कथेचे नाव- "फेरा"
गोष्ट साधारणपणे 80 च्या दशकातील आहे.त्याकाळी आताच्याएवढी मुबलक वहाने व करमणूकीची साधने नव्हती.खेड्यात तर कधीमधी येणारे पडद्यावर 'रिळ'चे सिनेमे तसेच तमाशे याशिवाय काहीच करमणूक नव्हती.
उन्हाळ्याचे दिवस होते,व शेजारच्या रेवंडे गावात एक तमाशा आला होता.रेवंडे गावाच्या परीसरात साधारणपणे सात वाड्या-वस्त्या होत्या,त्यापैकी एका लहान वाडीतील 4/5 तरुणांचे रात्री तमाशाला जायचे नियोजन झाले.साधारणपणे तमाशा रात्री 10 वाजता सुरु होणार होता.तुका,म्हादबा,सखा,अमृता व महिपती पैलवान एवढे पाचजण रात्री जेवण करुन सायकलवरुन निघाले.साधारणपणे त्यांच्या वाडीपासून रेवंडे गाव 5 km अंतरावर होते.रस्ता खाचखळग्यांचा,पाऊलवाटेचा होता.काही ठिकाणी खराब रस्ता असेल तर सायकलवरुन उतरुन चालत जावे लागे.जाताना एका उतारावर एक अोढा होता उन्हाळा असल्याने तो अोढा कोरडा ठणठणीत होता.गावापासून 3 km अंतरावर असेलेल्या अोढ्याजवळ एक वटलेले पिंपळाचे झाड होते.तमाशा पहायला निघालेले मित्र त्याच रस्त्याने निघाले अोढ्याच्या उतारावर रस्ता खराब असल्याने व खडक असल्याने सायकलवरुन उतरुन चालण्याशिवाय पर्याय नव्हता,पौर्णिमा असल्याने चांदणे टिप्पूर पडले होते.जसे ते पिंपळाचे झाड जवळ येऊ लागले तसे अमृता सांगू लागला त्या पिंपळाच्या झाडावर भूताटकी आहे,ब-याच लोकांना तिथे माणूस टांगलेला दिसतो.यावर बाकीच्या तरुण मित्रांनी त्याची टर उडवत खो-खो हसत दाद दिली मुद्दाम उरलेल्या चार जणांनी झाडाखाली थांबत चांदण्यात एखादे भूत दिसते का ते झाडावर पाहिले.अमृतालाही विचारले "कुठाय भूत?"
महिपतीने तर "आज पौर्णिमा आहे भूतांनो हजर व्हा!" असे म्हणत जोरात आरोळी ठोकली.
त्यानंतर अोढ्याच्या चढाने वर येत पुढे असणा-या रेवंडे गावच्या दिशेने सर्वजण सायकलवर निघाले.रेवंड्याला सर्वजण पोहचले.तमाशा फारच करमणूकप्रधान होता.तमाशा संपण्यास साधारणपणे रात्री एक वाजला.पाचही मित्र घरी जाण्यास निघाले तर महिपती पैलवनाची सायकल पंक्चर!उरलेले चौघे म्हणाले आता आम्ही तुझासाठी थांबणार नाही कारण कुणाला पहाटे उठून धारा काढायच्या होत्या,कुणी वडीलांच्या परस्पर तमाशाला आला होता.कुणाला सकाळी पाणी भरायचे होते.मग महिपती पैलवानाला तिथे सोडुन सर्वजण निघाले.महिपतीही त्यांच्यावर भडकला व म्हणाला "मी कुणाला घाबरतो व्हय?"
शेवटी तो पैलवान गडीच! पंक्चर झालेली सायकल चालवत तो निघाला.हळूहळू तो भितीदायक अोढा,पंचक्रोशीत चर्चा चालू असलेले पिंपळाचे झाड जवळ येऊ लागले तसे एकटा असल्याने नाही म्हटले तरी पैलवानला भिती वाटू लागली जसा अोढ्याच्या उताराने उतरु लागला तसा"शू. . . . . शू. . . . . शू. . . . ." असा आवाज येऊ लागला.जस जसे ते वटलेले झाड जवळ येऊ लागले तसा आवाज वाढू लागला त्याच बरोबर रात्रीच्या भयाण शांततेत व कोरड्या उन्हाळ्यात पाणी पडतंय असा भास व्हावा यापध्दतीने "टिप टिप" असा आवाज येऊ लागला आता पिंपळाचे झाड महिपतीच्या काही पावलावरच होते,तसा आवाज वाढू लागला,वटलेल्या वृक्षाखालुन जाताना सायकलच्या हॅंडेलवर काहीतरी टप टप पडतंय असे जाणवले तसे महिपती ने वर बघितले तर एका व्यक्तिचा उजवा हात व डावा पाय मुळासकट तोडून त्याला मारुन उलटे पिंपळाला टांगले होते.व त्या व्यक्तिचे डोळे जणूकाही महिपतीकडे पाहतात असा भास होत होता.व टपटप असा त्या व्यक्तिच्या गळत असलेल्या रक्ताचा आवाज येत होता.समोरचे हे भीषण दृष्य पाहिल्यावर महिपती पैलवानाची बोबडी वळली.मग सायकल खांद्यावर सायकल अडकवून तो पळत सुटला!किती पळत होता याचे भान नव्हते.आता ते वटलेले झाड-अोढा लांब पडला होता.दूर एक गाव दिसत होते.त्या गावाच्या दिशेने महिपती निघाला.गावच्या बाहेर एक कंदिलाचा प्रकाश दिसला मग त्या दिशेने महिपती निघाला-ती एक पानपट्टी होती कंदिलाचा प्रकाश मिणमिणत होता,पैलवान त्या पानपट्टीपाशी धापा टाकत आला खांद्यावरील सायकल पानपट्टी शेजारी टाकली बाहेरील फळीवर महिपती बसला.त्याची ही अवस्था बघून पानपट्टीवाल्याने सांगितले "पाव्हणं काय झालं?शेजारच्या माठातील पाणी घ्या मग बोला!" महिपती घटाघटा दोन तांबी पाणी पिला मग त्याला बरे वाटले.मग पाणपट्टीवाल्याने विचारले "काय पाव्हणं काय झालं?" त्यावर महिपती बोलू लागला व त्याने सुरुवातीपासून सविस्तर घडलेला वृतांत कथन केला.यावर पानपट्टीवाल्याने सल्ला दिला "पाव्हणं कशाला रात्री-अपरात्री भटकता?" एव्हाना त्या पानपट्टीवाल्याने पानाचा एक विडा पैलवानला दिला!पानपट्टीवाला सांगत होता तो टांगलेला माणूस म्हणजे आमच्या गावातील शिरपा न्हावी.या शिरपाचं गावातील एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते.एकदा शिरपा "raid hand" सापडला मग त्या महिलेच्या नव-याने व त्याच्या नातेवाईकांनी शिरपाला उभा फाडला एक हात व एक पाय तोडून अोढयाच्या पिंपळाला टांगला! तो पानपट्टीवाला सांगत होता महिपती पैलवान ऐकत होता त्यानंतर पानपट्टीवाला म्हणाला कोणता पाय व कोणता हात होता?त्यावर महिपती म्हणाला उजवा हात व डावा पाय त्यावर पानपट्टीवाल्याने खाली वाकत
व एक पाय व हात काढून महिपतीला दाखवले "हाच हात व हछ पाय आहे का बघा बरं" महिपतीची बोबडी वळली.कारण इतक्या वेळ कंदिलाच्या मिणमणत्या प्रकाशात न दिसलेला पानपट्टीवाल्याचा चेहरा त्याला दिसला तो चेहरा व पिंपळाला मारुन टांगलेल्या व्यक्तिचा चेहरा एकच होता.
"अहो मीच तो शिरपा हे बघा मला हात नाही व एक पाय नाही." त्यावर महिपती पैलवानचे तोंड-डोळे विस्फारले.क्षणात पानपट्टी नाहिशी झाली व त्या ठिकाणी पिंपळाचे झाड दिसत होते.व पानपट्टीवाला हात व पाय तुटलेल्या अवस्थेत भेसूर अवस्थेत लटकत होता.महिपती पैलवानाच्या शरीरातून कधीच प्राण निघून गेले होते.पिंपळाच्या झाडाखाली महिपती मरुन पडला होता.सायकलवर वरुन रक्त सांडत होते. . . .
No comments:
Post a Comment