पंगत
गच्च झाडींनी भरलेले नि लाल मातीने माखलेले कोकणातील ते एक छोटेसे दुर्लक्षित खेडेगाव होते. खाडीपुल ओलांडला की मोजून चौथ्या मैलावर डाव्या बाजूला एक नागमोडी पायवाट वळायची,ती थेट गावच्या पोटात घेऊन जायची.
गाव फार काही मोठे नव्हते.गावातील पाच पंचवीस घरे एकमेकांना अगदी बिलगून होती. एकंदरीत वर्दळ कमीच होती. तिकडे एकदा सूर्य समुद्रात बुडला की इकडे गाव चिडीचीप होऊन जायचे.जो तो स्वतःला त्या काळोखात गुरफटून निद्रादेवीच्या अधीन होऊन जायचा. मग कुठल्यातरी पडवीतला एखादा केविलवाणा बल्ब केवळ माणसाचे अस्तित्व तिथं आहे हे दाखवण्यापूरता मिणमिणायचा.त्याच्या त्या भकास उजेडाचे ते आक्रसलेले वर्तुळ पाहून कदाचित प्रकाशही त्या वर्तुळाच्या बाहेर जायला घाबरत असावा असे वाटले तर नवल नको!
एक गोष्ट मात्र लक्ष वेधून घेत होती.
ते एकमेव दुमजली घर गावापासून जरासे फटकुन होते.जणू बांधणाऱ्याला गावाशी जास्त लगट नको होती! तिथं राहणारा कारभारी व त्याची बायको आता या दुनियेत नव्हते! त्यांना मुलंबाळं नव्हती. दोघेच नवराबायको तिथं राहायची.त्यांच्या दोघांचेच विश्व होते.पुढे कारभाऱ्याच्या बायकोने आजारपणात त्याची साथ सोडली. मग कारभारी खचला,एकटा पडला. तो शेवटपर्यंत कधी गावकऱ्यात मिसळला नाही.एक विशिष्ट अंतर त्याने कायम राखले.मग एक दिवस त्याचाही मृतदेह त्या घराच्या वरच्या मजल्यावर आढळून आला. त्याला जवळचे नातेवाईकही कोणी नव्हते...एक भाचा होता...तो आला होता...त्याने त्याचा सर्व विधी केला.
पुढे तोच या इस्टेटीचा वारस झाला.
तो मुंबईला राहायचा.कालांतराने त्याचे या घराकडे दुर्लक्ष झाले.वापराभावी मग जे व्हायचे तेच झाले! लवकरच ते घर मोडकळीस येणार अशी चिन्ह दिसू लागली होती.
अशातच त्या घराबाबत अफवा उठत होत्या. शेवटच्या दिवसात कारभारी नको त्या गोष्टींच्या आहारी गेला होता. तिथं तसले प्रकार घडतात म्हणे! काही जणांना त्याचा अनुभवही आला होता.गावात त्याबाबत कुजबुज वाढत होती.एक मात्र खरे की आता रात्रीच काय पण दिवसासुद्धा गावातील कोणीच त्या बाजूला फिरकत नसत!
एक दिवस आश्चर्यच झाले.
त्या घराचे दरवाजे उघडले होते.कोणीतरी तिथे राहायला आले होते.माहिती घेता कळले की ते मलेरिया डॉक्टर आहेत. मुंबईवरून त्यांची या भागात काही महिन्यांसाठी नेमणूक झाली होती. या भागातील दहा बारा गाव त्यांच्या अंतर्गत येत होती.त्यांच्या मित्राला याबाबत कळताच त्याने ते घर त्यांना सुचवले होते. त्यानेच घरमालकाशी त्यांची भेट घडवून आणली होती. तिथेच त्यांना या घराची चावी मिळाली होती.
मुंबईच्या कल-कलाटापासून दूर निवांत काही महिने मिळणार म्हणून डॉक्टर खुश होते.
नारळी पोफळींमध्ये दडलेले ते टुमदार दुमजली घर कोणाला आवडणार नाही?
खाली दोन खोल्या, समोर पडवी,पडवीच्या उजव्या बाजूला शेवटी जिन्यात उघडणारा दरवाजा,जो की आता कुलूपबंद होता. वरचा मजला सेम टू सेम खालच्या सारखाच... घरासमोर पाण्यासाठी आड...
खाली दोन खोल्या, समोर पडवी,पडवीच्या उजव्या बाजूला शेवटी जिन्यात उघडणारा दरवाजा,जो की आता कुलूपबंद होता. वरचा मजला सेम टू सेम खालच्या सारखाच... घरासमोर पाण्यासाठी आड...
जेव्हा त्यांनी ते घर पाहिले तेव्हा ते हर्षोल्हासित झाले. ते एकटेच असल्याने खालच्या दोन खोल्या त्यांना पुरेशा होत्या.
डॉक्टरांना तिथे राहायला येऊन आता महिना उलटला होता. सर्व व्यवस्थित चालले होते. सुरुवातीला गावकऱ्यांनी त्यांना आडून आडून सांगायचं खूप प्रयत्न केला पण डॉक्टरांनी अर्थातच त्यावर विश्वास ठेवला नव्हता.एकमात्र ते मान्य करीत की रात्रीच्या वेळी तिथला काळोख, तिथली शांतता भयावह वाटत होती.पण तसला प्रकार काही तिथं त्यांना जाणवला नाही.गावकरीही गोंधळले होते.
दिवस सरत होते.
त्या रात्री सर्व गाव गाढ झोपेत असताना डॉक्टरांना कोणीतरी जोरजोरात हलवून उठवत होते.
"डॉक्टर...डॉक्टर..."
डॉक्टरांनी डोळे उघडताच आधी प्रखर प्रकाशाने त्यांचे डोळे दिपले मग काही क्षणांनी त्यांना दिसले की घराचे मालक त्यांना उठवत होते.डॉक्टरांना आश्चर्य वाटले. अचानक...न कळवता... हे मुंबईवरून केव्हा आले? त्यांनी सहज घड्याळ पाहिले. अकरा वाजून गेले होते.डॉक्टरांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून ते म्हणाले,
" अहो माझ्या मुलीला पहायला पाहुणे आले आहेत...! मुंबई दूर पडते त्यांना...! बेळगावी आहेत ना ! मग म्हटलं आपलं घर आहे की तिथं ठरवू...! दोघांनाही सोईस्कर...आम्ही आलो... तेव्हा तुम्ही झोपले होता, म्हटले नको तुमची झोपमोड करायला...! बर आता तुम्ही वर या लवकर...! ताटं वाढायला घेतली आहेत...!पाहुणे वाट बघातायेत...!"
ते निघून गेले.
डॉक्टर उठले.आवरून बाहेर पडवीत आले. पूर्ण घर प्रकाशाने झगमगत होते.जिन्याचा दरवाजा उघडा दिसत होता.आजपर्यंत कधी जिना उघडून वर जावे असे त्यांच्या मनात आले नव्हते.
ते सावकाश वर आले. वरच्या खोल्या उघडलेल्या होत्या.त्यांना अजूनही आश्चर्य वाटत होते की आपण इतके गाढ झोपलो होतो की हे आलेले सुद्धा आपल्याला कळले नाही.
जमिनीवर समोरासमोर अशी आठ दहा लोकांची पंगत बसली होती.खोलीत लक्ख प्रकाश पडला होता.
डॉक्टर आत जाऊन रिकाम्या जागेवर बसले.त्यांच्या दोन्ही बाजूला पाहुणे मंडळी बसली होती.कुणीच बोलत नव्हते.सर्वजण एकदम शांत होते.घरमालकही दिसत नव्हते.अनोळखी लोकांशी काय बोलायचे याचा डॉक्टर विचार करत होते.
तेवढ्यात रिकामी ताटं आली.सर्वजण आता अन्नपदार्थ वाढले जाण्याची वाट बघू लागले.
तितक्यात अचानक लाईट गेली.
क्षणात तिथं काळोख पसरला.
तेवढ्यात रिकामी ताटं आली.सर्वजण आता अन्नपदार्थ वाढले जाण्याची वाट बघू लागले.
तितक्यात अचानक लाईट गेली.
क्षणात तिथं काळोख पसरला.
दिवाबत्ती होईपर्यंत आता थांबावे लागणार होते.डॉक्टरांना ती शांतता असह्य झाली.
"काय पाहुणे,कुठल्या गावचे?"
त्यांनी चर्चेला तोंड फोडले.
"......................."
उत्तर आले नाही.
कदाचित प्रश्न कोणाला विचारला हे कळले नसल्याने कोणीच उत्तर दिले नसावे !असे समजून डॉक्टरांनी बाजूला बसलेल्या पाहुण्याच्या मांडीवर थाप टाकण्यासाठी हात चाचपडला तर शेजारची जागा रिकामीच होती.त्यांची दुसरी बाजूही रिकामीच होती.काही क्षणात त्यांना कळले की ती संपूर्ण खोलीच रिकामी होती.तिथं कोणीच नव्हते. फक्त श्वासांचे अगणित आवाज येत होते...
कदाचित प्रश्न कोणाला विचारला हे कळले नसल्याने कोणीच उत्तर दिले नसावे !असे समजून डॉक्टरांनी बाजूला बसलेल्या पाहुण्याच्या मांडीवर थाप टाकण्यासाठी हात चाचपडला तर शेजारची जागा रिकामीच होती.त्यांची दुसरी बाजूही रिकामीच होती.काही क्षणात त्यांना कळले की ती संपूर्ण खोलीच रिकामी होती.तिथं कोणीच नव्हते. फक्त श्वासांचे अगणित आवाज येत होते...
" हं घ्या पहिला घास! करा सुरुवात! "
कुठून तरी ओळखीचा आवाज घुमला.
डॉक्टर त्या सापळ्यात अलगद सापडले होते.
डॉक्टर त्या सापळ्यात अलगद सापडले होते.
त्याचवेळी लक्षावधी डोळे त्या अंधारात चमकले.
डॉक्टरांना हा धक्का पचवता आला नाही.तीच त्यांची शेवटची जाणीव ठरली.ते बाजूला कोसळले.
शेवटी एकदाचे त्या पंगतीला अन्न मिळाले...
समाप्त.
(काल्पनिक कथा)
श्री.आनंद निकम
पुणे 24
पुणे 24
No comments:
Post a Comment