A real horror marathi story
#फ्लॅट भाग११
पाटील काहितरी विचार करून निघाला होता… परत त्याच स्मशानात… त्या अघोरी बाबाला भेटायला…
आबा पाटील जाऊन तसा बराच वेळ झाला होता… चंदिला ही गाढ झोप लागली होती… तेवढ्यात बंगल्याच्या दरवाजावर एक जोरदार थाप पडली आणि कोणीतरी बाहेरून आवाज देत होतं…
"चंदे!… ए चंदे!.…"
त्या दारावर पडलेली थाप आणि आलेल्या आवाजाने चंदी खडबडून जागी झाली… बाहेरून येणारा आवाज ओळखीचा होता तरी चंदी ने एकदा आवाज दिला…
"कोन हाये?…"
"अगं म्या हाये!… दार उघीड…"
"हां!… आले आले…"
चांदीने जाऊन दारू घडले…
"आज्जा… तू?…"
आपल्या आज्ज्याला डोळ्यासमोर बघून चंदीच अवसानच गळालं, हात पाय लटपटू लागले आणि चंदी जागेवर बेशुद्ध पडली…
आबा पाटील स्मशानासमोर पोहोचला… स्मशाना समोर फटफटी लावून तो तांत्रिकांच्या झोपडीकडे निघाला… आबा पाटील झोपडीसमोर पोहोचलाच होता की…
"या पाटील… झाला का विचार करून?…"
तांत्रिक झोपडीत धुनी पेटवून त्याच्यात काही तरी टाकत बसला होता…
"बोला काय विचार केलात?…"
"महाराज काय वाट्टेल ते करा पण चंदीच्या जीवाला काही होता कामा नये… नाहीतर…"
"नाहीतर काय?… आता जीव जडला का त्या बाईवर?…"
"तसच समजा हवं तर?… पण तिला काही होता कामा नये…"
"पाटील तुमच काम व्हाव अस वाटत असेल तर तिथं बळी देण गरजेच ए…"
"महाराज तुमच्या डोक्यात काय ए ते मला सविस्तर सांगा…"
"ऐका तर मग… पाटील तुमच्या शेतजमिनीला पाणी लागायचं तर त्या जमिनीला एका कुमाऱ्या मुलींन जन्माला घातलेल्या बाळाचा बळी द्यावा लागेल… आणि मी जी सिद्धी प्राप्त करायला आलोय त्यासाठी मला कुमारी माता पाहिजे… या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत ज्याचा तुम्हाला त्रास ही होतोय…"
हे सगळं ऐकून पाटील सुन्न झाला… काही वेळ विचार करून पाटलाने आपल्या डोक्यातली कल्पना मांत्रिकाला ऐकवली…
"महाराज जे काय माझ्या हातून घडलय त्या सगळ्यातून मला बाहेर पडायचय… तुमच्या मागण्या काय आहेत ते मला कळलंय… आता चंदीपासून होणाऱ्या पोराला मी माझं नाव देऊ शकत नाही… ते मूल जन्माला आल्याने माझ्या आब्रूचे धिंडवडे निघतील, समाजात असलेली इज्जत धुळीला मिळेल, लोक शेण घालायला कमी करणार नाहीत तोंडात… पण या सगळ्यात त्या मुलीचा जीव जावा अस मला वाटत नाही आणि मी ते होऊ ही देणार नाही…
"घुमून फिरून बोलणं खूप झाल पाटील… तुमच्या डोक्यात काय चालू ए ते आता तुमी सांगा…"
"महाराज मला असं पण ते बाळ नको ए…माझ्या शेतीत पाणी लागण्यासाठी तुम्हाला जो बळी द्यायचाय त्या करता ते बाळ तुम्ही वापरा…"
"आणि मं माझ्या सिद्धीचा काय?…"
"तुमच्या सिद्धिसाठी लागणारी एखादी कुमारीमाता मी तुम्हाला मिळवून देतो… बळी गेलेल्या मुलाची आईच तुम्हाला लागेल बळीसाठी असं तर नाही ना?… तुम्ही माझं काम करा, आणि मी तुमच्या कामासाठी एखादी कुमारी आई शोधतो… पण चंदीच्या केसालाही धक्का लागणार नाही…"
"ठीक आहे पाटील तुम्ही असं म्हणत असाल तर असंच होईल… तुमच्या कामासाठी असे पण तुमच्याकडे अजून पाच महिने आहेत… या पाच महिन्यांमध्ये तुम्ही माझं पण काम करा…
"चालतय महाराज… येऊ मी?…"
"चालतंय निघा… रात्र पण भरपूर झाली ए… त्यात अमावाश्या… पण तुम्ही नका काळजी करू, आता तुम्हालाही जपावच लागेल की मला आता…"
पाटील उठून झोपडीच्या बाहेर निघालाच होता की मांत्रिक पाटलाला म्हणाला…
"पाटील तेवढ पाच सहा महिन्यासाठी थोड ते आपलं जेवणाखाण्याच बघा…"
"त्याची काळजी नका करू महाराज… उद्या दुपारी तुमच्यासाठी जो माणूस मटणाचं कालवण आणि भात घेऊन येईल त्याला सांगा तुम्हाला काय काय खायचं ते… आणत जाईल तुमच्यासाठी तो… आणि तुमच्या अटी थोडे दिवस बाजूला ठेवा नायतर अन्नाची चव घेऊन मरायचा एखादा… येतो…"
पाटलान स्मशानातून फटफटी काढली… मांत्रिकाशी सर्व नीट बोलून सुद्धा पाटलाच्या मनातून चंदीची काळजी काही जात नव्हती… स्वतःच्या घरी जाण्याऐवजी पाटलाने परत शेतावरच्या बंगल्याचा रस्ता धरला… पाटील आता चंदीच बाळंतपण आणि त्या बाळाची विल्हेवाट याचा विचार करत होता… खरतर बाळ मारण हे त्याला पटलेल नव्हत… ते मूल जन्माला आल्यानंतर होणारी बेईज्जती, समाजातला आपला असलेला मानमरातब त्याला लागणारा धक्का, पंचक्रोशीत होणारी चर्चा या सगळ्या समोर त्याला बाळाला संपवण हाच पर्याय योग्य वाटत होता… मनाला न पटणाऱ्या या निर्णयावर "आपण चंदीच्या केसालाही धक्का लागू न देता तिला वाचवले" याच पांघरूण घालून समजवायचा प्रयत्न करत होता… पाटील बंगल्याजवळ पोहोचणारच होता इतक्यात रस्त्यातत कोणीतरी आडवं आलं… समोर आलेला माणूस बघून पाटील ही मनातूनं चरकला… पाटील तसा अंगापिंडाने मजबूत गडी होता… कुस्तीत घाम गाळून त्यांनही शरीर कमावलं होतं… पण समोर आलेला माणूस बघून पाटलाला पण भीती वाटली कारण समोरचा माणूस होताच तसा…
काळा आडदांड पण कमावलेलं शरीर… सहा फुटाच्या वर उंची… हातात तेवढ्याच उंचीचा दंडासा ज्याला घुंगरू बांधले होते… पायात कोल्हापुरी वहाणा… अंगावर धोतर आणि काळी बंडी… डाव्या खांद्यावर घेतलेले ते काळं घोंगडं…पायात तोडा… हातात चांदीच जाड सलकडं… उजव्या दंडाच्या बेचकीत बांधलेला तो लाल धाग्यातला ताईत… झुपकेदार मिशा… पार हनुवटीपर्यंत पोहोचलेले ते जाड कल्ले… उजव्या कानात डूल… आणि पिंगट लाल डोळे, नजर एवढी भेदक की एका नजरेतच समोरचा माणूस अर्धा मेला पाहिजे… कमरेला एक विळा लटकवलेला… ओठावरच्या झुपकेदार मिशां वरून कळत होतं की गडी म्हातारा आहे पण त्या पांढऱ्या मिशा सोडल्या तर म्हातारपणाची एकही झलक त्याच्या ऐटीत दिसत नव्हती… तो चालत पाटला समोर आला तेव्हा त्याच्या वाहणां मधल्या विंचवां मधून होणारा कर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज पाटलाच्या मनात चर्रर्रर्रर्रर्रर्र करून गेला…
आपली गाडी कोणा दरोडेखोराने अडवली का अशी पाटलाला शंका आली…
"आबा पाटील तुमीच का?…" म्हाताऱ्याच्या आवाजाला धार होती, जरब होती…
"हो मीच आबा पाटील… कोण तुम्ही?… आणि माझा असा रस्ता का आडवलाय?…"
"म्या धनाजी… चंदीचा आज्जा… तुमच्या संग थ्वाडं बोलायचं व्हतं…"
"चंदीचा आजा?… पण चंदी तर…"
"अनाथ हाये असंच न्हवं?… या थ्वडं बसूनच्यान बोलू…"
पाटलांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावली तिथेच एका दगडावर बसून दोघं बोलायला लागले…
"पाटील!… काय ओ दशा करून ठेवलीया माज्या नातीची?… तुमा श्रीमंतांची मजा आनी माझ्या पोरीच आयुश बरबाद करून टाकलं बगा तुमी… तीच्या इज्जतीच पार भुसकाट करून सोडलय… तिच्या आयुशाची राखरांगोळी करताना तुमास्नी काईच कसं वाटलं न्हाई?… माझी पोर चार महिन्याची पोटूशी हाय… घुमून-फिरून बोलायची माझी सवय न्हाई पण आता त्या लेकरा सोबत तुमी काय करायचं ठरवलंयसा?…"
"बाबा!… जे काही झालंय ते चुकीचं झालंय आणि त्याचा मला ही पचतावा आहे पण विश्वास ठेवा माझ्यावर चंदीच्या केसालाही धक्का लागणार नाही…"
"आनी माज्या पोरीने काय आयुशभर ठेवलेली बाई म्हनून मिरवत फिरायचय व्हय रं?…"
"बाबा तुम्हाला वाटतंय तसं चंदीच्या बाबतीत काहीही होणार नाही… चंदीला मी आयुष्यभर मानात ठेवेन ती या आबा पाटलाची दुसरी बायको म्हणून मिरवेल…"
एक खोटं लपवण्यासाठी हजार खोटी बोलावी लागतात, आबा पाटलांचही तसंच काहीतरी झालं होतं… चंदीचा अचानक समोर आलेला आज्जा, त्याच ते भयानक रूप आणि त्याने विचारला जाब या सगळ्यामुळे त्या म्हातार्याला शांत करणं गरजेचं होतं… खोटी आश्वासनं देऊन तात्पुरती आबा पाटलांन वेळ मारून न्हेली होती… तो जे बोलतोय ते त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यात कधीच करू शकणार नाही हे माहिती होतं त्याला…
"खरंतर धनाजी लांबच्या एका गावात देशमुखा घरी रखवालदार होता… पोरीच्या जातीला आपल्या बरोबर कुठे वणवण फिरवायचं म्हणून आबा पाटलांच्या सासरीच तिला सांभाळायला ठेवली होती… लांब रहात असल्याने वरचेवर तिला भेटायला येणं त्याला शक्य होत नव्हतं… पण यावेळी घोटवडे गावाजवळच्या बापूजीबुवा च्या जत्रेचं निमित्त काढून तो आला होता… आबा पाटलांच्या सासरी गेल्यावर आपली नात शेतावरच्या बंगल्यावर असल्याचं त्याला समजलं… बंगल्यात पोहोचल्यावर आपल्या नातीची असलेली अवस्था आणि तिच्यावर झालेला अन्याय हे म्हातार्याला बघवलं नाही… धनाजी तडक सर्जेराव पाटलाकडे जाब मागायला निघाला होता… बंगल्याकडे चाललेल्या रस्त्यावरून येणारी फटफटी बघून हाच आबा पाटील असावा अशा अंदाजाने त्याने गाडी अडवली… हाच आबा पाटील असेल आणि तो जर माझ्या पोरी बद्दल काही बरं वाईट विचार करत असेल तर अत्ताच त्याचा मुडदा पाडायचा अस मनोमन ठरवलं होतं त्याने… पण आबा पाटलाच्या मनातलं आपल्या नाती बद्दलच प्रेम बघून त्याचं मनही पाघळल होतं… पण या रांगड्या माणसांचा पण एक प्रॉब्लेम असतो वरवर जरी खूप कठोर दिसत असले तरी यांचं मन म्हणजे एकदम कापसासारखं असत, त्याला पाघळायला जास्ती वेळ लागत नाही… धनाजीला आबा पाटलांच्या मनातल आपल्या नाती बद्दलच प्रेम तर दिसलं पण तो जे खोटे वादे करत होता ते मात्र आपल्या नातीच्या प्रेमासमोर त्याला ओळखता आले नाहीत…
"खरंतर धनाजी लांबच्या एका गावात देशमुखा घरी रखवालदार होता… पोरीच्या जातीला आपल्या बरोबर कुठे वणवण फिरवायचं म्हणून आबा पाटलांच्या सासरीच तिला सांभाळायला ठेवली होती… लांब रहात असल्याने वरचेवर तिला भेटायला येणं त्याला शक्य होत नव्हतं… पण यावेळी घोटवडे गावाजवळच्या बापूजीबुवा च्या जत्रेचं निमित्त काढून तो आला होता… आबा पाटलांच्या सासरी गेल्यावर आपली नात शेतावरच्या बंगल्यावर असल्याचं त्याला समजलं… बंगल्यात पोहोचल्यावर आपल्या नातीची असलेली अवस्था आणि तिच्यावर झालेला अन्याय हे म्हातार्याला बघवलं नाही… धनाजी तडक सर्जेराव पाटलाकडे जाब मागायला निघाला होता… बंगल्याकडे चाललेल्या रस्त्यावरून येणारी फटफटी बघून हाच आबा पाटील असावा अशा अंदाजाने त्याने गाडी अडवली… हाच आबा पाटील असेल आणि तो जर माझ्या पोरी बद्दल काही बरं वाईट विचार करत असेल तर अत्ताच त्याचा मुडदा पाडायचा अस मनोमन ठरवलं होतं त्याने… पण आबा पाटलाच्या मनातलं आपल्या नाती बद्दलच प्रेम बघून त्याचं मनही पाघळल होतं… पण या रांगड्या माणसांचा पण एक प्रॉब्लेम असतो वरवर जरी खूप कठोर दिसत असले तरी यांचं मन म्हणजे एकदम कापसासारखं असत, त्याला पाघळायला जास्ती वेळ लागत नाही… धनाजीला आबा पाटलांच्या मनातल आपल्या नाती बद्दलच प्रेम तर दिसलं पण तो जे खोटे वादे करत होता ते मात्र आपल्या नातीच्या प्रेमासमोर त्याला ओळखता आले नाहीत…
"पण एक गोस्ट ध्यानात ठेवा पाटील… माझ्या पोरीला जराजरी दुखावली, तिच्याशी काही वंगाळ वागलात तर या धनाजी सारखा वाईट कोन न्हाई लक्षात ठेवा!…"
वेळ मारून नेण्यासाठी आबा पाटलांनी शक्य होतील तेवढे सर्व कसमे वादे धनाजी ला केले… पाटलाच्याच फटफटीवर बसून धनाजी परत बंगल्यात आला… चंदिला काळजी लागून राहिली होती… आपला आज्जा पाटलांच्या घरी जाऊन काय तमाशा करणार या काळजीत होती… पण आपला आज्जा आबा पाटला बरोबरच परत आलेला बघून ती ही खुश झाली… आबा पाटलांचा आणि चंदीचा निरोप घेऊन तुझ्या बाळंतपणानंतर नक्की येईन असा नातीला वादा करून धनाजी आपल्या गावी निघून गेला… आपण सर्व आता सुरळीत केलं आहे, आता कोणापासून आपल्याला धोका नाही… या विचाराने आबा पाटील निश्चिंत झाला होता… बघता बघता दिवस जात होते… चंदीचा आठवा महिना चालू होता… बाजूच्या गावातील एक सुईण आबा पाटलांनी बंगल्यावर आणून ठेवली होती… चंदीच्या बाळंतपणानंतर जन्मलेले मुल सुईण आबा पाटलाला देणार होती आणि जन्मताच तुझं बाळ मेलेलं जन्मल होतं अस चंदिला पटवून देणार होती…
आबा पाटलांनी बाजूच्याच गावातली एक कुमारी माता शोधून ठेवली होती… चंदीच्या बाळंतपणानंतर त्याच रात्री बाळाचा बळी देऊन त्या पुढच्या येणाऱ्या अमावास्येला ती मुलगी मांत्रिकाच्या हवाली करायची असा डाव पाटीलाने रचला होता… दोन दिवसात चंदीच बाळंतपण होईल, वेळ जवळ आली आहे… असा निरोप सुईणी कडून पाटलाला मिळाला… मांत्रिकाशी बोलून आबा पाटलांनी सर्व तयारी करून ठेवायला सांगितली… चंदीच्या बाळंतपणाचा दिवस उजाडला… शेत जमिनीच्या कामासाठी तालुक्याच्या गावाला जातोय, दोन दिवसांनी परत येईन असं घरच्यांना सांगून पाटील सकाळीच आपल्या एका विश्वासू माणसाला बरोबर घेऊन स्मशानातल्या मांत्रिकाच्या झोपडीत येऊन थांबला… चंदीच बाळंतपण संध्याकाळनंतरच करायचं; मी पण येतोय असा निरोप त्याने सुईणीला पाठवला… संध्याकाळ झाल्यावर पाटील शेतावरच्या बंगल्यात पोहोचला… बंगल्यात आता फक्त चंदी आणि ती सुईण या व्यतिरिक्त आबा पाटील आणि त्याचा विश्वासू माणूसच होता चंदिला सकाळपासून प्रसूती वेदना होत होत्या… रात्र होत आली होती आणि जीवघेण्या प्रसूती वेदनांवर मात करून चंदीन एका गोंडस मुलाला जन्म दिला… पण आधीच ठरल्यानुसार सुईणीने ते बाळ आबा पाटील यांच्या हवाली केल… प्रसूतीमुळे चंदी अजून बेशुद्धावस्थेतच होती… तिची काळजी घ्यायला सांगून आबा पाटील आपल्या साथीदाराबरोबर ते बाळ घेऊन निघाला… पाटलाच्या शेत जमिनीत एका अर्धवट खोदलेल्या विहिरीच्या तोंडावर मांत्रिकाने सर्व पूजेची तयारी केली होती… बाळाचा जन्म झाल्या झाल्या त्या सुईणीने बाळाला कुठलंसं चाटण चाटवलं होतं, जेणेकरून बाळ झोपलेलं राहील… साधारण मध्यरात्री आबा पाटील त्या बाळाला घेऊन अर्धवट खणलेल्या त्या विहीरीकडे पोहोचला… मांत्रिक सर्व तयारी करून आधीच तिथे हजर होता… अर्धवट खणलेल्या त्या विहिरीच्या बाजूला मांत्रीकाने अजून एक खड्डा खणून ठेवला होता… जसा आबा पाटील त्या बाळाला घेऊन विहिरीकडे पोहोचला मांत्रीकाने आपले विधी सुरु केले… काही अघोरी प्रकार आबा पाटलांनी या आधीपण बघितले होते… पण आजचे चित्र काही वेगळेच होते… मांत्रिकाच्या झोपडीतली ती मूर्ती मांत्रिकाने विहिरीच्या बाजूला खणलेल्या खड्ड्याच्या तोंडावर ठेवली होती… तिच्या आजूबाजूला मांत्रिकाने चार-पाच कवट्या ठेवल्या होत्या… त्याच्यामध्ये दारू हळद कुंकू काळे तीळ अशा गोष्टी ठेवल्या होत्या… एका कवटी तर रक्त होतं… ते सर्व प्रकार बघून आबा पाटलाच्या अंगावर काटा आला… तिथेच बाजूला एक उलट्या पिसाची कोंबडी पण ठेवलेली होती… मांत्रिकाने विधी सुरु केले तसं आजूबाजूचं वातावरण बदलत होतं… मांत्रिकाचे मंत्र त्या वातावरणात घुमत आहेत असं वाटायला लागलं… मांत्रीकाने कवट्यां मधली एकेक वस्तू थोडी मूर्तीच्या अंगावर आणि उरलेली त्या खड्ड्यात टाकायला सुरुवात केली… असं करत करत सर्व वस्तू संपल्या… मांत्रिकाने ती उलट्या पिसाची कोंबडी घेतली आणि एका धारदार ब्लेडने तिचा गळा चिरून तिच्या रक्ताचा अभिषेक त्या मूर्तीवर केला आणि ती कोंबडी त्या खड्ड्यात टाकून दिली… ती पाय पंख आणि चोच बांधलेली ती कोंबडी विचित्रपणे त्या खड्ड्यात तडफडत होती… शेवटच्या विधीसाठी पाटलाचा हातातलं बाळ मांत्रिकाने स्वतःच्या हातात घेतलं… हे सगळं थांबवाव असं पाटलाच्या मनात आलं… पण उद्या सकाळी उठणारा प्रत्येक व्यक्ती आपल्याला या बाळाबद्दल विचारेल आणि आपल्याकडे सांगायला काहीही उत्तर नसेल या विचाराने आबा पाटलांने हे थांबवायचा विचार झटकून टाकला… मांत्रिकाने ते बाळ हातात घेऊन मूर्तीचा पायाला स्पर्श केल आणि ते खड्ड्यात ठेवून दिलं… आता मांत्रिक हा खड्डा बुझवणार हे आबा पाटलाला कळत होत पण वळत नव्हतं… आपल्या समाजातल्या इब्रतिपाई तो एका निष्पाप जिवाचा बळी द्यायला चालला होता… या सगळ्याला थांबवता आलं असतं पण त्याने नाही थांबवलं… भविष्यात काय काय होणार आहे याबद्दल आबा पाटील अनभिज्ञ होता… मांत्रिकाच्या पूजेतला शेवटचा भाग सुरु झाला… ते जिवंत बाळ ठेवलेला खड्डा बुजवायला मांत्रिकाने आणि आबा पाटलांच्या त्या माणसाने दोघांनी मिळून तो खड्डा बुजवला… तो खड्डा खणायचा आधी जशी ती जागा होती तशीच ती परत करून ठेवली… आपल्या हव्यासापोटी आबा पाटलांनी एकाने निष्पाप जीवाला मारलं होतं… बळी दिलेली जागा पूर्ववत करून मांत्रिकाला त्याच्या स्मशाना कडे जायला सांगून आबा पाटील परत शेतातल्या बंगल्याकडे निघाला… अख्खा रस्ताभर आपण केलं ते चूक की बरोबर या विचारातच आबा पाटील होता… पण आता त्याला जास्त विचार करून चालणार नव्हतं… त्याची चंदी आता शुद्धीवर येणार होती… आत्ता तिला सगळ्यात जास्त आबा पाटलाची गरज होती, तोच होता जो तिला समजावून देणार होता की तिच बाळ मेलेलं जन्माला आल म्हणून आणि त्या सगळ्यात चंदी आधारही फक्त आबा पाटलांचा शोधणार होती… आपल्याच मुलाला स्वतःच्या हाताने मारून तो चंदीच सांत्वन करायला निघाला होता… आबा पाटील शेतातल्या बंगल्या जवळ पोहोचला… सगळीकडे निरव शांतता होती… अजून थोड्या वेळात तांबडं फुटणार होतं… पाटलाने बंगल्याच्या गेटवर आपली फटफटी लावली… तो आणि त्याचा साथीदार बंगल्याच्या गेट मधून आत शिरले… बंगल्यात राखणदार म्हणून जे जोडपं होतं त्यांना गेट जवळच एक झोपडीवजा घर बांधून दिलं होत, त्यांचं ते झोपड कोलमडलं होतं आणि झोपडीच्या दारात त्यांचे मृतदेह पडलेले होते… कोणीतरी त्यांचा गळा चिरून त्यांना मारून टाकलं होतं… आबा पाटलांच्या डोक्यात पहिला चंदीचा विचार आला… मन चिंती ते वैरी न चिंती…आबा पाटलाच्या डोक्यात नको नको ते विचार यायला लागले… धावतच पाटील बंगल्याच्या दारापर्यंत पोहोचला, चंदीच बाळंतपण केलेली ती सुईण तिथे दारातच मरून पडली होती… तिच्याही गळ्यावर कापलेल्या ची खूण होती… आबा पाटील तसाच धावत आत गेला… बंगल्याच्या हॉलमध्ये एका माणसाचा मृतदेह उपडा पडला होता, पण त्याला ओळखायला आबा पाटलाला जास्त वेळ लागला नाही… तोच दणकट देह, त्याची काठी त्याच्या जवळच पडली होती, डोक्यावरच पागोटं उडून लांब पडल होत… धनाजी चा ही खून झाला होता… पण पाटलाला त्या सगळ्यात वेळ घालवायचा नव्हता… चंदीच काय झालं हे जास्त महत्त्वाचं होतं… धावतच पाटील चंदीच्या खोलीत गेला… आणि बंगल्यातून जो हंबरडा फोडला गेला त्याने आजूबाजूचा परिसर दणाणला
"चंदेदेदे…"
क्रमशः………
वेलिंग नाडकर्णी
फ्लॅट भाग १२
आणि बंगल्यातून जो हंबरडा फोडला गेला त्याने आजूबाजूचा परिसर दणाणला…
"चंदेदेदे…"
आबा पाटलांनी चंदीच्या खोलीत गेल्यानंतर समोर जे काही बघितलं त्याने पाटलाला दुःख अनावर झालं आणि त्यातच त्याने चंदीच्या नावाचा टाहो फोडला होता… कारण त्याची चंदी आता या जगात नव्हती…चंदीचा निष्प्राण देह त्याच्यासमोर पलंगावर पडलेला होता… बाहेर सगळे जे मरून पडले होते त्यांनी मरण्याआधी काहीतरी झटापट केली होती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे समजत होतं… पण चंदीला मात्र ती बेशुद्ध असतानाच संपवलं होतं हे ही समजत होतं… तिच्या अंगावरची चादरही विस्कटलेली नव्हती… ज्या चंदीला वाचवण्यासाठी पाटलांनी एवढा खटाटोप केला होता, तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती, त्या चंदीला पाटील वाचवू शकला नव्हता… आपलं चंदीवर किती प्रेम आहे, इतके दिवस केला तो दिखावा होता, पण आज त्याला तिच्यावरचं प्रेम सांगायचं होतं तीला… ठेवलेली असली तरी मनापासून प्रेम करायला लावणारी होती चंदी… तिचाही निर्घुणपणे कोणीतरी गळा चिरला होता… चंदीची ती अवस्था बघून पाटील चंदीच्या त्या निर्जीव झालेल्या देहावर पडून आसवे गाळत होता…
"काय झालं गं हे चंदे?… कोणी केलं तुझ्या बरोबर हे सगळं?… का सोडून गेलीस ग या आबा पाटलाला?… माझं तुझ्यावर खरं प्रेम जडलं होतं गं?… उठ ना गं चंदे, बघ तुझा आबा पाटील आलाय तुझ्यासाठी, तुला घरी घेऊन जायला आलाय, मला सोडून नको जाऊस गं अशी… चंदेदेदे…"
शेतावरच्या बंगल्यासमोर एक जीप येऊन थांबली… दहा-बारा माणसांना घेऊन सर्जेराव पाटील जीपमधून उतरले… आपल्याबरोबर आलेल्या माणसांना काही सूचना देऊन सर्जेराव एकटाच बंगल्यात शिरला… आबा पाटील मोठ मोठ्याने रडत दुःख करत बसला होता चंदीच्या खोलीत… आपल्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडलेला बघून आबा पाटलाने चमकून मागे बघितलं…
"दादा!… तुम्ही?…"
"होय!… मिच!… चला तुम्हाला न्ह्यायला आलोय…"
"दादा हे काय घडलं ओ…"
आपण आपल्या वडिलांपासून हे सर्व लपवलय याचाही आबा पाटलाला विसर पडला होता…
माहितीये आम्हांला सर्व… चला तुम्ही इथून, घरी जाऊ… मग सविस्तर बोलू आपण या विषयावर…"
सर्जेरावांनी आबा पाटलाला कसतरी सांभाळलं… कसाही वागलेला असला तरी त्यांचा मुलगा होता तो… त्याला आता एक वडीलकी च्या नात्याने सावरण्याची होती… काही गोष्टी या त्याला पटवून देणं गरजेचं होतं… जोर-जबरदस्ती झाली असती तर पोरगं अजून हाताबाहेर गेलं असतं, त्यामुळे प्रेमानेच समजावून या गोष्टी निकालात काढायच्या होत्या… सर्जेरावांनी आबा पाटलाला सावरत कसतरी जीप मध्ये बसवल आणि सर्जेराव स्वतःच जीप चालवत घरी निघाले… झालेल्या सर्व प्रकाराने आबा पाटील गप्प झाला होता… घरी येताना चा अख्खा रस्ता तो शून्यात कुठेतरी बघत होता… तो चंदिला शोधतोय हे सर्जेरावांना कळतं होतं… सर्जेरावांची जीप घरासमोर थांबली, सर्जेराव आणि अक्का साहेबांनी मिळून आबा पाटलाला त्याच्या खोलीत आणून बसवलं… आबा पाटील शांत होता पण डोळ्यातून अश्रूंची धार काही कमी होत नव्हती…
अक्का साहेबांना आबा पाटलां जवळ बसवून; बाजूच्या गावात राहणाऱ्या डॉक्टरला बोलावण पाठवण्यासाठी कुणालातरी पाठवायचं म्हणून सर्जेराव तिथूनं निघाले… अक्का साहेबांना आपल्या नवऱ्याची झालेली ती दशा बघवत नव्हती… काल रात्रीपासून वाड्यात काहीतरी कट शिजतोय एवढं तिला कळत होतं… पण तो काय?… यापासून ती अनभिज्ञ होती… आपल्या नवऱ्यावर काहीतरी संकट आलं होतं आणि आपले सासरे जाऊन त्यांना सुखरूप सोडवून घेऊन आले एवढंच तिने बघितलं होतं आणि ऐकलही तेवढेच होतं… आपला नवरा नक्की बाहेर काय गुण उधळून आलाय हे तिला माहिती नव्हतं…
"अहो मी काय म्हणते?… तुमच्यासाठी चहा टाकते थोडा… घ्या जरा गरम! गरम! बरे वाटेल… आणि रडायचं ते काहून दादा आले की नाही तुमच्या मदतीला?… मला माहिती नाही बाई तुमचं नक्की काय चाललंय? पण दादा घेतील सगळं सांभाळून तुम्ही नका एवढी काळजी करूत… जमलं तर मला सांगा ना?… नक्की काय झाले?… तुम्ही का रडतात असे?… काय झालय?… विश्वास ठेवा माझ्यावर मी कोण्णाला म्हणून नाही सांगणार… बोलाना हो काहीतरी!…"
"सुनबाई!… त्यांना आत्ता काय विचारत बसू नका… आम्हाला नाही वाटत आत्ता ते तुंम्हाला काही सांगतील… पण आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमच्या पासून काही लपवून ठेवणार नाही… वेळ आली की तुम्हाला सगळं कळेल… त्यावेळी मात्र कोण चूक कोण बरोबर याचा न्यायनिवाडा करत बसण्याची वेळ नसेल… जो न्यायनिवाडा करायचा होता तो आम्ही केलाय कालच… आता मात्र नवीन सुरुवात करायची… झालं गेलं गंगेला मिळालं…"
"अहो पण दादा!…"
"कळेल!… कळेल!… सगळं कळेल… दम धरा थोडा फक्त… आता पण मात्र तुम्हाला खंबीर होणं गरजेचं ए… आबांना तुम्हीच सांभाळायला हवं … डॉक्टर येथीलच येवढ्यात ते आले की पुढे बघू काय ते…"
थोड्याच वेळात डॉक्टर आले… डॉक्टर नीं आबा पाटलांचा चेक केलं… त्याला कुठलातरी प्रचंड धक्का बसलाय हे डॉक्टरांच्या लक्षात आलं… त्यांनी आबा पाटलाना इंजेक्शन दिलं ज्याने आबा पाटलांना लगेच झोप लागली…
"पाटील साहेब आपले चिरंजीव कुठल्यातरी मोठ्या धक्क्यात आहेत… मी आता इंजेक्शन दिलंय पण मी काही गोळ्या लिहून देतो त्या मात्र आजच्या आज शहरातून मागवून घ्या… मी अक्का साहेबांना सांगतो त्या कशा आणि कधी द्यायच्या त्या…"
असा म्हणून डॉक्टर निघून गेले… डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे आबा पाटलाला चांगली सात आठ तास झोप लागली आणि रात्री जशी जाग आली तशी डॉक्टरांनी दिलेली औषधं दूधातून पाजण्यात आली … डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या मुलाला आराम मिळावा म्हणून सर्जेराव पाटीलांनी इंजेक्शन आणि गोळ्यांच्या सहाय्याने आबा पाटलाला दोन-तीन दिवस झोपवून ठेवला… तिसऱ्या दिवशी जेव्हां शुद्ध आली तेव्हा आबा पाटील अर्धवट शुद्धीत बडबडत होता…
"नको नां गं जाऊस… मला सोडून… मी आलोय ना आता तुझ्याकडे?… नाही तू इथेच थांब…"
"आहो मी इथेच आहे… कुठेही जात नाहीये…"
आबा पाटील शुद्धीत आल्याचं सांगण्यासाठी गड्या करवी निरोप पाठवून अक्कासाहेब तिथेच आबा पाटलांचा हात हातात घेऊन बसल्या… जसा आबा पाटलांच्या हातात अक्का साहेबांचा हाता आला तसं…
चंदे!… हा हात परत सोडणार नाहीस ना गं?… दोन दिवस झाले तुला शोधतोय… कुठे गेली होतीस?… मला तर परत सोडून जाणार नाहीस ना गं?…"
नवऱ्याच्या तोंडून चंदीच नाव ऐकल तसं अक्कासाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली… आपला नवरा नक्की बाहेर काय गुण उधळून आलाय याची पुसटशी कल्पना आली तिला… मुलगा शुद्धीत आलेलं कळताच सर्जेराव त्याच्या खोलीत आले… चंदीच नाव ऐकून शॉक झालेली अक्काबाई, हातातला हात झिडकारून कोपऱ्यात जाऊन उभी राहिली… मुलाच्या खोलीत आल्या आल्या सर्जेराव पाटलाला ही सर्व प्रकार समजला… दोन गड्या ना सांगून त्याने आबा पाटलाला शुद्धीत आणले आणि जागेवर उठवून बसवले… दोन दिवस झोपेच्या पूर्णपणे आहारी असल्याकारणाने आबा पाटलाला पूर्ण शुद्धीत यायला एक पाच मिनिटं गेली… पण पाच मिनिटानंतर त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त चंदीच होती… आपण घरी आहोत, समोर आपली बायको आणि वडील उभे आहेत, आजूबाजूला गडी माणसं पण आहेत, याचा विसर पडलेला आबा पाटील "चंदे थांब मी आलो" असं म्हणत पलंगावरून उठला, पण दोन-तीन दिवसाच्या अशक्तपणामुळे त्याला परत चक्कर आली… सर्जेराव पाटलांनी मुलाला परत शुद्धीत आणले… गडी माणसांना बाहेर पाठवून नंदिनी ला बोलवून घेतले आणि आतून दार घट्ट बंद करून घेतले… आता त्या खोलीत फक्त चौघेजण होते… सर्जेराव, आबा पाटील, अक्कासाहेब आणि तेरा चौदा वर्षांची नंदिनी…
"बाळा नंदिनी!… तू आता लहान राहिली नाहीस… मी आता जे काही सांगणार आहे, ते भविष्यात बाहेरच्या लोकांकडून कळावं अशी अपेक्षा नाही म्हणून मी तुला हि बोलावून घेतलं… आबा तू शेतात बंगला बांधायला घेतलास, तेव्हापासून तुझ्या प्रत्येक हालचालींवर माझं बारीक लक्ष होतं… गेल्या वर्ष दीड वर्षापासून तुझ्यात आणि चंदी मध्ये जे जे काही म्हणून झालं ते सर्व मला माहिती होतं… पण चांदीला तुझ्यापासून दिवस गेलेत हे मला चार दिवसापूर्वीच कळालं… बापजाद्यांनी कमावलेलं नाव तू अशाप्रकारे धुळीला मिळवशील, असं वाटलं नव्हतं… गेल्या दीड वर्षापासून ज्यांना ज्यांना म्हणून तुझ्या आणि चंदी बद्दल माहिती होतं ते आता कोणीही जिवंत नाहीत… तू सोडून… मी जे काही केलं ते बरोबर का चूक हे मला माहिती नाही, पण माझ्या खानदानाची इज्जत वाचवण्यासाठी मला ते करणं भाग होतं… त्या वेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं… देवाने तुला एवढी सोन्यासारखी बायको दिली ए, तुमच्या दोघांच्या पदरात एवढ गोंडस लेकरू दिलय, यापुढे त्यांना जप, त्यांच्यासाठी जग… आजचा उगवलेला सूर्य तुझ्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन आलाय, झालं गेलं सगळं विसरून जा… सुनबाई मला माझ्या पोराचे सर्व प्रताप माहिती होते आणि तरीसुद्धा मी ते सर्व तुझ्यापासून लपवले, आजपर्यंत तुझ्यावर सख्ख्या बापासारखा प्रेम केलं जमलं तर या बापाला माफ कर आणि माझ्या पोराचे गुन्हे माफ करून त्याला पदरात घे…"
आबा पाटलाला चंदीच्या जाण्याचं दुःख तर होतंच… पण आपल्या वडिलांनी जे काही केलं ते आपण त्यांची इज्जत घालवली ती सांभाळण्यासाठी केलं आणि या सगळ्यात आपल्यामुळे एका निष्पाप पोरीचा जीव गेला हे त्याच्या मनाला डाचत होतं… आबा पाटील एका लहान मुलासारखा रडायला लागला…
"मी चुकलो… मी तुम्हा तिघांचाही गुन्हेगार आहे… आणि त्या निष्पाप जिवाचाही गुन्हेगार आहे… माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खुप त्रास झालाय आणि त्या बिचार्या मुलीने आपला जीव गमावलाय… मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही… तुमच्या तिघांच्या तरी पाया पडू शकतो… जमलं तर मला माफ करा…"
घडलेल्या सर्व प्रकारात चुकी फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्याची आहे… त्यामुळे जे काही म्हणून कळलं आणि घडलं याला फक्त आणि फक्त आपला नवरा जवाबदार आहे… पण म्हणतात ना की स्त्री एकदा लग्न करून आपल्या सासरी आली की ती कायमची तिथलीच होऊन जाते… त्या घरात आल्यावर तिकडच सुखदुःख सगळं वाटून घेते… आयुष्यभर फक्त त्या घरासाठी झगडते, तिचं जे काही म्हणून रक्त अाटतं ते फक्त त्या घराच्या उन्नतीसाठी आणि त्या घराच्या इज्जतीसाठी… आता या सगळ्यातून अक्का साहेबांना हे सगळं घर सांवरायचं होतं… यातून बाहेर काढायचं होतं… नंदिनीला बाजूला करून अक्का साहेब पुढे झाल्या आणि आपल्या नवर्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या…
"तुमच्यासारख्या पुरुष माणसाला हे असं लहान बाळा सारख रडण शोभत का? समोर आपली नंदिनी आहे, आपल्या बापाला असं रडताना बघून काय वाटेल त्या मुलीला?… नंदू आबांना खाली घेऊन जा आणि आंघोळीचं पाणी काढायला सांग मी आलेच… मला आजोबांची थोडंसं बोलायचं…"
नंदिनी आबा पाटलांना खाली घेऊन गेली
"दादा!… यांच्यामध्ये आणि चंदी मध्ये जे काही म्हणून घडलं ते मला सविस्तर ऐकायचा आहे… एक सुन एक मुलगी आणि एक आई म्हणून मी या घरातल्या कर्तव्याला कधीच चुकणार नाही… पण तुमच्या मुलाबरोबर बायको म्हणून आयुष्य काढायचं असेल तर मला थोडा वेळ द्या… बायको म्हणून त्याच्या बरोबर नांदायला तुम्ही मला माझा वेळ द्यावा अशी विनंती करते मी तुम्हाला… पण हेही सांगते की मी तुम्हा सगळ्यांना सोडून कुठेही जाणार नाही…
आयुष्यात आपली मुलं कितीही चुकली, कितीही मोठ्या संकटात अडकली तरी आईबाप त्यांना त्यातून बाहेर काढतात… त्यांचे सर्व अपराध पोटात घेतात आबा पाटलाच्या बाबतीतही असंच घडलं होतं… पण आबा पाटलाच्या डोक्यातून चंदीचे विचार काही जायला तयार होत नव्हते… काहीही झालं तरी प्रेम करायला लागला होता तो चंदीवर… दिवस दिवस एकटाच बसलेला असायचा त्याच्या खोलीत, फक्त चांदीचा विचार करत… आबा पाटलांच्या तब्येतीचं कारण सांगून सर्जेराव पाटलांनी बाहेरच्या कोणत्याही माणसाला भेटण्याची त्याला बंदी घातली होती… आणि अशातच अमावस्येचा दिवस उजाडला, दिवस इतर दिवसांसारखाच गेला, रात्रीच्या वेळी थोडंसं खाऊन डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेऊन आबा पाटील आपल्या खोलीत झोपला होता… अक्कासाहेब ही त्याच खोलीत झोपल्या होत्या… रात्रीचे बारा वाजले असतील आणि आबा पाटलाला कसल्याशा आवाजाने जाग आली…
"आबा पाटील!… ए आबा पाटील!… भाईर ये रे… ए आबा पाटील!… तू येतो भाईर?… का मी येऊ आत?…"
"चंदेदेदे…" असं जोरात ओरडत आबा पाटील झोपेतून जागा झाला… आबा पाटलांनी चंदी ला मारलेली हाक एवढी जोरात होती अक्कासाहेब ही जाग्या झाल्या…
"काय झालं ओ?… स्वप्न बघितलं का काही?…"
"ती मला आवाज देतीये…"
"आबा पाटील!… ए आबा पाटील!… भाईर ये रे… ए आबा पाटील!…"
"ते बघ… परत आवाज दिला तिने… ती मला बाहेर बोलवतीये… मी आलो जाऊन…"
"अहो कोणी आवाज देत नाहीये तुम्हाला… असं का करताय?… नाहीये कोणी बाहेर, बारा वाजून गेलेत… झोपा तुम्ही…"
आबा पाटलाला कसेतरी समजवून अक्कासाहेबांनी त्याला झोपवल…
परत अाबा पाटलांचा डोळा लागला होता की…
"ए आबा पाटील!… भाईर ये रे… ए आबा पाटील!… माझ पोर कुठ हाई ते सांग?…"
आबा पाटील परत उठून बसला अक्कासाहेब जाग्याच होत्या…
"अहो काय झालं?… परत का उठलात?…"
"अगं ती बोलवतीये!… मला मगाच पासून आवाज देती ये… थांब मी भेटून आलो तिला…"
असं म्हणून आबा पाटील खोलीच्या दारापर्यंत गेला आणि परत काहीतरी आठवल्या सारखा मागे फिरला…
पण ती माझ्याकडे बाळा बद्दल विचारती ए, मी काय सांगू तिला?… थांब मी बोलून येतो तिच्याशी, तिला समजणारे कोणी नाहीये गं माझ्याशिवाय… आलोच मी!…"
"चंदे थांब गं!… आलो मी!…"
"चंदे थांब गं!… आलो मी!…"
आबा पाटलांनी खोलीचा दरवाजा उघडला आणि तो धावतच निघाला… मागोमाग आक्कासाहेब ही धावत निघाल्या…
"शिरप्या, राम्या पाटलांना धरा… जाऊ नका देऊ कुठं…" अक्कासाहेबांनी धावता धावताच गड्यांना आवाज दिला… सगळी गडबड ऐकून सर्जेराव पाटलांनाही जाग आली होती, ते ही धावतच बाहेर आले… आबा पाटील आता बंगल्याच्या गेट पर्यंत पोहोचला होता…
"चंदे!… कुठे आहेस?… मी आलोय गं!… बघ तुझा आबा पाटील आलाय!…
पण आबा पाटलाला चंदी कुठेच दिसली नाही… राम्या आणि शिरप्या ने आबा पाटलांना येऊन धरलं आणि जबरदस्तीने परत ओढत त्यांच्या खोलीत घेऊन आले… आबा पाटलाच्या डोक्यातून चंदीचा विषय जाता जात नव्हता… तो भ्रमिष्टासारखा "मला ती बोलतीये… तिच्या बाळाबद्दल विचारतीये… आता मी काय सांगू?…" एवढंच बडबडत होता… आपल्या मुलाला आता वेड तर नाही ना लागलं अशी शंका सर्जेरावांना आली… पण हे कोणालाच कळत नव्हतं की आबा पाटलाला लागल ते वेड नव्हतं, त्याला खरंच चंदी चा आवाज येत होता… ती परत आली होती तिच्या बाळाला शोधायला…
आबा पाटलाला परत खोलीत आणून बसवलं आणि एवढ्यात आबा पाटलाला…
ठक, ठक, ठक… खळ्ळ, खळ्ळ, खळ्ळ… कर्रर्रर्र, कर्रर्रर्र, कर्रर्रर्र…
असा कोणीतरी घुंगुरवाळी काठी आपटत आणि पायातल्या वाहणांच्या विंचवां मधला आवाज करत चालतंय असा भास झाला… आपल्याला वाटत असलेला भास खरोखरच आहे का हे बघण्यासाठी आबा पाटलांनी बाहेर येऊन परत एकदा बंगल्याच्या गेट कडे बघितलं… त्याने गेट कडे बघितलं तसा आबा पाटील शॉक लागल्यासारखा मागे कोसळला आणि जमिनीवर पाय घासतच मागे मागे सरकायला लागला… डोळ्याला जे दिसत होतं त्याच्यावर त्याचा विश्वास नव्हता… सर्जेराव पाटील, अक्कासाहेब, शिरप्या आणि राम्या चौघेही धावतच बाहेर आले… आबा पाटील बघत होता त्या दिशेने चौघांनीही बघितलं पण अंधारात त्यांना काही दिसत नव्हतं… सर्जेराव पाटलांनी शिरप्याला आणि राम्याला गेट कडे जाऊन कोणी आहे का ते शोधून यायला सांगितलं… ते दोघे जाऊन बघूनही आले पण तिथे कोणीच नव्हतं… आबा पाटील घाबरून खोलीच्या कोपर्यात जाऊन बसला होता… शिरप्या आणि राम्याच्या मदतीने आबा पाटलाला परत पलंगावर बसून सर्जेराव पाटील त्याच्या शेजारीच बसले…
"पोरा काय होतंय तुला?… काहीतरी सांग?… तू इतका का घाबरलायस?…"
क्रमशः………
वेलिंग नाडकर्णी...
फ्लॅट भाग १३
"पोरा काय होतंय तुला?… काहीतरी सांग?… तू इतका का घाबरलायस?…"
"दादा ती दोघ आलीयेत… मला बोलावतायत… तिला तिच बाळ हवंय… आता मी काय सांगू तिला?…"
"अरे कोण दोघं आली आहेत?… कोणाचं बाळ आणि काय सांगायचंय तिला?…
चंदी आणि तिचा आज्जा धनाजी आलाय… चंदीला तिचं बाळ हवय… आता तिचं बाळ कुठंन देऊ मी दादा तिला?…
"कसं शक्य आहे?… ती सगळी तर कधीच मेलीत… ज्यां लोकांना मारायची सुपारी दिलेली त्यांनी तर मारलेल्या सर्व लोकांची विल्हेवाट लावली असेल…"
"दादा ती बघा चंदी परत आवाज देतीये…"
"आबा!… डोक्यावर पडलायत का?… ती सगळी आता मेलीयेत… कसं शक्य आहे त्यातलं कोणी ईथे येणं… आणि कोणतं बाळ?… ते त्या चंदी बरोबरच तर गेल असणार… जे जन्माला आल नाही त्या बद्दल काय विचारायच… आणि महत्त्वाच म्हणजे जी जिवंतच नाही ती का बोलेल तुमच्याशी?…
आता मात्र आबा पाटलाला बाळा च्या बाबतीत जे काही म्हणून घडलं हे सगळं खरं खरं सांगणं भाग होतं… कारण जोपर्यंत ते खरं सांगत नाही तो पर्यंत आपल्याला दिसणारी चंदी आणि धनाजी याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही… सर्जेरावांच्या बोलण्यावरून कळत होतं कि कोणालाच शेतात दिलेल्या बळी बद्दल काहीच माहिती नव्हतं… आबा पाटलांनी चंदी च्या बाळा बरोबर जे जे म्हणून काही घडलं ते सर्व तिथे उपस्थित लोकांना सांगितलं… चंदीच्या बाळा बरोबर आपल्या पोराने जे काही केलं ते ऐकून सर्जेराव पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आपल्या पोराचा रागही… रागाच्या भरात सर्जेराव पाटलांनी आबा पाटलाच्या कानाखाली एक खणखणीत लावून दिली… त्या क्षणी खरतर त्याला तुडवायची इच्छा झाली होती त्याना… आपल्या मुलांने जे केलं होतं ते माणुसकीला काळिमा फासणार होतं…
"अरे असा कसा रे सैतान तू?… जन्मलेल्या बाळाला, त्याच्या आईला सुद्धा बघायला दिलं नाहीस?… तू स्वतःच्या स्वार्थासाठी त्या निष्पाप बाळाचा जीव दिला?… तुला नरकात तरी देव जागा देईल का?… मागच्या जन्मात असं काय म्हणून पाप केलं होतं मी? की तुझ्यासारखा सैतान माझ्या घरात जन्माला आला?… देवाने तुला काळीज दिलं? का त्या ठिकाणी दगड बसवलाय?… तुला काहीच कसं कळलं नाही की ज्याला मारलं ते तुझं हि पोर होतं?… देवा इतक हरामी पोर जन्माला घालण्यापेक्षा माझ्यावर खानदानाला वारस दिला नसतास तरी चाललं असतं रे… लाज कशी वाटली नाही रे तुला एका जीवाला मारताना?…"
असं म्हणत सर्जेराव पाटलानी मागचा-पुढचा विचार न करता हातातल्या काठीने आबा पाटलाला बडवायला सुरुवात केली… पोराचं कृत्य एवढ मनाला चिड आणणार होतं की, म्हातारा मुलाला वाट्टेल तसा बडवत होता… म्हातार्याच्या अंगात येवढा जोर कुठून आला? हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना पडलेला प्रश्न होता… एखादा जनावराला ही मारत नाही तसं सर्जेराव पाटलांनी आबा पाटलाला धुऊन काढला… अक्कासाहेब मध्ये पडल्या नसत्या तर आज तर सर्जेराव पाटलांनी पोराचा जीवच घेतला असता…
"दादा बस झालं!… आता किती मारणार ते?… त्यांच्या कर्मांची सजा त्यांना देव देईलच पण म्हणून त्या करता तुम्ही का पापाचे भागीदार होताय?…"
"अगं पोरी!… याच्या पापाचा भागीदार तर मी कधीच झालोय… मला जर माहिती असतं की हा जन्मलेल्या बाळाचा जीव घेईल? तर मी सगळ्यात आधी ह्याला मारला असता, पण त्या बाळाला वाचवल असतं… मला जर माहिती असतं की बाळाचा जन्म झालाय आणि हा उलट्या काळजाचा नराधम त्याचा जाऊन बळी देईल? तर मी कशाला ग त्या माऊलीला मारलं असतं आणि त्या बाळाला तरी?… त्या सगळ्यांना मारण्यापेक्षा जन्मताच याला संपवला असता तर आज हा दिवस तरी बघायला मिळाला नसता…"
"दादा!… आता जे झालं ते झालं… घडून गेलेल्या गोष्टी काही आता आपण परत सुधारू शकत नाही… इतके दिवस ज्या मानाने आपण या गावात फिरलो इतके दिवस जी इज्जत आपल्याला गावकऱ्यांकडून मिळाली आज तुमच्या मुलाने त्या सगळ्याची राख करून टाकली… आज पासून यान्नां हीच शिक्षा की हे आपल्या सगळ्यांमध्ये राहतील पण आपल्याशी यांच कोणतच नातं नसेल…"
असं म्हणून अक्कासाहेब त्या खोलीतून निघून गेल्या… सर्जेराव पाटलाला ही ते पटलं असावं त्यांचं म्हणणं, कारण तेही तिथून निघून गेले… शिरप्या आणि रामा ते ही तिथून निघाले… दारात उभी असलेली नंदिनी हा सर्व प्रकार बघून खूप गोंधळलेली होती… ते म्हणतात ना मुलांपेक्षा मुली लवकर जाणत्या होतात, गेल्या काही दिवसांपासून घडलेले सर्व प्रकार तिला कळत होते पण आपल्या वडिलांची झालेली दयनीय अवस्था तिला बघवत नव्हती… तिच्या बापाचं रडणं तिच्या मनाला बघवत नव्हतं…
"दादा नका हो जाऊ मला सोडून… अगं तू तरी थांब गं… मी चुकलोय, मला माफ करा रे… मला अस एकट नका रे पाडू… मला माफ करा… नंदू तुझ्या आईला आणि आजोबांना सांग ना गं… तुझा बाप वाईट नाही गं…"
आबा पाटलाचं ते लहान पोरासारखं रडणं, त्याचं ते माफीसाठी भीक मागणं, या सगळ्याने बाकी कोणाला दया आली नाही तरी नंदीनीला मात्र दया आली… तिने पुढे येऊन आपल्या बापाला सावरलं… आपली छोटी नंदू आपल्यासाठी आली हे बघून आबा पाटलाला अजून रडायला आलं, आपल्या छोट्या नंदूच्या मांडीवर डोकं ठेवून रडता रडता कधी त्याला झोप लागली हे कळालंच नाही…
त्या रात्री पासून घरातली नंदिनी सोडली तर आबा पाटलाशी कोणी बोलतही नव्हतं… तो समोर जरी बसलेला असला तरी अक्कासाहेब आणि सर्जेराव तो नाहीच, असं वागत होते… आबा पाटलाचा दिवसातला थोडाफार वेळ नंदिनी बरोबर जात होता… पण इतर वेळी त्याच्या डोक्यात मात्र फक्त चंदीचाच विचार असायचा… भ्रमिष्टासारखा तो एकटक शुन्यात बघत बसलेला असायचा आणि स्वतःशीच बडबड करायचां जसं काही तो कोणाशी बोलत आहे… सर्जेराव पाटलाने चंदीच्या बाळाचा बळी द्यायच्या दिवशी जो माणूस आबा पाटला बरोबर होता त्याला शोधून काढला…त्याच नाव श्रीपती… त्याच्या कडून आबा पाटलांना त्या मांत्रिकांचाही ठावठिकाणा समजला… मांत्रिकाच्या मुसक्या बांधून आणण्यासाठी सर्जेराव पाटलांनी आठ-दहा माणसं स्मशानाकडे पाठवली… मांत्रिकाच्या मुसक्या बांधून पोलिसांच्या हवाली करायचं हा विचार करून पाटलांनी पोलिसांनाही बोलावणं पाठवलं…
"या!… या!… इन्स्पेक्टर साहेब… बसा… नंदु जाऊन जरा अक्काला चार कप चहा सांग बरं… इन्स्पेक्टर साहेब आलेत म्हणाव…"
"आज आमची कशी आठवण काढलीत पाटील साहेब?…"
"अहो काही नाही!… गावच्या स्मशानात बरेच दिवसापासून एक मांत्रिक येऊन राहिलाय… तुम्हाला तर माहितीच आहे, मांत्रिक म्हंटलं की गावातली लोकं पण घाबरतात… काहीतरी वाढीव व्हायच्या हात म्हटलं तुमच्या ताब्यात देऊन टाकावा…"
"ते पण बरोबर आहे म्हणायला, माणसं गेलेत का?… आणायला?…"
"हो!… हो!… तुम्हाला निरोप दिला तेव्हांच धाडलीयेत…"
आबा पाटील इन्स्पेक्टर शी बोलत होते की गेलेल्या माणसांपैकी चार माणसं धावत परत बंगल्याकडे आली… माणसांच्या तोंडावर प्रचंड भीती होती आणि माणसं घामाने चिंब ओली झाली होती… आबांनी शिरपाला विचारलं…
"काय झालं शिरप्या?… असे का धावत आला तुम्ही?… आणि तो मांत्रिक कुठे ए?… त्याच्या मुसक्या आवळल्याा का! नाही?…"
"पाटील मांत्रिक आता न्हाई जी…"
"पळून गेला का काय तो हरामखोर?…"
"न्हाई जी!… पाटील!… एक बारी स्मसानात चला जी… तुमच्या डोल्यांनी बघा जी समद… इस्वास बसलं…"
"असं काय झालय स्मशानात?… सांग पटकन…"
"पाटील!… तो मांत्रिक म्येला… पन इतका इचीत्र मारलाय त्यास्नी की इचारू नका… त्यास्नी उलटा करूनश्यान जमीनीमंदी पुरलाय आनी सरीराचा कंमरे खालचा भाग जमिनीवर मेल्यागत पडलाय… मनक्याचा चुथडाच केलाय जी… रामाला तितच थांबून आलो जी खबय द्याया…"
शिरप्याच्या तोंडून हे सर्व ऐकून आबा पाटील जागेवरच उभे राहिला… त्याला या सर्वावर विश्वासच बसत नव्हता… सर्जेराव आणि इन्स्पेक्टर यांची पण काही स्थिती वेगळी नव्हती…
"पाटील साहेब मी माझी दोन माणसं तुमच्याबरोबर देतो… ती पंचनामा वगैरे सर्व करून घेतील… मला थोडं निघावे लागेल, काम आहे… तुम्ही बोलावलं होतंत, फक्त म्हणून आधी तुमच्याकडे आलो…"
"इन्स्पेक्टर साहेब!… गावात एवढ घडलय आणि तुम्ही अजून बाहेर चाललायत… इथे स्मशानात खून झालाय आणि त्याच्यापेक्षा असं काय विशेष महत्त्वाचं काम आहे तुमचं?…"
"पाटील साहेब मुळशीच्या जंगलात आठ-दहा माणसांचे मृतदेह मिळालेत… सुरुवातीला वाटलं होतं की कुठल्यातरी प्राण्याने मारलं असेल… पण प्रत्येकाला एकाच प्रकारे मारले गळा चिरून आणि शरीराची नुसती वाट लावलीए… आणि जे मेलेत ते अट्टल गुन्हेगार होते… बऱ्याच खुनांमागे त्यांचा हात होता… बाजूच्या पोलीस स्टेशन मधून सकाळीच निरोप आलाय… खोऱ्यातला सर्व पोलीस स्टेशन ना कुमक घेऊन तिकडे बोलावलंय… कमिशनर साहेब स्वतः येणार आहेत… मी निघतो… आलो की मांत्रिकाच्या खुनाबद्दल तपासाला घेऊन सांगेन तुम्हाला…"
इन्स्पेक्टर त्याचे दोन हवालदार सोडून त्याच्या कामाला निघून गेला…
सर्जेराव पाटलांनी बाहेर जाऊन येतो असा निरोप पाठवला आणि तेही निघाले… स्मशानाकडे… मांत्रिकाच्या अशा गूढ हत्येची खबर गावात पसरायला जास्ती वेळ लागला नाही… पाटील स्मशानात पोहोचेपर्यंत अख्खा गाव स्मशानात गोळा झाला होता… सर्जेरावा पाटील स्मशानात गेले आणि मांत्रिकाचा झालेला खून बघून तेही चक्रावले…
”दादा!…"
स्मशानात उभे असतानाच आबा पाटलांनी दिलेल्या हाकेने सर्जेराव एक क्षण चमकले… पण आबा पाटलाशी बोलले काहीच नाहीत… फक्त त्याच्याकडे बघितल्यासारखं केलं, पण आबा पाटील बोलतच होता…
"दादा!… तुम्ही नका बोलू माझ्याशी, पण हा मांत्रिकाचा झालेला खून आणि मुळशीच्या जंगलात आढळलेले ते मृतदेह हे सर्व चंदी ने आणि तिच्या आज्ज्याने केलय … या सगळ्यामागे तेच दोघं आहेत… दोघांच्या आत्म्यानेच हे सर्व खून केलेत… मला पण त्यादिवशी बंगल्याच्या गेटवर ते दोघेजण दिसले होते… दादा ते बदला घ्यायला आलेत… ते आता कोणालाही जिवंत सोडणार नाहीत, मलाही मारून टाकणार…"
जमलेल्या गावकऱ्यांसमोर आपल्या पोराचं हे बोलणं आबा पाटलांना आवडलं नाही… कुठेतरी आपल्या पोराच कृष्णकृत्य गावासमोर उघडं पडेल म्हणून त्यांनी आबा पाटलाला घेऊन तडक घर गाठलं… घडलेल्या सर्व प्रकारामुळे सर्जेराव पाटलांनाही आपल्या मुलाची फिकीर वाटायला लागली… खरंच चंदी परत आली तर ती आपल्या पोराच ही बरेवाईट करेल अशी भीती सर्जेराव पाटला होती… रात्रीची जेवणं करून सर्जेराव पाटील आणि अक्कासाहेब दिवसभरात घडलेल्या गोष्टींवर बोलत बसले होते… आबा पाटील छोट्या नंदू कडून दिवसभरात शाळेत झालेल्या सर्व घडामोडी ऐकत होता… ही पोरगीच अशी होती तिच्याकडून त्याला सध्या खूप माया मिळत होती… नंदिनी आबा पाटलाला औषधांचा डोस देतच होती एवढ्यात… बंगल्याच्या गेट वरून जोरजोरात कोणीतरी आवाज देत होतो…
"पाटील!… वाचवा मला… दार उघडा बंगल्याचं… मला आत घ्या पाटील… ती माझा जीव घेईल…"
आलेल्या आवाजाने चमकून सर्जेराव पाटील आणि अक्कासाहेब दोघांनी गेट कडे बघितलं तर आबा पाटील माडीवरून धावत खाली आला… गेटवर आलेल्या श्रीपतीला अात आणून बसवलं… त्याच्या कपड्यांची अगदी दयनीय अवस्था झालेली होती… सगळे कपडे जागोजागी पडलेले होते… तो कुठेतरी मातीत लोळुन आलाय असंच वाटत होतं…
"काय झालं रे श्रीपती?… का जीव चाललाय तुझा?…"
"पाटील वाचवा मला…"
"का काय झालं?…"
"पाटील!… ती चंदी आणि तिचा म्हातारा माझ्या जीवावर उठलेत…"
"काय दारू प्यायला का संध्याकाळी?…"
अहो खरच पाटील!… त्यांच्या तावडीतून सुटूनच आलोय आत्ता…"
"बंद कर तुझी बकबक… शिरप्या रामा याला घरी सोडून या… आणि याच्या बायकोला सांगा, चांगलं बांधून ठेव म्हणजे दारू प्यायला जायचं नाही परत…"
"ओ पाटील खरंच ओ!… माला आजची रात्र राहू दे हिथं… उद्या सकाळच्या ला जाईन मी माझ्या घरला…"
शिरप्या आणि रामा त्याला जबरदस्तीच घेऊन त्याच्या घरी सोडायला गेले… मात्र परत आले त्या वेळी दोघांनी जे सांगितलं त्याने पाटील चक्रावले… घराकडे जाईपर्यंत श्रीपती तसा घाबरलेलाच होता… पण घराकडे पोहोचल्यावर अचानक बोलायला लागला "ते बघा ती दोघं, तिथे माझ्या घराकडेच बसली येत, मी गेलो की ते मला पकडणार, मी चाललो आता, मांत्रिकच वाचवल मला यातून…" असं म्हणत दोघांच्याही हाताला हिसडा देऊन श्रीपती स्मशानाच्या दिशेने पळून गेला… दोघांनी त्याला अडवायचा थोडासा प्रयत्न केला पण अंधारात तो काही भेटला नाही आणि स्मशानाकडे जायची त्यांची आता हिम्मत नव्हती म्हणून ते बंगल्यात परत आले… ऐकलेल्या प्रकाराने सर्व स्तब्ध झाले होते, नक्की काय चालू आहे हे कोणालाच कळत नव्हतं… श्रीपतीचं सकाळी बघू असं म्हणून सर्जेराव पाटलांनी सगळ्यांना झोपायला जायला सांगितलं… नंदिनीने आबां जवळ झोपायचा हट्ट धरला म्हणून शिरपा आणि रामाला पण आबा पाटलाच्या खोलीत झोपायला सांगून सर्जेराव पाटीलही झोपायला गेले… आपले बाबा मध्येच झोपेतून उठतात या काळजीने नंदिनीची झोप थोडीशी जागृत होती… आणि झालंही तसच… आबा पाटील ओरडतच झोपेतून जागा झाला, तशी नंदिनीला जाग आली…
"आबा काय झालं?… आबा बोला ना?…"
"नंदू तो श्रीपती मेला गं, मी बघितलं त्याला मेलेला…"
"आबा दादा म्हणालेत ना उद्या सकाळी बघू म्हणून, चला झोपा तुम्ही आता…"
"नाही रे बाळा, खरच तो मेला… जसं मांत्रिकाला मारल ना? तसच मारलं चंदीन आणि तिच्या आज्ज्या नं त्याला… मला खूप भीती वाटतीये रे बाळा… आजोबांना आणि तुझ्या आईला घेऊन ये ना…"
नंदिनीने जाऊन आपल्या आजोबांना आणि आईला उठवून घेऊन आली… तिने आबा पाटलाला पडलेलं स्वप्न जसंच्या तसं आपल्या आईला आणि आजोबांना सांगितलं… अक्कासाहेबांचा या सगळ्यावर विश्वास नव्हता, पण सर्जेरावांना काही तरी शंका आली… त्यांनी शिरप्याला आणि रामाला गावातून पंधरा-वीस माणसं उठवून आणायला सांगितली… शिरप्याला आणि रामाला नंदिनी अक्कासाहेब आणि आबा पाटलाकडे थांबवून सर्जेराव पाटील गावकऱ्यांबरोबर स्मशानात गेले… पण सर्जेराव पाटील जेंव्हा स्मशानातून परत आले तेंव्हा त्यांच्यात चेहर्याचा रंग उडालेला होता…
"दादा काय झालं?… असा का चेहरा झालां आहे तुमचा?…" अक्का साहेबांनी सर्जेरावांना विचारलं…
"श्रीपती चा ही खून झाला… मांत्रिकाला मारला अगदी तसाच श्रीपती ला ही मारला… त्याच स्मशानात…"
हे सर्व ऐकून सगळ्यांच्याच चेहऱ्याचा रंग उडाला होता… त्या रात्री कोणीही झोपलं नाही… पण दुसऱ्या दिवशी सकाळ नंतर मात्र, प्रत्येक जण आबा पाटीलाची काळजी घ्यायला लागला… कुठेतरी सगळ्यांच्याच मनात ही धास्ती होती, की आबा पाटलाला ही मरण असंच काहीसं येणार आहे… आबा पाटील स्वतःही मनातून प्रचंड घाबरला होता… आपल्या बंगल्यात असलेल्या देवघराच्या कोपऱ्यात दिवसभर तो पडून असायचा… आता त्या देवाचाच आधार होता त्याला… सर्जेरावांच्या देवघरामध्ये कुठल्याशा एका संतांनी दिलेल्या दत्त महाराजांच्या पादुका होत्या… आता सर्जेराव यांची सर्व भिशाद त्यांच्यावरच होती… देवघरात त्या जागृत पादुका असल्याकारणाने त्या बंगल्याला एक प्रकारचं कवचच प्राप्त झालं होतं… आबा पाटलाला चंदी आणि आज्जा यांनी आजपर्यंत कधी त्या बंगल्यात येऊन त्रास दिला नव्हता, जे काही व्हायचं किंवा जे काही दिसायचं ते सर्व त्या बंगल्याबाहेर… त्या वास्तूत कधीच कोणाला कोणता त्रास झाला नाही…
श्रीपती गेल्यापासून आबा पाटलाला बंगल्याभोवती काठी ठोकत चालल्याचा आवाज, त्या काठी बरोबर येणारा घुंगरांचा आवाज, कोल्हापुरी वहाणांच्या विंचवांच्या करकरण्याचा आवाज आणि "आबा पाटील आता तुझी बारी, जित्ता नाही सोडत तुला मी…" असा येणारा चंदी चा आवाज… आबा पाटलाचं गावातनं अचानक दिसायचं कमी होण, सारखं घरात राहणं, घरातल्या गडीमाणसां शिवाय त्याला गावातल्या कोणालाही न भेटू देण, अचानक पणे सर्व व्यवहार सर्जेराव पाटील यांनी बघणं, या सर्व गोष्टींमुळे गावात थोड्याफार प्रमाणात चर्चा होत होती… पण सर्जेराव पाटलांचा गावात दरारा ईतका होता की प्रत्यक्ष त्यांच्या तोंडावर कोणाचीही बोलायची हिम्मत झाली नाही किंवा विचारण्याची हिंमत झाली नाही… आबा पाटील दिवसभर देव्हाऱ्याच्या कोपऱ्यात पडून असायचा… रात्री जेवून खाऊन मात्र स्वतःच्या खोलीत झोपायला जायचा… सर्जेराव पाटील सोडले तर बाकीचे इतर सर्वजण हे आबा पाटलाच्या खोलीत झोपायला असायचे… आधे मध्ये आबा पाटलाला रात्रीचे चांदीचे आणि तिच्या आज्ज्याचे आवाज यायचे पण आजूबाजूला असलेले सर्वजण त्याला काही बंगल्याबाहेर जाऊ देत नव्हते आणि एक दिवस ती रात्र उजाडली ज्या रात्री आबा पाटील गायब झाला…
तो दिवस अमावस्येचा होता… दिवसा सर्व व्यवस्थित चालू होतं… सगळे जण आपापली कामं करत होते… आजचा दिवसही आबा पाटलांनी देवाच्या खोलीत बसूनच काढला… पण का कुणास ठाऊक त्याच्या मनाला आता हे समजून चुकलं होतं, की जोपर्यंत आपण या देवाच्या खोलीत आहोत तोपर्यंत आपल्या जीवाला कोणी बरं वाईट करू शकत नाही… थोड्याफार प्रमाणात घरात वावरण्यासाठी तो निश्चिंत झाला होता… दिवसभराचं सर्व आवरून रात्री सगळ्यांची जेवणं झाली… आबा पाटलांच्या खोलीत पाटील स्वतः, त्यांची मुलगी नंदिनी, अक्कासाहेब आणि शिरप्या झोपायला होती, सर्जेराव पाटील आपल्यास खोलीत झोपले होते, रामा बाहेर ओसरीवर अंथरून टाकून झोपला होता… रात्रीचे बारा वाजून गेले आणि आबा पाटलांचे डोळे उघडले… आबा पाटील या वेळी मात्र झोपेतून दचकून जागा झाला नाही… रोज आबा पाटील उठल्यावर बाकी कोणाला नाही पण नंदिनीला नक्की जाग यायची पण आज तीही आली नाही… आबा पाटलांनी सावकाश खोलीचं दार उघडलं, माडी च्या पायऱ्या उतरून आबा पाटील खाली आला… समोर गेटवर त्याची चंदी त्याला घ्यायला आली होती, अगदी पहिल्या दिवशी बघितली होती अगदी तशीच… आबा पाटलांनी बंगल्याच गेट उघडल… आपली फटफटी ढकलतच बंगल्या बाहेर काढली… ओसरीवर राम्या झोपला होता पण त्यालाही आज जाग आली नाही… आबा पाटलांनी जशी फटफटीला किक मारली तशी नंदिनी झोपेतून खाडकन जाग आली… आपले वडील आपल्या जवळ नाहीत हे बघून त्या पोरीने अक्कासाहेब आणि शिरपा दोघांनाही उठवलं आणि धावतच माडीचा जिना उतरून खाली आली… गेटच्या बाहेर आबा पाटील आपल्या फटफटीवर बसलेला होता, तो कोणाला तरी मागे बसायला सांगत होता पण गेट बाहेर आबा पाटील आणि फटफटी सोडून कोणीच नव्हतं… कोणीतरी मागे बसल्यासारखं झालं असेल का नाही माहिती नाही पण आबा पाटलांनी फटफटी सुरू केली आणि तो निघाला… आबा पाटील बंगल्यातून गेल्यावर बंगल्यात एकच हलकल्लोळ माजला… आपल्या पोराला शोधण्यासाठी सर्जेराव पाटलांनी आख्खा गाव जागा केला… पंचवीस-तीस माणसांना घेऊन सर्जेराव पाटील मुलाला स्मशानातही शोधून आले… पण त्यादिवशी आबा पाटलांचा काहीच पत्ता लागला नाही… सकाळी पोलीस स्टेशनला ही कंप्लेंट केली गेली… दिवसभर पाटील आजुबाजूच्या गावांमध्येही तपास करून आले पण आबा पाटील कुठेच भेटला नाही… घरी नंदिनीचा रडून वाईट अवस्था होती, आक्का साहेबांची परिस्थितीही काही वेगळी नव्हती… या सगळ्यात सर्जेराव पाटलांना रडायला येत नव्हतं असं नाही, पण तेच खचले तर या दोघांना कोण सांभाळणार म्हणून ते जिद्दीने उभे होते…
आबा पाटील गायब होऊन आता दोन दिवस झाले… आबा पाटलांचा कुठेच पत्ता नव्हता… नंदिनी आणि अक्कासाहेबांनी देव पाण्यात ठेवले… गावच्या इन्स्पेक्टरने पार पुण्यापर्यंत खबर पोचवली, पण पाटलाचा कुठेच पत्ता नाही… आबा पाटलांसाठी अख्ख खोरं पिंजून काढलं सर्जेराव पाटलांनी पण काही हाताला लागलं नाही… तिसऱ्या दिवशी रात्री अक्कासाहेब देवघरात पोथी वाचत बसल्या होत्या, नंदिनी तिथेच त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती… झोपलेल्या नंदूला काय झालं माहिती नाही पण ती अचानक "आबा थांबा!… आबा थांबा!…" असे म्हमत जागी झाली… नंदिनी चा आवाज ऐकून सर्जेराव ही देवघरात आले… झोपेतून घाबरून उठलेल्या नंदिनीला अक्कासाहेबांनी आपल्या कुशीत घेऊन कवटाळलं… झोपेत काहीतरी वाईट बघितला असेल म्हणून पोरगी घाबरली असंच सगळ्यांना वाटलं… पण नंदिनीने जे काही सांगितलं ते फार विचित्र होतं…
"दादा!… आता माझ्या स्वप्नात बाबा आले होते… ते खूप घाबरलेले होते, खूप रडत होते… त्यानी हात जोडून आपल्या सगळ्यांची माफी मागितली आहे, "मी चुकलो, फार वाईट वागलो, तुम्हा सगळ्यांची फसवणूक केली, मला माफ करा… शेतावरच्या बंगल्यावर मी अडकलोय, मला इथून.सोडवा, माझी सुटका करा" असं रडून सांगत होते… आबा चला ना जाऊ आपण त्यांना सोडवायला…"
झोपेत एखाद स्वप्न बघितलं असेल म्हणून पोरगी अशी बोलते असा विचार करून नंदिनीच्या बोलण्या कडे कोणीच लक्ष दिलं नाही… पण तेच स्वप्न नंदिनीला परत जेंव्हा पहाटे पडलं तेव्हा मात्र सर्जेराव पाटलांना थोडी शंका आली… शिरप्याला आणि रामाला नंदिनी आणि अक्का साहेबांच्या बरोबर थांबवून, गावातील दहा-बारा माणसं घेऊन सर्जेरावांनी शेतातला बंगला गाठला… महिन्या भरात त्या बंगल्याची अगदी रया गेली होती… बंगला पूर्णपणे मोडकळीस आलाय असंच वाटत होतं… आजू बाजूला खूप झाडी वाढली होती अचानक… बंगाला वीस पंचवीस वर्षे धूळ खात पडला आहे असच त्याच्याकडे कडे बघून वाटत होतं… सर्जेराव पाटील बंगल्याचा दारात पोचले, बरोबर माणसंही होतीच… बंगल्याच मोडकळीला आलेलं दार आतून घट्ट लावलेलं होतं… माणसांकरवी दार तोडून सर्जेराव पाटील बंगल्यात घुसले… नुकताच सूर्य उगवत होता, सूर्यप्रकाश बंगल्याच्या तुटलेल्या छपरातून आत शिरायला बघत होता आणि त्या उगवती च्या कोवळ्या सूर्यकिरणात सर्जेराव पाटलांनी जे बघितलं ते भयानक, अंगावर काटा आणणार पण एका बापाच काळीज पिळवटून टाकणार होतं…
बंगल्याच्या हॉल मधल्या एका वाश्याला आबा पाटलांना एकाच पायाला उलटा लटकवला होता… आबा पाटलाच्या शरीराच्या चिंध्या केलेल्या होत्या… शरीरावर अशी एकही जागा नव्हती जिथे जखम नव्हती… त्यांचा गळा चिरलेला होता… चेहऱ्यावर डोळ्यांच्या ठिकाणी फक्त दोन खोबणी होत्या आणि जीभ हासडून बाहेर काढावी अशी बाहेर आली होती… आबा पाटलांचा किळसवाणा पण निर्दयपणे खून करण्यात आला होता…
चंदी नं आणि धनाजी नं त्यांचा बदला घेतला होता…
क्रमशः………
वेलिंग नाडकर्णी...
No comments:
Post a Comment