#मी येऊ का#
माझे मूळ गाव आजेगाव. तालुका सेनगाव आणि जिल्हा हिंगोली. मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर वसलेले छोटेसे खेडेगाव. मराठवाड्यात असलेल्या या गावाने *हैदराबाद मुक्ती संग्राम* मध्ये दिलेला लढा फार प्रसिद्ध आहे. याच गावात बालपणात माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग मी इथे लिहित आहे.
या गावात एक पुरातन मंदिर आहे. मंदिराचे नाव आहे "केशवराज मंदिर". या मंदिरावर गावातील सर्व लोकांची श्रद्धा आहे. अर्थात "आजेगाव" हे माझे मूळ गाव असले तरी माझ्या वडिलांनी त्यांचे लग्न झाल्यानंतर पोटापाण्यासाठी "उमरखेड" हे गाव निवडले आणि आम्ही नेहमीसाठी तिथेच राहू लागलो.
आजोबाबद्दल मला लहानपणापासून खूप आदर होता जसा इतर सर्व नातवांना असतो. माझ्या आजोबांना सुद्धा माझा खूप लळा होता म्हणून मी हमखास उन्हाळी सुट्टीच्या काळात आजेगाव येथे जात असे.
माझे आजोबा म्हणजे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि धर्मशास्त्राचे प्रकांडपंडीत होते. त्यांच्या शब्दाला गावातील सर्व लोक मान देत असत. दत्तागुरू म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. पोथी पुराणे आणि इतर धार्मिक विधीसाठी त्यांचा फार लौकिक होता. मला ते सर्व पुराणे आणि त्यातील गोष्टी विस्तृतपणे सांगत. आपल्या संस्कृतीतील रीतिरिवाज आजच्या काळातही कसे योग्य आहेत हेही ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत. वय साधारण ७० असताना सुध्दा गावातील भला मोठा परीघ असलेल्या विहिरीच्या पाण्यात शंभर फेऱ्या मारत. या सर्व व्यायामामुळे त्यांचे कमावलेले शरीर हे पाहताक्षणी दिसत होते.
एकदा असेच बारा तेरा वर्षाचा असताना मी "आजेगाव" येथे गेलो होतो. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी मंदिरात दर्शनासाठी निघालो. जुने असले तरी हे मंदिर आजही खूपच आकर्षक आहे. मंदिरातील मूर्ती फारच आकर्षक आणि मनमोहक आहे. या केशवराज मंदिराचा आकार तसा फार विस्तीर्ण आहे आणि अजूनही त्या मंदिराची भव्यता बऱ्यापैकी टिकून आहे. साऱ्या गावात भरपूर एकी आहे. केशवराज मंदिर खूप मोठे आणि त्या मानाने गाव खुपच छोटे आहे. मंदिरात भाविकांची कधीही वर्दळ राहत नसे. कुणीही देवाचे दर्शन घेतल्यानंतर पायऱ्यांवर निवांत बसू शकत असे. मुख्य म्हणजे हे मंदिर भरवस्तीत आहे.
मी साधारणतः चार पाच वाजता केशवराज मंदिरात दर्शनाला जात असे. त्या दिवशीही मी नेहमीप्रमाणे मंदिरात दर्शनाला गेलो आणि सवयीनुसार गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. पहिली प्रदक्षिणा मारताना अचानक एका फरशीवर जेव्हा माझा पाय पडला, त्याच वेळी मला एक आवाज ऐकू आला. "मी येऊ का"? मला वाटले; कुणीतरी हटकून गम्मत करत असेल त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी दुसरी प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली आणि पुन्हा त्याच फरशीवर पाय टाकल्यानंतर पुन्हा मला तसाच आवाज आला "मी येऊ का"? अर्थात याही वेळेस मला स्वतःला भास झाला असेच वाटले आणि मी पुन्हा त्याकडे दुर्लक्ष केले. मी पुन्हा तिसरी प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली. आता मात्र मी हटकून त्या फरशीवर पाय ठेवण्याचे ठरविले होते. त्या फरशीवर पाय ठेवताच पुन्हा एकदा आवाज आला "मी येऊ का?". मी आजूबाजूला पाहिले; तर आसपास कुणीही नव्हते. आता मात्र माझी खात्री झाली की, कुणीही आपली गम्मत करत नाही किंवा आपल्याला भासही झालेला नाही. कारण जर कुणाला माझी गम्मतच करायची असती तर, त्याच फरशीवर पाय टाकल्यानंतर नेमका त्याच वेळेला आणि तस्साच आवाज काढणे हे कोणत्याही व्यक्तीला जमणारच नव्हते कारण आवाज येण्याची वेळ थोडीफार तरी मागे पुढे होण्याची शक्यता होतीच. पण इथे तसे होत नव्हते. कारण त्याच फरशीवर पाय टाकला की "मी येऊ का" असा आवाज येत होता. जणु एखादी अदृश्य शक्ती ठरवुन तसे करीत आहे असे मला मनोमन वाटत होते. आता माझी खात्री पटली की इथे काहीतरी पाणी मुरते आहे. मी पूर्ण मंदिरात सगळीकडे फिरून पाहिले परंतु माझ्या व्यतिरिक्त त्या मंदिरात त्या क्षणी इतर कुणीही नव्हते. मी पूर्ण मंदिर फिरलो पण तसा कुठलाही आवाज इतर कुठल्याही फरशीवर पाय ठेवल्यानंतर आला नाही त्यामुळे मी तडक घरी गेलो आणि सर्व घटना मी माझ्या आजोबांना सांगितली.
माझे आजोबा धर्मशास्त्राचे प्रकांडपंडित असल्याने ते स्वतः याची खातरजमा करण्यासाठी माझ्यासोबत मंदिरात आले. मंदिरात माझ्याबरोबर त्यांनी प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. दहा-बारा प्रदक्षिणा त्यांनी माझ्याबरोबर मारल्या परंतु कुठेही "मी येऊ का"? असा आवाज आला नाही. मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगितले; "आजोबा, या फरशीवर पाय ठेवल्यानंतरच आवाज येत होता". ती फरशी मी त्यांना हाताने आणि पायाने दाखवीत होतो. पुढे मीच त्यांना म्हणालो; "आजोबा, कदाचित तुम्ही माझ्याबरोबर असल्याने तो आवाज येत नसेल का"?. आजोबाला माझे म्हणणे पटले. आजोबा मला घरी घेऊन आले. त्यांनी मायेने मला स्वतः जवळ बसवून माझ्या पाठीवरून हात फिरविला. आजोबा मोठ्या प्रेमाने म्हणाले, "संजू, त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही". जर तू पुन्हा कधी मंदिरात गेला आणि पुन्हा तसा आवाज आला तर तू फक्त एवढेच म्हणायचे की "तुला जर माझे चांगले करायचे असेल तर तू ये आणि जर तुला माझे वाईट करायचे असेल तर तू आहे तेथेच राहा. त्यांनी पुढे असेही विचारले की, तू मंदिरात गेला नाहीस तर चालणार नाही का? मी म्हणालो, मी स्वतःहून जाणार नाही परंतु अजाणता किंवा मित्राने प्रेमाने नेले तर? किंवा कुतूहल म्हणून मीच गेलो तर?? असे म्हटल्यानंतर ते म्हणाले, ठीक आहे. पण मी काय सांगितले ते पक्के लक्षात ठेव; असे त्यांनी पुन्हा एकदा मला समजाऊन सांगितले. ते पुढे असेही म्हणाले, तू दत्तागुरू यांचा नातू आहेस. जीवनात कुणालाच आणि कधीही घाबरायचे नाही आणि तुला कुणी घाबरट म्हटलेले मला सुद्धा आवडणार नाही. त्यामुळे निर्धास्तपणे जा. अर्थात मीही मनात ठरविले होतेच की, आपण जायचेच; कारण आता माझे कुतूहल वाढले होते.. नाहीतरी बालपणीचे वय हे कुतूहल बाळगण्याचे असतेच..
दोन दिवसांनी मी पुन्हा त्याच वेळी म्हणजे साधारण चार पाच वाजता मंदिरात गेलो. आताही मंदिरात कुणीही नव्हते. मी प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली आणि हटकून त्याच फरशीवर पाय ठेवला आणि त्याच वेळी तेथून *मी येऊ का*? असा आवाज आला. मी क्षणाचाही विलंब न करता म्हणालो; तुला माझे सगळे चांगले करायचे असेल तर तू नक्की ये; पण जर तुला माझे वाईट करायचे असेल तर तू आहे तिथेच राहा. असे म्हणून मी पुन्हा प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली आणि त्या फरशीवर पाय ठेवला.. पण त्या फरशीखालून कुठलाही आवाज आला नाही. त्यानंतर मी जवळपास पंचवीस प्रदक्षिणा मारल्या परंतु आता त्या फरशी खालून कुठलाही आवाज येत नव्हता. आता मला खात्री पटली की तिथून आता पुन्हा कधीही आवाज येणार नाही. मी परत एकदा मंदिरातील देवाचे दर्शन घेतले आणि घराकडे आनंदाने धूम ठोकली. घरी येताच सर्व घटना मी आजोबांना सांगितली. आजोबा हसून म्हणाले; छान झाले...याचा अर्थ त्या शक्तीला तुझे किंवा आपल्या कुटुंबाचे वाईटच करायचे होते म्हणून त्याने येण्याचे टाळले. असे म्हणत त्यांनी मला घरातील देवाला नमस्कार करण्यास सांगितला आणि स्वतःही नमस्कार करून माझ्यावरील, घरावरील आणि कुटुंबावरील येणारे संकट टाळले म्हणून त्या देवाला शतशः धन्यवाद दिले.
शब्दांकन:संजय चंद्रकांत आजेगांवकर.
टीप: हे मंदिर आजही या गावी दिमाखात उभे आहे आणि आजही जेव्हा कधी मी आजेगाव येथे जातो तेव्हा हमखास या केशवराज मंदिरात देवदर्शनासाठी जातो.
"केशवराज महाराज की जय".
©® Sanjay Chandrakant Ajegaonkar
सर्वाधिकार सुरक्षित...
*शब्दांकन*- संजय चंद्रकांत आजेगावकर....
No comments:
Post a Comment