शाच्च पर्व
पर्व पहिले – अघोर कालींजर
भाग १ – धडा – ३
मागील धड्यांच्या लिंक्स
धडा १ला
धडा २ रा
धडा ३रा
“अरे खर तर ना माला आज जायचा कंटाळा आलाय रे. म्हातारी फार बोर करते. तुला माहितीय ना मागच्या वर्षी येऊन माईला आणि अण्णांना काय विचारत होती. म्हणे की रागिणी अजूनही माझ्याशी लग्नाला तयार आहे. आता मला सांग ही रागिणी जीच लग्न ह्यांनीच मोठ्या थाटामाटात लाऊन दिल, जी आज जवळ जवळ चाळीस पंचेचाळीस कोटींची मालकीण आहे ती परत इथे आता का येईल आणि समजा जर तसं काही असतं तर तिनंच मला नसता का फोन केला. हे म्हणजे ना ह्या म्हातारीला काहीतरी पर्सनॅलीटी डीसॉरडर असावा अस वाटायला लागलाय मला.”
“पण स्वांड्य़ा तुला ती खूप आवडायची की नाही ,खर सांग.” स्वानंदच्या विषयाला बगल देत संतोष म्हणाला.
“साल्या गाडी चालव ना समोर बघून ;..... आधीच मगाशी सतीश काकांनी आणि मालू आत्यानी डोक फिरवलय. आता जास्त काही बोलशील ना तर सरळ रिक्षा करून जाईन” स्वानंद वैतागून म्हणाला.
जीव लावणारे २ / ३ मित्र आणि माई.. सध्या हेच स्वानंदच विश्व होत. काही काळापुरत सगळ्याना अस वाटलं होत की रागिणी आणि स्वानंदच लग्न होईल पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळच घडलं.
महेशकुमार चौहान. संतोषी भाषेत ‘पाकातला गुलाबजाम’. काही काही व्यक्तीना संतोषनी स्वतः नाव तयार केली होती. या पृथ्वीवर फक्त तीनच प्राणी होते की ज्याना ही संतोषी भाषा अवगत होती. एक म्हणजे खुद्द संतोष, स्वानंद आणि विकी. विकिला हे अस तिरकस बोलता यायचं नाही पण स्वानंद आणि संतोष काय बोलतायत हे समजायचं.
संतोषच्या मते, गुलाबजाम जसा दिसतो तसे श्येम टू श्येम रागिणीचे बाबा म्हणजे महेशकुमार चौहान दिसतात. गुलाबजाम सारखा तपकिरी रंग, त्यावर घामानी चमकणार टक्कल, उंची साधारण साडेपाच फूट. मूळ गाव राजस्थानातील कोटा……. १९९० साली त्यांची स्टेट बँक होम लोन डीपार्टमेंटला पुण्यात बदली झाली. नव्वद सालच पुणं चौहान साहेबांना एवढ आवडलं की त्यांनी कुटुंबाला म्हणजे रागिणी, तिची आई उमादेवी आणि आई वडील सगळ्यानांच इथे बोलवून घेतलं आणि कायमचे पुणेकर झाले.
रागिणीच सगळ शिक्षण सेंट हेलेनास मध्ये झालं. पण इथे पुण्यात रहायचं तर इथली भाषा आणि पद्धती शिकायला हव्यात. चौहान साहेबांना त्यांच्या बँकेत कुणीतरी मराठीच्या शिकवणी संदर्भात, माईंची म्हणजेच श्रीमती. सुलोचनाताई केळकर म्हणजेच स्वानंदची आई, यांची ओळख करून दिली. त्या वेळी माई भावे प्राथमिक मधे पहिली ते चौथीला शिकवायच्या.
माईंच्या संध्याकाळच्या शिकवण्यांमध्ये मराठी शिकायला रागिणी पण यायला लागली. पण संतोषी भाषेत सांगायचं झालाच तर तिचा ‘बी एम आर’ झाला होता. म्हणजे बेसिक मधे राडा. म्हणजेच विकी, संतोष, समोरच्या वैद्यांची चींगी, अशी पाच सात पोर चौथीच्या शिकवणीला माईं कडे यायची. चौथी चा वर्ग संपला की मग पहिली ते तिसरी वयोगटातली पोर यायची. वाड्यातल्याच एका खोलीत हे वर्ग भरायचे.
राजस्थानातला जन्म, आई अलमोडाची आणि बाबा राजस्थानचे. रागिणीला मराठीचा म पण माहीत नव्हता. त्यामुळे चौथीत असून सुद्धा तिला माईंनी पहिलीच्या वर्गात यायला सांगितलं होत. रागीणीची नैसर्गिक रीत्या शारीरिक ठेवण पहाडी भागातल्या लोकांसारखी होती. म्हणजे सफरचन्दा सारखे गुलाबी गाल, लांब काळेभोर केस आणि विलक्षण बोलके डोळे. तिच्या वयाच्या मुलांमध्ये ती सगळ्यात उंच होती. ती सगळ्यांपेक्षा खूप वेगळी दिसायची. त्यामुळे हळू हळू मुल तिला चिडवायला लागली. हे माईंच्या लक्षात आलं म्हणून मग माईंनीच स्वानंदला तिला ग म भ न शिकवायला सांगितलं.
स्वानंद केळकर.. हा राजस्थानातून आलेल्या रागिणी चौहानचा पुण्यातला पहिला मित्र झाला. मग हळू हळू स्वानंद, संतोष, विकी ह्या पक्क्या पुणेरी टोळक्यात ती ही अलगद मिसळली. मग नऊवारी, नथ ते भोंडला माईंनी तिला पक्क मराठ्मोळं बनवून टाकलं.
आणि मराठी तर इतकं चांगल झालं होत की पुढे एका जिल्हास्तरीय मराठी नाट्य स्पर्धेत रागीणीनी भाग ही घेतला होता. ह्याच नाटकाच्या रंगीत तालिमीच्या वेळी एकदा रागिणीनी सर्वांदेखत स्वानंदला कीस केलं होत.तेंव्हा सगळ्यांची खात्रीच पटली होती कि ही गोरी गोमटी रागिणी, केळकरांची सून होणार. पण पुढे काहीतरी भलतच वाढून ठेवलं होत.
१० मिनिटात संतोषचा एकशिंगी घोडा लॉ कॉलेज रोडच्या कांचन गल्लीत शिरला. नुकत्याच झालेल्या पावामुळे या परिसरात ताज्या गवताचा, झाडांचा आणि मातीचा असा एक रानवट पावसाळी गंध भरून राहिला होता. या सुखद पावसाळी वातावरणामुळे मनावरचा ताण जरा कमी झाला होता.
कांचन बन सोसायटीच्या बाहेर संतोषनी गाडी लावली. स्वानंद आणि संतोष दोघही गाडीवरून उतरले. पावसामुळे वीज गेली होती पण अंधार पडायला अजुन तसा अवकाश होता. आकाश काळवंडल होत. वेळेचा अंदाज लागत नव्हता. स्वानंदनी घड्याळात पाहिलं तर पावणेसहा वाजले होते. लिफ्ट साहजिकच बंद होती, ढांगा टाकत दोघेही तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. दारावर इंग्रजीत चौहानस् अस लिहील होत पण आता या चौहानस् पैकी फक्त एकच चौहान या तीन बेडरूमच्या फ्लॅट मध्ये राहत होती ती म्हणजे रागीणीची आई उमादेवी.
स्वानंदनी ३ / ४ वेळा बेल वाजवली. मग नेहमीच्या जावाईशोध लावल्याच्या स्वरात संतोष म्हणाला, “म्हातारीकडे इन्व्हर्टर नसेल बहुतेक , तू बडव दरवाजा.”
उमाकाकुनी दार उघडलं. बाहेरच्या झाडांमुळे घरात तसा अंधारच होता पण त्या अंधारातही स्वानंदच्या एक गोष्ट लक्षात आली ,उमा काकुंचा चेहेरा रडून रडून सुजला होता म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर झालय.
रेनकोट, टोपी, बाजूला काढून ठेवत स्वानंद आणि संतोष सोफ्यावर जाऊन बसले. ड्रॉईंग रूम मोठी प्रशस्त होती पण सगळ फर्निचर जुनं होत. सोफ्या समोरच्या भिंतींवर फोटो होते. सगळ्यात पुढे रागीणीच्या बाबांचा फोटो होता. फोटोला घातलेला हार वाळून त्याची फोलकट झाली होती. त्याच्या शेजारी रागीणी आणि अनुरागचा त्यांच्या लग्नातला फोटो होता. तो फोटो बघून स्वानंदच्या जुन्या आठवणी परत ताज्या झाल्या.
महेशकुमार चौहान हा फार तऱ्हेवाईक माणूस होता. उत्तम मराठी येत असूनही सगळ्यांशी ते हिंदीतच बोलायचे. त्यांचा कौटुंबिक हिशोब खूप साधा आणि सरळ होता. पैसा कमावणं सोडलं तर बाकी सगळी जबाबदारी उमादेवीनी घेण अपेक्षित होत. मग रागीणीची शाळा, अभ्यास, मित्र अवांतर कार्यक्रम हे सगळ उमादेवीच बघायच्या.
उमादेवींची मनापसून इच्छा होती की माईंनी रागिणीला सून करून घ्यावी पण चौहान साहेबाना हे कधीच पटणार नव्हत. त्याच कारण म्हणजे विनायकराव केळकर. एकदा रागिणीला शिकवणीला सोडायच्या निम्मित्ताने चौहान साहेबांचे पाय या वाड्याला लागले होते. रागिणीला शिकवणीला सोडून परत जाताना चौहान साहेबाना समोर विनायकराव उभे असलेले दिसले. वय आणि सामाजिक पत यांची कुठलीही तमा न बाळगता महेशकुमार चौहान यांनी सरळ अण्णांना दारू पार्टीसाठी आमंत्रण दिल. आणि वर हेही बोलून गेले , “अरे अन्नाजी ! नमश्कार, रागिनी और उमा बोलती राहती है हमेशा आपके बारे में ! कैसे हो आप. अरे हमारे गरीबखानेमे भी कभी आया करो. हर तऱह की खातिरदारी करेंगे. वैसे कोई नवाबोवाले शौख रखते हो या ऐसे ही पंडित बने फिरते हो.” अण्णांनी फक्त एक मंद स्मित केलं आणि उजव्या हाताची अशी काही श्रीमुखात भडकवली कि पाकातला गुलाबजाम गडगडत वाड्याच्या बाहेर जाऊन पडला. परत सदाशिव पेठेत पाउल जरी टाकल तरी तंगड मोडून हातात देईन हा सज्जड दमही भरला. ह्या प्रकारात चौहान साहेबांचे डाविकडचे ३ दात तुटून हातात आले आणि संतोषी भाषेत दातपडका गुलाबजाम या नावांनी त्यांची नोंद झाली.
ही घटना घडताक्षणी अण्णांनी ताबडतोब उमादेवी, रागिणी, स्वानंद, संतोष आणि माईना एकत्र बोलावलं. शिकवणीच्या खोलीतच बैठक जमली. लहान मुलांना खेळायला पाठवून, उमादेविंकडे बघून अण्णा म्हणाले. “नमस्कार मी विनायक रघुनाथ केळकर” , अण्णांचा आवाज आणि व्यक्तीमत्व हे इतकं भारदस्त होत की समोरच्याला अण्णांचं ऐकल्याशिवाय गत्यंतरच नसायचं. आणि त्यावर त्यांची ती भेदक नजर.... अण्णा जेंव्हा एखाद्याकडे टक लाऊन बघायचे त्यावेळी समोरच्याला असं वाटायच की आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट अण्णांना समजली आहे आणि आता या व्यक्तीपासून आपण काहीच लपवून ठेऊ शकत नाही.
“मी स्वानंदचा आजोबा. मी कोण आणि काय करतो हे आत्ता महत्वाच नाही. पण काल ज्या व्यक्तीला मी या घरातून हाकलून दिल ते आपले पती आहेत हे समजलं. एक कायमची सूचना म्हणून सांगतो. हीच व्यक्ती पुढे रागीणीच्या अकाली मृत्यूसाठी कारणीभूत ठरेल. त्यामुळे या व्यक्तीपासून तुम्ही दोघीही जणी जितक्या लांब राहाल तेवढे चांगले”...............
हे अस काही कानावर पडेल हे उमादेविना स्वप्नातही वाटलं नव्हत. पण कडेलाच बसलेल्या माईंनी प्रसंगावधानानी उमादेविना सावरलं. रागीणीच्या रोजच्या येण्याजाण्याने उमादेवी आणि माई यांच्यात तेवढी मैत्री नक्कीच झाली होती.
अण्णा पुढे बोलू लागले, “जर घरात या व्यक्तीपासून कधीही आणि कुठलाही धोका जाणवला तर केळकरांचा वाडा रागिणी आणि तुमच्या मदतीसाठी सदैव उघडा राहील. वय वर्ष वीस नंतर या मुलीला विशेष जपावं लागेल. संकट इतक्या छुप्या पावलांनी येईल की समजेपर्यंत खूप उशीर झाला असेल........ काळजी घ्या.... तुम्ही निघू शकता.” अशा वेळी अण्णा मुद्दा सोडून कधी एक शब्द ही जास्त बोलत नसत. उमा देवी कशाबाशा सावरत उठल्या. “सुलोचना तू जरा थांब.” उमादेविना माईंनी खुणेनच बाहेर थांबायला सांगितलं.
“एक लक्षात ठेव स्वानंदच्या कार्यभागाची सुरवात रागिणी पासूनच होईल. एकत्र असण आणि एकरूप होण यात फरक असतो. त्यांना फक्त एकत्र ठेव पण पुढच्या अपेक्षा नकोत. स्वानंद आणि रागिणीला आत पाठवून दे.”
दोघाही धाड धाड पळत खोलीत घुसले. ज्या खुर्चीवर स्वानंद बसला त्याच खुर्चीवर त्याला ढकलून रागिणी बसली. स्वानंद मग शेजारच्या खुर्चीवर बसला. रागीणीला अण्णा खूप आवडायचे. सामोरासमोर अशी तिची आणि त्यांची ही पहिलीच भेट होती. अण्णाही मुलांशी हसत खेळत बोलत होते. बोलता बोलता अचानक अण्णांचा आवाज गंभीर झाला आणि रागीणीकडे बघून अण्णा म्हणाले. “बेटा अगर कभी ऐसा हो की आप घरमे अकेले हो और आपके पापा उनके किसी दोस्त को साथ मे लेके आये तो तुरंत स्वानंद या फिर संतोष को फोन करना और यहा चली आना. डीम्ब्या आणि तू ही लक्षात ठेव की रागिणीने जर असा काही फोन केला तर तिला तू आणि आणि संतोष ताबडतोब इथे घेऊन या.” स्वानंदनी फक्त मान डोलावली आणि दोघ परत बाहेर पळाले.
आण्णांच्या या सगळ्या सूचनांचा अर्थ त्यावेळी कुणालाच समजला नव्हता.
पण अता कदाचित ती वेळ आली होती.
जुन्या आठवणींमध्ये स्वानंद पूर्ण बुडाला होता. उमा काकू समोरून पाणी घेऊन आल्या. सोबत राजस्थानातली मठरी पण होती. पाणी समोरच्या टीपॉय ठेवत उमाकाकू म्हणाल्या. “अण्णा म्हणजे सगळ्यांचा आधार होता रे. हमें भी कितना सुकून लागता था. अब आगे क्या और कैसे होगा क्या पता.”
आता उमादेवी स्वानंद आणि संतोषच्या समोरच्या खुर्चीत बसल्या. येताना त्या एक मेणबत्ती घेऊन आल्या होत्या. थोड्याच वेळात त्याची गरज लागणार होती. कारण आता परत मुसळधार पाउस सुरु झाला होता. अर्धवट उघड्या खिडकीतून पाण्याचे शिंतोडे स्वानंदच्या मानेवर पडत होते. घरात तसा अंधार होता पण सगळ दिसत होत.
उमा काकू गंभीर आवाजात बोलू लागल्या.
“स्वानंद बेटा तुला माहितीच आहे की कशा परिस्थितीत रागिणीच लग्न झालं. त्यावेळी पापा आणि मी दोघही किती खुश झालो होतो त्याची तुला कल्पना पण नसेल. लेकीन काश अन्ना की वो बात मुझे उस वक्त याद आती.
६ दिवसांपूर्वी रागीणीचा काल आला होता. संध्याकाळचे सात वाजले होते. ती खूप घाबरलेली होती आणि रडत होती. रागिणी त्यावेळी लता कडे होती. मला मागून लता आणि तिच्या नवर्याचा पण आवाज ऐकू येत होता”. “ही लता कोण?” मधेच स्वानंदनी मठरीचा एक तुकडा तोंडात टाकत विचारलं. “लता रागीणीकडे काम करते. अगदी तिच्या विश्वासातली नौकराणी आहे लता”. “हुं मग,”
“उस दिन अनुराग और मिस्राजी दोनो किसी काम के सिलसिले में दिल्ली गये थे. त्या दिवशी रागिणीला खूप कंटाळा आला होता. उसी समय, तू तिला लग्नात गिफ्ट दिलेल्या कॅमेऱ्याची आठवण झाली. पण मग तिला आठवलं की कॅमेऱ्याची बॅग तर फार्म हाउस वरच विसरलीय. सहा महिन्यापूर्वी जेंव्हा रागिणी जेंव्हा त्यांच्या फार्म हाउस वर गेली होती त्या वेळी फार्म हाउस मधल्या तिच्या खोलीतल्या कपाटात तीन ती बॅग ठेवली होती. तीने लताला विचारलं की तिच्या नवऱ्याला टॅक्सी घेऊन फार्म हाउस वर यायला जमेल का, तेवढाच जरा वेळही मजेत जाईल. लताचीही कळी खुलली. तीन लगेच नवऱ्याला म्हणजे ताराचंदला टॅक्सी घेऊन बोलावलं आणि दुपार का खाना झाल्यावर ते तिघे जण फार्म हाउस वर गेले.
उमा ताईंच बोलण मधेच तोडत स्वानंद म्हणाला, “हो काकू मला आठवलं मागे एकदा रागिणीनी फोन केला होता तेंव्हा ती या फार्महाउस बद्दल बोलली होती. काहीतरी ३० का ४० एकर जमिनीवर हवेली सारखं बांधलय म्हणे. आणि आजूबाजूला जंगल आहे असं काहीतरी ती सांगत होती.”
“हा बेटा, ये मिश्रा लोगोंका जबलपूर के बहार कोई बीजादांडी नाम एक छोटा गाव है. वाहे पे एक बडीसी हवली है. कई बार सॅटर्डे संडे को ये लोग जाया करते है वहा पे. वैसे ये जगह जबलपूर से थोडीसी दूर है ना इस लिये रागिणी कभी अकेले नाही गायी थी वहा.”
आता बाहेर बर्यापैकी अंधार पडला होता. संतोषनी उमा काकुना मधेच थांबवत मेणबत्ती पेटवली. सगळी खोली त्या मेणबत्तीच्या प्रकाशानी उजळून निघाली. बाहेर पावसानी लय पकडली होती. मेणबत्तीच्या प्रकाशात उमादेविंची सावली मागच्या भिंतीवर नाचत होती. उमादेवी पुढे बोलू लागल्या.
वो करीब साढे तीन चार बजे वाहा पाहोचे. बाहेर गाडी लाऊन मग ती आणि लता आत गेले ताराचंद गाडीतच थांबला होता. आत गेले तर हवेलीच मुख्य द्वार उघडाच होत. ते बघून रागिणीला शंका आली. कारण नवरा आणि सासरे दोघही दिल्लीला गेले होते ना आणि हवेलीची देखभाल करणारा धनसिंग पण कुठे दिसेना. पण कदाचित पेस्ट कंट्रोल किवा मरम्मद करायला कोणीतरी आले असेल. पण सावधगिरी म्हणून रागिणी आणि लता चोरपावलांनी हवेलीत मागच्या दारातून हवेलीत शिरले.
अब आगे जो कुच मै कहने जा रही हुं ये बात मुझे लताने बाद मे बातायी बेटा. चोर पावलांनी त्या दोघी आत शिरल्या आणि दिवाणखान्यात येऊन थांबल्या. त्यावेळी वरच्या मजल्यावर असलेल्या रागीणीच्या खोलीतून कोणीतरी मोठमोठ्यांदा मंत्र म्हणल्याचा आवाज येत होता. भाषा समजत नव्हती. पण ५ /६ लोक असावेत.
उमाकाकूंना मधेच थांबवत स्वानंद म्हणाला काकू थोड अजून पाणी आणता का. हा ब्रेक उमादेवींना अपेक्षित नव्हता. पण तरीही काहीही न बोलता त्या उठल्या. तेवढयात स्वानंदनी पटकन खिशातून एक डबी काढली. झाकण उघडून डबी संतोष च्या पुढे केली. त्या डबीत रांगोळी सारखी दिसणारी पावडर होती संतोषनी आणि स्वानंदनी त्या डबीतून पटकन करंगळीच्या नखावर मावेल एवढी पावडर चाटली. मग स्वानंदनी एक बारीक चिमुट पावडर डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवली काहीतरी पुटपुटला आणि संपूर्ण खोलीभर ती पावडर फुंकरली. आणि पटकन दोघही आपल्या जागेवर बसले. काकू आल्या तेवढ्यात पाणी घेऊन.
आणलेल्या पाण्याचे बळ बळच दोन घोट घेत संतोष म्हणाला हा मग पुढे काय झालं.
लता आणि रागिणी चोर पावलांनी हळू हळू वरच्या मजल्यावर गेल्या. आणि...... बेटा उमादेविंचा आवाज आता रडवेला आणि कापरा झाला होता. ....हा काकू बोला. आणि ... तो आवाज रागीणीच्याच खोलीतून येत होता. म्हणून ह्या दोघीजणी रागिणीच्या खोलीपाशी गेल्या. आणि हळूच खोलीत डोकावून बघितलं तर समोर अनुराग उभा असलेला दिसला. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि डोक्यापासून ते पायापर्यंत तो सगळा रक्तानी माखला होता. आणि बेभान होऊन ह: ह: ह्ह.. अस घुमत होता. त्याच ह्या दोघींकडे लक्ष नव्हत. त्याच्या हातात मोठी तलवार होती आणि आणि त्याच्या पुढ्यात मिस्राजी मतलब रागिणी के ससुर, खाली जमीन पे घुतानो पे बैठे थे और मुंडी उपर उठायी थी. आणि अनुरागनी डाव्या हातात त्यांचे केस पकडले होते. आणि सगळे जण जोरात काही तरी ओरडले आणि अनुरागनी मिस्राजींची गर्दन काटली.
आता काकूंना पुढंच बोलावत नव्हत. एकदम संतोष उठला आणि समोरचा पाण्याचा ग्लास उमादेवीन समोर धरला. काकू ओक्साबोक्शी रडत होत्या. स्वानंदही लगेच उठून काकुना सावरायला पुढे आला. शांत व्हा काकू आता मी आलोय ना.
उमादेवींनी जे काही सांगितलं होत ते ऐकून स्वांदन आणि संतोष पुरते हादरले होते. सगळच अनपेक्षित नव्हत पण ते या स्वरूपात हे अस समोर येईल अस वाटलं नव्हत. उसन आवसान आणून स्वानंद काकुना धीर देऊ लागला. रागिणीला मी स्वत: घेऊन येईन काकू तुम्ही पहिल्या शांत व्हा. मन घट्ट करा. आणि एक लक्षात ठेवा रागिणीला अण्णांनी अशा वेळेस काय करायचं हे सांगितलय. तिला काहीही होणार नाही. हे वाक्य उच्चारताना स्वानंदला रागिणीचा घाबरलेला चेहेरा डोळ्यासमोर दिसू लागला. उमादेवी रडता रडता त्या खुर्चीवरच कोसळल्या. संतोष पटकन डॉक ला फोन लाव आणि विकिला पण इथेच बोलव मी घरात इलेक्ट्राल आहे का ते बघतो. हुं म्हणून पटकन संतोषनी फोन लावायला सुरवात केली.
संध्याकाळचे आठ वाजले होते. अजूनही वीज आली नव्हती. बाहेर पाउस कोसळतच होता. स्वानंदनी मोबाईलचा टोर्च चालू केला आणि किचन मध्ये गेला. एक दोन ड्रावर उघडून बघितले पण काहीच सापडेना. शेवटी साखर आणि मीठ घेऊन स्वानंद हॉल मध्ये आला. आणि बघतो तर काय समोरच्या खुर्चीत संतोष दगड होऊन स्तब्ध बसलाय, मोबाईल जमिनीवरच पडलाय आणि फोन चालू आहे, फोनमधून विकीच्या ओरडण्याचा आवाज येतोय पण संतोषची नजर वर भिंतीवर समोरच्या खिळलीय आणि तोंडाचा ऑ झालाय. स्वानंद हातात साखर मिठाच्या डब्या घेऊन आला टीपॉय वर त्या डब्या ठेवल्या आणि संतोषला जाऊन हालवू लागला. संत्या, संत्या अरे काय झालं? संतोषनी समोरच्या भिंतीकडे बोट दाखवलं. आणि बघतो तर काय समोर भिंतीवरच्या फोटोमध्ये एक रागिणीचा पोर्टेट फोटो होता. त्या फोटोतल्या रागीणीच्या चेहर्यात बदल होत होता.
संत्या, ए संत्या भानावर ये. अस म्हणत स्वानंदनी संतोषच्या गालावर दोन चार चापट्या मारून त्याला भानावर आणण्याचा प्रयत्न करू केला. पण संतोष दगड होऊन समोर बघत होता.
फोटोतली रागिणी जाऊन आता तिथे एक भेसूर अभद्र चेहेरा प्रकट झाला होता. मेणबत्तीच्या प्रकाशात ते सगळ अजूनच भेसूर दिसत होत. उमादेवींची शुद्ध हरपली होती. संतोष चे डोळे जरी उघडे असले तरी संवेदना संपल्या होत्या. स्वानंदला आता कळून चुकल होत. की थोडं तयारीनिशी यायला हव होत. पण हा प्रकार एवढा मोठा असेल ह्याची काहीच कल्पना नव्हती. स्वानंद आता त्याच्या खुर्चीत जाऊन बसला. त्या फोटोतल्या रागीणीच्या चेहेर्याला आता एक अमानवी आकार प्राप्त झाला होता. त्या खोलीत आता एक वेगळच वातावरण तयार होऊ लागल होत. मेणबत्तीही आता विझायला आली होती. खोलीत एक धूसर अंधुक लालसर प्रकाश पडला होता. एक वेगळाच उग्र वास जाणवू लागला. समोर फोटोमधली हसणारी रागिणी जाऊन एक भयानक हसरा पाशवी चेहेरा स्वानंद कडे नजर रोखून बघत होता. मंद निरागस हास्य जाऊन तिथे छद्मी कापटी, खुनशी हास्य दिसत होत.
*******************************************************************
© लेखक : रघुनंदन कुलकर्णी.
© Ghost image : Alex Gustav
प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि आवडल्यास शेअर करा.
No comments:
Post a Comment