भुतांचा बाजार
संजय माझा लहानपनीचा मित्र. त्याच्या आईने तिच्या लहानपनची सांगीतलेली गोष्ट. संजयची आई लहान म्हणजे सात आठ वर्षाची असेल.कमल तिचे नाव .त्याकाळी प्रवास हा बैलगाडीनेच असायचा. कमलच्या गावापासून आठ दहा कोसावर असणार्या निपानी गावात दरवर्षी पौष महिण्यात यात्रा भरायची.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रेला जाण्याचे ठरले होते. त्यामुळे जाण्याच्या तयारीची लगबग सुरू होती. यात्रा म्हटली की दोन दिवस तेथे मुक्काम असायचा. दोन दिवस पुरेल असे सर्व खाण्यापिण्याचे साहीत्य बैलगाडीत भरण्यात आलेत. बैलाचे वैरनही बैलगाडीत घेतले. दोन बैलगाड्यातून पंधरा सोळाजण सकाळीच सकाळची चांदणी उगवल्यावर यात्रेला निघाले . पौष महिन्यातील हिवाळ्याचे आल्हाददायक वातावरण . सर्वजण गप्पागोष्टी करीत सकाळी आठ वाजता यात्रेच्या ठिकाणी पोहोचले. छानपैकी पुर्णा नदीत सर्वांनी आंघोळी करुन देवाचे दर्शन घेतले . त्यापैकी काहीजण स्वयंपाकाच्या तयारीला लागले तर काहीजण यात्रेत फिरायला गेले . दुपारी दोनला सर्वाची जेवणे आटोपली. यात्रेत फिरणे, आवश्यक त्या वस्तू यात्रेतून विकत घेणे, यात्रेतील मनोरंजनाचे खेळ पाहणे यामध्ये दोन दिवस मजेत गेलेत. दुसर्या दिवशी रात्री नऊ वाजता ते सर्वजण गावी परत यायला निघाले. दोन्ही बैलगाड्या मागेपुढेच चालत होत्या. मध्ये रस्त्यात एक नाला होता. तो नाला ओलांडला . सर्वजण गप्पागोष्टीत दंग होते. यात्रेतील गमतीजमती सांगत होते. बैल हळूहळू बैलगाड्या ओढत होते . गावी पोहोचण्याची घाई असी कोणालाच नव्हती. रात्री बारापर्यंत आरामात गावात पोहोचू असा त्यांचा अंदाज होता. पण रात्र अंधारी होती. त्या अंधारात मार्गक्रमण चालू होते. त्या भयाण शांततेत नाला ओलांडताच त्यांना एकदोनदा विचित्र आवाज एैकायला आले . त्यामुळे लहान मुले भितीने हळू आवाजात बोलू लागले. मोठी माणसे सर्वांना धीर देत होते .आता मुलांना भुकाही लागल्या होत्या त्यामुळे ते जेवणासाठी हट्ट करु लागली. आणखी थोडे समोर गेल्यावर त्यांना उजेड दिसला . ते पाच दहा घरांचे गाव होते. तेथे थोडावेळ थांबून जेवणे आटोपून समोर जावे असे सर्वानुमते ठरले. म्हणून बैलगाड्या गावाच्या दिशेने वळविण्यात आल्या. गावाबाहेरच बैलगाड्या थांबवल्या व बैल बैलगाड्यांना बांधून त्यांना वैरण टाकण्यात आले. व तेथून थोड्या अंतरावर खाली तडव टाकून सर्वजण बसले . प्रकाशाकरीता कंदिल लावण्यात आले. स्त्रियांनी मुलांना जेवायला वाढून दिले. ते बसले होते तेथून त्यांना गावातील बायामाणसे इकडेतिकडे फिरतांना दिसत होती. कारण गावाच्या समोरच बाजार भरलेला होता . त्याकाळी खेड्यात भरत असे तसाच तो आठवडी बाजार होता. गावातील लोक बाजारात फिरून वस्तू खरेदी करीत होते. यांच्यापैकी एकजण म्हणालाही बाजारात जावून काहीतरी खरेदी करून आणतो . पण स्त्रियां मात्र नाही म्हणत होत्या. तेव्हा त्यांना गावातून दोन स्त्रिया त्यांच्याच दिशेने येतांना दिसल्या . त्या स्त्रियांनी त्यांच्याजवळ येवून त्यांची विचारपूस केली व काही लागले तर सांगा असेहीे म्हटले. गावात चालण्याचासुद्धा त्या आग्रह करीत होत्या . परंतू जाग्यावरून हलावे असे कुणालाही वाटतं नव्हतं कारण एवढ्या रात्रीपर्यंत बाजार कसाकाय अशी शंका त्यांच्या मनात आली होती. शेवटी त्या स्त्रियांनी बाजारात जावून काहीतरी खरेदी करा असेही म्हटले. व त्या परत गावात जायला लागल्या पण चुकून कमलच्या आईचे लक्ष त्यांच्या पायाकडे गेले. त्यांचे पाय उलटे होते. तीने हळू आवाजात बाजूच्या बाईला सांगीतले. एकमेकांच्या कानात सांगत ही गोष्ट सर्वांच्या नजरेत आणून दिली. सर्वजण भितीने गारठून गेले होतेे.तरी त्यांनी हिंमत हरली नाही. सर्वजण शांत शांत होते. मग कमलच्या आईने शक्कल लढवली . आम्ही बाया एका एका मुलाला सोबत घेवून प्रातर्विधीच्या निमीत्ताने डबे घेवून मुख्य रस्त्यापर्यंत जातो.मग तुम्ही माणसांनी सर्व सामान बैलगाडीत टाकून तीथे निघून या. बैलगाड्या मुख्य रस्त्यावर आल्यावर सर्वजण बैलगाड्यात बसून वेगात गाड्या गावाच्या रस्त्याने धावायला लागल्या. कुणीच काहीही बोलत नव्हते. मुलांची भितीने गाळण उडाली होती. त्यामुळे एकाजणाने गाडीतील तडव (मोठी सतरंजी)सर्वांच्या अंगावरून टाकून घेतली. थोडे पुढे जात नाही तोच त्यांना पाठीमागून गावातील लोक मागे धावत येत असल्याचा भास झाला व जोरजोरात विचित्र आवाज एैकू येवू लागले. बैल मात्र जीवाच्या आकांताने धावत होते. आजूबाजूला घनदाट अंधार पसरलेला होता. बैलाना पाठ असल्यासारखा होता. जेव्हा त्यांनी नदी ओलांडली तेव्हा मागून येणारे आवाज थांबले होते. तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. आता संकट टळल्याची त्यांना जाणिव झाली. मग बैलांची धावही कमी झाली. हळूहळू बैलगाड्या गाव जवळ करू लागल्या. रात्री एकला ते गावाच्या शिवेत पोचले. रात्रभर मग भुतांच्याच गोष्टी सुरू होत्या. ते सर्वजण भुतांचा बाजार पाहून आले होते. मी लहाणपनी ऐकलेली हीच पहिली खरी गोष्ट.
अशोक आवारे
अमरावती
No comments:
Post a Comment