कारखान्या तील भुत
कोणे एके काळी भंडारा जिल्ह्यात विड्या वळण्याचा उद्योग भरभराटीस होता.स्वस्त आणि मुबलक मनुष्यबळ,जंगलात मोठ्या प्रमाणात उगवणारी तेंदूची झाडे आणि विडी कारखान्याला असणारे पोषक वातावरण, ह्यामुळे बर्याच उद्योजकांनी बिडी कारखाने चालवले होते. सिगारेटींचे एवढे प्रस्थ नव्हते; गावोगावी, चौकाचौकांत विड्याच फ़ुंकल्या जात. एकूणच विडी कारखान्यांना भरभराट होती, नफ्याचा उद्योग होता. काळ बदलला. विड्या ओढणे गावंढळपणा झाला. सिगारेटी ओढणे 'फॅशन' म्हणवू लागली.
आता गावागावांत, चौकाचौकांत तरुण पोरं सिगारेटी ओढत 'स्टाईल' मारु लागली. विड्यांची विक्री दिवसेंदिवस मंदावत होती. नक्षलवाद्यांच्या वाढत्या त्रासामुळे जंगलातून तेंदूपत्ता आणणे जिकीरीचे होऊ लागले. तेंदूपत्ता महाग झाला. विडी कारखान्यांना ओहोटी लागली. गावोगावचे छोटे कारखाने बंद पडले. मोठे कारखाने कसेबसे तग धरून होते, पण बरेचसे नतमस्तक झाले. असाच एक विडी कारखाना एका छोट्याशा गावात टिकण्याची धडपड करत होता. पण घर फिरले की घराचे वासेही फिरतात. जेमतेम टिकून असलेल्या या कारखान्याला एके दिवशी आगीने कवेत घेतले.( गावात अजूनही लोक कुजबुजतात की, आग मालकानेच लावली आणि विम्याची रक्कम खिशात घातली. ) कारखाना सार्या मुद्देमालासकट भस्मसात झाला.
मातीच्या भिंती आणि वरचे कौलारू छप्पर तेवढे टिकून राहिले. आग विझवण्याच्या प्रयत्नात दोन कामगार मात्र बळी पडले. कारखान्याच्या कंपाउंडबाहेर कामगारांसाठी मालकाने २०-२१ घरांची एक वसाहत बनवली होती.
कारखाना बंद झाल्यावर ती कुटुंबं नव्या रोजगाराच्या शोधात इतरत्र पांगली. मालकाने चाळ भाड्याने चढवली. गावात बदली होऊन येणार्या नोकरदार वर्गासाठी ती चाळ सोयीची होती. कारखान्याच्या भव्य लोखंडी फाटकाला मोठे कुलुप चढवून आणि गावातला आपला बंगला विकून मालक शहरात रहायला गेला. वर्षामागून वर्षे गेली. जळक्या भिंती आणि फुटक्या कौलांचे छप्पर घेऊन कारखाना एकाकी उभा होता. आवारातल्या सुंदर बागेचे रुपांतर रानात झाले. लोखंडी फाटकाला गंज चढला. चाळीला कारखान्यापासून वेगळी करणारी कंपाउंड मोडकळीस आली. अशा इमारतींसोबत भुतांच्या गोष्टी जोडल्या गेल्या नाहीत तरच नवल. आगीत बळी गेलेल्या त्या दोन कामगारांचा भूत म्हणून पुनर्जन्म झाला होता. कारखान्यासोबत अनेक भूतकथा जोडल्या गेल्या. चाळीत एखादे नवे कुटुंब रहायला आले की, त्यांना ह्या कथा सांगून खबरदार केले जाई. मुलाने जास्त मस्ती केली की, त्याला कारखान्यातल्या भुतांचे भय दाखवले जाई. 'अभ्यास कर नाहीतर कारखान्यात नेऊन सोडेन' म्हणण्याचा अवकाश , मुलगा लगेच अभ्यासाला बसे!
एके दिवशी चाळीत नवे कुटुंब रहायला आले. नवरा-बायको आणि दोन मुले असे छोटेखानी कुटुंब होते. घरप्रमुखाची बॅंकेची फिरतीची नोकरी, २-३ वर्षांत बदली व्हायची. शेजारी आले, विचारपूस केली, गावाबद्दलची माहिती दिली आणि शेजारधर्म पाळत कारखान्याचीही सविस्तर माहिती दिली. हळूहळु ते कुटुंब चाळीत, गावात चांगलेच रुळले.
जवळच असलेल्या शाळेत मुले जाऊ लागली. शेंडेफळ थोडे उनाड होते. त्याचे नाव पंकज,एकदा तो कंपाउंडवरून उडी मारून कारखान्यात जाण्याचा प्रयत्न करू लागला. आईने पाहिले आणि त्याला ओढतच परत आणले. अर्थात उनाडक्या करणार्या मुलाला वठणीवर कसे आणायचे हे सर्वच आयांना ठाऊक असते. आईने त्याला तिखट-मीठ लावून कारखान्यातल्या भुतांच्या गोष्टी सांगितल्या. खरे तर तिचा भुतांवर विश्वास नव्हता, पण ह्याने पुन्हा पुन्हा कारखान्याकडे जाऊ नये हा त्यामागचा हेतू होता. बर्याच वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्यात साप-विंचवांचा धोका होता. रान माजले होते. अशा जागी ती माउली आपल्या लेकराला कसे जाऊ देईल?
पंकजने आईवर विश्वास ठेवला. मनात कुठेतरी भूत घर करून बसले. आता संध्याकाळी संधीप्रकाशात, रातकिड्यांच्या किर्र-किर्र आवाजात कारखान्याकडे लक्ष गेले की, त्याच्या उरात धडकी भरायची. कंपाउंडवरून उडी मारण्याचा विचार मन त्याच्या स्वप्नातही आला नाही. वर्गात पंकजचा एक चांगला मित्र बनला होता, अमोल. अमोल चुणचुणीत आणि हुशार मुलगा होता. दोघांची चांगलीच गट्टी जमली. दोघे एकाच बाकावर बसायचे, एकत्र डबे खायचे आणि खेळायचे. शाळेमागे थोडे अंतर चालत गेले की शेतातून तळ्याकडे जाणारी एक पायवाट होती. तिथे एक मोठे चिंचेचे झाड होते. दूर कारखान्याची मागची बाजू दिसायची. लांबच लांब काळपट लाल भिंत आणि थोड्या-थोड्या अंतराने असलेल्या लोखंडी गजाच्या मोठ्या खिडक्या.
बरेचदा दोघेही सुटीत त्या झाडाखाली येऊन बसत. हे त्या दोघांचे छोटेसे विश्व होते. निवांत बसून गप्पा मारायची जागा होती. इथे वर्गातला, पटांगणावरचा गोंधळ नव्ह्ता. होता तो पक्ष्यांचा मंजुळ ध्वनी आणि कुठुनतरी येणारा बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिण स्वर. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायची ती हक्काची जागा होती.
त्या दिवशी दोघे असेच गप्पा मारत चिंचेखाली बसले होते. अचानक त्या कारखान्याकडे लक्ष जाऊन पंकज
बोलला, "तुले का वाटते बे, अम्या, कारखान्यात भूत असल?"
बोलला, "तुले का वाटते बे, अम्या, कारखान्यात भूत असल?"
"ह्या ss !! काहीच का बे ! आपन अश्या फाल्तू गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. "
"अबे, पर सबच जन तं म्हनतंत?"
"सबच जन म्हनतत म्हनून का झाला, खरा थोडीच असल. मले भुतावर विश्वास नाही. दिसला तं मानीन. आमच्या बाजूच्या घरात अमरभाऊ रायते. तो सांगते का, तो कारखान्यात गेल्ता तं त्याले भूत नाही दिसला. तो म्हन्ते का भूत नाय आहे. आपला भरोसा आहे त्याच्यावर. एकदम डेरिंगबाज मानूस आहे तो."
"हव?"
"नाइ तं का. खोटा थोडीच सांगून रायलो. आता मले सांग, लोक म्हन्तेत का चिचेच्या झाडावर देवाल रायते. आता आपन तं रोजच या झाडाखाली बसतो का नाही? कधी कधी सायंकाळी सात वाजेवरी बसून रायलो, पर तुले दिसली आहे? कधी का आपल्या आंगावर चढली ? नाही नं ? असती तं दिसली नसती का ?" अमोल विजयी मुद्रेत पंकजकडे पाहत बोलला.
पंकजला उगीच ओशाळल्यासारखे झाले. ह्या वयात मुलांची मानस्थिक स्थिती विचित्र असते. एखादा मित्र आपण जे करू शकत नाही ते करत आहे म्हणजे काहीतरी अचाट पराक्रम करत आहे असे वाटत असते. घरची बंधने आणि आपल्या मित्राच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण अशा कात्रीच तो सापडतो. मित्रासमोर आपली प्रतिमा भागुबाईची होऊ नये असे त्यांना वाटत असते. मग तो मनातली भीती लपवतो, सारवासारव करण्याचा प्रयत्न करतो. आपण अगदीच बावळट नाही हे दाखवण्याची धडपड सुरू होते. पंकजने तेच केले.
"आपन बी भुताले काही भेवत नाही, पर विश्वास ठेवाले का जाते ? जगात चांगला आहे तं वाईट बी असलच. देव आहे तं भूत बी असलच!"
"तू ठेव विश्वास, आपन नाही ठेवत."
"अनं तुले का वाटते, त्या कारखान्यातल्या विहीरीत पाह्यला तं मानूस साप बन्ते अनं तिच्यात पडते, खरा असल ?"
"तुले कोनं सागंलन?"
"नाही.....असाच इखनाल-तिखनाल ऐकलाओ..." खरे तर त्याला ही गोष्ट त्याच्या आईनेच सांगितली होती, पण अजूनही आपण आईने सांगितलेल्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतो, हे अमोलसमोर स्वीकार करायची त्याला लाज वाटली. तो पुन्हा आपले हसे उडवेल अशी भीती होतीच.
"ते सब झूट आहे बे पक्या. असा कधी होऊ शकते का? वाटल्यास तूच त्या विहीरीत डोकावून पाह्य." खरे तर तेव्हा पंकज" नाही भाऊ, मी कायले रिस्क घेऊ? " म्हणणार होता , पण स्वतःला सावरून तो म्हणाला, "हव बे, जाऊन पाहावा लागल एखाद-दिवशी. "
" अबे, उद्याच जाउन जा. "
" हव."
घंटा झाली. दोघे उठले आणि वर्गाकडे जायला निघाले. वर्गात पंकजच्या डोक्यात तोच विषय घॊळत
होता आणि शाळा सुटल्यावर घरी जातांनाही त्याच्या डोक्यातून कारखान्यातले भूत काही जात
नव्हते. रात्री झोपतांना पडल्यापडल्या त्याने विचार केला की एकदा खरंच कारखान्यात जायला हवे. भूत खरंच आहे की नाही बघायला हवे. त्याचे विचारचक्र सुरू झाले.
होता आणि शाळा सुटल्यावर घरी जातांनाही त्याच्या डोक्यातून कारखान्यातले भूत काही जात
नव्हते. रात्री झोपतांना पडल्यापडल्या त्याने विचार केला की एकदा खरंच कारखान्यात जायला हवे. भूत खरंच आहे की नाही बघायला हवे. त्याचे विचारचक्र सुरू झाले.
क्रमश,,,,,,,,
No comments:
Post a Comment