"विरोचन"
स्पर्धा हॅशटॅग : #MBKG_Summerसौ आरती अत्रे-कुलकर्णी
:
:
"विरोचन म्हणतात ह्याला कारण ह्याचा प्रकाश चंद्रासारखा शीतल,सौम्य आहे पण त्याचवेळी लांबून पाहिल्यास आग लागल्यासारखे,अतिप्रकाशमान दिसते, म्हणून विरोचन. तुला माहितीये ह्या शब्दाचा अर्थ? चंद्र आणि आग असा दोन्ही अर्थ असणारा शब्द म्हणजे विरोचन आणि त्याप्रमाणेच हा दिवा" सुहासने एका दमात सांगितले आणि विजयी योध्याप्रमाणे हसून कीर्तीकडे पाहिले.
"हो का? वा..व्वा! आज तर अगदी युध्याला जाऊन जिंकूनच आलात कि तुम्ही सुहासराव? खरं तर दारातच औक्षण करून विजयी योध्याप्रमाणे तिलक लावून आत घ्यायला हवे होते तुम्हाला आणि विरोचनला..." कीर्तीने उपहासाने म्हणले
"हे सारे अपेक्षितच होते मला. तुला ना जराही कौतुक नाही माझ्या आवडीचे, छंदाचे, कलेचे, ज्ञानाचे आणि ह्या मी जमवलेल्या अँटिक वस्तूंचे..." तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आत येऊन सुहासने घरातच इकडे-तिकडे तो आणलेला दिवा ठेवायला जागा पाहणे सुरु केले.
"जागा शोधतोस? नाहीये कुठे...भरलंय सगळं घर आपले ह्या जुन्यापुराण्या वस्तुंनी. एक नवीन वस्तू येत नाही घरात. पाहावे तिथे जुने ठिगळ लावलेले सामान, रंग उडालेल्या वस्तू, खटाटोप करून सुरु ठेवलेल्या जिनसा... अँटीकचे दुकान झालंय आपले घर..." उपहासाने मोठ्याने बोलत कीर्ती दमून सोफ्यावर बसली. तरी सगळे लक्ष सुहास तो दिवा कुठे ठेवतोय इकडेच होते.
एका हातात तो साधारण तीन फूट उंचीचा दिवा तोलत सुहास दुसऱ्या हाताने काचेच्या भव्य कपाटाचे दार पकडून आतमध्ये पहात होता. मग त्याने तो 'विरोचन दिवा' खाली ठेवला आणि कीर्तीकडे पाहून म्हणाला "तुला हा 'सहस्त्रदर्पण' आठवतोय का? खरंच एकाचवेळी सहस्त्र चेहरे दिसतात कि नाही ह्याच्यात. पाहिलेस ना तू स्वतः? खात्री केलीस ना? कसला भारी मिळालाय मला हा, तुला आठवतोय का?" असे म्हणत त्याने तो कोपऱ्यात ठेवलेला मोठया वहीसारखा असणारा दर्पण पुढे ओढला. त्यावर असलेले एकावर एक कमलदलाच्या पानाचे कव्हर बाजूला केले. अचानक एका चेहऱ्याचे सहस्त्र चेहरे होऊन सुहासकडे पाहू लागले. त्यामध्ये मागून डोकावणाऱ्या कीर्तीच्या चेहऱ्याचीपण भर पडली आणि दोघेही आरशामध्ये एकमेकांकडे पाहून हसू लागले. पुन्हा तो आरसा बंद करून सुहास ठेवत असतानाच कीर्ती म्हणाली "सुहास, हि 'लासवती' पुन्हा लावलीच नाही कि आपण? दिवाळीला लावायची होती. बघ, विसरलो..."
"किती भारी प्रकार आहे ना...गोलाकार गुंडाळून ठेवलेली एक प्रकारची दिव्याची माळ, तेलावर चालणारी. तेल टाकून ठेवायचे, वातींची गरजच नाही. एक दिवा लावला कि ओळीने १२ दिवे एकामागोमाग पेट घेतात..जणू लासवटच...नावच इतके भयानक आहे कि उगाचच भीती वाटावी पण वस्तू एक नंबर!"
"आणि ती मृच्छकटिकम्, तिकडे मागे..." असे म्हणत कीर्ती थोडी उंच होऊन हाताने दाखवू लागली.
"हो..हो म्हणजे खेळण्यातली मातीची गाडी. कसली खरी वाटते ना..." सुहास मोठे मोठे डोळे करत म्हणाला.
"तिकडे ती घंटामृदूंगम, इकडे हे सप्तलोलक.... खरंच सांगतो तुला कीर्ती, हे असे काही पाहिले ना कि मला दुसरे काही सुचतच नाही मग. कधी एकदा हि वस्तू विकत घेतो आणि घरी आणतो असे होते मला." एकीकडे वस्तू जरा जवळजवळ करत त्याने जागा केली आणि त्यातच 'विरोचन' ठेवला आणि दार बंद केले.
"झाले? आता काय..पोट भरले का सुहासरावांचे का भूक आहे अजून?" फणकाऱ्याने स्वयंपाकघरात जाता जाता कीर्ती म्हणाली
"कीर्ती, आज नुसती खिचडीच टाक आणि ये इकडे. आज रात्री विरोचन लावूयात..." असे म्हणत सुहासने त्याची 'अँटिक चोपडी' काढली. त्यामध्ये वस्तूचे नाव, ती वस्तू कुठून घेतली, कधी घेतली, कितीला घेतली, ती वस्तू कशी वापरायची, त्याचा इतिहास असे सगळे सविस्तर लिहून ठेवले होते. सुहास त्यामध्ये विरोचनची माहिती लिहीत बसला.
त्या रात्री काही जमलेच नाही विरोचन लावायला. दुसऱ्या दिवशी मात्र कीर्ती बाहेर गेली ते निमित्य साधून सुहासने पूर्ण संशोधन करून तो दिवा घासून पुसून स्वच्छ केला. त्याच्याकडे असणारे वेगवेगळे केमिकल/रसायने वापरून त्याला चकचकीत पारदर्शक केला. त्याला दोन/तीन खिट्ट्या होत्या, त्यामध्ये हलकेच तेल सोडून ठेवले.
दुपारी बाहेर पडलेली कीर्ती जराशी उशिरानेच आली घरी, ती दमलेलीच. "सुहास, तुझ्यासाठी पेठेतील भेळ आणली आहे. मी झोपणारे लौकर..."
"कीर्ती, तू झोपायच्या आधी विरोचन लावूयात, एकदा त्याला पहा आणि मग जा झोपायला..." सुहासने अगदीच आर्जवाने सांगितले तशी कीर्ती "ठीक आहे..." म्हणाली.
सर्वात वरची खिट्टी बाजूला केली तशी काचेचा एक थर बाजूला होऊन त्याचे लोलक झाले आणि लटकू लागले. दुसऱ्या खिट्टीला दुसरा थर बाजूला होऊन हाताच्या ओंजळीसारख्या आकारात वातीच्या बाजूला जाऊन स्थिरावले. हाताला चरबरीत लागणारी जाड दोरीसारखी वात पेटायलाही बराच वेळ लागला. वात पेटली तशी दुसऱ्या थरातील काच अजूनच चमकदार दिसू लागली आणि तिसऱ्या थरातील लोलक हलू लागताच दिव्याचा प्रकाश बाहेर सांडू लागला. हळूहळू वात व्यवस्थित पेटली आणि त्याचा पूर्ण उजेड पसरला. सुहासने हळूच उठून चालू असलेल्या विजेच्या दिव्याचे बटन बंद केले. जवळ बसले कि तो प्रकाश पांढराशुभ्र दिसे आणि लोलकांमधून परावर्तित होऊन हिऱ्याप्रमाणे चमकू लागे. दूर जाऊन पाहिले कि तो प्रकाश पिवळसर दिसे, जणू आगच लागली असावी असा. एकदा लांब जाऊन एकदा जवळ जाऊन..सुहासने दिव्याचे अनेक कौतुक केले. ज्याने हा दिवा बनविला त्याच्या ज्ञानाचेही कौतुक केले. मग शेवटी 'कसा हा दिवा मी आणला' असे स्वतःचेही कौतुक करून हा कौतुकसोहळा एकदाचा संपला.
जांभया देत असणाऱ्या कीर्तीने हाच क्षण साधून 'मी जाते झोपायला..." असे म्हणत बेडरूम गाठली आणि दिवा बंद करून झोपी गेली.
:
मध्यरात्रीच्या सुमारास गाढ झोपेतून एकदम कसल्यातरी आवाजाने सुहासला जाग आली. डोळे उघडताच त्याने सावध होत कसला आवाज आलाय, पुन्हा येतोय का... ते पडूनच कानोसा घेऊन ऐकू लागला. डोक्यावर पंखा चालू होता, कीर्ती शांतपणे झोपलेली होती. आजूबाजूला किर्रर्र अंधार आणि निरव शांतता! तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सुहासचा बेडरूमच्या बाहेर मोठे झाड होते, गुलमोहराचे. त्याची सावली भिंतीवर पडून हलत होती. अचानक त्या सावलीत माणसाचा आकार दिसला तसा सुहास दचकला....क्षणात तो आकार त्याला त्याच्या खिडकीत दिसला, आरामात बसलेला. हौसेने खिडकीचे ग्रील काढून नुसती चौकट ठेवली होती, रात्री खिडकी बंद न करता उघडीच ठेवत असे सुहास. "कीर्ती..." अगदी हळू आवाजात सुहासने कीर्तीला हाक मारली पण बहुतेक घाबरल्यामुळे घशातून आवाजच बाहेर आला नाही किंवा कीर्तीला गाढ झोप लागली असावी.
तो एखाद्या बुटक्या माणसाचा आकार असावा, हिमगौरीमधल्या बुटक्यासारखा. तो उडी मारून सुहासच्या पायाजवळ आला तशी सुहासने प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून घाबरून आपले पाय जवळ ओढले आणि एकदम उठून बसला.
"मालक, मला बोलावलंत..?" तो घागऱ्या बसक्या कुजबुजत्या आवाजात हळूच सुहासला म्हणाला.
सुहास डोळे मोठे करून मानेनेच 'नाही नाही' म्हणत होता. बाहेर वाऱ्याचा आवाज होता, आजूबाजूचे दिवे चालू होते. बाकी सगळे नेहमीसारखेच होते. सुहास थोडासा स्थिरावला. अजूनही तो माणूस तिथेच होता, तोच त्याला बेडरूमच्या दारात दुसरा एक मोठा उंच माणूस दिसला. त्याने धोतर नेसले होते, मुंडासे बांधले होते. अंगात कुठल्यातरी मळकट रंगाचा सदरा होता. चेहरा नीटसा दिसत नसला तरी चेहऱ्यावर काहीतरी रंग उमटलेले होते पण बराचसा साध्या माणसासारखाच चेहरा होता. अचानक तो सुहासजवळ येत दबक्या घुसमटत्या आवाजात म्हणाला "मालक, आलोय मी, काय हुकूम?"
त्या बुटक्या माणसाला जणू तो दुसरा माणूस दिसतच नव्हता आणि त्या उंच माणसाला हा बुटका.
सुहास जरासा सावरला "तुम्ही कोण आहात?" त्याने जरा मोठ्यानेच विचारले, जेणे करून कीर्तीही जागी व्हावी आणि आपल्याला जरा धीर यावा. पण कीर्तीची पाठ असल्याने त्याला काहीच कळत नव्हते आणि कीर्तीची हालचालही नव्हती म्हणजे ती पूर्ण झोपेतच असणार.
"मालक, मला बोलावलंत..?"
"मालक, आलोय मी, काय हुकूम?"
सर्वांगाला घाम आला होता सुहासला. त्याने असे काही अनुभव ऐकले होते. मागे एक-दोन वस्तू घेताना त्याला काही जाणकारांनी थांबवलेलेही होते. अश्या जुन्या वस्तू घेताना त्याचा खूपदा चुकीचा इतिहास पसरलेला असतो जेणे करून गूढशक्तीनी भरलेल्या वस्तू चालत राहाव्यात. हि विद्या खूप वेगळी आहे, ते ज्ञान नव्हे! संपूर्ण विश्वावर आपलेच राज्य चालावे, काळ्या जादूने विश्वातील अणुरेणू भारून जावा, म्हणून हे प्रयत्न असतात...
ह्याचा अर्थ तो दिवा...विरोचन! आज तोच लावला होता त्याने सुहासने.... विचारात किती वेळ गेला कुणास ठाऊक!
"मालक, मला बोलावलंत..?"
"मालक, आलोय मी, काय हुकूम?"
"कोण आहात तुम्ही? मी कधी बोलावले तुम्हाला?" सुहासने आश्चर्याने, जरासे मोठ्याने विचारले
"विरोचनद्वारा...तो संदेशवाहक आहे. मालक, मला बोलावलंत..?"
"विरोचनद्वारे ...तो संदेशवाहक आहे. मालक, आलोय मी, काय हुकूम?"
अरे बापरे....असे म्हणत सुहासने कपाळावर आलेला घाम पुसला. घशात रोखून ठेवलेला आवंढा गिळला. श्वासही हळुवार सोडला आणि उरलेला सगळा धीर एकवटून कसेबसे म्हणाले "जा तुम्ही...पुन्हा येऊ नका..."
सुहासलाही माहिती नव्हते कि आता पुढे काय होणार ते. पण अचानक ते दोघेही मागे मागे जाऊ लागले आणि बाहेरच्या खोलीत गेले. सुहासही त्यांच्या मागे गेला. ते दोघेही काचेच्या कपाटाकडे विरोचकडेच टक लावून पहात होते तोच सुहासला मागून काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज आला म्हणून त्याने मागे वळून पाहिले.
कीर्ती गादीवर झोपूनच दाराकडे पहात होती. "सुहास, दारात उभा राहून काय करतोस रात्रीचा?" असे चिडचिडतच म्हणाली
"कीर्ती उठ लौकर, बाहेर बघ कोण आलंय ते...." सुहास पुन्हा बाहेर पहात कीर्तीला हळू आवाजात म्हणाला. त्याने बाहेर येऊन दिवा लावला तर बाहेर कोणीच नव्हते. त्याने भराभर हॉलमधून बाहेरपर्यंत फिरून पाहिले, बेडरूमचा दिवा लावून खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले, पुन्हा हालमध्ये बाहेर आला. काचेचे कपाट बंद होते आणि विरोचन तसाच होता, जसा सुहासने त्याला झोपायच्या आधी ठेवला होता.
"सुहास, आता रात्रीचा पण तू त्या कपाटाकडे काय पहात बसलायस? चांगली झोपले होते मी...झोपमोड करायची स्वतःची पण आणि दुसऱ्याची पण..." असे चिडचिडत म्हणत कीर्ती बाथरूमला जाऊन आली आणि पुन्हा झोपली. सुहास उरलेली रात्र टक्क जागाच होता.
:
"खरंच सांगतो कीर्ती, खूप घाबरलो होतो मी आणि तू म्हणजे कुंभकर्णच जणू! अजिबात उठली नाहीस. किती हाक मारत होतो मी तुला. जाम टरकली होती माझी..." सुहास सकाळी कीर्तीला सांगत होता
"खोटं वाटतंय मला सगळंच! इतकी काही मी गाढ झोपत नाही हा....इतके सगळे आवाज झाले असते, मालक, तर उठले नसते का मी?" हसून कीर्तीने विचारले
"बाकी काही पण म्हण...पण मालक म्हणू नकोस.." सुहास अजूनही घाबरलेलाच होता. हे सारे कीर्तीला सांगताही थरथरत होता.
"अरे, तुला आठवतंय का एकदा आपण त्या कोकणातल्या गावाकडे गेलो होतो आणि तिथे काही बाहुल्या होत्या. तू घेणार होतास पण राजकाकांनी तुला अडवले, म्हणाले कि असले काही घ्यायचे नाही आणि जीव अडचणीत टाकायचा नाही. मागे तू त्या कुठल्या कुठारीच्या जंगलात गेला होतास. तिथून काही दगडे आणली होतीस वेगवेगळ्या रंगाची, पण जंगलाच्या बाहेर यायच्या आधीच त्या गाईडने जंगलामध्येच टाकून द्यायला सांगितली. आठवतंय ना...असतात रे काही अतर्क अगम्य अनाकलनीय गोष्टी! जाऊ दे आता..फार विचार करू नकोस. आणि हे पहा, आता पुन्हा जुन्या गोष्टींच्या नादी लागू नकोस. तो विरोचन का फिरोचनही देऊन टाक त्या दुकानात पुन्हा...आणि शांतपणे संध्याकाळी आपण दोघेही देवळात जाऊन येऊयात! बरं वाटेल तुला..."
विचारात गढलेला सुहास अजूनही दूर कुठेतरी पहात होता. चहा झाल्यावर स्वतःचे आवरून त्याने कपाटातून विरोचन बाहेर काढला आणि पुन्हा एकदा त्याच्याकडे नीट पाहिले. अतिशय प्रिय गोष्ट देऊन टाकायला जसे मन होत नाही, तसे त्याचे काहीसे झाले होते. तरीही रात्री आलेल्या अनुभवाने त्याने निर्णय घेतला होता..... आणि त्याने तो अंमलातही आणला.
:
"धन्यवाद किशोर भाऊ!" असे म्हणत कीर्ती टेबलाच्या दुसऱ्या बाजूला बसली.
"कीर्ती वाहिनी, धन्यवाद कसले? आम्ही उपयोगी पडलो, हे आमचे भाग्य." किशोरभाऊ म्हणाले
"तसे नव्हे किशोरभाऊ, काम थोडे अवघड आणि नेहमीच्या पठडीतले नव्हते ना..म्हणून! मलाही समजत नव्हते कि ह्यातून मार्ग कसा काढावा ते. शौनक शिकायला म्हणून बाहेर पडला आणि सुहासचा हा शौक दिवसेंदिवस वाढायलाच लागला. कितीही आणि कसाही आवर घातला तरी त्याच्या डोळ्याला हे असले जुने, अँटिक काहीतरी दिसायचेच. कितीही महाग वस्तू असली तरी तो पैसे ओतायचा आणि विकत आणायचा. शौनक म्हणायचा, 'बाबा रमतोय ना कुठेतरी, तू काळजी करू नकोस, करू दे त्याला.' पण माझ्या जीवाला चैन पडायची नाही. कायकाय वाचतो आपण.... सहज म्हणून तुमच्याशी बोलले आणि तुम्ही हि युक्ती सांगितली आणि केली म्हणून सुहास घाबरला थोडा. आता जरा आळाही बसेल त्याच्या ह्या असल्या आवडीला."
"वहिनी, काळजी करू नका...सगळं अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केलं आम्ही! दोन्ही माणसे पण गावाकडून आणली, नेहमीची नाटक कंपनीची नव्हती. म्हणजे काय...सुहासरावांना जरा म्हणून कधी आयुष्यात नजरेला पडणार कधी आणि तुमची हि युक्ती समजणार नाही त्यांना..." हसत हसत किशोरभाऊ म्हणाले
"ते एक बरे झाले. मला जरा भीतीच होता हि सुहास कसा रिऍक्ट करेल म्हणून, पण तसा धीट निघाला तो...अगदी एकटा रात्रीच्या अंधारात त्यांच्या मागे गेला...कपाटापर्यंत! मी आपली झोपेचे नाटक करून गपचूप निजले होते. सगळं समजत होते मला पण तरीही भीती वाटत होती."
"ते खिडकीत सज्जामधून आत येण्याची कल्पना भारी होती तुमची. आणि तुम्ही बाहेरचे दार आधीच उघडे ठेवले म्हणून ते पटकन पळाले दारातून आणि तेव्हाच तुम्ही उठला, ठरल्याप्रमाणे... तुमच्याकडे पाहिल्यामुळे सुहासरावांना समजलेच नाही कि दोघे कुठे गेली ते."
"दोघे नाही हो, किशोरभाऊ, तिघे...सुहास मला तिघे म्हणाला..." कीर्ती म्हणाली
"वहिनी, दोन माणसे पाठवलेली मी.." किशोर दुरुस्त करत म्हणाला
"नाही हो किशोरभाऊ, तीन जण होते. एक बुटका माणूस, एक उंच माणूस आणि एक बाई...असे म्हणाला सुहास मला सकाळी."
"वहिनी,काहीतरी गल्लत होतीये पहा...मी दोनच पाठवले होते. एक बुटका, आपला दिन्या होता तो नाटकातला आणि एक उंच, मल्हारी होता तो. गेले पण गावाला दोघबी त्याच दिवशी सकाळच्या गाडीने. मीच स्वतः पैसे दिले त्यांना ह्या एका रात्रीचे."
"किशोरभाऊ, सुहास नक्की तिघे म्हणाला. एक बाईपण होती म्हणाला. दिवा पेटवला नसला तरी दिव्याचा मंद प्रकाश तिच्यावर पडला होता. त्याला त्या दोन माणसांचे इतके वर्णन नाही करता आले नीटसे पण बाईचे मात्र अगदी नीट व्यवस्थित वर्णन केले त्याने. काळीसावळी, दोन्ही नाकात दाक्षिण्यात्य चमकी घातलेली, कपाळावर लाल आणि पांढरे गंध लावलेली, तश्याच पद्धतीचे नऊवारी लुगडे नेसलेली, हातभार बांगड्याही होत्या तिच्या दोन्ही हातात, डोक्यावरून पदर घेतलेली. सुहास म्हणाला, त्याने जेव्हा पुन्हा बाहेर पाहिले मी उठल्यानंतर तेव्हा तो बुटका आणि उंच माणूस तिथे नव्हते पण ती बाई एकटक त्या दिव्याकडे पहात होती आणि अचानक त्याला म्हणाली "मालक, मी जातीये!" आणि त्या दिव्यात बघता बघता नाहीशी झाली. अजूनही सुहासचा चेहरा आठवतोय मला....तो खोटे नक्कीच सांगत नव्हता. मला वाटले तुम्ही तीनजण पाठवले असतील, सोंग खरे वाटावे म्हणून!"
"वहिनी, काहीतरी गडबड हाय. मी नक्की दोनच माणसे पाठवलेली."
"किशोरभाऊ, कोण होती ती?" कीर्तीने काळजीने घाबरून विचारले
"वहिनी, कोण होती ती?" किशोरभाऊ गोंधळून जात कीर्तिवाहिनीकडे पाहून म्हणाले
कीर्ती घरी जायला निघाली. ती आता घरी जाऊन सुहासला सगळे खरे सांगणार होती, त्याची क्षमा मागणार होती. त्याच्या अँटीकच्या वेडापायी तिने हे नाटक केले, हे देखील सांगणार होती. पण काही प्रश्नाची उत्तरेही विचारणार होती...
"कोण होती ती बाई? कशी होती ती बाई? दिवा लावलेला नसतानाही खरंच का त्या दिव्याचा प्रकाश तिच्यावर पडला होता ज्याच्यामुळे सुहासला तिचाच चेहरा नीट लक्षात राहिला? खरंच का ती त्या दिव्यामध्ये गुप्त झाली? बाई खरी होती का त्या विरोचनच्या मार्गाने आलेले एखादे ....????"
Photo : lady with Lamp concept by Raja Ravi Verma oil Painting
No comments:
Post a Comment