लेखक-श्रीरंग फडके.
'राखणदार सलामत तो.....'
साल आठवत नाही.तारीख मात्र पक्की लक्षात आहे. तेरा मे (१३ मे) उलटून चौदा मे ची मध्यरात्र सुरू झाली होती.रात्रीचे बारा साडेबारा झाले असतील.उन्हाळ्याचा मौसम.बाहेर मिट्ट काळोख.सदाहरित जंगलाचा तो लांबलचक पट्टा.रस्त्यावर आमची गाडी सोडून कुठेही वाहनाचा मागमूस नाही.गाडीत आम्ही चौघे जण.टक्क जागे.काचा खाली असूनही अंगावरून निथळणारा घाम.अर्थात हवा एवढी काही गरम नव्हती.प्रत्येक शंभर मीटरनंतर चेहऱ्यावर वाढत जाणारी एकेक आठी.कमालीचे भेदरलेलो.गाडीच्या इंधन (पेट्रोल) काट्याकडे सारखं लक्ष्य.एव्हाना तो काटाही उघडमीट होऊ लागलेला.म्हणजे कोणत्याही क्षणी पेट्रोल संपणार.नकाशावर जवळचा पेट्रोल पंप सत्तर किमी पुढे दाखवत होता.म्हणजे जेव्हा मोबाईलला सिग्नल होता तेव्हा दाखवत होता.आता या रानात कुठला आला सिग्नल!रस्ता चढाउताराचा.उत्तर कन्नड जिल्ह्यातला तो एकाकी जंगलभाग.अनशी अभयारण्याची सीमा रस्त्याच्या पश्चिमेला पसरलेली.अजून यल्लापुर बरच पुढे.शिरसी केव्हाच मागे पडलेलं. शिरसीत पेट्रोल पंप असूनही पेट्रोल भरायचं कोणालाही सुचलं नाही.आता खंत करून काय फायदा! आमचे चेहरे पांढरेफटक.रान संपायचं नाव घेईना.फार उशीर झालेला.काहीही करून त्या रात्री गोव्यात पोहोचायचं होतं.दुसऱ्या दिवशी एक महत्वाचं काम होतं.जायला लागणारच होतं काहीही करून.आता कसलं काय!अगदी हळूहळू पुढे जात होतो.गाडीच्या दिव्यांच्या उजेडात एका फायकसच्या फांदीवर रस्त्याला समांतर एक मतस्यघुबड बसलेलं दिसलं.मान पूर्णपणे फिरवून आपले पिवळेरंजन डोळे आमच्यावर रोखलेले.हाडापर्यंत शिरशिरी आणणारी, गोठवून टाकणारी एक शीळ घालून त्या फांदीवरून त्याने पोबारा केला आणि अचानक आमच्या गाडीने हिसका दिलाच...
दरवर्षी उन्हाळ्यात आम्ही चार घट्ट मित्र कुठेनाकुठेना कुठे लांबच्या गाडीप्रवासाची सहल करतो.यात एक अट अशी असते की शक्यतो ही सहल कुठल्याही नियोजनाशिवाय व्हायला हवी. यात हॉटेल किंवा राहायच्या जागाच काय पण आपण कुठे जाणार किंवा परत कधी येणार हेही ठरलेलं नसतं.जायची तारीख फक्त ठरते.यायची तारीख त्या त्या वेळी ठरवली जाते.कोणाची गाडी घायची हेसुध्दा त्याच दिवशी ठरतं.मग सगळे (म्हणजे चार) जण गोव्यातल्या वेगवेगळ्या भागातून मध्यवर्ती भागातल्या आमच्या नेहमीच्या रस-आम्लेट वाल्याकडे जमतो.साधारण संध्याकाळी सहाची वेळ असते.मस्तपैकी कात्रा पाव आणि रस्सा हाणून त्यावर मिट्ट गोड चहा प्यायला की आमच्यातला एक जण विचारतो की 'कुठे जायचं!' मग ठरतं की चला यावेळी हे ठिकाण करू. रात्री झोप येईपर्यंत आम्ही गाडी चालवतो.इतके जिगरी मित्र असे वर्षातून एखाद-दोनदाच मोठ्या काळासाठी लाभतात त्यामुळे गप्पा- गोष्टी - गाणी सगळं यथासांग होतं. प्रवास करताना एखाद्या ठिकाणी झोप अगदीच डोळ्यांत मावेनाशी झाली की उत्तररात्री तीनसाडेतीनच्या सुमारास एखाद्या दिसेल त्या हॉटेलचा, लॉजचा दरवाजा वाजवायचा.खूप वेळ आतून जागच नसते.मग कधीतरी साखरझोपेत असलेला एखादा माणूस त्रासीक चेहऱ्याने येतो आणि इतक्या रात्री आलो म्हणून शिव्यांची लाखोली वाहतो.मग खोलीही देतोच अर्थात आणि परत झोपायला निघून जातो. बाकी सगळं दुसऱ्या दिवशी होतं. आमच्या अश्या गाडीप्रवासाचे इतके किस्से आहेत की विचारायलाच नको.एकदा एका हॉटेलच्या एका पोऱ्याने तो झोपेत असताना असच आम्हाला आत घेतलं. खीळ्या वरच्या असंख्य चाव्यांच्या गुंत्यातून एक चावी काढली आणि आम्हाला दार उघडून दिले.त्याचे डोळे या सगळ्या सोपस्कारात बंद होते चक्क. याने काय घोळ घातलाय ते आमच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्यात यायच्या आत आम्ही ते हॉटेलच काय, ते शहर सोडलेलं. आम्हाला चुकून (म्हणजे झोपेत) ज्या खोलीची चावी दिली गेली होती ती आधीच एका मधूचंद्रासाठी आलेल्या जोडप्यालाही दिली गेली होती.बहुधा झोपेतच त्याने हे कृत्य केलं होतं.ती त्या खोलीची डूप्लिकेट चावी असावी.आम्ही बहुतेक तिघे होतो तेव्हा.छान ऐसपैस खोली होती.मध्ये एक पार्टीशन होतं आणि त्यामुळे त्या खोलीचे दोन भाग झाले होते. उत्तर भारतात कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी होतो वाटतं आम्ही आता आठवत नाही.बहुधा ते जोडपं त्यांच्या सजवलेल्या बेडवर होतं आणि लाईट बंद होते.(साहजिक आहे)आम्ही इतके दमलो होतो की दिवे लावायचं त्राण आमच्यात नव्हतं.त्या पार्टीशनकडे असलेल्या दोन सोफ्यातच आम्ही तिघे पसरलो. त्या जोडप्याला आम्ही आल्याच कळलंही नाही.पहाटेला खोलीत खूप आवाज येत असल्याने झोपेचं खोबरं होऊन आमच्यातला एक जण त्रासून उठला आणि त्याने धक्का बसलेल्या चेहऱ्याने आम्हाला उठवलं.मग आम्ही सगळेच बिबट्याला लाजवेल अशा सहजतेने (म्हणजे आवाज न करता)ती खोली सोडली.
त्यावर्षीच्या मे महिन्यात आम्ही दक्षिण भारतात होतो आणि गोव्याहून तमिळनाडूपर्यंत पश्चिम घाटातली बहुतेक सगळी राने पालथी घालत होतो. आम्ही केलेल्या गाडीप्रवासामधला तो सगळ्यात संस्मरणीय प्रवास होता असावा.घाटाचा परिसर किती हिरवा होता! सदाहरित झाडांच्या दाट गोपुरांच्या एकावर एक चढत गेलेल्या छत्र्या,मध्येच वळवाची येणारी एखादी सर,दरीत उतरणारे कापसाच्या ढगांचे पुंजके, गुलमोहोराने लाल केशरी झालेले आणि त्याच्या मुलायम पाकळ्यांचा सडा घेऊन मिरवणारे रस्ते..काळया रस्त्याबाजूचा सांडलेला तो लाल भडक सडा कित्ती म्हणून सुंदर दिसावा! मध्येच येणारे कॉफीचे मळे,त्यांची ती लाल - हिरवी फळे. 'स्क्विरल टेल' ची दुधी छटा असलेली फुले, केनचे घनदाट रान, उंच डोंगरावरचे गवताळ उतार, मधूनच रस्ता ओलांडणारा रानगव्यांचा कळप अगदी अस्थिरचित्त करत होता.अनेक वेळा पाहूनही हा परिसर अगदी कोरा,नवा वाटत होता.गर्दीची लोकप्रिय ठिकाणे टाळून शक्यतो एकाकी जागी राहण्याकडे आमचा कल.माणसांपासून दूर,निसर्गाच्या सानिध्यात.त्यामुळे प्रवासात अजूनच रंगत भरते.
कोटागिरीच्या एका डाकबंगल्यात आमचा त्यावेळी मुक्काम होता. वरांड्यात बसलं की खालच्या बाजूला पसरलेले चहाचे मळे दिसत.त्यांच्यामध्ये ओळीने लावलेले सिल्वर ओक वृक्ष लक्ष्य वेधून घेत.आपल्या पाठीला बांबूच्या टोपल्या लाऊन चहा पाने खुडणारी माणसे. क्षितिजाकडेला अन्नमलाईच्या निळसर रांगा.त्यावरच्या गवताळ उतारांवर आमची विशेष नजर असे.कधीकधी चरायला येणारे 'निलगिरी थार' किंवा 'निलगिरी मार्टीन' दुर्बिणीतून अश्या उतारांवर दिसत.त्याखाली दरीत शोला जातीचं कंच रान, आता फारच थोडं शिल्लक राहीलेले दिसे.सकाळ- संध्याकाळी पावसाचा एखादा शिडकावा सारा परिसर तजेलदार करत असे.मातीचा वास,त्यात चहाचा वास, रानातल्या अनेक गोष्टींचा वास, धुराचा वास,आंब्यांचा वास, गुरांच्या शेणाचा वास, डाक बंगल्याच्या फर्निचर चा वास,बकुळीच्या फुलांचा वास, मधुमालतीचा वास, शेल मधल्या जुन्या पुस्तकांचा वास,रसाळ फणसाचा वास, लाल चाफ्याचा वास आणि कसला कसला वास.उतरत्या छपरांची जुनी मोठ्ठी घरे टेकड्यांमध्ये कुठेकुठे पेरलेली दिसत.आभाळाचे विविध रंग एकाच वेळी अनुभवायला मिळत.चार पाच दिवसांचा तिथला मुक्काम फारच आनंददायी होता.निर्हेतुक भटकणं, डोंगरदर्या तुडवणं ,पक्षीनिरिक्षण करण्यात वेळ जात होता.पुढचा मुक्काम कुठे करायचा याचा खल त्या सकाळी करत असताना मित्राला फोन आला की काहीतरी महत्वाचं काम आलय आणि दुसऱ्या दिवशी साताला तातडीने गोव्यात हजार व्हायला सांगितलय.आम्ही घड्याळ पाहिलं.सकाळचे नऊ वाजले होते.नाश्ता भरपेट झाला होता.नकाशात अंतर साधारण साडेसातशे किमी आणि सोळा तास दाखवत होते. तितकच महत्वाचं कारण होतं, जायला तर लागणार होतं आणि त्यामुळे पटापट सगळं उरकून आम्ही सकाळी साडेदहाला कोटागिरी सोडलं.
तो अख्खा दिवस तसा थकवणाराच होता. अन्नमलाई सोडल्यावर मैदानी प्रदेशात उन्हाच्या झळा बसत होत्या.घाई होती तरी तत्त्व सोडायला गडी तयार नव्हते.मैसूरवरून, म्हणजे बाहेरून जाणार आणि गुरु स्वीट शॉपचां घशाखाली अक्षरशः विरघळणारा मैसूर पाक नाही खायचा म्हणजे काय मतलब आहे का? एवढी बदतमीजी? शक्यच नाही.त्यामुळे पार देवराजा मार्केट बिल्डिंग पर्यंत जाऊन दुकानासमोर लागलेल्या प्रचंड गर्दीतून वाट काढत तो तुपकट मैसूर पाक खायचे प्रताप पार पाडले गेले.
सूर्य कलेपर्यंत आम्ही बरच अंतर तुडवलेलं. शिमोग्यात थांबून आमच्या एका मित्राकडे कॉफीपान झालं.ज्या मित्राला दुसऱ्या दिवशी काम होतं तो सारखा अस्वस्थ होत होता.आम्ही पोचणार कधी,झोप कधी मिळणार,उद्या वेळेवर जाग येईल का असे असंख्य प्रश्न त्याला भेडसावत होते.पूर्ण काळोख झाला आणि रस्ताही तसा सूनसान झाला.क्वचित एखादं वाहन दिसायचं.सर्वत्र माडांची ओळीने उभी असलेली झाडे आता केवळ आकृतीरुपात दिसत होती.मध्ये मध्ये येणारी गावे रस्त्याला लक्ख करत आणि पुन्हा सर्वत्र काळोख दाटे. हळूहळू कमी होत जाणाऱ्या पेट्रोल काट्यावर आमचे लक्ष्य होतेच. टाकी फुल करणे आवश्यक होते.पुढे काही तासांवर असलेल्या शिरसीपर्यंत गाडी सहज जाणार होती.तिथेच जेवून पुढे जायचा विचार होता आणि तो सर्वाँना पटला.काही वेळाने शरावतीच्या पूर्व भागातलं रान सुरू झालं.रस्ता अजूनच एकाकी झाला.इतक्यात एका याराने टायमिंग साधून गूढकथा सांगायला सुरुवात केली.हा आमचा दोस्त अशा गोष्टी सांगण्यात पटाईत. विश्वास असो वा नसो,एकदा का अशा गोष्टी ऐकायला लागल्या की अगदी तल्लीन व्हायला होतं.आणि कथांचे विषयही इतके भारी की सारे जण जीवाचा कान करून ऐकण्यात मश्गूल.समाही तसाच बांधला गेलेला.गोव्याकडच्या,कोकणातल्या असंख्य गूढकथा त्यावेळी आम्ही ऐकल्या.वळणे येत होती जात होती.आम्ही किती अंतर काटले याचे काही भान नव्हते.एक गोष्ट संपली की दुसरी चालू. आता बास आता बास म्हणत शेवटची कथा सांगतो म्हणाला. गोव्यातल्या राखणदाराची आणि भुताच्या जत्रेची गोष्ट सांगायला सुरुवात झाली.होळीच्या सुमारास त्या भागात भरणाऱ्या अश्या जत्रेविषयी मित्र माहिती देत होता.आम्ही अतिशय तल्लीन होऊन ती ऐकत होतो.कथा गुंगवून टाकणारी होती खास.अश्या गोष्टी सांगायची त्याची हातोटी कमालीची होती.बाकी साऱ्याचा आम्हाला विसर पडला.अगदी गाडी चालवणारा ही ऐकण्यात तल्लीन होता.म्हणजे लक्ष्य रस्त्यावर पण अर्थात कान या गोष्टीकडे.
रान सुरू होतच. मध्ये काही गावं गेल्याचं पुसटसं आठवत होतं. आता मात्र किर्र अंधार.कुठेही वस्ती नाही,येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या नाहीत.एक मुलगा गोष्ट सांगत होता आणि बाकीचे नुसते 'हुं हुं ' करत ती गोष्ट भरल्यासारखे ऐकत फारच लांबलेली ती कथा एकदाची संपली आणि अचानक आमच्या लक्षात आलं की शिरसी कधीच मागे गेलय आणि पेट्रोलची आता केवळ एकच रेषा राहीली आहे.आम्ही जेवायचही विसरलोय आणि गाडीत पेट्रोल भरायचही.
सगळेजण एकमेकांकडे आ वासून बघत राहिले.आता काय हा एकच प्रश्न दिसत होता. शरावतीच्या जांगलापासून अनशीच्या जांगलापर्यंत चांगले तीन चार तास आम्ही फक्त याच गोष्टी ऐकण्यात आणि सांगण्यात इतके रमून गेलो की आम्हाला पेट्रोल भरायचं आणि जेवायचही सुचलं नाही. वाटेत वीस- एक तरी पंप नक्कीच येऊन गेले असतील.सुरुवातीला आमचं पेट्रोलच्या मीटर वर लक्ष्य होतही. 'जरा पुढे जरा पुढे' म्हणत शिरसी पर्यंत तर नक्कीच गाडी जाईल. आम्ही वाटेत चौकशीही केली. तिथे आम्हाला एकदा नव्हे दोनदा सांगितलं गेलं की खुद्द शीरसी गावात चोवीस तास उघडे असेल तीन पंप आहेत.तिथे तुम्ही इंधन भरा.मात्र पुढे रामनगरपर्यंत एकही रात्रीचा पेट्रोल पंप नाही.रस्ता जंगलाचा आहे.क्वचित लुटमारही होते.त्यामुळे सावध राहा. जेवण, गाडीत पेट्रोल वैगरे सगळं शिरसीमध्येच बघून घ्या.आम्ही काहीसे बेफिकीरीने निघालो पण बाहेरच्या वातावरणाने आणि आत चाललेल्या विषयाने सगळं सगळं पार विसरून गेलो.इतके तल्लीन झालेलो आम्ही त्या शेवटच्या, राखणदाराच्या गोष्टीत की कशाचच भान उरलं नव्हतं.आता त्या पेट्रोलकाट्याच्या उघडमीटीने आम्ही खाडकन भानावर आलो.भुकेची जाणीव झाली.मुख्य म्हणजे गाडीत इंधन भरलं नाही तर पोहोचायच कसं वेळेत याची चिंता सतावू लागली.
आम्ही तसेच पुढे पुढे जात होतो.दोन कोल्ह्यांनी आमच्या समोर रस्ता ओलांडला.सागाच्या रानामागे लपून ते भेसूर कोल्हेकुई करू लागले तेव्हा आमचे धाबे पुरते दणाणाले.रात्रीचे बारा - साडेबारा वाजलेले.रस्त्यावर कुठलेही वाहन गेल्या आर्ध्या तासापासून आम्हाला दिसले नव्हते.आम्ही चौघे टक्क जागे.अंगावरून निथळणारा घाम. काटा अगदीच एमटीकडे झुकलेला.रान संपायचं नाव घेईना,कुठे वस्ती दिसेना.तेव्हाच त्या फायकस च्या फांदीवर बसलेल्या घुबडाने आमच्यावर पिवळे डोळे रोखले.अंगावर शिरशिरी आणणारी शीळ घालत त्याने पोबारा केला आणि अचानक आमच्या गाडीने हिसका दिला.पेट्रोल संपलं होतं, गाडी धक्के खात होती.अजून पुरती बंद पडली नव्हती पण कधीही बंद पडणार होती.त्या गुढकथेने आम्हाला चांगलाच हिसका दिलेला.रात्र जंगलात घालवण्यावाचून गत्यंतर नव्हतं.आम्ही कमालीचे तणावात होतो,फोन ला सिग्नल नव्हता त्यामुळे कुठेही कळवू शकत नव्हतो.देवाचा धावा करायलाही आम्ही विसरलेलो.गाडीत बसून रहाण्याशिवाय पर्याय नव्हता.सकाळी कोणाची तरी मदत मागून परत मागे जाऊन पेट्रोल घेऊन यायला लागणार होतं.आमचे विचार खुंटलेले.गाडी बंद होईपर्यंत धक्के देत पुढे न्यायचं आम्ही ठरवलं.
अचानक किर्र जंगलातून वर जाणारा पांढरा प्रकाश दिसला समोरच्या बाजूला डाव्या वळणापाशी.एवढ्या दाट रानात काय असावं हा प्रश्न होताच.जेमतेम दोनशे मीटर पुढे असेल पण झाडांमुळे काही दिसतं नव्हत.घर असेल का एखादं की अजून काही!कोणी माणसं दिसतील का? की अजून काही! प्रश्न सतावत होते.गाडी हिसके देत देत त्या वळणापाशी आली आणि शेवटचे घटके मोजून बंद पडली.आम्ही गार.उगीचच स्टार्ट करायचा प्रयत्न केला.उपयोग शून्य.कारण माहिती होतं.आम्ही सगळे उतरलो आणि त्या प्रकाशाकडे निघालो.आता कसली भीती आणि कसलं काय! अगदीच दहा पावलांवर तो उजेड.झाडं थोडी कमी झाली.रान मोकळं केलं गेलं होतं.तिथे एका मोठ्या खांबावर चार एल ई डी दिवे स्वच्छ प्रकाश देत होते.रस्त्यावर डांबराचे अजून दोन थर चढवले होते.सगळीकडे फुले, हार, कागदाच्या डिश आणि फुटलेल्या फटाक्यांचा कचरा झाला होता. एव्हाना त्या हारांचे निर्माल्य झाले होते.समोरच एक मोठा बोर्ड लावलेला होता.त्यावर लिहिले होते,
'Shetty Petrol Pump and Pure Veg Restaurant, 24 hrs service, inaugurated by horn. MLA Shri _________ on 13 May at 14.00....
मला आजही ती तारीख चांगलीच आठवत्ये... 'तेरा मे संपून चौदा मे ची मध्यरात्र सुरू झाली होती.'
© श्रीरंग फडके
No comments:
Post a Comment