© ओढ.
By Sanjay Kamble..
एवढं बोलून त्यान आपला मोबाईल खिशात ठेवतच तीच्याकड पाहून किंचित हसला.. खरतर काय बोलावं दोघांनाही समजत नव्हत. गावापासून काहीच अंतरावर नितळ शुभ्र चांदण्यात दोघही एका झाडाखाली बांधलेल्या त्या छोट्या कठड्यावर एकमेकांपासून थोडं अंतर ठेवूनच बसले होते. आकाशातील चंद्राच शुभ्र प्रतिबिंब समोरच्या त्या छोट्याश्या तलावातील उमटणा-या लाटांवर हेलकावे घेताना अधिकच सुरेख दिसायच.. अगदी तशाच भावनांच्या लाटा दोघांच्याही मनात एकमेकांसाठी हेलकावे घेत होत्या...
ती, म्हणजे राधिका... दिसायला गोरी जशी चांदणी चंद्राची, गोल चेह-यावर गोड हासु उमलताना गालांवर पडणारी खळी पाहुन कोणीही अगदी सहज घायाळ होई, , कोरलेल्या सुरेख भुवयांच्या मधे कपाळावर बारीकशी टिकली. नाकात चमकणारी छोटीशी नथ आणी नाजूक ओठांवर बारीकसा तीळ तीच रूप आणखी खालावलत होता... मध्यम बांधा त्यावर फिक्कट गुलाबी पंजाबी ड्रेसवर अधिकच आकर्षक दिसत होती... तसा तो ही कमी नव्हता.. तरूण रूबाबदार, अंगान अगदी भक्कम. पैलवान टाईप.
दोघांच्याही मनात एक गोड गुपित लपल होत, पन मनातलं ते गुपित ओठांवर मात्र येईल एवढं धाडस ना तीच्यात होतं , ना याच्यात...
एरवी एकमेकांना पाहुन हासण, हसुन लाजण, लाजुन नजर चोरनं आणि चोरून पुन्हा पाहणं नेहमीचंच.. त्यासोबतच फोन वर तासंतास बोलणही असायचच... पन एकमेकांना प्रत्यक्ष भेटायची ही वेळ मात्र किती तरी दिवसांनी आली होती... ती ही अशा धुंद एकांतात...
एक गोष्ट खरच अजब असते ना... म्हणजे बघा . आपली आवडती व्यक्ती जेव्हा आपल्या पासून दूर असते तेव्हा मनात बरच काही असतं...
ती किंवा तो जेव्हा भेटेल तेव्हा हे बोलायच, ते बोलायचं, हात हातात घेऊन तासंतास त्याच्या किंवा तिच्या मिठीत विरघळून जायच वगैरे वगैरे...
पन आई बाबांची, बहिण भावाची,
शेजा-यापाजा-यांची, आणी येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर चुकवून जेव्हा प्रत्यक्ष भेटायची वेळ येते...
ती किंवा तो आपल्या समोर असतो
एक धुंद एकांत असतो..
वाराही पिसाट असतो.
रातीच्या काळ्याभोर आकाशात, उगवणारा चंद्र ही अर्धा असतो..
तेव्हा मात्र काळजी जरा जास्तच धडधड असतं,
मन रोमांचित तर गालांवर गोड हसु असतं.
बोलायच असत बरच काही, पन त्या क्षणी भानच कुठं असतं..
आणि आज अशीच काहीशी अवस्था या दोघांचीही झालेली.. बोलायच तर खुप काही होत पन सुरवात कशी करायची ते सुचत नव्हतं..
दुर डोंगरावर असणा-या जंगलात कुठे तरी शुभ्र सुवासित रातराणी बहरलेली होती, आणि वा-याच्या झोक्यासोबत दरवळणा-या त्या सुगंधासोबतच रात्रही पुढं सरकत होती. त्या हव्या हव्याश्या एकांतात कधी तो तीला तर कधी ती याला पाहून गालातच हसत होती... तीनं धाडस करून याच्याकड पाहील आणि काही बोलणार
तोच त्याच्या मोबाईल ची रिंग वाजली.. त्यानही नाईलाजाने फोन रिसिव्ह केला...
" हैलो, विनोद कुठ हाईस.. जेवायला हाॅटेलवर जायचं हाय.." पलिकडून एक मित्र बोलत होता.
" अरे सचिनचा पन फोन आला होता... त्याच्याकड सांगितले होत, एका लय इम्पाॅर्टंट मिटिंगमध्ये आहे... थोड्या वेळान फोन कर.." विनोद च्या आवाजात उतावीळपना अगदी स्पष्ट दिसत होता..
" माहीत हाय पोरगीला भेटायला गेलाईस..." समोरून मित्राच बोलणं ऐकताच तो गालातच हसला...
" बोलत बसला असशील ना..?" मित्र पुढं म्हणाला...
"होय.." विनोद हळू आवाजात म्हणाला..
" होय म्हणून तोंड वर करून काय सांगायला लागलाईस..." मित्र ओरडलाच
" मग..?"
" अशी झटकन जवळ वडायची अनं पटकन किस करायचा..." मित्रान सल्ला दिला ..
" झालं तुमचं... ठेवा आता..."
त्यान फोन कट केला आणि फोन खिशात ठेवून तीच्याकड पहात म्हणाला..
" Sorry... हा... ते .. निवडणूकीच्या जेवणाचे पास भेटलेत ना. दारू मटनाची सोय होती त्यामुळ जो तो फोन करून निमंत्रण देतोय .."
तो स्पष्टीकरण देऊ लागला...
" असुदे.... खरंतर Sorry मी म्हणायला हवं.... जरा उशीराच झाला यायला ना.." ती म्हणाली..
" जरा....? असं काही नाही.. मला वाटलं.. आजही येणार नाहीस." बोलत तो किंचित तीच्या जवळ सरकुन बसला... ती ही तिरक्या नजरेने पाहत होती.
" तुला माहीत आहे ना. किती जणांच्या नजरा असतात... पन नाही जमलं तर तुला फोन करून सांगतेच ना.. " ती खुलासा करू लागली तस समोर पुर्वेला क्षितीजावर टिमटिमणारी एक चांदणी पहात तो म्हणाला...
" रात्र झालीये ना..'' त्याच्या या बावळट प्रश्नानं तीला किंचित हासु आलं...
"हल्ली चांदण्या रात्रीच दिसतात, असं मला तरी वाटतंय."
आणि शेवटी संवाद सुरू झाला एकदाचा..
" असं काही नाही हं... परवा तुझ्या बाबांनी ज्या दोन चार कानाखाली लगावल्या त्यावेळी दिवसापन मस्त नितळ चांदण्यात न्हाऊन गेल्यासारखं मला झालं.."
तो सहज बोलून गेला पण तीला मात्र जिव्हारी लागलं.
" Sorry ना.. पन तु पन call केल्यानंतर आवाज तरी ऐकायचा ना, नेमका कोणी फोन घेतलाय.."
" अग एक्साईटमेंटच एवढी होती ना.. डायरेक्ट बोलून गेलो ग.."
"पन तुला एवढं धुतलं, अस नक्की काय म्हणाला होतास.?" तीनं विचारलं.
तसा तो झटकन म्हणाला.
" विशेष काही नाही ग.. एवढंच म्हणालो..
हैलो राधिका......
गावाच्या बाहेर त्या
तलावाच्या शेजारी
वडाच्या झाडाच्या
लय मोठ्या खोडाच्या
भोवताली कट्यावर .
तुझ प्रेम,
तुझी वाट बघतय..."
त्याच बोलणं ऐकून तीनं आपल्या भुवया उंचावल्या ...
" एवढंच की आणखी काही बोलला होतास..?"
" हो...पुढं म्हणालो ना..
आईची बाबांची,
थोरल्या भावाची,
फिकिर नको करू.
त्या म्हाता-या आबाची..
शपथ तुला ग माझ्या या प्रेमाची.
ये पटकन,
नजर चुकवून सर्वांची..."
त्याचे शब्द ऐकून हलक्याच टाळ्या वाजवत ती म्हणाली..
"खरच अप्रतिम.... नाही म्हणजे तु कविता करतोस इथवर ठीक आहे, पन निदान फोन केल्यावर आपल्याला ज्यांच्यासोबत बोलायच तीच व्यक्ती समोर आहे का, हे समजून घ्याव माणसानं"
" ही कविता नव्हती ग.. रॅप साॅंग... हानी सिंग , बादशाह.." तो उदाहरण देतच होता की पुन्हा मोबाईल ची रिंग वाजली... तीच्याकड पहातच फोन कानाला लावला
"हैलो... किस केलास का...?" पलीकडून मित्र बोलू लागला.. त्या शांत वातावरणात फोन वरचा आवाज तीलाही स्पष्ट ऐकू येत होता...
" नं...नाही अजुन... तु... तुम्ही चालु करा.. मी येईन नंतर.." विनोद चाचपडत बोलत होता.. ती मात्र गालात हसत होती... त्यानं फोन कट केला...
" ते मित्र..." तीच्याकड पहात म्हणाला ...
" हो... चालायचंच... " ती मात्र समजून घेत होती..
तसा कठड्यावर आपल्या बाजूला ठेवलेल्या तीच्या नाजुकशा उजव्या हातावर त्यान आपला डावा हात अलगद ठेवला, त्याच्या त्या स्पर्शाने जणु ती शहारली, सर्वांगातुन एक गोड शिरशिरी उमटली. त्याच्या विरुद्ध दिशेला पाहून तीनं आपले डोळे गच्च मिटून घेतले, तीच्या चेहऱ्यावर गुलाबी लाली आली होती.. त्यानही नकळत तिच्या बोटांमध्ये आपली बोटे गुंफली तस लाजुन तीन त्याच्याकड पाहिलं.. तीच्या डोळ्यात पहात तो म्हणाला
" राधिका... आज तु खुपचं सुंदर दिसत आहेस ग.."
" काही तुझं... पन आज चांदणं मात्र फारच सुरेख पडलंय हा." ती आभाळाकडे पाहत म्हणाली...
" चांदणं रोजच पडतय ग, पण तुझ्या सहवासात ते आणखी उमलुन आलंय..."
त्याच्या या शब्दांनी ती थोडी लाजलीच... त्याच्या याच शब्दांनीच तर तीला मोहीत केलं होतं... आपलं सर्वस्व विसरून ती त्याची झाली होती..
" तुला एक विचारू..." तीच्या आवाजात काळजी होती...
" हा बोल ना"
" तु इथं का बोलवलस भेटायला... ही जागा चांगली नाही रे.. लोक बरच काही बोलतात या जागेबद्दल.."
"काय बोलतात..? "
" विनोद...तुलाही माहीत आहे ना, कितीतरी लोक या तलावात बुडून मेलेत.. असं म्हणतात की या जागेवर एक पिशाच्च आहे जे लोकांना या तलावात खेचत नेत आणी ठार करत."
तीच्या मनातील भिती योग्य होती... गावाबाहेरच्या या तलावात आजवर कित्येक लोक गुढ पणे बुडून मेले होते , त्या लोकांच्या मृत्यूच गुढ कोणालाच उकलल नव्हत... पोलीसांनीही आत्महत्या ठरवून केस बंद करून टाकल्या होत्या... आणि आज यान राधिकाला याच तलावाजवळ बोलवलं होत... त्यांच्यावरील प्रेमाखातर ती ही लोकांच्या नजरा चुकवत आली होती... पन मन मात्र अस्वस्थ झाल होत...
ती कचवचत आजुबाजुला पाहू लागली..
" बघ, हे आजुबाजुला कापलेले लिंबू. दुरड्यांमधे गुलाल टाकलेला पांढरा भात.. काळ्या बाहुल्या.. हे बघून तुला नसेल पन मला भिती वाटते रे..."
आणी समोर पाहील तर विनोद कुठेच दिसत नव्हता..
ती किंचीत घाबरून आजुबाजुला पहातच उभी राहिली..
" विनोद... कुठ आहेस...? प्लिज... मला भिती वाटतेय रे...''
ती काकुळतीला येऊन त्याला साद घालत होती... भितीन काळीज धडधत होत पण तो कुठच दिसत नव्हता...
" विनोद... असं काय करतोयस ... ? मी जाते बघ घरी.."
तीच बोलणं संपत न संपत तोच तीला काहीतरी विचीत्र जाणीव होऊ लागली.. जणू तलावातील पाण्यात कसलीशी हलचाल होत होती.... मघापासून शांत असणार ते पाणी आता कोणाच्यातरी हलचालीन ढवळून जात असल्यासारखं वाटु लागलं... ती समोर पहात एक एक पाऊल मागे सरकत होती की झटकन तीला मागुन कोणीतरी तीच्या खांद्यावर हात ठेवला...
" विनोद खुप झाली मस्करी.. चल आता घरी... मी ट्युशन चा कारण सांगून आली आहे..." बोलतच ती मागे वळली..
" राधिका... किती घाबरतेस ग..?"
...
" विनोद प्लिज... चल जाऊया... मला अस्वस्थ वाटू लागल्याय रे.. मनात नको नको ते विचार येऊ लागलेत..''
तसा विनोद न तीचा हात घट्ट धरून झटकन जवळ ओढल आणि ती त्याच्या मिठीतच आली.. तीच्या गहि-या डोळ्यात पहात तो म्हणाला..
" काय झालं...? घाबरलीस..?"
त्याच्या स्पर्शान तीची भीती किंचित नाहीशी झाली.. मन पुन्हा रोमांचित झालं.... तीनं लाजुन आपल्या पापण्या झुकवील्या तसा थंड वा-याचा एक झोका तीच्या मोकळ्या केसांना उधळत निघून गेला आणि अंगावर सरसरून काटा आला.. तीच देखणं रुप पहात चेहऱ्यावर पसरलेले रेशमी केस तो अलगद बाजूला करु लागला तशी तीच्या काळजाची धडधड वाढू लागली... हवेत कमालीचा गारवा होता... इतक्यात पुन्हा फोन वाजला... विनोद आता जरा वैतगलाच...
" हैलो... जेऊन या तुम्ही... मला नाही जमणार..." तोच समोरची व्यक्ती बोलू लागली...
" अरे मी बोलतेय.. राधिका... मला नाही जमणार आज यायला... ठेवते फोन... काळजी घे.."
समाप्त...
No comments:
Post a Comment