रहस्यमयी गुफा....-Bhutakhetachya Goshti |
लेखक:- अंकुश सू. नवघरे. (पालघर)
प्रकाशन:- २१.१२.२०१७
©Ankush S. Navghare ®२०१७
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
ही गोष्ट पालघर जिह्यातीलच एक गावात घडली आहे. गावाचे नाव काही करणास्थव इथे देणे मला उपयुक्त वाटत नसल्याने ते देण्याचे मी टाळत आहे. हे गाव तसे मोठे आहे तसेच ते रेल्वेस्टेशन असल्याने सर्वाना माहीत आहे. ही कथा मला माझ्या एका ओळखीच्या वयोवृद्ध भगत काकांनी सत्यघटना आहे असे म्हणून सांगितली होती. पुढील स्टोरी त्याच्याच शब्दात.
ते गाव डोंगर, जंगल, नद्या, हिरवळ ह्यांनी नटलेल आहे. ह्या गावाच्या काही दूर अंतरावर परंतु गावाच्याच हद्दीत एक मोठा पाण्याचा डॅम बांधलेला आहे. तो डॅम साधारणतः २० ते २५ एकरावर पसरलेला आहे. डॅम च्या पुढच्या बाजूला केळीची पिके घेतलेली आहेत आणि मागच्या बाजूला घनदाट जंगल आहे तिथे सहसा जास्त कोणी जात नाही कारण त्या जंगलात दिवसा ढवळ्या पण वाघ, जंगली डुकरे आशा जंगली प्राण्यांचा वावर असतो. त्या जंगलाला लागूनच मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराची हकीकत अशी आहे की, ज्यावेळी जगबुडी झाली त्यावेळी एक माणसाने एक खूप मोठी बोट तयार करून त्यात सर्व प्रजाती भरून ह्या सृष्टी चे रक्षण केले. त्यावेळी सर्व काही जलमय झाले होते आणि ती बोट पाण्यावरून जात असताना तिचा खालचा भाग त्या डोंगरावर घासला गेल्यामुळे त्या डोंगराला एक खाच पडली. त्या खाचेला एक प्रचलित नाव आहे परंतु ते नाव ही मी इथे देऊ शकत नाही. त्या खाचे बद्दल असे बोलले जाते की त्या खाचेच्या एक बाजूला उभे राहून आपली इच्छा मनात धरून एक दगड हातात घेऊन तो दगड त्या खाचेच्या दुसऱ्या बाजूला मारला असता ती इच्छा पूर्ण होते. अंतर खूप कमी असले तरी इच्छा पूर्ण होणार नसली तर काहीतरी कारण होऊन तो दगड तिकडे जात नाही.
त्या डोंगराखालचे जंगल खूपच घनदाट असून खूप रहस्यमय आहे. त्या जंगलात राणीभुताचा वास आहे आणि तेच ह्या सर्व जंगलाचे रक्षण करते असे तिकडची लोक म्हणतात. सांगायचे तात्पर्य असे की राणी भुताला मी पण पाहिले आहे परंतु त्याविषयी मी इथे काहीच देऊ शकत नाही. त्या जंगलात काही ठिकाणी खूप दलदल आहे, त्यात मगरी, अजगर अशी जनावरे असल्याने तिकडे कोणी जायची हिम्मत करत नाही. त्या जंगलातच एके ठिकाणी ती रहस्यमयी गुफा आहे ज्याबद्दल ही कथा आहे.
एक दिवस मी आणि माझा मित्र कुठल्यातरी विषयावर चर्चा करत असताना दोन माणसे आमच्याकडे आली आणि त्यांनी आम्हाला संगीतले की अमुक एक माणसाने आम्हाला तुमच्याकडे पाठवले आहे. तो अमुक एक माणूस आमच्या खास परिचयाचा असल्याने त्यांना आम्ही बसायला सांगून काय काम आहे अशी विचारणा केली असता त्यांनी आमच्या दोघांच्या हातात एक दगडासारखी दिसणारी वस्तू दिली. त्यातला एक माणूस म्हणाला की ही वस्तू म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कच्चा हिरा आहे आणि असे कितीतरी हिरे एक जंगलात आहेत परंतु त्या जागेचे नाव पत्ता आम्हाला महिती नाही.
त्यावर मी त्याला म्हणालो की मग तुम्हाला आमच्याकडून काय पाहिजे, त्यावर तो मला म्हणाला की माझ्या वडिलांना त्या जागेचा पत्ता माहीत होता परंतु त्यांनी आम्हाला त्या बद्दल कधीच काहीच सांगितले नाही. आम्ही असे ऐकले होते की एकदा माझे आजोबा आमच्या वडिलांना तिकडे एकाच अटीवर घेऊन गेले होते की त्यांनी तिकडे एकट्याने जाऊ नये आणि नेहमी जाताना सोबत कमीत कमी तीन लोकांना घेऊन जावे. त्यानंतर त्यांनी तिकडून असल्याचं प्रकारचे काही दगड आणले होते. परंतु काही दिवसांनी माझे बाबा एकटेच त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर त्यांची तब्बेत खराब होऊन सहा महिन्यांनी त्यातच ते गेले आणि ह्याचाच धक्का घेऊन माझे आजोबा ही आजारी पडून शेवटी आम्हाला सोडून गेले. त्यांनीच मरता मरता आम्हाला ह्याची माहिती दिली, परंतु त्या जागेचा पत्ता न सांगता ह्याच्या मागे लागू नका असे सांगितले. त्यानंतर आम्ही त्या जागेचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आम्हाला त्यात यश आले नाही. आम्ही सर्व जंगल पिंजून काढले. आम्हाला आठवते की आमचे बाबा कधी कधी असे बरळत असायचे की, तिकडे जाऊ नका, ती सर्वांना मारून टाकेल, बळी, बळी पाहिजे तिला, हार, सोन, हिरा, कमरे इतक्या पाण्यातून जाऊन एक गुहा लागते, तिकडे त्याला एक कोंबडं द्यायचं मगच तो दार उघडतो, बळी बळी, बळी पाहिजे तिला, कोणी जाऊ नका, ती तुमची वाटच पाहते, कोणी जाऊ नका. असे बोलत बोलत त्यानी शेवटची घटका मोजली. इतके म्हणून त्या दोघांनी खोल श्वास घेऊन एकमेकांकडे पाहिले आणि ते गप्प बसले.
थोडावेळ सर्वकाही शांततेत गेलं. त्यांनी संगीतलेल ते सर्वकाही आम्हाला खूपच अविश्वनिय असे वाटत होते त्यामुळे आमच्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्यातला एक जण मला म्हणाला की आम्ही असे ऐकले आहे की तुमच्या मित्राला काही विशिष्ट क्रिया करून दूरचे सर्व काही पाहता येते. आमची अशी विनंती आहे की तुम्ही आम्हाला त्या जागेचा पत्ता शोधायला मदत करावी आणि आमच्याबरोबर चलावे कारण कमीत कमी तीन लोक हवीत आणि आम्ही दोघेच आहोत तसेच दुसऱ्या कोणाला सांगावे म्हणजे उगाच बोभाटा नको म्हणूनच तुम्ही बोलाल ती किंमत द्यायला किंवा मिळणाऱ्या वस्तूंची भागीदारी तुम्हाला द्यायला आम्ही तयार आहोत फक्त आम्हाला तिकडे घेऊन चला. माझा मित्र गरीब असला तरी इमानदार होता परंतु त्यालाही क्षणभर असे वाटले की श्रीमंत होण्याची ही चांगली संधी चालून आली आहे. एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे, आपण चोरी थोडीच करणार आहोत. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचून मी मधेच म्हणलो की हे सर्व बेकायदा आहे आणि अशा सर्व गोष्टींवर फक्त देशाचा अधिकार असतो. त्यावर त्यातला एक म्हणाला की सरकार पण असे काही शोधले की त्यातला काही भाग शोधणाऱ्याला देते आणि वर वाहवा मिळते ती वेगळीच. आपण त्यातला काही भाग आपल्याकडे ठेऊ आणि बाकी सरकारला देऊन टाकू, म्हणून तुम्ही हा नमुना तुमच्या कडे ठेवा. त्यावर मी म्हणालो की आम्हाला त्यातले काही एक नको, परंतु आमच्या कामाचा मोबदला म्हणून तुमच्याकडची काही रक्कम तुम्ही आम्हला द्यायची आणि सर्वच वस्तू न घेता थोडेसे घेऊन बाकी सर्व देशाच्या तिजोरीत जमा करायचे. त्यांनी त्या अटींना होकार देऊन आम्ही आता चार दिवसांनी परत येतो असे म्हणून आमच्या हातावर ती चमकणारी दगडे ठेवली आणि ते निघून गेले.
माझा मित्र त्या कामाला तयार झाला होता परंतु मला काही वेगळीच जाणीव येत होती. त्या कामात मला काहितरी धोका जाणवत होता. दुसऱ्या दिवशी मी ते नमुने माझ्या एका ओळखीच्या जाणकार माणसाला दाखवले. त्याने असे सांगितले की ही साधी दगडे नाहीत तर हा एक हिरा आणि दुसरा हिऱ्यापेक्षा मौल्यवान धातू आहे, तुम्हाला कुठे मिळाले. मी म्हटले की मासे पकडताना समुद्रात जाळ्यात अडकले होते. त्यावर तो काही बोलला नाही. त्यानंतर मला व माझ्या मित्राला हे पटले की ती माणसे जे काही सांगत होती त्यात तथ्य होते. काही विचारविनिमय करून आम्ही ठरवले की ह्याचा शोध घ्यायचा. जरी अपल्याला काही मिळाले नाही तरी काहीतरी मोठा शोध लावला म्हणून आपली वाहवा तर नक्कीच होईल. बस दुसऱ्या दिवशी मी आणि माझा मित्र त्या दगडांचा मागोवा घेऊ लागलो. माझ्या मित्राला काही क्रिया करून लांबचे बऱ्यापैकी दिसत असे. माझ्या मित्राला त्यांनी सांगितले त्याप्रमाणे त्या जागेपर्यंत कसे जायचे ते दिसले असावे म्हणूनच दुसऱ्या दिवशी तो मला म्हणाला की ती त्या जागेवर कसे जायचे ते मला कळले आहे. ते ऐकून मी फक्त मान हलवली व म्हटले, ठीक आहे कसे जायचे कळलंय तर जाऊया आपण. आमची खास मैत्री असल्याने मी त्याला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मी त्याला म्हटले की आता खूपच रात्र झाली आहे आता मी झोपायला घरी जातो आणि सकाळी लवकर येईन. त्याच्या चेहऱ्यावर खूपच समाधान दाटले होते ते पाहून मलाही समाधान वाटले. मी घरी आलो, जेवलो आणि सर्व झोपले आहेत ह्याची खात्री करून हळूच मागच्या दारातून बाहेर पडलो...
दुसऱ्या दिवशी पहाटे ते दोघे परत आले तसे आम्ही दोघांनी त्यांच्याबरोबर येण्याची तयारी दाखवली तसे ते खुश झाले. त्यानंतर सर्व व्यवस्तीत ठरवून आम्ही दुसऱ्या दिवशी उजडायच्या आताच तेथून निघालो. माझा मित्र आणि ते दोघे असे तिघेजण पुढे चालत होते आणि मी त्यांच्या मागून चालत होतो. खोल जंगलात पोहोचल्यावर एके ठिकाणी माझा मित्र थांबला आणि म्हणाला की थांबा ते ठिकाण इकडेच कुठेतरी आहे असे बोलून तो झाडीत इकडे तिकडे शोधाशोध करू लागला तेव्हा मी त्याला विचारले की अरे तू तर सर्व पाहिले आहेस ना? त्यावर तो म्हणाला की मला फक्त खुणा दिसल्या पण इतकं स्पष्ट दिसल नाही. तिथेच एका ठिकाणी झाडीत पाण्यासारखा खळखळ असा आवाज येत होता. ती झाडी हटवल्यावर तिथे एक पाण्याचा ओहोळ दिसून आला. तो पाण्याचा ओहोळ साधारणतः २०० मीटर लांब असावा. माझा मित्र आम्हाला सर्वाना म्हणाला की आता आपण त्या जागेच्या जवळ येऊन पोहोचलो आहोत, हीच ती जागा आहे, ह्या पाण्यातून समोर चालत गेले की निश्चितच ती गुफा येईल. त्यावर मी त्याला सांगितले की मी नाही येणार मला खूप भीती वाटते, पाण्यात जनावरे असतात, त्यावर ते सर्वजण हसू लागले. माझा मित्र मला म्हणाला की ठीक आहे मी तुझ्यासोबत चालतो तू घाबरू नकोस, ह्यावर मी त्यांना म्हटले की ठीक आहे तुम्ही दोघेजण पुढे चला मी आणि माझा मित्र आम्ही दोघे तुमच्या मागून चालतो. त्यांनी होकारार्थी मान हलविली आणि ते दोघे पुढे आणि आम्ही दोघे मागे असे गुडघाभर पाण्यातून पुढे पुढे चालू लागलो. चालता चालता दोघांच्याही पायात काहीतरी अडकल्याने ते दोघेही धडपडले आणि एकाच्या पायाला आणि एकाच्या हाताला ठेच लागून जराशी जखम झाली. मी पटकन त्यांना बाजूला एका दगडापाशी नेलं आणि माझ्या जवळचा मोठा रुमाल फाडून त्यांची जखम पुसून ते नको नको म्हणत असताना पण त्यावर मलमपट्टी केली. मी त्यांना म्हणालो की मी खूप जंगलात फिरलो आहे, इकडे पाण्यात खूप जंतू आणि मच्छर पण असतात त्यामुळे जखम उघडी ठेऊन चालणार नाही. त्यानंतर आम्ही परत चालू लागलो. चालता चालता पाण्याचा प्रवाह डोंगरातील गुहेत शिरला, तिकडून जरा पुढे चालल्यानंतर समोर एक मोठा पाषाण दिसू लागला. त्याच्या तोंडाशी खोलगट भाग वाटत होता आणि त्यावर झाडी वाढली होती. माझा मित्र म्हणाला की मला वाटतेय की हीच ती जागा आहे. हळुहळू आम्ही त्या झाडापाशी पोहोचलो आणि ती झाडी बाजूला केली असता खरच तीथे अजून आत जाण्यासाठी एक रस्ता होता.
आम्ही पाहिले की त्या ठिकाणी एक काळ्या रंगाची अभद्र आकार असणारी एक छोटी मूर्ती होती. त्या मूर्तीच्या बाजूलाच एक लखलखणारा सूरा ठेवला होता. माझ्या मित्राने त्या दोघांनपैकी एकाला सांगितले की त्या मूर्तीची पूजा करून कोंबड्याचा बळी द्या म्हणजे समोरच रस्ता उघडेल. त्याप्रमाणे त्याने त्या दगडाची पूजा केली असता खूप मोठा कररर कररर असा आवाज होऊन समोरचा काळा पाषाण बाजूला होऊन तिथे एक आतमध्ये खोलवर जाणार रस्ता दिसू लागला. तो रस्ता आत खोल कुठेतरी जात होता. आतमध्ये खूपच काळोख होता आणि त्याचसाठी असेल कदाचीत की त्या रस्त्याच्या तोंडापाशी दोन मशाली ठेवल्या होत्या, त्या आम्ही पेटवून आत जाऊ लागलो. काही अंतर चालून गेल्यावर आम्ही एका प्रशस्त अशा दालनात प्रवेश केला तिथे सर्वत्र डोळे दिपवून टाकणारा प्रकाश पडला होता आणि समोरच माणुसभर उंचीची काळ्या पाषाणात कोरलेली एक दगडी मूर्ती होती. मूर्तीला पाहून माझा मित्र खूपच आनंदित झाला आणि मला म्हणाला शेवटी आपण एकदाचे पोहोचलोच असे म्हणून तो मूर्तीच्या जवळ जाऊ लागला तसे मीही त्याच्या मागे जाऊ लागलो, आम्ही त्या मूर्तीच्या पायाशी पोहोचलोच होतो की आम्ही पाहिले की त्या दोघांमधला एक जण आमच्या समोर बंदुक घेऊन उभा राहिला आणि हसून आम्हाला म्हणाला की शेवटी तुम्ही इकडे पोहोचलेच पण आता आम्ही तुम्हाला दोघांना पोहोचवणार आहोत. ते ऐकून माझा मित्र खूप घाबरला आणि त्यांच्यासमोर खूप गयावया करू लागला आणि ते हरामखोर कुत्सित पणे हसू लागले. तो बंदुकवाला त्याच्या साथीदाराला म्हणाला की बांधून टाक ह्या दोघांना. तो आम्हाला बांधायला सारसावणार इतक्यात मी हात जोडून त्या दोघांना म्हणालो की एक शेवटची इच्छा म्हणून आम्हाला तो खजाना तरी पाहू द्या. त्यावर तो बंदूकधारी म्हणाला की दोन लोकांच्या मुंडीचे रक्त चढावील्याशिवाय तो खजाना मिळणार नाही आणि म्हणून तर हे सत्कार्य करण्यासाठीच तुम्हाला दोघांना इथे घेऊन आलो आहे. ते ऐकून माझा मित्र खूप रडू लागला व डोके आणि छाती बडवून म्हणाला, हे मी काय केले मोहापायी माझ्यासकट माझ्या जिवलग मित्राला पण संकटात ढकलले. मी पण त्या दोघांसमोर खूप गयावया केली परंतु ते काही एक मानायला तयार नव्हते. त्यांनी ढकलत ढकलत आम्हाला मूर्तीपाशी आणले आणि जबरदस्ती आमची शिरे त्या मूर्तीच्या पायापाशी झुकवली आणि त्यातला बंदूकधारी म्हणाला की आता मारायला तयार व्हा. ते ऐकून एक अंतिम इच्छा तरी पूर्ण व्हावी म्हणून मी त्यांना म्हणालो की मला एकदा ह्या देवीला मनोभावे पाया पडुद्या आणि मी काही जंगली फुले आणली आहेत ती हिच्या चरणी वाहुदया. त्यांच्यातल्या एकाला दया आली की काय कोण जाणे तो म्हाणाला की करा तुमची शेवटची इच्छा पूर्ण. मी माझ्या खिशात हात घातला असता माझ्या चेहऱ्यावर एक विकट हास्य पसरले जे कोणालाही भयभीत करू शकले असते. ते पाहून त्या दोघांपैकी एक जण वैतागून म्हणाला हारामखोरांनो जे काय आहे ते लवकर आटोपते घ्या आम्हाला जास्त वेळ नाहीय. मला खिशात फुलांव्यतिरिक्त अजूनही काहीतरी हाताला लागले ते म्हणजे त्या दोघांच्या जखमा पुसलेले रुमाल होते. मी हळूच ते दोन्ही रुमाल घेतले आणि देवीच्या पायावर पुसू लागलो. ते करत असताना मला परवा रात्रीचा तो प्रसंग परत आठवला की....
मी घरी आलो, जेवलो आणि सर्व झोपले आहेत ह्याची खात्री करून हळूच मागच्या दारातून बाहेर पडून उजव्या बाजूच्या पडक्या घरात शिरलो. ते घर खूप वर्षांपासून असेच खंडर झाले होते, लहान असताना आई म्हणायची की तिकडेच तुझे बाबा काम करत असायचे आणि एके दिवशी गायब झाले तेव्हापासून मी तिकडे फिरकलेही नाही म्हणून तुपण तिकडे जाऊ नकोस नजाणो तिकडे एखादे जनावर किंवा अजून काही असेल. लहान असताना मी आईचे ऐकायचो परंतु वयात आल्यावर मला तिकडची खूपच ओढ लागू लागली. मला असे वाटायचे की मला तिकडे कोणीतरी बोलावत आहे. म्हणून मी एकदा खेळता खेळता तिकडे गेलो आणि मस्तीमध्ये तिकडच्या भिंतीत मारलेल्या एक खुंटीवर लटकु लागलो असता अचानक ती खुंटी खाली जाऊन खरखर असा आवाज होऊन जमिनीत काहीतरी हालचाल झाली, तसा मी घाबरलो, एका खांबाच्या आड लपून पाहू लागलो असता मला दिसले की जमीन फाटुन त्यातून असंख्य वटवागळू उडत उडत बाहेर माझा दिशेनेच आली, मी घाबरून डोळे गच्च डोळे मिटले आणि मनात आईला आठवू लागलो. बराच वेळ झाला पण काहीच घडले नाही म्हणून मी डोळे किलकिले करून पाहु लागलो तेव्हा मला दिसले की जमिनीत एक खड्डा पडून त्यातून दुधाळ प्रकाश बाहेर येत होता म्हणून जवळ जाऊन पाहिले तर खाली जायला पायऱ्या दिसत होत्या. मी तिकडून पळण्याच्या तयारीतच होतो इतक्यात माझ्या कानात कोणाचातरी आवाज घुमला की थांब!. मी तो आवाज ओळखला, तो माझ्या बाबांचा होता. आईने सांगितलेले की मी लहान असताना बाबा अचानक कुठेतरी गायब झाले होते, गावातले लोक बोलायचे की त्यांना सर्व तंत्र मंत्र अवगत होते, ते लोकांची मदत करायचे पण अचानक एक दिवस गायब झाले. त्यानंतर परत कधीच आले नाहीत. त्यांचे काय झाले कोणालाही कळले नाही. आईने आणि मीही तो विषय सोडून दिला होता.
परत आवाज आला इकडे ये... खाली उतर, आवाजाने मी भानावर आलो आणि भीतभितच खाली त्या भुयारात उतरलो. ती एक काळ्या दगडाने बनलेली प्रशस्त खोली होती. ठीक ठिकाणी कसलीतरी अगम्य भाषेत लिहिलेली तर काही मला समजेल अशा भाषेत लिहिलेली पुस्तके, काहीतरी भरलेल्या असंख्य काचेच्या बाटल्या, कुप्या, कसल्यातरी सुकलेल्या वनस्पती, वस्तू, समोर एक कुठल्यातरी देवाची मूर्ती आणि तिच्यासमोर एक विझलेले, जाळजळमटे पसरलेले यज्ञकुंड, त्याच्या समोर एक मानवी कवटी आणि तिच्या बाजूलाच गुणाकार ठेवलेली दोन हाडे आणि बरोबर त्याच्या समोर बसलेल्या अवस्थेत असलेला एक मानवी सांगाडा. त्याला निरखून पाहिले असता त्याच्या कापड्यावरून मला असे समजले की हे आपले बाबाच आहेत. त्यांच्याबाजूला एक शाईचे दौत आणि एक बोरू पडला होता आणि त्याच्या बाजूलाच एक उघडी आणि अर्धवट लिहिलेली मोठी आणि खुप जाड अशी वही ठेवलेली होती. मी ती वही वाचायला सुरवात केली असता मला असे दिसले की ती वही साधी नसून तंत्र मंत्रांचे भांडार होती. वयात आल्यामुळे माझ्या इच्छाही वाढल्या होत्या आणि जर का त्या वहीत लिहिलेलं ते सर्व खरे असेल तर त्याच्या साहाय्याने मला त्या सर्व पूर्ण करता येणार होत्या असा एक विचार माझ्या मनात चमकून गेला होता. त्यानंतर ती वही वाचता वाचता मी कधी त्यात गुंतून गेलो आणि कालांतराने सर्व विद्यांत पारंगत झालो हे मला देखील कळलेच नव्हते.
मी त्या खंडर घरात येऊन नेहमीप्रमाणे ती लाकडी खटका ओढली आणि तो तळघरात गेलो. आत जाऊन रस्ता अटल्याबाजूने बंद करून घेतला आणि अग्निकुंड प्रज्वलित करून ध्यान लावले. आता मला सर्व काही दिसू लागले होते की त्या खजिन्याचा जागेवर कसे जायचे, मग त्या लहान दरवाजाजवळ कोंबडं कापल्यावर दरवाजा कसा उघडतो आणि मग आत मध्ये गेल्यावर एक काळ्या पाषाणात कोरलेली ती स्त्री सारखी दिसणारी काळीकुट्ट मूर्ती. सामान्य माणुस तिच्याकडे बघूनच बेशुद्ध पडेल इतकी भयानक आणि सजीव. तिच्या हातात कसलेसे एक सोनेरी त्रिशूळासारखे दिसणारे शस्त्र. मूर्तीच्या तोंडातून निघालेले अणूकुचीदार आणि रक्ताने माखलेले दोन सुळे असे दिसत होते की जसेकाही आत्ताच त्यांची जन्माची तहान भागवली असेल. त्या मूर्तीच्या डाव्याबाजूला एक खोल खड्डा त्यात वर्षानुवर्षे सुकलेले रक्त, एक बाजूला पडलेले कित्येक लोकांची शीरे आणि दुसऱ्याबाजूला शीर नसलेले सांगाडे, मूर्तीच्या उजव्या बाजूला असलेला एक काळभोर पाषाण, त्याला बघून असे वाटत होते की तो पोकळ असावा किंवा त्याच्या मागे काहितरी निश्चितच असावे. मूर्तीच्या पायाशी रक्त वाहून जाण्यासाठी एक लहान खड्डा. त्यानंतर मूर्तीच्या चरणांना कोणाच्याही रक्ताचा स्पर्श केल्यावर मूर्तीत येणारे चैतन्य, मग ज्याच्या रक्ताचा स्पर्श झाला त्याच्या रक्ताला चटावणारी ती मूर्ती, मग मूर्तीने घेतलेला बळी आणि मग त्या मूर्तीच्या उजव्या बाजूला उघडणारा पाषाण असे बरेच काही मला दिसले. मला असेही दिसले की ते दोघे ह्याआधीच त्या जागेवर येऊन गेले होते परंतु त्यांनी आम्हाला अर्धवटच माहिती दिली होती की ते तिकडे जाऊन आले होते आणि ती मूर्ती दोन बळी घेतल्याशिवाय खजान्याचे दार उघडत नाही.
मी त्या मूर्तीच्या पायाला ते दोन रुमाल पुसत असतानाच अचानक कसलातरी मोठा ढगांच्या गडगडाटासारखा आवाज होऊन वीजा चमकतात तसा एक डोळे दिपवणारा प्रकाश चमकला आणि खन्न करून मोठा आवाज झाला. आम्ही चौघांनीही त्या दीशेने पाहिले असता आम्हाला मूर्तीत काही हालचाल जाणवली आणि क्षणात काही कळायच्या आताच त्या मूर्तीचे शस्त्र फिरले आणि त्या दोघांची शिरे धडपासून वेगळी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली दिसली. त्यांचे देह थोडावेळ हालचाल करून कायमचे थंडावले. ते भयंकर दृश्य पाहून माझा मित्र पुरताच घाबरून तिथेच थिजून गेला होता आणि थरथर कापत होता.
अचानक परत मोठा कर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज होत बाजूचा दरवाजा उघडला आणि एक लक्ख प्रकाश सगळीकडे पसरला. त्यात डोकावून पाहिले असता सगळीकडे ते हिरेच हिरे आणि सोन्याच्या राशी पसरल्या होत्या. आत पाय टाकल्यावर लिहिलेलं होते की एकावेळी एकदा जेवढे घेता येईल तेवढेच घ्या नंतर गुफा बंद होईल. त्याप्रमाणे आम्ही जितके घेता येईल तितके घेतले आणि बाहेर पडलो असता दरवाजा परत बंद झाला. त्यानंतर आम्ही गुहेतून बाहेर बाहेर पडलो. मूर्तीच्या बाजूलाच रक्ताच्या थारोळ्यात त्या दोघांची शीर नसलेली प्रेत पडली होती आणि देवीची मूर्ती जसेकाही झालेच नाही ह्या पावित्र्यात तिच्या जागी उभी होती. त्या दोघांनाही त्यांच्या खोटेपणाची शिक्षा मिळाली होती. त्यानंतर आम्ही दोघांनीही ह्याबाबतची वाच्यता कुठेच न करण्याचे वचन एकमेकांना करत चुपचाप तिकडून बाहेरचा रस्ता धरला. त्या प्रसंगानंतर आम्ही परत तिकडे कधीच गेलो नाही किंवा कोणाला काही सांगितले नाही ते आजतागायत परंतु आज इतक्या वर्षांनी ते वचन फक्त तुझ्यासाठी मोडले. इतके म्हणून त्यांनी माझ्या हातात एक जीर्ण झालेल्या कागदाची गुंडाळी दिली. विचारले असता ते म्हणाले की हे मी माझ्या हातानी रेखाटलेले त्या देवीचे चित्र आहे. त्यानंतर थोडावेळ बसून तिथून ते निघून गेले. त्यानंतर कधीच तो विषय पुन्हा निघाला नाही परंतु त्यांची आठवण म्हणून मी ते चित्र आजपर्यंत जपून ठेवले आहे आणि त्याचाच फोटो आज कथेत टाकला आहे. परंतु मला असे नेहमीच वाटते की ती जागा ती मूर्ती ते धन खरोखरच तिथे असेल आणि नक्कीच कोणाची तरी प्रतीक्षा करत असेल.... समाप्त...
धन्यवाद...
अँ. अंकुश सू. नवघरे...
दि. २१.१२.२०१७ वेळ १०.४२ रात्रौ
http://marathighoststories.blogspot.com/2018/08/bhutakhetachya-goshti.html
No comments:
Post a Comment