#आगंतूक
जुलै 1954, हानेडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (टोकीयो विमानतळ ) जपान
पावसाळ्यातील एक धुंद सकाळ
जपानी इमिग्रेशन खात्यातील अधिकारी नेहमीप्रमाणे विमानतळावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या पारपत्र तपासणी सारख्या दैनंदिन कामात व्यग्र असावेत.
युरोपमधून येणारे एक आंतरराष्ट्रीय विमान धावपट्टीवर उतरले. त्यातून उतरलेले प्रवासी लगबगीने विमानतळाच्या कस्टम आणि इमिग्रेशन काउंटरवर आपआपली कागदपत्रे तपासणीसाठी पुढे येऊ लागले.
एका कोपऱ्यावर सुरु झालेल्या गोंधळाने त्यांच्यातील सिनियर अधिकाऱ्याचे लक्ष वेधून घेतले.
कॉकेशियन वंशाच्या एका उंचपुऱ्या गोऱ्यापान व्यक्तीला त्याचा पासपोर्ट एका वेगळाच देशाच्या नावाखाली असलेला पाहून जपानी इमिग्रेशन अधिकारी चक्रावले.
टॉर्ड या कधीही न ऐकलेल्या देशाचा पासपोर्ट पाहून तो जपानी इमिग्रेशन अधिकारी त्या इसमाकडे संशयाने पाहू लागला.
होय मी टॉर्ड देशाचा रहिवासी आहे. आणि हाच माझा पासपोर्ट आहे.
त्या इसमाने शांतपणे उत्तर दिले.
भल्या माणसा अशा नावाचा कोणताही देश अस्तित्वात नसून तुझा पासपोर्ट कदाचित बनावट नकली असेल. बघू पुन्हा एकदा...
त्या जपानी इमिग्रेशन अधिकाऱ्याने पुन्हा एकदा त्याचा पासपोर्ट त्याच्या हातात घेऊन त्याची तपासणी केली.
सोनेरी तांबडी दाढी असलेल्या त्या गोऱ्यापान व्यक्तीकडे ते पुन्हा संशयाने पाहून बूचकळ्यात पडले.
पासपोर्ट कुठूनही बनावटी नकली असण्याचा थोडाफार ही संशय येत नव्हता. विशेष म्हणजे त्याच्यावर जगातील इतर देशात जाऊन आल्याचे रबरी शिक्के सुद्धा होते. युरोपातील वेगवेगळ्या देशाच्या नोटा त्याच्याकडे होत्या.
होय मी टॉर्ड देशाचा रहिवासीच आहे. आणि तुम्हाला माझ्या देशाचे नाव माहिती नाही?? माझा देश 1000 वर्षापासून अस्तित्वात आहे. तो उंचपुरा गोरापान प्रवाशी थोडासा वैतागून त्यांना म्हणाला.
जपानी अधिकाऱ्यानी त्याच्यापुढे जगाचा नकाशा ठेवला आणि त्याला विचारले.
सांग पाहू?? तुझा देश नक्की कुठे आहे??
त्याने जगाच्या नकाशातील युरोप खंडात असलेल्या स्पेन आणि फ्रान्स या देशाच्या सिमावर असलेल्या अंडोरा नामक एका छोट्याश्या देशाच्या स्थानावर बोट ठेवले.
इथे आहे माझा देश "टॉर्ड "
आपल्या देशाचे नाव जगाच्या नकाशावर अस्तित्वात नसल्याचे पाहून त्याला धक्काच बसला आणि त्यातही आपला देश अंडोरा नामक भलत्याच नावाने ओळखला जातो आहे हे पाहून तो संभ्रमात पडला.
तरीही मी टॉर्ड देशाचाच रहिवासी आहे या विधानावर तो ठाम अडून बसला.
चौकशीचे थोडे वादात रूपांतर होऊ लागले तसे काही जपानी अधिकाऱ्यानी पोलिसांना पाचारण केले.
पोलीस चौकशी दरम्यान सुद्धा त्याने आपण टॉर्ड देशाचा रहिवासी आहोत हाच जुना पवित्रा कायम ठेवला.
आपण जपान मध्ये एका व्यापार चर्चासत्र संदर्भात आलो असून ते संपवून लवकरच मायदेशी जाणार आहोत असे त्याने पोलिसांना सांगितले.
टोकियो मधील नियोजीत भेटीचे ठिकाण त्याला विचारून त्या हॉटेल ला या प्रवाशाबाबत चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे तो सांगत असलेले हॉटेल टोकियोमध्ये अस्तित्वात होते.
अशी कुठलीच आगाऊ बुकिंग हॉटेलला करण्यात आली नसून हॉटेल व्यवस्थापनाने त्या इसमाला ओळखण्याचा साफ नकार दिला.
कदाचित हा गुन्हेगारी वृत्तीचा इसम असावा. कोणत्यातरी गुन्हयाच्या उद्देशाने हा आपली मुळ ओळख लपवत असून याची अजून चौकशी करावी लागेल. या आरोपाखाली त्याला अटक करण्यात येऊन विमानतळाजवळील एका उंच इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर ठेवण्यात आले. सोबतच त्याचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली.
त्याच्यावर देखरेख करण्यासाठी दोन जपानी पोलिसांची त्याच्या खोलीबाहेर नेमणूक करण्यात आली.
--------------------------------------------------------------
दुसऱ्या दिवशी पोलीस त्याची पुन्हा चौकशी करण्यासाठी इमारतीच्या खोलीवर पोहोचले. रात्रीपासून बाहेर रखवाली करत असलेल्या दोन पोलिसांच्या समोर खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. आणि दरवाजा उघडून पाहताच पोलिसांना एकच धक्का बसला.
त्या रहस्यमयी व्यक्तीचे आत कोणतेही अस्तित्व दिसून येत नव्हते. त्याला ठेवण्यात आलेली खोली उंचपुऱ्या इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर असून बाहेर जाण्यासाठी तिथून कोणताही मार्ग नव्हता. निव्वळ एक चिंचोळी झरोकासदृश खिडकी प्रकाश आणि हवेच्या योजनेसाठी तिथे असून त्या छोट्याश्या चिंचोळ्या खिडकीतून बाहेर निघणे तेही इतक्या उंचावरून जवळजवळ अशक्यप्राय होते. वर खोलीत प्रवेश करण्यासाठी एकमेव प्रवेशद्वार होते ज्यातून खोलीत प्रवेश अथवा बाहेर जाता येऊ शकत होते. जपानी पोलिसांच्या कडक निगराणीत त्याला खोलीत ठेवून खिडकी सील केली गेली होती.
पुढचा धक्का अजून बसायचा बाकी असावा.
त्या गोऱ्यापान उंचपुऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी जप्त केलेला पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे रहस्यमयरित्या पोलीस कस्टडीतून त्या व्यक्तीप्रमाणेच गायब झाले होते.
नक्क्की तो व्यक्ती कोण होता?? तो गायब कसा झाला?? " टॉर्ड " नावाचा देश खरेच पृथ्वीवर अस्तित्वात आहे???
या प्रकरणाबाबत वेगवेगळ्या कटसिद्धांत (Conspirasy Theories) मांडल्या गेल्या.
पारलौकिक अथवा समांतर जगातील (parallel World ) हा प्रवासी चुकून आपल्या पृथ्वीवर आला आणि या शक्यतेनुसार आपल्या पृथ्वीसारखी हुबेहूब दुसरी पृथ्वी एखाद्या आयामात अथवा मितित अस्तित्वात आहे. जिथे आपल्या पृथ्वीप्रमाणेच सजीवसृष्टी आहे. फक्त आपल्या पृथ्वीत आणि या दुसऱ्या आयामात असणाऱ्या पृथ्वीमध्ये काहीसे भौगोलीक आणि ऐतिहासिक बदल असावेत.
आपल्या जगात चुकून आलेला हा प्रवासी त्या समांतर जगातील पृथ्वीवरचा रहिवासी असून त्याचा " टॉर्ड " देश हा त्या समांतर जगाचा एक प्रदेश अथवा भूभाग असावा.
या सोबत अजून एक शक्यता अशी वर्तवली गेली कि हा इसम कदाचित टाईम ट्रॅव्हलर (Time Traveller ) असावा जो चुकून आपल्या रूढ विश्वाच्या काळात प्रकट झाला असावा.
या घटनेच्या पुष्टीबाबत उपलब्ध असलेली मुळ कागदपत्रे त्या रहस्यमयी इसमासोबत अदृश्य झाल्याने ह्या घटनेला सिद्ध करता येऊ शकत नाही
अदृश्य असलेल्या समांतर विश्वाचे पदर काहीसे दृश्य करणारी हि रहस्यमयी घटना भौतिकशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक यांच्या क्षेत्रात लोकप्रिय असून काही प्रत्यक्षदर्शीच्या वेगवेगळ्या मतानुसार या मुळ घटनेचे वेगवेगळे प्रकार (Version )लिहिले गेले आहेत.
टॉर्ड देशाचा हा रहिवासी कुठून आपल्या जगात आला होता आणि कुठे गूढरित्या अदृश्य झाला. हे आजमितिस मोठे रहस्यच बनून राहिले आहे.
समाप्त.
2021
संदीप रविकांत मुणगेकर
डोंबिवली
पोस्ट नावासकट शेर करून थोडंफार क्रेडिट द्या
लेकराला
संदर्भ. आंतरजालावर केलेली मुशाफिरी
Parallel dimension वर नेटवर वाचलेले काही लेख.
No comments:
Post a Comment