थचे नाव- रखवालदार-Marathi Bhutachi gosht
लेखकाचे नाव- सचिन मधुकर परांजपे (पालघर)
त्या खडबडीत अशा दोन दगडांमधली निमुळती जागा मला आवडली होती. माझ्या स्मृतीपटलांवर त्या जागेची नोंद घेतली गेली….माझ्या इवल्याश्या स्मृतीपटलांवर आज भूतकाळाचा प्रचंड मोठा पट उलगडलेला असतो हे फार कमी जणांना माहिती आहे. म्हणजे तुमच्यापैकी ज्यांनी आमचा अगदी वैज्ञानिक वगैरे दृष्टीकोनातून अभ्यास केलाय त्यांनाही ते फारसं अवगत आहे असं दिसत नाही. मी कोण? मी कालसर्प….तुमच्या समोर हा जो सत्तावीस एकराचा एकसलग प्लॉट दिसतोय ना, त्याचा रखवालदार बरं का….राख्या, क्षेत्रपाल, जागर अशी अनेक टोपणनावंही आहेत मला.
गेल्या कित्येक पिढ्या मी या जागेचा रखवालदार आहे. एकेकाळी ही जागा माझ्याच मालकीची होती, या इस्टेटीविषयी, जागेविषयी मला विशेष ममत्व असल्याने माझ्या मनुष्यजन्मातील मृत्युनंतर मी कालसर्प म्हणून इथेच जन्म घेतला. त्याला किती वर्षे झालीत देव जाणे? आता माझ्या अंगावर खवल्यांच्या मधेमध्ये करड्या तपकिरी रंगाचे केसही उगवायला सुरुवात झाली आहे. मी या सबंध इस्टेटीत कुठेही, कधीही फिरु शकतो….मला बघितलं की इथे काम करणाऱ्या शेतमजूरांच्या पायाखालची जमीन हादरते बरं का…आणि मी जेव्हा अत्यंत डौलाने त्यांच्याकडे मान वर करुन फणा काढून बघितलं की आपसूकच त्यांचे हात जोडले जातात….”द्येवा…येत्या सोम्वारी नारळ ठिवतो बग….” किंवा “शुकिरवारी कवटं ठिवतो बग उंतऱ्यावर…आमचं रक्षण कर बाबा” अशा प्रार्थना आपोआप त्यांच्या तोंडून बाहेर पडतात….मी आजवर कधीच कोणाला दंश केला नाही. माझ्या जबड्यातलं जहाल, भयकारी आणि काही क्षणात मृत्युच्या कराल जबड्यात पोहोचविणारं विष आजवर फक्त एकाच माणसाच्या आत उतरवलं होतं आणि त्याला यमसदनी पोहोचवला होता….
माझ्यानंतरच्या तिसऱ्या पिढीतला विश्वंभर….हरामखोर साला….माझ्या नातवाचा थोरला लेक….माझीच वंशावळ हो….पण ही जमीन विकायला निघाला होता. अत्यंत हुशारीने आपल्या उरलेल्या दोघा भावंडांना भरीस पाडून ही जमीन विकायचा बेत होता सावकाराला….अर्थात हा बेत तडीस न्यायच्या आतच त्याला दंश केला मी. माझ्या देखतच तडफडत मेला….त्वरीत धाकट्याच्या स्वप्नात जाऊन मी संदेश दिला, जमीन विकाल तर असाच एकेकाचा बळी घेईन…ही जमीन आपल्या कुटुंबातच रहायला हवी….
आज माझा कात टाकायचा बेत होता म्हणूनच ही निमुळती दगडातली जागा मी नक्की केली….अत्यंत चपळाईने त्या निमुळत्या जागेत शिरुन वेगाने मी आपलं तोंड घासत पुढे सरकत गेलो….आणि निष्प्राण, सुकलेली कात मागे निघत गेली…माझं काळ्या रंगाचं, तेजस्वी त्वचेचं आणि अधिक बलवान व चपळ शरीर दुसरीकडून बाहेर येत गेलं….कात टाकण्याची प्रक्रिया झाल्यावर मला थोडी ग्लानी येते….थोडं बाजूलाच जाऊन शांतपणे पडलो होतो, निपचित. इतक्यात बापू आला…हा माझ्या सव्वीसाव्या पिढीतला माझा वंशज, माझ्यावर प्रचंड श्रध्दा असणारा….त्याने कात बघितली आणि केवढ्याने दचकला….”रखवालदार बाबा आता पुन्हा तरुण झाला” त्याच्या मनातले विचार मी ऐकले. कात उचलून हातात घेतली, भक्तिभावाने मस्तकी लावली…..आणि घेऊन निघून गेला. मला माहितीये आता हा घरी जाईल, लाल कापड्यात ती कात गुंडाळून ठेवेल. शिवालयात जाऊन मंत्रजप करुन ती कात तिजोरीत ठेवेल. मग मी माझ्या तपोबलाने त्याला काहीच कमी पडू देणार नाही. माझ्यासारख्या कालसर्पाच्या कातेमध्ये अतिंद्रिय शक्ती असते….
मी देखील इथे साधना करत असतो. शिवांचे काही गुप्त सर्पमंत्र आहेत, त्याच्या साधना आम्हाला कराव्याच लागतात. वासनांचे तीव्र अंश आमच्यात अजूनही शिल्लक असल्याने आम्हाला नैसर्गिक मृत्यु नाही….पिढी दर पिढी आम्ही जागत्या किंवा रखवालदार म्हणून इथेच रहातो. कालसर्पाला संभोग करता येत नाही, तशी परवानगी नसते. आमच्या पिढीजात जमीनीचे रक्षण हा एकमेव संकल्प असल्याने आम्ही आमचा सर्पवंश निर्माण करु शकत नाही….
एकदा एक मोठा विचित्र प्रकार झाला. मला आठवतंय माझ्या बाराव्या पिढीत एकच मुलगा जन्माला आला……केशव….त्याला ना भाऊ ना बहिण….म्हणजे पिढीचा एकच वंशज, केशवचे काका अविवाहित होते आणि याच्या आईबापांना नंतर मुलबाळ झालंच नाही. माझ्यावर प्रचंड ताण आला….एकतर माझी हद्द ही सत्तावीस एकराचीच होती. कोणत्याही परिस्थितीत आता केशवचं रक्षण करणं गरजेचं होतं. कारण याला जर काही झालं तर जमीन चोरापोरांना जाईल हो….सुदैवाने केशवला काहीही झालं नाही. त्याचं यथावकाश लग्न झालं….सुंदर बायको मिळाली….पण लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी मुल होईना….उभयता चिंताग्रस्त झाले, केशवचे आईबापही तणावात आले…मी पण चिंताग्रस्त झालो.म्हणजे आता केशवला जर मुलबाळ झालंच नाही तर म्हातारपणी हा जमीन विकेल, पैसे मोकळे करेल आणि हरी हरी करत बसेल….ज्या जमीनीवर माझ्या वासना अडकलेल्या आहेत ती जमीन कोणीतरी दुसराच मालक कसायला घेईल…हे शक्यच नव्हतं……मी कडक साधना सुरु केली….केशवच्या बायकोच्या स्वप्नात गेलो….माझ्या मुळ कालसर्प रुपात…तिला म्हणालो, “बाई गं तू माझी नात आहेस असं समज…..आपल्या पिढीला वंशज हवाच….तिला स्वप्नातच एक गुप्त शिवमंत्र दिला, म्हणालो रोज जप कर आणि शेतातल्या माझ्या जागी ये…मी तुला दर्शन देईन. तिथे सोमवारी येणाऱ्या अमावस्येला दहिभात ठेव…..वंश वाढेल तुझा” आणि अंतर्धान पावलो….
पोरीने भक्तिभावाने ते सगळं केलं….माझ्या साधनेच्या बळावर माझ्यातल्या इच्छाशक्तीचे आणि तेजाचे खूप सारे अंश मी केशवच्या शरीरात स्थिर केले…..मला तपोबलाने हे करता येतं….सहा महिन्यात कुस उजवली पोरीची….मग एकापाठोपाठ एक असे तीन तगडे वंशज जन्माला घातले गेले पुढच्या सहा वर्षात…..वंश सुरु झाला. मी सुखावलो….
….गेल्या काही दिवसांपासून आमच्या इस्टेटीवर काहीतरी घडतंय…काहीतरी कटकारस्थानं शिजत आहेत असा मला दाट संशय आहे. एक सुटाबुटाला मनुष्य दर शनिवारी, रविवारी मोटरकार घेऊन इथे येतो. ओठात तपकीरी रंगाची धुम्रओष्ठशलाका घेऊन, काळा चश्मा लावून सबंध इस्टेट न्याहाळत असतो. हा माझा वंशज नाही, पण माझ्या वंशातला सध्याचा जो वंशज आहे म्हणजे बापूचा मोठा भाऊ वसंता तो त्याच्यासोबत कायम असतो, लाचार नजरेने तो ती जमीन सारखी त्याला दाखवत असतो, तो आलेला आगंतुक मनुष्य सारखी मान डोलावत असतो….परवाच शेतावरचा एक मजूर दुसऱ्या एकाला बोलताना मी ऐकलं आणि हादरलो…..”वसंतशेट जमीन विकतायत…वालिया साहेबांना…..पुढच्या आठवडाभरात कागदपत्र होतील…वालियासाहेब इथे एकतर रिसॉर्ट बांधतील किंवा बिल्डिंग” हे ऐकलं आणि माझ्या शेपटातली आग मस्तकात गेली….नकळतपणे मी फुत्कार टाकला, तो ऐकला आणि दोघे मजुर पळून गेले….
पुढच्या दोन दिवसात माझ्या शरीरात पसरलेलं संतापाचं, फसवणूकीच्या रागाचं आणि वैफल्याचं जहर मी गोळा केलं. मूळात माझं कालसर्पविष जहाल होतंच त्याच्यात हे मिसळलं….आणि कोण तो वालिया का कोण आहे त्याला इस्टेटीवर येण्याचा एक गुप्त संदेश पाठवला….हा संदेश एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा असतो…आम्ही एखाद्याच्या मनात तो संदेश पाठविल्यानंतर त्याच्या आंतर्मनाकडून वारंवार ती क्रिया करण्याचा फोर्स निर्माण केला जातो. वालियाला म्हणालो संध्याकाळी एकट्यानेच ये, सोबत कोणी नको….सूर्यास्तानंतर ये…..संधीप्रकाशात इस्टेट कशी दिसते ते बघायला….मी दुपारपासून तयारच होतो. आज काढणी लवकर संपल्याने मजुर दुपारनंतर कामावर येणारच नव्हते. सबंध इस्टेट मोकळीच होती.
संध्याकाळ झाली, उन्हं मंद झाली, सूर्यास्त झाला आणि ठरल्याप्रमाणे वालियाची कार इस्टेटीच्या दारात येऊन थांबली….त्याला बघताक्षणीच माझ्या संतापाचा कडेलोट झाला….वालिया….कारच्या बाहेर उतरला, धुम्रओष्ठशलाका पेटवली आणि दाराशी येऊन आत नुसता बघत होता…..माझ्यापासून दोनेकशे फुटावर होता…..आसपास कोणी नव्हतं….हा अचानक गेला तर परत….मी पुन्हा एक संदेश पाठवला….त्याच्या आंतर्मनावर नोंद झाली….तो पुढे सरकला…..मी डावीकडे पारिजातकाच्या झाडाच्या जवळ होतो….हा उजवीकडे आमराईच्या दिशेने जाऊ लागला……”नाही नाही वालिया…तिथे नको जाऊस…..तिथे धोका आहे….उगाच काळॊखात काही चावलं वगैरे तर…” मी पुन्हा संदेश धाडला…तो उलट फिरला आणि माझ्या दिशेने येऊ लागला…..माझं जहाल हलाहल जबड्यात गोळा होऊ लागलं होतं…..आला….आला……माझ्यापासून दोन फुटावर येऊन उभा होता…..मी पुढच्याक्षणी झेपावलो आणि त्याच्या पोटरीलाच विळखा घेऊन माझ्या अग्निदंश केला त्याच्या पायावर गुडघ्याच्या खाली….एक दोन तीन असे तब्बल तीन दंश करुन होतं नव्हतं तेवढं सगळं विष आत उतरवलं……”ओह…..माssss” त्याला ओरडायलाही संधी दिली नाही, इतक्या प्रचंड वेगात विष पसरायला सुरुवात झाली….दोन मिनिटात तडफडून मेला माझ्यासमोरच….
दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांना समजलं…..विषप्रभावाने काळंनिळं होऊन ताठरलेलं त्याचं शरीर नेण्यात आलं. जमीन विकण्याचा वसंताचा बेत रहित झाला…स्वप्नात जाऊन म्हणालो, “नालायका, या जमीनीत तुझे सत्तावीस वंशज खपलेत. अशी कोणालाही विकशील तर आज जसा त्याला डसलोय तसा तुलाही डसायला मी मागेपुढे बघणार नाही. माझा बापू आहे जमीन राखायला….याद राख पुन्हा जमीन विकशील तर……” वसंताला माझं उग्ररुप दाखविल्यानंतर त्याने बिछाना ओला केला असणार हे नक्की…..
जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझा वंश सुरुच रहाणार….माझ्या ऐहिक वासनांची पूर्तता या जमीनीत उगवणारं पिक करत रहाणार….माझे पुढचे प्रत्येक वंशज शेती पिकवत रहाणार, माझ्या तपोबलाने मला जितकी शक्य आहे तितकी मदत मी करणार…..पण जमीन विकू देणार नाही….तेव्हा लक्षात घ्या…अशी एखाद्या अडल्यानडल्या जमीनीची ऑफर आली तर ती स्विकारण्यापूर्वी नीट विचार करा, तिथे इमले बांधायची स्वप्न बघण्याआधीच दहावेळा विचार करा. ग्राहक म्हणून जमीनीवर पाय ठेवण्याअगोदर, पायाखाली नीट बघा, कदाचित माझ्यासारख्या एखाद्या कालसर्पाचा वेढा तर पडलेला नाहीये ना आपल्या तळपायाना ते नीट बघा….कारण, एकदा का आमचं हलाहल तुमच्या रक्तात पोहोचलं की प्रत्यक्ष धन्वंतरी जरी आला तरी तुम्हाला यमाच्या कराल दाढेखालून वाचवू शकणार नाही हं…..आगोदरच सुचना दिली….नंतर म्हणू नका मी बोललो नव्हतो असं…..काय?
समाप्त
No comments:
Post a Comment