ती काळरात्र (The Unsolved Mystery)
Written By : Abhishek Shelar
Written By : Abhishek Shelar
भाग 2 :-
भाग 1 पासून पुढे सुरु......
ऑफिसमध्येही काम थोडे जास्तच असल्याने त्याला घरी जाण्यास आज उशीरच होणार होता, आणि तसेही आज घरी लवकर जाण्याची त्याला मुळीच घाई नव्हती. कारण त्याची लाडकी पत्नी आज घरी नव्हती.
ऑफिसमधील सर्व कामे उरकून घरी निघेपर्यंत 9.30 वाजून गेले. घरी येताना त्याने एका हॉटेलमध्ये जेवण केले, त्यामुळे घरी येईस्तोवर त्याला जवळजवळ 10.30 वाजले.
घरी येऊन फ्रेश झाल्यानंतर थोडावेळ टाइमपास म्हणून तो टीव्हीवर कॉमेडी serials पाहू लागला... काहीवेळ जातो न जातो तोच कोणीतरी दार वाजवत असल्याचे त्याला जाणवले... दार उघडून पाहिले असता सचिनच्या शेजारी राहणारे दामूकाका आले होते. दिपेशने त्यांना इतक्या रात्री येण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले, “सरिताने तुला ताबडतोब तिच्या घरी बोलावले आहे, खूप महत्त्वाचे काम आहे.” त्यांचा हा निरोप ऐकताच दिपेश पूर्णतः गोंधळून गेला. तो दामूकाकांना काही विचारणार इतक्यात ते काहीही न बोलता तेथून निघून गेले व काही क्षणात दिसेनासे झाले.
हे सर्व काय चालले आहे त्याला काहीच कळत नव्हते. परंतु शेवटी न राहून तो सरिताच्या घरी जाण्यास निघाला. संपूर्ण इमारतीत भयाण शांतता पसरली होती. काहीवेळातच तो सरिताच्या घराजवळ येऊन पोहोचला..... रूमचा दरवाजा किंचित उघडा होता. त्याने बाहेरून दारावर knock करतच त्या दोघांना हाक दिली, परंतु बराचवेळ झाला तरी आतून काहीच प्रतिसाद आला नाही.
खूप वेळ वाट पाहून सरतेशेवटी दरवाजा ढकलून तो आत गेला. संपूर्ण खोलीत मिट्ट अंधार पसरला होता... भिंतीच्या एका कोपऱ्यात तेवत असलेल्या मेणबत्तीचा एकमेव प्रकाश तेवढा त्या अंधाराशी लढण्याची केविलवाणी धडपड करत होता... खोलीतील वातावरण अगदी भकास वाटत होते.... उन्हाळ्याचे दिवस असूनही वातावरणात एक विचित्र असा गारवा जाणवत होता.
काहीवेळाने किचनमधून एक व्यक्ती धावतच बाहेर आली, तिला पाहून दिपेशचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.... ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून सरिताच होती.... “वहिनी तुम्ही?? आश्चर्यचकित होतच दिपेशने विचारले. “भावोजी, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे, परंतु माझ्याकडे वेळ खूपच कमी आहे.” दिपेशचे बोलणे अर्धवट तोडतच सरिता त्याला म्हणाली. बोलताना तिच्या चेहऱ्यावरील भीती त्याला स्पष्टपणे दिसत होती. परंतु ती पुढे काही सांगणार इतक्यात किचनमधून सचिनने तिला हाक दिली... “भावोजी मी 5 मिनिटांतच येते, तुम्ही कुठेही जाऊ नका” असे दिपेशला सांगून घाईघाईतच ती किचनमध्ये गेली.
दिपेशला त्याच्यासोबत काय घडतेय काहीच कळत नव्हते. सर्वकाही अगदी स्वप्नवत असल्यासारखेच भासत होते. त्याच्या मनात असंख्य प्रश्नांचे वादळ घोंगावत होते.... सरिताच्या सांगण्याप्रमाणे तो तिथेच हॉलमध्ये बसून राहिला, परंतु बराचवेळ झाला तरीही ती बाहेर आली नाही.
काहीवेळाने किचनमधून धूर येताना त्याला दिसला, तसेच किंचाळण्याचे व हसण्याचे आवाज येऊ लागले. नेमके काय घडतेय ते पाहण्यासाठी दिपेश धावतच किचनमध्ये गेला आणि समोरील दृश्य पाहून त्याची दातखिळीच बसली....भीतीने हाता-पायांना कंप सुटला.... समोर सरिताचे संपूर्ण शरीर आगीच्या प्रचंड ज्वाळांनी अक्षरशः भाजून निघत होते व त्यामुळे होणाऱ्या मरणयातनांनी ती जोरजोरात किंचाळत होती. त्याहूनही विचित्र बाब म्हणजे भिंतीच्या एका कोपऱ्यात उभे राहून सचिन व त्याचे आई-वडील सरिताच्या त्या जळत्या देहाकडे पाहत मोठमोठ्याने हसत होते.....
विसफारलेल्या डोळयांनी दिपेश समोरील ते सर्व भयानक दृश्य पाहत होता... इतक्यात अचानक सरिताचा तो पेटता देह त्याच्या दिशेने येऊ लागला आणि........ दचकन तो जागा झाला...... स्वप्न..... एक भयाण स्वप्न होते ते.... त्याचे संपूर्ण शरीर घामाने अगदी ओलेचिंब झाले होते.... काळीज भीतीने जोरजोरात धडधडत होते.... समोर पाहिले तर T.V. तसाच चालू होता. T.V. बंद करतच त्याने घड्याळात पाहिले तर मध्यरात्रीचे 2.30 वाजून गेले होते...
बेडवर बसून तो त्या भयाण स्वप्नाचा विचार करू लागला... किती विचित्र होते ते स्वप्न?? सरिताला नेमके काय सांगायचे होते?? आणि तिच्यावर इतके जीवापाड प्रेम करणारा सचिन आणि त्याचे आई-वडीलच तिच्या जीवावर उठले असतील का??..... “असो !! शेवटी स्वप्नच ते, एवढा काय विचार करायचा त्याचा” असे स्वतःशीच म्हणत तो झोपायला जाणार तोच दारावर कोणीतरी थापा मारत असल्याचे त्याला ऐकू आले... इतक्या रात्री दरवाजा उघडणेसुद्धा त्याला बरोबर वाटत नव्हते, म्हणून त्याने Door Lens मधून बाहेर पाहिले, परंतु बाहेर कोणीच दिसत नव्हते. “कोण आहे?” त्याने आतूनच आवाज देत विचारले, परंतु बाहेरून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याच्या शेजारी राहत असलेल्या काकांना दारू पिऊन रात्री उशिरा घरी येण्याची सवय होती, त्यामुळे कदाचित त्यांनीच चुकुन दरवाजा वाजवला असावा असा त्याचा समज झाला.
झोपमोड झाल्याने चिडचिड करत तो त्याच्या बेडपाशी आला असेल, इतक्यात पुन्हा दारावर थापा मारण्याचा आवाज येऊ लागला.... “वाचवा मला !! माझा जीव धोक्यात आहे, खूप त्रास होतोय मला... please वाचवा...” बाहेरून येणाऱ्या या हाका ऐकताच दिपेशच्या काळजात धस्सस झाले.... सर्रर्रर्रकन अंगावर काटा उभा राहिला.... भीतीने हात-पाय सुन्न पडले.... शरीरातील उरला सुरला त्राणही संपला.... तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून सरिताचाच होता....
तिच्या आवाजातील ती आर्तता ऐकून त्याला खूप वाईट वाटत होते, परंतु दरवाजा उघडण्याची हिंमत आता त्याच्यात नव्हती. काहीवेळाने तो आवाज थांबला....
एकाच रात्रीत घडलेल्या या दोन घटना त्याला बरंच काही सांगून गेल्या होत्या... सरिताने खरंच आत्महत्या केली होती का?? की तिच्या घरच्यांनीच काही कट रचून तिला मारले होते?? परंतु तिच्यावर इतके जीवापाड प्रेम करणारी तिची आपलीच माणसं तिच्या जीवावर का बर उठले असतील?? इतक्या हसत्या-खेळत्या कुटुंबामागे कोणते असे गूढ रहस्य दडले होते?? सरिताला नेमके काय सांगायचे होते??......
असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच होते.... परंतु त्या रात्रीने त्याला या सर्व रहस्यांचा उलगडा करण्यास भाग पाडले होते....
दुसऱ्या दिवशी अजून एक विचित्र बातमी त्याच्या कानावर आली.... काल संध्याकाळी गावी जात असताना दामूकाकांचे एका विचित्र अपघातात निधन झाले होते.... होय तेच दामूकाका जे सरिताचा निरोप घेऊन काल रात्री त्याच्या स्वप्नात आले होते.....
या सर्व रहस्यांचा उलगडा करू शकेल का दिपेश??........
To Be Continued.....
No comments:
Post a Comment