कथा : आवाज
लेखक : स्वानंद गोगटे
शबाना दचकून जागी झाली. आजचा तिसरा दिवस आणि तिला हेच स्वप्न रोज पडत होत. हे नुसतं स्वप्न नव्हतं तर तिला असं वाटे की ती हे प्रत्यक्ष घडताना पाहत आहे, कानावर पडणाऱ्या त्या आवाजमधली भूक आताही तिच्या अंगावर शहारे आणत होती..बऱ्याच दिवसांचे भुकेले बाळ आपल्या आई ला ज्या आर्ततेने हाक मारेल तीच आर्तता त्या स्वप्नातील स्वरात होती. ते शब्द आणि ते स्वर ऐकून तिला नकळत पाझर फुटत असे, तिच्या मायेने ओथंबलेल्या छातीमधून दुधाच्या धारा वाहू लागत.... आज सुद्धा तसेच झाले होते. तिने दचकून जाग आल्यावर आजूबाजूला पाहिले, शेजारी जावेद घोरत पडला होता. बेड च्या बाजूला पाळण्यात तिचा मुलगा रहमान झोपला होता. काहीच वेगळे भासेल असे नव्हते. मग हे अचानक स्वप्न पडण्यामागचे प्रयोजन तिला समजत नव्हते.
शबाना चा निकाह तसा तिच्या मर्जीच्या विरुध्द च झाला होता, तिच्यापेक्षा वयाने जवळजवळ 14 वर्षांनी जावेद मोठा होता, जावेदचा हा दुसरा निकाह होता. जावेदचा पहिली बायको एका रेल्वे अपघातात वारली असे तिला कळले होते. जावेद ला पहिल्या बायकोपासून तीन मुली होत्या पण त्यांच्याशी जावेद ने काहीच संबंध ठेवला नव्हता. त्या तिन्ही मुली त्यांच्या अम्मी च्या अब्बू कडे वाढत होत्या.
जावेद तसा वागायला आणि बोलायला बरा होता पण अचानक कधीतरी तो विक्षिप्त वागत असे, पण कुटुंबाची तो व्यवस्थित काळजी घेत होता त्यामुळे शबानाची काहीच तक्रार नव्हती. लग्नानंतर तिला जेव्हा पहिल्यांदा दिवस राहिले तेव्हा तिच्या बरोबर जावेद सुद्धा खूप खुश होता. त्याने शबाना ला बेस्ट ट्रीटमेंट मिळावी म्हणून बँकॉक सारख्या परदेशातल्या ठिकाणी नेले. तिथे तिच्या सगळ्या चाचण्या व्यवस्थित केल्या पण ते मूल त्यांच्या नाशिबतच नव्हते. बाळात काहीतरी दोष होता त्यामुळे त्यांना गर्भपाताचा निर्णय घ्यावा लागला.
आता दुसऱ्या वेळी देखील जावेद खूप खुश होता. या वेळेला त्याने त्याच्या चुलत भावाच्या दवाखान्यातच नेले ट्रीटमेंट साठी, त्यामुळे काहीच त्रास झाला नाही, आणि रहमान सारखा गोड मुलगा जन्माला आला. त्या दिवसापासून जावेद रहमान ला कुठे ठेऊ आणि कुठे नको असेच करत असे.
अचानक शाबानाची तंद्री भंग पावली. तिने बघितलं तर रहमान ने झोपेत काहीतरी हातात पकडले होते. शबाना ने जवळ जाऊन पाहिले तेव्हा तिला रहमान च्या हातात एक चिमुकला दुसरा हात दिसला. शबाना ने दचकून लाईट लावला तेव्हा रहमान च्या हातात काही नव्हते.
शबाना ने उठून बाथरूम मध्ये जाऊन चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा केला. आता जरा तिला तरतरी आली. अचानक तिला झोपाळ्याचा आवाज आला म्हणून ती दचकून बाहेर गेली तर रहमान चा झोपाळा हळुवार पणे हलत होता, जणू कोणीतरी हळुवार पणे त्याला धक्का देत आहे. ती झोपळ्याजवळ आली , आणि तिच्या कानावर परत तोच स्वप्नातील आवाज आला, "अम्मी, रहमान जागा झाला होता, मी पाळण्याला झोका दिला आता शांत झोपला तो" शबाना ने दचकून आजू बाजूला पाहिलं. आवाज नक्की तिने ऐकला होता, झोपाळा हलताना देखील तिने पाहिलं होतं. पण तिला आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं.
शाबानाची जावेद ला उठवायचा प्रयत्न केला, पण जावेद ने अजिबात प्रतिसाद दिला नाही. आता शबाना पुरती घाबरून गेली होती. तिला तो ऐकू येणारा आवाज खूप ओळखीचा आणि जवळचा वाटत होतं पण समोर कोणीच दिसत नव्हतं त्याने जास्त भीती वाटत होती.
उरलेली रात्र तिने जागूनच काढली. दुसऱ्या दिवशी तिने सकाळी जावेद ला हे सगळे घडलेले सांगितले, आधी पडलेल्या स्वप्नांबद्दल देखील सांगितले, तेव्हा जावेद ने ते सगळं हसण्यावारी नेले आणि शबाना ला वहम होत आहे असे सांगून गप्प केले.
आता हे रोजचेच झाले होते. रोज रात्री शबाना दचकून जागी होत असे, रोज ती झोपाळा हलताना पाहत असे आणि आवाज ऐकू आला तरी कोणीच दिसत नसे. हळूहळू तिची तब्येत खालावू लागली. शेवटी एकदाच जावेद ने शबाना ला हॉस्पिटलमध्ये नेले. तिला तिकडे सोडून तो ऑफिस ला निघून गेला. हे तेच हॉस्पिटल होत जिथे तिची डिलिव्हरी झाली होती, जावेद च्या चुलत भावाचं. शबाना ला वाटलं आता तरी सर्व बदलेल आणि शांत झोप लागेल. तसं आल्या दिवशी तिला शांतपणे झोपता आलं.
दुसऱ्या दिवशी ती दुपारी झोपली असताना, तिला परत एक स्वप्न पडलं, त्यात ती याच खोलीत होती, तिचा चुलत दिर आणि जावेद काहीतरी बोलत होते. ती ग्लानीत होती म्हणून तिला नक्की काय चालू आहे ते कळत नव्हते पण तिला हे दिसलं की तिच्या बाजूला दोन झोपाळे आहेत आणि त्या दोन्ही मध्ये दोन बाळ आहेत, जावेद आणि त्याच्या भावमधलं बोलणं झाल्यावर त्या डॉक्टर ने एका नर्स ला इशारा केला आणि त्या नर्स ने एका झोपाळ्यामधील एक बाळ उचलले आणि घेऊन जाऊ लागली, त्याच वेळी शबाना च्या कानावर तोच चिरपरिचित आवाज आला, "अम्मी, हे बघ मला घेऊन जात आहेत हे, तुझ्या पासून दूर, नको ना मला दूर करुस तू, अब्बू ना सांग ना, मी एवढी वाईट आहे का ?" हे बोलता बोलता आवाज दूर आणि कमी कमी होत होता. नर्स दरवाज्याबाहेर गेल्यावर तो थांबला.
शबाना ने खाडकन डोळे उघडले. बघितले तर बाजूला जावेद आला होता ऑफिस मधून. शबाना ने जावेद ला विचारले, "जावेद, आपल्याला नक्की मुलगाच झाला होता ना रे, ?" तिचा प्रश्न ऐकून जावेद गडबडला, तो म्हणाला, "शबाना , काय होतंय तुला, असा का प्रश्न विचारतेस ?"
शबाना ने उत्तर दिलं नाही आणि ती आढयाकडे बघत राहिली. तेवढ्यात एक नर्स खोलीत आली आणि तिने शबाना कडे पाहून स्माईल केलं, शबाना ने चमकून पाहिलं, ही तीच नर्स होती जी शबाना ला स्वप्नात दिसली होती, जी शबानाच्या बाजूचे बाळ घेऊन जाताना शबाना ला दिसली होती. ती नर्स कोणत्यातरी कागदांवर जावेद च्या सह्या घ्यायला आली होती, त्या घेतल्यावर ती खोलीबाहेर पडली. शबाना ताडकन आपल्या बेडवरून उठली. तिने एका झटक्यात तिला लावलेले सलाईन वगैरे काढून टाकले आणि धावत खोलीच्या बाहेर गेली. जावेद ला विचार करायला सुद्धा फुरसत मिळाली नाही एवढ्या वेगात हे घडलं.
शबाना खोलीबाहेर बघू लागली, तिला तीच स्वप्नामध्ये दिसलेली नर्स कॉरिडॉर च्या शेवटी असलेल्या खोलीत गेलेली दिसली, शबाना सुद्धा धावत तिकडे गेली आणि तिने त्या नर्स ला गाठलं. धावत जाऊन त्या नर्स ला विचारू लागली, " का नेलंस माझ्या जवळून ते बाळ ?, कुणाचं होत ते बाळ ? आता कुठे आहे ते ?"
त्या नर्स चा चेहरा खाडकन उतरला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती शबाना ला म्हणाली, " बेहेन, मुझे माफ कर देना, मुझे पता हैं, अल्ला मुझे कभी माफ नही करेगा , इसीलिए आज तुज़से माफी मांग रही हूँ । मैने जो भी किया वो सिर्फ अपनी नोकरी बचने के लिए किया । " असं म्हणून ती नर्स रडायला लागली. शबाना ने तिला परत विचारलं , " ते बाळ कुणाचं होत ? आणि आता कुठे आहे ते ? "
ती नर्स सांगू लागली ," वो बच्ची थी, लड़की थी वो, आपकी ही लड़की थी । आपको जुड़वा बच्चे हुए थे, एक लड़का और एक लड़की, लेकिन आपके शौहर को लड़की नही चाहिए थी इसीलिए उसने अपने डॉक्टर भी के साथ मिलके लड़की को आपके यहांसे उठवाया, और पास के तालाब में डाल दिया । "
हे सर्व ऐकून शबाना च्या पायाखालची जमीनच सरकली, आपला जावेद असे शैतान सारखे वागू शकतो हे बघून ती हादरली होती. तिने मागे बघितले तर जावेद तिथेच येऊन उभा होता. शबाना ने जाऊन खाडकन जावेद च्या मुस्काटात मारली आणि विचारले, " जावेद ती आपली मुलगी होती, तू असा कसा वागू शकतोस". त्याने थंडपणे तिला सांगितले की त्याला मुली अजिबात नको होत्या म्हणून तर मी आधीच्या बायकोला देखील संपवलं, कारण ती मला फक्त मुलीच देत होती, आता तुझ्याशी लग्न केलं तेव्हा वाटलं होतं की तू तरी मला मुलगा देशील, पण पाहिल्यावेळी तुला मुलगीच होणार होती, म्हणून तर ते बँकॉक ला जाऊन सगळं नाटक करावं लागलं. आता दुसर्यावेळी तुला मुलगा होणार होता पण यावेळी सुद्धा ही मुलगी आलीच होती पण तिला असं संपवता येणार नव्हतं कारण त्यामुळे पोटातल्या आपल्या मुलाला देखील धोका निर्माण झाला असता, म्हणू हे सर्व केले,"
शबाना ताडकन तिथून उठली आणि तडक घरी आली. रहमान ला तिने घेतलं आणि आपल्या आई वडिलांकडे गेली, त्यांच्या कानावर हा सर्व प्रकार घातला. पण त्यांनी सुद्धा शबाना ला परत जावेद बरोबर राहण्याचा सल्ला दिला, तू परत आलीस तर कौंम नाध्ये आम्ही कुणाला तोंड दाखवू शकणार नाही असे देखील सांगितले,
आता शबाना पुढे अब्बूचे घर हा पर्याय देखील उरला नव्हता. ती परत एकदा छोट्या रहमान ला घेऊन बाहेर पडली आणि आता ती स्वतःची जिंदगी स्वतःच बनवणार होती. त्याचवेळी तिच्या कानावर परत एकदा आवाज आला, "अम्मी, भूक लगी हैं । कुछ खानेको दे ना ।"
पण आता तिला माहीत होतं की तिला काय करायचं आहे ते, तिने आनंदाने रहमान सोबत अजून एक ताट वाढलं , आपल्या मुलीसाठी....!!!!
No comments:
Post a Comment