अनाहूत (भयकथा)
सावधान! घर बदलताय? डोळे, कान उघडे ठेवा, अंदाज घ्या आणि मगच निर्णय घ्या. कदाचित ....कुणीतरी तिथं तुमची वाट पाहत असेल.... कायमची सोबत करण्यासाठी.
जागा बदलून त्याला अवघा एकच आठवडा झाला होता. आधीच्या जागेची आठवण सुद्धा त्या चौघांना नको होती, सगळ्यांनीच त्या जागेचा नुसता धसका घेतला होता. तिथले सहा महिने म्हणजे नरकयातने पेक्षा अजिबात कमी नव्हते. कुठून दुर्बुद्धी झाली आणि ते घर मिळालं असं त्या दोघांनाही झालं होतं. चांगली ऐसपैस जागा, अंगण, तुळस, सगळं छान... पण शांतता? ती कुठून आणणार. वडिलोपार्जित घर, वर्षानुवर्ष बंदच होतं ते. त्यानं हट्टानंच ते ताब्यात घेतलं, चौघांचा संसार सुखात होईल ही एकमेव अपेक्षा. पण सहाच महिन्यात चौघांच्या डोळ्याखाली वर्तुळं झाली होती, धाकट्याचा डोळा जाता जाता राहिला होता, थोरल्याचा हात एकदा मोडून झाला होता, तिच्या साडीनं मागच्या अमावसेला पेट घेतला होता आणि तो ....तो तर मरता मरता वाचला होता. पहिल्या दोन महिन्यातच या चौघांनाही समजलं होतं इथे आपण चार नाही .....पाच जण राहतो ते.
चांगलं दोन लाखाचं कर्ज काढून डागडुजी करून घेतली होती, व्हरांडा नीट केला होता, कुंपण बांधून घेतलं होतं आणि किचनची दिशा हि वास्तुशास्त्रानुसार बदलून घेतली होती, पण गोष्टी सरळ व्हायच्या ऐवजी वाकड्याच होत होत्या. लहान्याच्या वाढदिवसाला आजूबाजूची मंडळी, लहान पोरसोरंं जमली होती. नेमकं दिवेलागणीच्या आसपास वरती चुकचुकणारी पाल त्या केक वर पडली. कोणी खाऊ नये म्हणून त्यानं केक तसाच उचलला आणि कोपऱ्यावरच्या वडा खाली ठेवून दिला, एखादं कुत्र-मांजर खाईल म्हणून. बास.... तेवढंच काय ते निमित्त. वाढदिवस झाला, जो तो घरी परतला, अर्ध्याअधिक पोरांना उलट्या झाल्या, घरात सगळ्यांचं पोट बिघडलं. केकच्या मागोमाग, त्या वाढदिवसाला बहुतेक अनाहूत व्यक्ती घरात शिरली होती ........ कधीच न जाण्यासाठी.
त्या दिवसापासून पोरं शाळेला जाता येता धडपडू लागली, तोही बसमधून पडता-पडता वाचला, एक-दोन वेळा उकळत्या चहाचं भांडं तिच्या अंगावर पालथं झालं, असे अपघात होत राहतात म्हणून सगळेच या गोष्टीकडे कानाडोळा करत होते. एकदा पोरं शाळेला गेली होती आणि तो ऑफिसला. ती आंघोळीला गेली आणि दार वाजलं,लगबगीनं बाहेर येऊन बघितलं तर कोणीच नव्हतं. दोन वेळा असचं झालं, कुणीतरी खोडी करत असेल म्हणून सोडून दिलं. पण दुपारी जेवताना, अचानक किचनमधलं भांडं खाली पडलं, ते बघायला गेली तर इकडे टीव्ही कोणीतरी बंद केला आणि तिच्या ताटातला कालवलेला भात अख्या घरभर उधळला होता. आता हे मात्र विचित्र होतं, अवघ्या दोन-चार मिनीटात हे कोण करेल .....काहीच कल्पना येत नव्हती.
संध्याकाळी सगळे घरात असतानाही एकदम भांडी पडायची, ती बघायला गेलं तर बेड मधली अंथरूणं अस्ताव्यस्त झालेली असायची. हल्ली हल्ली पोरांनाही त्या वडाच्या झाडाजवळ खेळायची सवय लागली होती. बारीक-सारीक गोष्टींवरून कुरबुरी सुरू झाल्या होत्या. त्यादिवशी लहाना फ्रीजमधून आईस्क्रीम घेत होता तेवढ्यात कुठून तरी चमचा उडाला आणि त्याच्या डोळ्याच्या खाली लागला, डोळा अगदी थोडक्यात वाचला. मोठा स्टूलवर उभा राहून कपाटावरची पुस्तकं काढत होता, तेवढ्यात कुणीतरी स्टूल खेचलं... धपकन डाव्या हातावर पडला आणि हाड मोडलं.
मागच्या अमावसेला तुळशी-वृंदावनात दिवा उदबत्ती करून ती परत फिरली आणि एका वाऱ्याच्या झोतासरशी उदबत्तीच्या एका ठिणगीनं तिच्या साडीचा वेध घेतला अन् साडी पेटली, त्यानं पटकन पाणी ओतलं आणि कशीबशी ती आग विझवली. आता तर देवापुढे दिवा लावायची ही तिला भिती वाटू लागली. याचाही अनुभव काही निराळा नव्हता, कडक उन्हाळा, विज चमकणे, आभाळ भरून येणे हा काही प्रकार नव्हता पण ज्या वडा खालून तो रोज येत जात होता, जिथं त्यांना केक ठेवला होता त्या वडाची भली मोठी फांदी त्याच्यापासून अगदी वीतभर अंतरावर पडली, डोकं फुटता फुटता वाचलं. एकूणच विचित्र गोष्टी घडत होत्या. दिवस आणि रात्र यांत काहीच फरक राहिला नव्हता. भीत-भीत दिवस काढणे एवढंच काय ते नशिबाला आलं होतं.
रात्रीला अचानक दार वाजणे, टीव्ही चालू होणे, बाथरूम मधून पाण्याचा आवाज येणे, लाइट्स आपोआप चालू बंद होणे असले विचित्र प्रकार सुरू झाले. सगळ्यांनाच रात्र उजाडली की भीती वाटायची आणि कधी सकाळ होते असं वाटायचं. रात्री झोपलेल्या दिशा आणि सकाळी उठल्यानंतर च्या दिशा वेगळ्याच असायच्या. मग त्यानं कुठून तरी एका तांत्रिकाला आणलं, तो आवारत येतो न येतो तोच एक अणुकुची दगड त्याच्या दिशेने आला आणि त्याच्या मांडीत घुसला. तो तसाच त्याचं गाठोडं आणि सोगा धरत लंगडत लंगडत पळत सुटला, जाताना फक्त ......हे घर सोडा...... हे घर सोडा.... एवढंच ओरडत होता.
कसाबसा त्यानं दुसऱ्या जागेचा बंदोबस्त केला आणि अवघ्या सहाच महिन्यात घर बदललं. आता ते जुनं घर पुन्हा पूर्वीसारखं एकटच राहायला लागलं..... कदाचित तीच ओढ, तीच अपेक्षा होती की काय ....कोण जाणे. नव्या घरात गृहप्रवेश करून, कलश ठेवला, पाहुणे मंडळी आली. सगळं कसं शांत आणि मनाजोगं झालं , या दिवसाची ते कधीपासून वाट बघत होते. चौघेही टेकले आणि एकमेकांना बिलगून एकदम छान झोपले .....अगदी सगळे प्रश्न संपल्या सारखे.
सकाळ होताच कालच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या, तिनं उरलेलं अन्न देऊन टाकलं, त्यांनं खराब झालेलं उकिरड्यावर टाकून दिलं आणि परत येऊन बसतो तोच.... दारावरची बेल वाजली. दारात कोणीच नव्हतं .... होता तो फक्त एक गिफ्ट बॉक्स..... कोणीतरी ठेवून गेलं असावं. लहान्यानं मोठ्या उत्साहानं बॉक्स उघडला ....त्यात केक होता आणि एक ग्रीटिंग कार्ड ज्यावर लिहिलं होतं .....
"मला बोलावलंस ...... आणि मी आलोच."
फटकन दार बंद झालं आणि लहान्याचं बोट त्याच्यात सापडलं.
(समाप्त)
No comments:
Post a Comment