोड्याश्या आश्चर्याने त्यांनी पुन्हा बाहेर पाहिले....तिथे काहीही नव्हते.
:
दुसऱ्याच दिवशी आईने शेजारी राहणाऱ्या बाईशी बोलत असताना ह्या घराबद्दल विचारले. तिथून घरी आल्यावर त्यांनी संध्याकाळ पर्यंत कसाबसा धीर काढला.
संध्याकाळी महेश आल्यावर म्हणाल्या "महेश, हे घर बाधित आहे म्हणतात सगळे. दुसरे मिळेपर्यंत इथे नका राहू. त्यातून मिनलची तब्येत हि अशी....काय माहिती! ऐक माझं, काही दिवस राहुयात एकत्रच. मिळाले दुसरे घर कि जा रहायला तिथे पण हे घर सोडा."
"असं नाही करता येणार, आई. डिपॉझिट दिलंय, ते कमी मिळेल मध्येच घर सोडलं कि. शिवाय आपल्याला काही अनुभव आलाय का? नाही ना...कशाला आपण विश्वास ठेवायचा?"
"मीनल, तुला काल रात्री, मध्यरात्री खिडकीबाहेर काय दिसलं ते आठवतंय का?"
"मला...? नाही आठवत. छान झोप लागली होती इतके मात्र आठवतंय." मीनल हसत म्हणाली.
"मीनल, तू बाहेर ज्या नजरेने पहात होतीस, मलाही ओळखले नाहीस, जे मला दिसत नव्हते ते तुला दिसत होते... हि सगळी सुरुवात आहे. हे असेच वाढत जाते आणि मगच...मगच विश्वास ठेवणार आहात का तुम्ही दोघे? ऐका ना माझं..." असं म्हणत त्या रडू लागल्या.
"आई, रडू नकोस. माझा एक मित्र आहे, म्हणजे मित्राचा मित्र आहे, गुरुनाथ, त्याच्याशी बोलतो मी. मी ऐकलंय कि तो असं काही असेल तर सांगतो वास्तूबद्दल." महेश समजावत म्हणाला.
"बोलावून बघुयात त्याला, महेश" मीनल म्हणाली.
:
संध्याकाळची वेळ. महेशसोबत अगदी साधा, त्याच्यासारखाच दिसणारा, साधारण त्याच वयाचा एक माणूस होता. इमारतीसमोर उभा राहून डोळे मिटून, हाताची घडी घालून, कसलातरी विचार/चिंतन करत होता.
त्याने डोळे उघडले तेव्हा त्याचे डोळे पाण्याने डबडबलेले होते.
"गुरु, काय झालं?"
"काही नाही. चल, जरा मागच्या बाजूला जाऊयात..." असे म्हणून तो चालायला लागला.
मागच्या बाजूला भिंत घालून त्यावर तारेचे कुंपण होते, इमारत संपल्याची खूण. तरीही मागचे सगळे नीट दिसत होते. त्याच्यामागे उकिरड्यासारखे झाले होते. नदीचे पात्र तसे जवळच होते त्यामुळे पाण्यासोबत आलेला कचराही आजूबाजूला अडकून तिथेच राहिला होता. दूरवर एखाद-दोन गायी, म्हशी दिसत होत्या. भटकी कुत्रीही होती.
गुरु बराच वेळ निरखत राहिला...आजूबाजूचा परिसर, नदीचे पात्र, वाहणारे पाणी, आकाश....
चेहऱ्यावर कोणतेही भाव नाहीत, विचारांची चलबिचल नाही.....निर्विकार!
"चल, घरी जाऊयात" असे म्हणून तो नदीकडे पाठ करून चालूही लागला.
:
तो अतिशय शांतपणे सावकाश जिना चढत होता. आजूबाजूला बंद दारे होती. दारात चपला, दारावर तोरण, वाळलेले हार, १-२ कुंड्या..असे काहीकाही सामान दिसत होते. प्रत्येक मजल्यावर ३ घरे आणि तीनच मजले. तरी त्याने चांगली ८-१० मिनिटे घेतली घरापर्यंत पोचायला.
दारामध्ये उभा राहून तो दाराकडे पहात होता. पूजा झाल्यावरचा वाळलेला हार अजूनही दारावरच होता. दारात आईने काढलेली रांगोळी होती, त्यावर हळदी-कुंकू वाहिलेले होते. दाराच्या उंबऱ्यासारख्या पट्टीवर रांगोळीचा स्टिकर चिकटवलेला होता.
गुरूने हलकेच दार वाजवले.
आईने दार उघडले. समोरच कॉटवर मीनल आवरून सावरून बसलेली होती.
गुरु आणि महेश आत आल्यावर गुरु त्याला दाखवलेल्या खुर्चीवर बसला. आईने आत जाऊन पाणी आणले तसे हातानेच गुरूने "नको" असे सांगितले.
आई आणि मिनलकडे पाहून त्याने हात जोडून 'नमस्कार' असे म्हणले.
डोळे मिटून तो जमिनीकडे पाहू लागला.
आई काही बोलणार तोच त्याने नजर वर केली आणि विचारले "किती दिवस झाले इथे रहायला येऊन?"
"६ महिने"
"काही अनुभव? काही वेगळी जाणीव?"
"म्हणजे तसे काही खास सांगण्यासारखे नाही..." मिनल म्हणाली.
"पण इथे आल्यावर मीनल जास्तच थकायला लागली आहे. आम्हाला वाटले कि ऑफिसचे काम जास्त आहे म्हणून थकत असेल पण... नक्की माहिती नाही. लगेचच हि बातमी आली आणि त्याकडे जरा दुर्लक्षच झाले." आईने सांगितलं.
"कितवा महिना आहे वहिनींना?"
"दीड महिनाच झालाय..पण उलट्यांचा खूपच त्रास सुरु झालाय. डॉक्टर म्हणाले कि हे नॉर्मल आहे, काही काळजीचे कारण नाही." मिनल.
"वहिनी, तुम्हाला काही वेगळे जाणवते का? कसली भीती वाटते का? स्वप्न पडते का?"
"नाही, काहीच नाही. फक्त थकवा आहे, झोपून राहावेसे वाटते." मिनल.
"आपले वडील कुठे आहेत?" महेशकडे पहात त्याने विचारले.
"इथून जवळच घर आहे, तिथे आई-बाबा राहतात." जरासे शब्द जुळवत महेश म्हणाला "बाबांचे जरा पटायचे नाही वागणे तेव्हा आम्ही वेगळे रहायचा निर्णय घेतला."
"हम्म..."
एक बाहेरची आणि आतली खोली म्हणजे तेच स्वयंपाकघर. आतच संडास, बाथरूम. अगदीच लहान खोली होती आतली. त्यामानाने बाहेरची जरा मोठी. इतकेच घर होते. गुरु ज्या खुर्चीत बसला होता तिथूनही त्याला बरेचसे दृष्टिक्षेपात येत होते.
"महेश, वाहिनी..म्हणजे अजून अनुभव आला नाही तरी इथे काही अज्ञात शक्ती आहे. शक्य असल्यास हे घर सोडा."
"अज्ञात म्हणजे..जरा नीटसे सांगा ना.." मीनल म्हणाली.
"हे पहा, सगळेच असे विस्ताराने सांगता येत नाही. काही गोष्टी सांगायच्याही नसतात. तेव्हा फार खोलात जाऊन विचार करू नका, प्रश्नही विचारू नका."
"अहो पण..डिपॉझिट जाईल ना! एक एक पैसा जोडताहेत दोघेही. त्यातून आता दोनाचे तीन होणार म्हणजे..." आई.
"ऐका आई, दोनाचे तीन होणार, हा भविष्यकाळ आहे. तो डोकावून पहायचा नाही. अजून वेळ गेलेली नाही. हे घर नको...हे ध्यानात घ्या आणि हलवा मुक्काम! "
"भविष्यकाळ डोकावून पहायचा नाही...म्हणजे काय? तुम्ही फार कोड्यात बोलता. जे काही असेल ते स्पष्ट सांगा ना." मिनल.
"स्पष्ट ऐकायला कडू असतं आणि पचायला जहर! " गुरू.
"तरीही ऐकवाच...नाहीतर विश्वास कसा बसायचा? आणि पैसे असं निष्कारण वाया जाताना दिसत असेल तर नाहीच बसायचा विश्वास" मीनल एकदम तावातावाने म्हणाली.
"वाहिनी, नुसते सांगून विश्वास ठेवला तर बरे होईल."
यावर महेशने मीनलला "आता तू गप्प राहा" अश्या अर्थाने खूण केली. महेश आईकडे पाहू लागला. आई दोन्ही हाताने गालावर मारून घेत म्हणाली "तुम्ही काय म्हणताय ते समजले काहीच नाही पण हे घर सोडण्यावर तम्ही नक्की आहात ना?"
"हो"
"महेश, आता बस तुमचे इथे रहाणं, चला दोघेही आमच्यासोबत रहायला. बाळ होईपर्यंत रहा आणि मग घ्या पुन्हा वेगळे घर..."
:
:
बराच वेळ शांततेत गेला.
"येतो मी" असे म्हणत गुरु उठला.
"मी आलो सोडून..." असे म्हणत महेश त्याला पोचवायला गेला.
:
"गुरु, मी वचन देतो कि तू आता जे सांगशील ते कोणालाही सांगणार नाही. पण मला खरं खरं सांग, तुला काय जाणवलं/दिसलं म्हणून तू हे घरच सोडून जायला सांगत आहे? तू बाकी काही उपाय नाही का करू शकत? त्या विजयच्या मामाच्या घरी तू काहीतरी पूजा केली होतीस, कधी लोकांना अंगारा देतोस, कधी अमावास्येला करायचे काही उपास सांगतोस. मला मात्र एकदम घरच सोडायला सांगतोस?"
"महेश..."
"गुरु, मी सोडीनही घर पण पैशाचे फार नुकसान होईल रे माझे. म्हणून म्हणतो नक्की काय कारण आहे ते सांग, कृपया सांग..." महेशने हातच जोडले.
गुरूने त्याचे हात धरले आणि एक दीर्घ श्वास घेतला.
"ऐक, नदीकाठी अनेकदा स्मशाने असतात हे तुलाही माहिती आहे ना. कदाचित अनेक अनेक वर्षांपूर्वी इथे, या जागेतही असे काहीतरी होते. मला त्या अज्ञात लहरी, स्पंदने जाणवली. मला लहान बाळांच्या रुदनाचा, वेदनेचा आवाज, आईचा आक्रोश हे जास्त प्रमाणात ऐकू आलंय. म्हणून मी असा अर्थ काढलाय कि इथे लहान बाळांना पुरायची जागा असावी. काळाच्या ओघात हे संपले, गावे वाढली आणि स्मशाने अजून अजून दूर गेली. पण काही गोष्टी इथेच, ह्या जागेत आत आत आहेत. त्या शक्ती चांगल्या नसतात. तेव्हा अजून काही अनुभव यायच्या आत हि जागा सोडावी असे माझे मत आहे."
"पण इतकी लोक राहतात इथे, त्यांना नाही काही अनुभव आला?"
"महेश, सगळ्याचे जीवन सारखे नसते. हा अनुभव तुम्हाला आला कारण तुमच्या घरी नुकताच एक नवा जीव अंकुरला आहे, आकार घेत आहे. कदाचित इथे असणाऱ्या शक्ती त्यामुळे जागृत झाल्या आहेत, ओढल्या गेल्या आहेत आणि त्या मीनल भोवती एकवटायला पहात आहेत. म्हणूनच मी म्हणालो कि भविष्यकाळात डोकावायला जाऊ नका..."
"गुरु..."
"हो. वहिनींची काळजी वाटते म्हणूनच हे घर सोडा. आणि..मनावर दगड ठेऊन ऐक, हे बाळ राहणार नाही."
"काय...? नाही नाही..." महेश रडायलाच लागला.
"महेश, सावर स्वतःला. तुला अजून बऱ्याच दुःखद गोष्टीना सामोरे जायचे आहे." असे बोलून गुरु त्याला थोपटून निघून गेला.
:
मीनल आणि महेश पुन्हा आई-बाबांच्या घरी आले.
मीनल तर एकदमच बदललेली होती. गर्भपात झालेला, नोकरी सुटलेली आणि सतत बाळाचा, परिस्थितीचा विचार करणारी मीनल हि जणू कोणी वेगळीच व्यक्ती होती. अत्यंत कृश, खालावलेली मीनल कोणाच्या आधाराशिवाय बाथरूमलाही जाऊ शकत नव्हती.
आता बाबाही बरेचसे बदलले होते. आपला मुलगा, सून ज्या अवस्थेमधून जात आहेत त्याला अंशतः आपणच जबाबदार आहोत, हे त्यांना माहीती होते. तेव्हाच जरा समजुतीने वागलो असतो तर आज हा दिवस दिसला नसता, असे वाटून ते सर्वांशीच नजर चोरून रहात असत. आणि सारा दिवस देवासमोर बसले तरी त्यांचे मन शांत होत नसे.
महेश जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवू लागला. पैसा हवा, हे कारण असले तरी घरी गेल्यावर रडवेली, उदास मीनल पाहणे त्याला नको वाटे. डॉक्टर म्हणताहेत "पुन्हा लौकरात लौकर चान्स घ्या, त्यांची तब्येत सुधारेल." पण आशेचा किरणच दिसत नव्हता कुठे...दूरदूर पर्यंत! बाबांचा राग राग येत असे, ते डोळ्यासमोरही नकोसे होत असे.
आणि आई! श्वास चालू होते म्हणून ती जिवंत होती. आधी नवऱ्याच्या तर्हेवाईक स्वभावामुळे आतून मेलेली आणि आता आलेल्या अनुभवाने पूर्ण खचलेली.
ह्यामध्ये चूक कोणाची? म्हणले तर नियतीचीच.
एकाने चूक सुधारून बाकी माणसाच्या चुका झाकल्या गेल्या असत्या का?
जसे बाबांनी समजून घेतले असते तसेच मिनलनेही समजून घेतले असते तर? महेशने तिला वेगळे रहायला नकार दिला असता आणि आईने तिला प्रेमाने सांभाळले असते तर?
असो, अनुभवातून शिकावे.
एकाला ठेच लागल्यास दुसऱ्याने सांभाळून चालावे.
:
समाप्त
No comments:
Post a Comment