दराक्षी- Read online new marathi stories on this blog
(पूर्ण कथा)
ट्रिंग ट्रिंगssss.... ट्रिंग ट्रिंगssss..... ट्रिंग ट्रिंगsss....
सकाळी साडेपाचच्या दरम्यान फोन खणखणला. हवालदार शिंदे आपल्या अकाळी बाळसं धरलेल्या शरीराला आळोखेपिळोखे देत, आपलं भलमोठं पोट सांभाळत लाकडी बाकावरून कसेबसे उठले अन टेबलाकडे जाऊ लागले.
"आरं आलो बाबाssss..... काय जगबुडी झालीया कि काय....हरामखोर नीट झोपूही देत नाहीत...!!"
अलिबाबाच्या गुहेएवढं मोठ्ठ तोंड करून त्यांनी एक जांभई दिली अन रिसिव्हार कानाला लावून ते खेकसले -
"शाळगाव पोलीस स्टेशन.... कोणाय...??"
"सायेब.... आता लगूलग हीत रायरीत या... मोठं कांड झालंय "
शिंदे अजूनही डोळे चोळतच होते.
"हे बघा काय कम्प्लेंट आसेल तर इथं स्टेशनात या, मग बघू " असं बोलत शिंदे रिसिव्हर दूर करतच होते अन इतक्यात तिकडून फोनवर ओरडणाऱ्या माणसाचे पुसटशे शब्द कानी पडताच शिंदेनीं कान टवकरत ते जवळजवळ ओरडलेच -
"आरे काय बोलतोस..... शुद्धीवर आहेस का...??"
त्यांच्या या ओरडण्याने रात्रपाळीला असलेले इतर दोन हवालदारही कुतूहलाने शिंदेजवळ येऊन उभे राहिले.
"आवं सायेब खरं सांगतुया..... रातीला सहा मुदडं पडल्यात गावात... लगूलग या... ठिवतो फोन...!!" म्हणत त्या इसमाने फोन ठेवला.
एका छोट्या गावात एका रात्रीत सहा खून, प्रकरण गंभीर होतं. शिंदेनी पटकन इन्स्पेक्टर कदमना फोन करून झालेला प्रकार सांगितला. पुढील अर्ध्या तासात इन्स्पेक्टर कदम, सब -इन्स्पेक्टर अन्सारी आणि दिवसाच्या ड्युटीवर असणारे चार हवालदार असा फौजफाटा जमा झाला. स्टेशनमध्ये दोघांना थांबवून कदमसह बाकीचे सहाजण आता भरधावं वेगाने रायरी गावाकडे रवाना झाले.
*****
रायरी गाव हे शाळगावपासून जवळजवळ चाळीस किलोमीटर दूर डोंगराच्या कुशीत वसलेलं एक खेडेगाव. मागील कित्येक वर्षांत ह्या गावाचा पोलीस, कोर्ट-कचेरी अश्या गोष्टींशी दुरूनही संबंध आला नव्हता. गावात काहीही तंटे झालेच नाहीत, असं मुळीच नाही. जे काही वाद होत, ते गावचे पाटील, सरपंच आणि बाकी पंच मिळून गावापातळीवर सोडवत. एकंदरीत काय, तर अतिशय मवाळ अन पापभीरू असं हे गावं...!!! रिटायरमेंटला आलेले हवालदार शिंदे हे याच तालुक्यातील असल्याने त्यांना या गावाबद्दल ऐकून माहिती होते. त्यामुळे या सहा खुनांच्या बातमीने शिंदे भलतेच दचकले होते. रस्ता खराब असल्याने जवळजवळ तासाभरात पोलीस गाडी गावात पोहोचली. गावच्या मुख्य चौकातील पारावर पंधरा- वीस गावकरी बसून होते, ते पोलीस येण्याचीच वाट पाहत असावे. जीप थांबतच सारी जनता जीपभोवती जमा झाली, त्यात गावचे सरपंचही होते. त्यांच्या सांगण्यावरून इन्स्पेक्टर कदम अन् बाकीच्यांना सारा प्रकार लक्षात आला, गावात काल रात्री सशस्त्र दरोडा पडला होता. गावातील एक मातब्बर व्यक्ती दिनानाथ इनामदार यांच्या घरी हा दरोडा पडला होता. त्यात त्यांचा, त्यांच्या पत्नीचा तसेच, मुलगा - सून अन् आठ वर्षांची नात यांचा निर्घृण खून झाला होता. तसेच त्यांचा एक नोकरही मारला गेला होता. दुसरा एक नोकर रात्री घरातून पळून जाण्यास सफल झाल्याने तो वाचला होता. त्या वाचलेल्या नोकराणेच गावात बोंब उठवल्याने गावकरी जागे झाले होते, पण तोपर्यंत उशीर झाला होता. गावातल्या बऱ्याच लोकांनी रात्री त्या दरोडेखोरांना अंधारातून जंगलाकडे पळताना पाहिले होते. ते सहा - सातजण असावेत, असा प्रत्याकदर्शिंचा अंदाज होता. पण यावर एकमत नव्हते. ते सारे दरोडेखोर तोंडावर कापड - गमछा बांधून होते अन् त्यांच्याकडे दुनाळी बंदुका होत्या. ते सारे जंगलाकडे पळताना लोकांनी पाहिले होते. ही प्राथमिक माहिती मिळाल्यावर पोलीस टीम आता इनामदारांच्या वाड्याकडे निघाली. वाड्यावर पोहोचताच कदम यांनी सूचना देत पंचनामा सुरू करण्यास सांगितला. इनामदारांच्या फोनवरून त्यांनी स्वतः तालुक्याच्या सरकारी इस्पितळात फोन केला अन् दोन शववहिका पाठवण्यास सांगितले. पुढील दोन तासांत पंचनामा उरकून डेडबॉडीज पोस्टमॉरटमसाठी पाठवून कदम यातून तूर्तास मोकळे झाले. त्यांनी आता सरपंचांना विचारण्यास सुरुवात केली.
"सरपंच.... या गावापुढे जंगलात कोणतं गावं माझ्या तर ऐकीवात नाहीय, बरोबर ना...??"
"व्हय सायब..... गावं न्हाय पुढं पर एक आदिवाशी पाडा हाय....!!! पर ती आदिवाशी लोकं ह्या गावात येत्यात, ती लोकं फार मवाळ हायती.... असलं आकरीत करणारी न्हायती ती...!!"
"हू..... बघूया.... मला दोन माणसं पाहिजेत त्या पाड्याची वाट दाखवायला..... तुम्ही म्हणता तस ते लोकं यात नसतीलाही, पण हे दरोडेखोर तिकडेच पळालेत..... त्या पाड्यावर जाऊन लपलेले असू शकतात....." कदम म्हणाले.
"ते बी खरंच हाय म्हणा...." म्हणत सरपंच गर्दीकडे वळत म्हणाले -
"पांडू अन गणा.... तुमी दोगं जावा सायबासनी घिवून... आमी बॉड्या आल्या कि तेंच पुढलं बगतो..."
तसें गर्दीतून दोन तरुण पुढे आले. इन्स्पेक्टर कदम यांना हे सर्च ओपरेशन स्वतः लीड करायचे होते, कारण झालेला प्रकार फार गंभीर होता. उद्या पेपरात बातमी येणार, वरिष्ठाचे फोन सुरु होणार.... त्यामुळे हे प्रकरण लवकर निकालात काढणे त्यांना गरजेचे होते. सब - इन्स्पेक्टर अन्सारीकडे वळून ते म्हणाले -
"अन्सारी.....मी तीन हत्यारबंद हवालदार अन वायरलेस ऑपरेटर घेऊन जंगलात जातो.... बाकीच्यांना घेऊन तुम्ही चौकीवर जा..... गरज पडल्यास आम्ही वायरलेसवर संपर्क करू."
हो म्हणत बाकीच्यांना घेऊन अन्सारी जीपकडे वळले. कदम चार जणांना घेऊन त्या दोन तरुणांच्या मागे जाऊ लागले.
गावातून जंगलाच्या पायवाटेला लागून त्यांना तासभर उलटला होता. आत - आत जात असता जंगल अधिक गहीरं होत होतं. झाडाझुडपातून जात असता बाजूचे महाकाय वृक्ष एखाद्या राक्षसासारखे भासत होते. ती तरुण गावकरी मुलं मात्र ताडताड चालत जात होती. पोटं सुटलेल्या हवालदारांची मात्र आता दमछाक होऊ लागली होती, पण कदम साहेब सोबत असल्याने तक्रार करण्यास वाव नव्हता. अजून तासभर पायपीट केल्यावर ते आता त्या पाड्यावर पोहोचले. पंधरा - वीस झोपड्यांचा तो छोटासा पाडा होता. पाड्यावर एक - दोन म्हातारे, उघडी - नागडी पोरं अन काही बायका दिसत होत्या. गावकरी तरुणांनी केलेल्या चौकशीवरून इतर पाडेकरी शिकारीला गेल्याचे समजले. कदमनी साऱ्या उपस्थितांना एकत्र करण्याचा हुकूम सोडला. पुढील पाच मिनिटात हवालदारांनी पाड्यावरील सर्व मुंडकी कदम साहेबांसमोर हजर केली. कदम आता बोलू लागले -
"हे पहा.... शेजारच्या रायरी गावात रात्री एक दरोडा पडलाय आणि ते दरोडेखोर इकडेच पळालेत.... आपल्यापैकी कुणीही रात्री त्यांना पाहिलं असल्यास किंवा कुणालाही काहीही माहिती असल्यास आम्हाला सांगा आणि सरकारी कामात मदत करा..... कुणीही काही लपवा - छपवी केल्यास एकेकाला तुरुंगात डांबेन."
आधीच घाबरलेले आदिवाशी या धमकीवजा इशाऱ्याने आणखीच गांगरले. त्यांची ती अवस्था पाहून एक हवालदार म्हणाला -
"हे बघा.... जे काय माहिती असेल ते सांगा... आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही"
त्यावर एक म्हातारा म्हणाला -
"न्हाय जी.... आसल कुणीबी आमच्या पाड्याकडं आलं न्हाय काल रातीला.... तुमी कुणालाबी इचारा..."
त्यावर इतर जनता "व्हय जी.... कुणीबी आलं न्हाय " म्हणू लागली.
अन इतक्यात पाड्यावरचा एक तेरा - चौदा वर्षांचा पोरगा पुटपुटला -
"दराक्षीच्या घळीकडं तर गेलं नसत्यान ते चोर....??"
त्याच्या या वाक्यावर सारे पाडेकरी त्याच्याकडे खाऊ कि गिळू या नजरेने बघू लागले. आपली चूक लक्षात आल्याने तो पोरगा खजिल झाला.
इन्स्पेक्टर कदमनी मात्र त्या पोराची पुटपुट ऐकली होती. ते चढ्या आवाजात विचारू लागले -
"हे 'दराक्षीची घळी' म्हणजे काय....?? नीट सांगा"
त्यावर रायरी गावातून त्यांच्यासोबत आलेला गणा उद्गारला-
"सायेब.... हिकडं गुहेला 'घळी' म्हणत्यात.... ह्ये येकाद्या गुहेचं नाव आसलं "
"अच्छा..... मग कुठं आहे ती गुहा.... म्हणजे 'घळी'...??"
पण सारे पाडेकरी मात्र उभ्याउभ्याचं कोमात गेल्यासारखे झाले, कुणीही काहीही बोलेना.
आता मात्र कदम साहेबांचं पित्त खवळलं असावं -
"बऱ्या बोलानं सांगा.... नाहीतर साऱ्यांनाच घेऊन जाईन चौकीवर.... सांगा पटकन....!!!" त्यांच्या आवाजातली जरब पाहून पाडेकरी थरथर कापू लागले. एक म्हातारा हिंमत करून पुढे झाला अन बोलू लागला -
"सायेब..... ती जागा वंगाळ हाय.... तिथं जाणं म्हंजी आपल्या मौतीला बोलावण्यासारखं हाय...आमी कुणीबी त्या भागात फिरकत न्हाय... मुळात पाड्यावरल्या दोन- चार म्हाताऱ्यांना सुडून कुणालाबी ती घळी कुठं हाय, ते बी ठावं न्हाय."
त्याच्या ईशाऱ्याकडे दुर्लक्ष करत कदम उद्गारले -
"हे बघा.... जर ती गुहा इतकी आडरानात असेल, तर ते हरामखोर तिकडेच गेले असावे. बाकी तुमच्या या भाकडंकथासाठी आता वेळ नाहीये. कुणीतरी एकजण आम्हाला त्या गुहेकडे घेऊन चला."
त्यांचं शेवटचं वाक्य ऐकून पाडेकरी भीतीने मागे सरकले. आयाबाया लहान पोरांना जवळ करून रडू लागल्या. अन तो म्हातारा पुन्हा बोलला -
"सायेब.... मी दाखीवतो वाट, पर एक शबूद द्या.... मी तुमाला लांबणं ती घळी दावली कि तुमी मला परत मागारी जाऊ दिशीला आनी पाड्यावरल्या कुणालाबी तुरुंगात न्हेणार न्हायसा... हाय का कबूल....??"
"ठीक आहे.... दोन वाजत आलेत.... चला लवकर..." म्हणत कदम घाई करू लागले. रायरी गावातून आलेल्या दोन तरुणांना परत जाण्यास सांगून, टीमला ईशारा करत कदम त्या म्हाताऱ्यासोबत आता पुन्हा त्या भयानक जंगलात शिरू लागले.
*****
घोंघावत येणारा वाराही त्या उंच कपारीवर येवून आदळताच काहीसा अंग चोरून घेत होता. रात्रभर पायपीट करून थकलेले ते सात दरोडेखोर त्या अजस्त्र गुहेच्या तोंडाशी बसून देशी दारूचा आस्वाद घेत होते. पैशांनी अन् सोन्यानाण्यांनी भरलेली दोन गाठोडी त्यांनी मध्यभागी ठेवली होती. मनसोक्त दारू ढोसल्यावर आता त्यांना त्या लुटीच्या वाटण्या करायच्या होत्या. असं गुहेच्या तोंडाशी बसून राहिल्यास कुणीतरी पाहू शकतं, है जाणून ते उठले अन् एकमताने आत गुहेत जाऊ लागले. गुहेच्या तोंडाशी असणारा उजेड आत जाईल तसा धूसर होऊ लागला. सहाजण वेगाने सरकत असले तरी एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा वेग कमी होता. त्याच्या पायाच्या पोटरीतून अजूनही रक्तस्राव सुरू होता. ते रक्त सावरताना त्याचे हातही रक्ताने माखले होते. हळूहळू आत सरकत ते आता त्या गुहेच्या चांगलेच आत आले. त्यांच्या येण्याने अजिबात वर्दळ नसणाऱ्या त्या गुहेत जणू थरथर जाणवू लागली. वटवाघुळांचा एक मोठा थवा या चाहुलीने दचकून चीं.. चीं.. चीं.. करत गुहेतून बाहेर पडण्याचीधडपड करू लागला. सुरुवातीला मिट्ट वाटणारा काळोख आता हळूहळू सुसह्य वाटू लागला. ते सारेजण आता खाली बसले अन् दोन्ही गाठोडी सोडली. सात वाटे घालण्यास सुरुवात झाली. प्रत्येकजण खुश होता. अन् त्या सातजणांपैकी तो जखमी असणारा अचानक उठला, त्याला लघुशंका आली होती. पाय जखमी असल्याने गुहेबाहेर न जाता तो आणखी आत जाऊ लागला. अंधाराचा अंदाज घेत तो दहाएक फूट दूर आला असावा अन् अचानक पाय अडखळल्याने तो धपकन पडला. तो दगडांच्या एका ढीगाऱ्यावर पडला होता. खाली पडल्यावर तो वेदनेने आणखीच विव्हळला. बाकीच्यांनी त्याला "काय झालं" म्हणून आवाज दिला. त्यानं "काही नाही...मी ठीक आहे" म्हणून उत्तर दिलं अन् तो अडखळत उभा राहू लागला. अनावधानाने त्याच्या हातावरील रक्त त्या धिगाऱ्यावरील दगडांना लागले. आपली लघुशंका उरकून तो आता परत वळू लागला. त्या दगडांच्या ढीगाऱ्यातून उठणारा काळा धूर त्याला त्या मिट्ट काळोखात कदाचित दिसला नसावा. अन् अचानक त्या गुहेतल वातावरण काहीसं दमट अन् जीवघेणं होऊ लागलं. त्या मिट्ट काळोखात, त्या सैतानी गुहेत ते सातजण साक्षात मृत्यूच्या दाढेत होते. अन लंगडत चालणाऱ्या त्या दरोडेखोरासमोर एक मिट्ट आकृती अचानक उभी राहिली, तसा तो जागीच गोठला. त्या आकृतीला निश्चित आकार नव्हता. कुबट वास असणारी ती आकृती आता पुन्हा धुरात परवर्तीत झाली अन सेकंदाच्या दशांश भागात तो काळसर धूर त्या लंगड्या दरोडेखोराच्या नाका - तोंडातून आत जाऊ लागला. पुढील काही सेकंदातच त्याच्या डोळ्यातली बुबूळ गायब झाली अन तोंडावर एक आसुरी हास्य उमटलं. आता त्या इसमाला दुखणाऱ्या पायाची फिकीर नव्हती. आपली नजर जमिनीकडे वळवून तो त्या सहाजणांकडे सरकू लागला. कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या घश्यातली गुरगूर कमी होत नव्हती. अन अचानक त्या बसलेल्यापैकी एकजण मागे अंधारात खेचला गेला. पुढच्या दोन सेकंदात त्याची किंकाळी त्या गुहेत परवार्तीत होऊ लागली. बाकी लोकांना काही समजायच्या आत ती गुहा एका भेदक हास्याने गडगडून उठली. पुढील तीनच मिनिटात किंकाळ्यांनी ती गुहा थरारली अन पुन्हा शांतता आपलं राज्य प्रस्थापित करू लागली. पण ती शांतता आता पूर्वीची खाचितच नव्हती.
*****
पावलागनीस निबीड होत जाणाऱ्या त्या घनदाट जंगलात एक अनोळखी शिरकाव होत होता. काहीसा भेदारलेला तो आदिवाशी म्हातारा अगदी कान टवकारून एक - एक पाऊल टाकत, सावकाश कानोसा घेत जात होता. त्याचा चेहरा कमालीचा चिंताक्रांत वाटत होता. कसल्याशा अनामिक भीतीने त्याची मती जणू गुंग झाली असावी. सोबत चाललेले पोलीस मात्र निर्धास्तपणे चालत असले, तरी या पायपीटीने तेही थकलेले दिसत होते. इन्स्पेक्टर कदम मात्र त्या म्हातार्या आदिवास्यासोबत चालण्याचा प्रयत्न करत होते. जवळजवळ चाळीस मिनिटे पायपीट करत आल्यावर त्यांना समजले, की ते एका भव्य डोंगराच्या पायथ्याशी पोहोचले आहेत. तिथे पोहोचताच तो आदिवासी म्हातारा थबकला आणि घाबरतच आपली मान डोंगराच्या दिशेने करू लागला. आपली भिरभिरती नजर एका विशिष्ट ठिकाणी स्थीरावल्यानंतर मात्र तो म्हातारा आणखीच गर्भगळीत झाला आणि म्हणाला-
"सायेब...ती बगा... ती काळी कातळ दिसत्या नव्ह कपारीला, तिच्या डाव्या आंगाला जी पोकळी दिसत्या- तीच ती घळी हाय....!!! पर मला हितणं जाऊद्या सायेब... तुमी ही पायवाट न सोडता सरळ खाली आलासा कि पाड्यावर पोचशीला..."
असं म्हणत तो म्हातारा चक्क विजेच्या वेगाने आल्यावाटे मागे पळालाही....!! त्याला पळताना पाहुन हवालदारांसह कदमही काहीसे दचकले आणि मग हसूही लागले. दहा मिनिटांची विश्रांती करुन झाल्यानंतर कदम यांनी सूचना देण्यास सुरुवात केली.
" हे पहा, आपल्याला एकत्र न जाता थोड्या थोड्या अंतरावरून चढत चारी बाजूंनी त्या गुहेच्या तोंडाकडे सरकायच आहे. आणि हो, मी ऑर्डर दिल्याशिवाय कुणीही फायर ओपन करू नका. आपल्याला शक्यतो त्यांना जिवंत पकडायचा आहे, आलं लक्षात सगळ्यांना...?? " हवालदारांनी माना डोलावल्या. थोडे थोडे अंतर ठेवून ते सर्वजण आता त्या गुहेच्या तोंडाकडे सरकू लागले. पुढे पुढे जात असता डोंगराची चढण अधिक खडी होत आहे, असं वाटू लागलं. स्वतःला लपवत ते सर्वजण आता त्या गुहेच्या अगदी तोंडाजवळ जाऊन पोहोचले. इन्स्पेक्टर कदम त्यांना इशाऱ्यानेच कसली सूचना देत होते अन एवढ्यात कुणीतरी इसम गुहेतून बाहेर चालत येत गुहेच्या तोंडाशी येऊन उभा राहीला. त्याला पाहताच सारे पोलीस सावध झाले. त्याचा अवतार पाहता तो एखादा दरोडेखोर असावा, कदमसह बाकीच्यांना खात्री पटली. एवढ्या मोठ्या पायपिटीचे चीज झाल्याने ते सारेजण खूप खुश झाले असावे. गुहेच्या तोंडाशी उभा असणारा तो दरोडेखोर ज्या विक्षिप्त हालचाली करत बाहेर आला होता; तशाच हालचाली करत हळूहळू गुहेत जाऊ लागला. हल्ला करण्याची हीच वेळ आहे, हे जाणून कदम यांनी सर्वांना इशारा केला आणि क्षणार्धात पोलिसांची तुकडी गुहेच्या तोंडातून त्या अंधाऱ्या गुहेत दाखल झाली. तिथे त्यांच्या स्वागताला ते सात दरोडेखोर जणू ठाण मांडून बसले होते. त्यांची शरीरं अजून तरी मानवी होती. पण बिना बुभूळाचे पांढरेफट्ट डोळे मात्र त्या अंधारात आता चमकताना दिसत होते. अन पुढील चारेक मिनिटात ती गुहा मानवी किंकाळ्यांनी पुन्हा एकदा दणाणून उठली.
*****
सायंकाळचे पाच वाजत आले तरी इन्स्पेक्टर कदम यांच्याशी कसलाही संपर्क न झाल्याने सबइंस्पेक्टर अन्सारी आपला बाकीचा फौजफाटा घेऊन थेट रायरी गावात पोहोचले. इन्स्पेक्टर कदम आणि टीम अजून रायरी गावात परत आलेली नाहीये, हे जाणताच सबइंस्पेक्टर अन्सारी आणखीच चिंतित झाले आणि ते एका गावकऱ्यांच्या मदतीने त्या आदिवासी पाड्यावर जायला निघाले. अंसारी जेव्हा त्या आदिवासी पाड्यावर पोहोचले, तेव्हा मात्र अन्सारी आणि पोलीस टीमसह आदिवासी पाडाही जणु कोमात गेल्यासारखा झाला. कारण दुपारी त्या गुहेकडे गेलेले ते पोलीस अजून परतले नाहीयेत, ही गोष्ट त्या पाडेकरण्यासाठी नवी होती. त्या गुहेत गेलेले पोलीस अजून परतले नाहीत, म्हणजे नक्कीच त्यांचा काहीतरी घातपात झाला आहे- याची जणू त्या आदिवासी लोकांना खात्री होती. इन्स्पेक्टर अन्सारीनी त्या गुहेकडे जाण्याचा विषय काढताच दुपारचा तो आदिवासी म्हातारा भयंकर चिडला आणि म्हणाला-
"सायेब.... आत्ताच्या आत्ता बंदुकीनं मारून टाका आमा समद्यास्नी. पण त्या घळीकडं नेऊ नगा. आणि पाया पडतो, तुमीबी जाऊ नगा. तुमची जी लोकं दुपारी तिकडं गेली, ती आत्ता जित्ती नसतील सायेब.... उगी मराण कशाला वडून घेताय आंगावं...??" त्याच्या बोलण्यात अगतिकता विनवणी आणि तितकीच भीतीही खच्चून भरली होती
त्या म्हाताऱ्याच्या अशा कोड्यात टाकणाऱ्या बोलण्याने अन्सारी काहीसे वैतागले आणि विचारू लागले
" ओ म्हातारेबाबा.... उगीच काहीही बोलू नका. तुम्हाला इथं बसून काय माहिती, तिकडे काय घडले ते....आणि एवढी काळजी करण्यासारखे काय आहे काय त्या गुहेत...?? एखादा नरभक्षक वाघ तर नाही ना...??"
"वाग बरा सायेब.... आवो, ही लय वंगाळ बिलामत हाय... ती जर मोकळी सुटली आसलं, तर काय खरं न्हाय बगा...!!"
वैतागलेला अन्सारी काहीसा आवाज चढवून ओरडला
" अहो, कोण "ती"....??? हे असं कोड्यात बोलायचं बंद करा बघू आणि काय आहे, ते मला सविस्तर सांगा"
त्यावर गळा खाकरत काहीशा भेदरलेल्या स्वरात तो म्हातारा बोलू लागला-
"सायेब.... चार - पाच पिड्यामागची गाता हाय ह्या "दराक्षी"ची.... ही बिलामत आमच्या पाड्यातलीच, ह्या पाड्यातच राहत हुती...दिसाया जितकी भारी तितकीच बेरकी... ती काळा जादू शिकली हुती. आणि त्या जादूनच ती चांगली दिसतं हुती. तेच्यासाठी ती रोज एका जनवराचं ताज रगात प्याची.
आमच्या पाड्यात लगीन- बिगीन करीत न्हायत सायेब....जो जोडा एकमेकांना पसंती करील ते येक हुन रातात.... पण दराक्षी जरी चांगली दिसतं असली तरी तिला तसं इचारायची कुणाची छाती नव्हती. अन आसबी तिच्यासाठी पाड्यावरलं गडी कुचकामी हुतं. तिला कायतरी येगळंच पायजेल हुतं. तिनं घरात येक बुजगावणं बनवून तेच्यासंग निजायची. अन तिला दिस गेलं सायेब.... त्या बेरकी बायंनं काळी जादू करून बुजगावण्यात कुणाला तरी बोलावलं आसन. तिचं हे धंदं बगुन सारा पाडा चिडला हुता, पण तिला ईचरणार कोण...?? आन हाळूहळू पाड्याला ती नगुशी झाली, लोकं कायबी करून तिला कसं हाकालता येईल नायतर मारता येईल ते बगत हुती. मग एक म्हातारा पाडेकरी गुपचूप दुसऱ्या एका पाड्यात गेला अन तिथल्या एका काळा जादू शिकल्याल्या देवरुश्याला भेटला. तेन सांगितलं कि त्या बायच्या पोटात सैतानाची औलाद हाय. तिच्याकडं कितीबी काळी जादू असली, तरी ती वापराया आंगची लय ताकद लागती. पोटूशी बाय आसं करू शकत न्हाय, न्हायतर तिच्या पोटातलं लेकरू मरलं. म्हंजी तिला मारायचं आसन तर हीच येळ हाय...!!
पाड्यावर आल्याव त्या म्हाताऱ्यानं साऱ्या गडीमाणसांची बैठक घेतली. पण त्या दराक्षीला माराया कुणीबी तयार हुईना. शेवटी तिला जित्तीचं हात-पाय बांधून कपारीच्या त्या घळीत न्यून ठेवायचं ठरलं. तित बिना आनापाण्याची ती चार - आठ दिसात ती मरलं, आसं समद्यास्नी वाटलं हुतं...पण त्या घळीकडनं चार म्हईनं "समद्यास्नी बगती... कुणाला सोडणार न्हाय" आसं आवाज येत हुतं सायब.... सारा पाडा जीव मुटीत धरून जगत हुता. मंग कुठं ते आवाज बंद झालं. मग त्या देवरुष्याला बुलवून पाड्यातली गडीमाणसं त्या घळीत गिली... तितं दराक्षीची सडल्याली काया हुती. तेनी ती तितंच गाडली आणि वर दगडी रचून ठेवली. आन त्या देवरुष्यानं सांगितलं, ही घळी आजपासन बंद करा... ह्या दराक्षीनं मरतानाबी आपली ताकद दाखीवल्या. जर तिला गाडल्याला जागी माणसाच्या रगताचा एक ठिपूस जरी सांडला, तरी ती दराक्षी काळाच्या पडद्यामागणं परत येईल. मी माझ्या काळ्या शक्तिन तिला ह्या डोंगरातच थोपवून ठेवतो. म्हंजी जरी ती जागी झाली तरी ह्या डोंगरातन ती खाली याची न्हाय.
तवापासन ती घळी आमी पाड्यासाठी बंद केल्या सायेब..... ती अवदसा जर खरुखर उठली आसन, तर कुणाचं काय खरं नाय साहेब...!!"
शांतपणे ही कथा ऐकणाऱ्या अन्सारीला या कथेत कसलेही तथ्य वाटले नाही. हे आदिवाशी अशाच भाकडकथा उराशी बाळगून आयुष्य काढतात, ही पण तश्या कथापैकीचं एक असावी म्हणत अन्सारी उद्गारले.
"हे बघा.... मला काहीही करून त्या गुहेपर्यंत जायचंय.... आमचे लोकं अडकलेत तिथे लं...तुम्हाला यावंच लागेल "
"सायेब...आत्ता दिस ढळलाय. जंगल लयं बेक्कार हाय, जणांवरबी हायती मोक्कार....कायबी करा अन उद्या येरव्हाळी या... आपुन जाऊ...!!"
अन्सारीला यात तथ्य वाटले. सकाळी सहा वाजताच आम्ही येऊ, असे सांगून पोलीस परतले.
*****
दुसऱ्या दिवशी पहाटे अन्सारी आणि टीम पाड्यावर हजर झाली. काल रात्री वायरलेसवर इन्स्पेक्टर कदम आणि टीमचा काहीतरी मॅसेज येईल, ही आशा फोल ठरल्याने अन्सारी आज जरा जास्तच चिंतीत दिसत होते. आधीच ठरल्याप्रमाणे त्या आदिवासी म्हाताऱ्याने अन्सारी आणि टीमला त्या भव्य डोंगराच्या पायथ्याला नेऊन सोडले अन तो म्हातारा पळतच पाड्याकडे जाऊ लागला. आता अन्सारी आणि टीम तो डोंगर चढत त्या गुहेकडे सरकू लागले अन अचानक त्या गुहेतून कुणीतरी धडपडत बाहेर आलं आणि गुहेच्या तोंडाशी येऊन एका दगडावर बसलं. हाळूहळू गुहेजवळ जाताना अन्सारीला कळालं कि तो व्यक्ती पोलीस युनिफॉर्ममध्ये आहे, पण जखमा आणि रक्ताच्या डागाने तो बरबटलेला दिसत आहे... त्या व्यक्तीचे डोळे हातरूमाल किंवा कपडाने बांधलेले आहेत. अंतर अजून कमी होताच अन्सारीने ओळखले- ते इन्स्पेक्टर कदम होते. त्यांना पाहून अन्सारीला हुरूप आला आणि तो मोठ्याने ओरडला-
"अरे ते बघा... कदम साहेब ठीक आहेत... चला लवकर..."
अन गुहेकडे पाहून अन्सारी ओरडला -
"कदम साहेब.... आम्ही आलोय मदत घेऊन...!!"
या आवाजासरशी कदमने कान टवकारले, त्याच्या घश्यातली गुरगूर किंचित वाढली. अन्सारी अन बाकीचे कदमजवळ पोहोचले अन अन्सारी विचारू लागला -
"नेमक काय झालं सायेब.... आपली बाकी टीम कुठंय...?? अन ते दरोडेखोर....??? त्यांचं काय झालं....??"
त्यावर त्या कदमने अवाक्षरही न उच्चारता गुहेकडे बोट दाखवलं. अन्सारीने पटकन सोबतच्या हवालदारांना गुहेत जाऊन आपल्या साथीदारांना शोधून बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या. अन तो कदमसमोर बसून पुन्हा विचारू लागला-
"साहेब.... डोळ्यांना काय लागलं हो....?? डोळ्याबाजूला आहे ना, का डोळ्यालाचं ईजा झालीय...जरा बघू तर" म्हणत अन्सारीने कदमच्या डोळ्यावर बांधलेला हातरूमाल काढू लागला, तसा कदम गुरगुरू लागला. अन एवढ्यात गुहेतून एकामागोमाग एक किंकाळ्यांचे सत्र सुरु झाले. अन्सारीने हिमतीने पुढे होत कदमच्या डोळ्यावरील ती पट्टी ओढली, तसा पांढऱ्याफट्ट डोळ्यांचा कदम गुरगुरत हसू लागला अन त्याने विजेच्या वेगाने अन्सारीवर झडप घातली.
*****
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या अजस्त्र गुहेच तोंड गर्दीने भरून गेलं होतं. सात दरोडेखोर, नऊ पोलीस....सारे त्या गुहेच्या तोंडाशी यंत्रवत उभे होते. एक धुरकट काळी आकृती त्यांच्यामधून घोंगावत होती. आता त्या साऱ्यांचा रोख मानवी वस्तीकडे होता....!!!
दराक्षीला त्या देवरुष्याचा सुरक्षाघेरा तोडण्यासाठी सोळा बळी हवे होते.... आता तिने ते मिळवल्याने ती मुक्तपणे फिरू शकत होती.
(समाप्त)
No comments:
Post a Comment