भयकथा-गुप्तधन Bhaykatha-Guptdhan
#गुप्तधन
गावाबाहेर, नदीकाठी असलेला तो पडका वाडा, एके काळच्या वैभवाच्या खूणा सावरत एकाकी उभा होता. एखादी, अर्धवट भिंत सोडली तर बाकीच्या भिंती ढासळलेल्या अवस्थेत होत्या. उभे, नक्षीदार खांब मात्र गतवैभवाची साक्ष देत होते. दिवसा तो वाडा चरसी, गंजेडी, व्यसनी लोकांचा अड्डा असायचा. रात्री मात्र काळजाचा थरकाप उडवणारी भयाण शांतता. जोडीला रातकिड्यांची किरकिर. वटवाघळांचा आणि घुबडांचा अभद्र वावर.
रावसाहेब इनामदारांच्या कारकिर्दीत वाडा कायम गजबजलेला असे. रावसाहेब आणि त्यांचे दोन भाऊ कुटुंबासोबत तिथे राहत असत. भरपूर शेती आणि सावकारी व्यवसाय, त्यामुळे लक्ष्मी त्या कुटुंबावर प्रसन्न होती. मुलंबाळं, नोकर-चाकर, पै-पाव्हणा, आला-गेला सगळ्यांना पोटात घेऊन वाडा दिमाखात झगमगत असे.
वाड्याचे बांधकाम रावसाहेबांच्या वडिलांच्या म्हणजे आबासाहेबांच्या काळातले. मजबूत, भरभक्कम आणि चौसोपी...असं म्हणतात, सावकारीतून आबासाहेबांनी बऱ्यावाईट मार्गाने भरपूर माया जमवली होती. थोड्या कर्जावर लोकांची जमीन तारण ठेवून घेऊन नंतर बळकावली होती. सोनं, चांदी, रत्न, असं सगळं धन त्यांनी वाड्याच्या तळघराखाली भुयार करून पुरून ठेवलं होतं. नंतर भुयार बुजवून टाकलं. पण उतारवयात स्मृतिभ्रंश झाल्याने आबासाहेब पुरलेल्या धनाची नेमकी जागा विसरले. त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांनी ते गुप्तधन शोधून काढण्याचे बरेच प्रयत्न केले. पण एकही प्रयत्न फळला नाही. अडचणीत असलेल्यांना नाडून मिळवलेले धन कोणी उपभोगू शकत नाही हेच खरं.
काळाच्या ओघात रावसाहेबांची एक पिढी संपली. त्यांच्या पुढच्या पिढीतील बहुतेकांनी शेती विकून शहराचा रस्ता धरला. दिनकर मात्र वाट्याला आलेली ५-७ एकर जमीन कसत गावातच राहिला. दिनकर, रावसाहेबांचा पुतण्या. त्यांच्या सर्वात लहान भावाचा, वामनरावांचा मुलगा. कमी उंचीचा, किरकोळ शरीरयष्टी चा दिनकर गावातील एका छोट्या घरात बायको मुलासह रहात होता.
गेल्या पंधरा-वीस वर्षांत गावात पुष्कळ बदल झाला होता. गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती, फुलांची शेती, फळबागा, ऍग्रो टुरिझम वगैरेसारखे प्रयोग करून आपली प्रगती साधली होती. दिनकर ला मात्र यापैकी काहीही जमलं नव्हतं. गेली कित्येक वर्ष तो पारंपारिक, पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेती पद्धतीवर विसंबून होता. कधी ओला किंवा कोरडा दुष्काळ , कधी वादळ किंवा रोग पडल्याने पिकांची नासाडी तर कधी भरघोस पीक पण पडते भाव, या दुष्टचक्रातून त्याची काही सुटका होत नव्हती. बँकेकडून आणि नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज काही फीटत नव्हते. उलट वाढतच चालले होते.
गावातील त्याचे काही हितचिंतक त्याला शेती विकून टाकण्याचा सल्ला देत. त्याने तसा प्रयत्न करूनही पाहिला, पण तो अडचणीत असल्याचे लक्षात घेऊन लोक शेतीचे भाव पाडून मागत. दिनकरची ओढाताण काही संपत नव्हती. दिनकर ची बायको नंदा तशी स्वभावाने गरीब. कुणाच्या अध्यात-मध्यात नसलेली. पण परिस्थितीने गांजल्याने ती देखील त्याला घालून पाडून बोलायची.
दिनकर चा मुलगा, दिपक मात्र शहाणा, समंजस होता. तालुक्याला राहून कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला शिकणारा दिपक, अभ्यासात हुशार होता. फावल्या वेळात शाळेतील मुलांच्या शिकवण्या घेऊन स्वतःपुरते पैसे कमवत होता. त्याला खेड्यात राहून शेती करण्यात काही रस नव्हता. शिक्षण पूर्ण करून, स्वतःच्या पाया वर उभं राहिल्यावर, आई-बाबांना आपल्याजवळ तालुक्याला राहायला घेऊन यायचं त्याने पक्कं ठरवलं होतं. बाबांना शेती विकायला लावून, आलेल्या पैशात तालुक्यातच छोटासा उद्योग धंदा उभारून, छोटेसे घर बांधायचे त्याचे स्वप्न होते. दिनकर चे मन वळविण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होते. पारंपरिक शेतीत काही राम नाही, हे त्याने त्याला परोपरीने समजावून सांगितले. नंदा आपल्या मुलाशी सहमत होती. पण दिनकरला काही पटत नव्हते.
एक दिवस नंदाचा दूरचा भाऊ श्रावण सहज म्हणून त्यांच्याकडे आला. दिनकरने या मेव्हण्या कडून चार वर्षांपूर्वी दीड लाख रुपये व्याजावर, उसनवार घेतले होते. व्याज वाढत जाऊन त्याचे आज दोन लाखावर झाले होते. "भाऊजी ! ते पैसे परत करण्याचं बघा आता. मुलीच्या लग्नाचं पहातोय. वर्षाअखेरपर्यंत जमेलसं वाटतंय."
श्रावण बोलला.
"भाऊ ! सध्या हाता आखडलेत. सहा आठ महिन्यात तांदूळ आला की देतो."
"आत्ता थोडेफार द्या...बाकीचे सवडीने द्या.."
"आता शक्य नाही भाऊ ! "
श्रावणने पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. तो व्याज माफ करायला देखील तयार झाला. पण दिनकर जवळ सध्यातरी वीस-पंचवीस हजारांपेक्षा जास्त नव्हते. ते सुद्धा त्याला दिले तर खायचे वांधे होणार होते. वाद वाढून त्याचे पर्यवसान भांडणात झाले. शेवटी नंदाने तिच्या लग्नात मिळालेल्या चार तोळ्यांच्या बांगड्या काढून श्रावणच्या हवाली केल्या तेव्हा कुठे तो परत गेला.
तो गेल्यावर मात्र नंदा खूप रडली.
"कधी कसली हौस मौज केली नाही. गुंजभर सोनं अंगावर चढवलं नाही. आता तर लंकेची पार्वती बनवलं. माझ्या माहेरून मिळालेली चीजवस्तू सुद्धा तुमच्या कर्जपायी गेली. वर श्रावण भाऊशी संबंध बिघडले ते वेगळंच. काय पाप केलं होतं, की तुमच्यासारखं पाप्याचं पितर पदरी पडलं ??? अशा जगण्यापेक्षा मेलेलं बरं...."
दिनकर ला ती खूप घालून पाडून बोलली. तो मात्र खाली मान घालून सगळं निमूटपणे ऐकत होता.
दुपार झाली होती. कुठल्या तरी तिरीमिरीत तो घरातून बाहेर पडला आणि त्याच्या पूर्वजांच्या जुन्या वाड्यापाशी आला. या वाड्याच्या बाबतीतल्या वदंता त्याच्याही कानी आल्या होत्या. त्या भयाण, भकास वाड्याभोवती एक चक्कर टाकून तो विचार करत बसला.
'आजोबांनी कुठे बरं पुरून ठेवलं असेल ते गुप्तधन? आपल्याला मिळालं तर सगळेच प्रश्न सुटतील.कर्ज फेडता येईल. नंदा आणि दीपकला सुखात ठेवता येईल. काय करता येईल ते गुप्तधन मिळवण्यासाठी ?? '
विचारांच्या नादात त्याने वाड्याभोवती परत एक फेरी मारली. वाड्या बाहेरील भागाचे निरीक्षण केले.
'नक्की कुठे असणार ते गुप्तधन पुरलेली जागा??'
तो विचार करू लागला. थोड्या वेळाने त्याला स्वतःच्याच मूर्खपणा वर हसू आले.
'असे सहजासहजी हाती लागले असते तर त्याला गुप्तधन का म्हटले असते ??'
क्षणभरात त्याच्या डोक्यात एक विचार विजेसारखा चमकून गेला. भैरव ची मदत घेतली तर ??? भैरव.... गावातील एक ज्योतिषी. पण फार थोड्या लोकांना तो एक पोहोचलेला मांत्रिक आहे, याची माहीती होती. अमावस्या, पौर्णिमेच्या दिवशी स्मशानात जाऊन कसलीशी साधना करायचा. वायंगी म्हणजेच कर्णपिशाच्च वश करून देण्यात त्याचा हातखंडा होता. घराच्या भरभराटी साठी या भूताचा वापर करतात. काही महिने किंवा वर्षांसाठी याला बाळगता येते. बाळगणाऱ्या व्यक्तीच्या कानात ते गुणगुणत राहते म्हणून त्याला कर्णपिशाच्च सुद्धा म्हणतात.
"या इनामदार साहेब... गरीबाच्या झोपडीत कसं येणं केलंत?"
दिनकरला पाहून भैरव म्हणाला. भैरवला दिनकरने सहा महिन्यांसाठी वायंगी भारून देण्यास सांगितले.
"काही काळजी करू नका. या अवसेला तुमचं काम होईल. दहा हजार रुपये आगाऊ लागतील."
दिनकर ने भैरवच्या हातात पैसे ठेवले. भैरवने काही वस्तूंची यादी बनवून दिनकरला दिली.
"हे सर्व साहित्य घेऊन येत्या अमावस्येला गावाबाहेरच्या मसणवटीत रात्री १२ पर्यंत या... मी तुम्हाला तिथेच भेटेन."
दिनकर अमावस्येची भितीयुक्त उत्कंठेने वाट पाहू लागला. अमावस्येचा दिवस उजाडला. दिवसभर दिनकरला चैन नव्हते. सर्व वस्तूंची जमवाजमव त्याने करुन ठेवली होती. अर्थात नंदाच्या चोरून...तिला माहित झाले तर, ती नक्की त्या सगळ्या गोष्टींना विरोध करणार... याची त्याला खात्री होती.
रात्रीचे साडेअकरा वाजले. सर्वत्र निजानीज झाली. दिनकर हळूच उठला. दबक्या पावलांनी घराच्या बाहेर पडला आणि स्मशानाच्या रस्त्याला लागला. स्मशानात येताच धगधगणाऱ्या होमकुंडा समोर बसलेला भैरव त्याच्या दृष्टीस पडला.
"सगळे साहित्य आणले का ?"
भैरवने विचारलं.
"हो..."
सगळ्या वस्तूंची मांडामांड करून भैरवने अनाकलनीय असे मंत्रोच्चार करण्यास सुरुवात केली. मानवी कवटी, हाडे, पांढरी मोहरी, काळे तीळ, लिंबू, गुलाल यांची ती विचित्र मांडणी पाहूनच दिनकर ची छाती दडपली. काही वेळाने समोरच्या होम कुंडातून मोठ्या, काळ्या ज्वाळा निघायला सुरुवात झाली. एक नारळ त्या ज्वालांपाशी धरून काही तरी पुटपुटत भैरवने तो नारळ दिनकर जवळ दिला.
"हा घ्या भारलेला नारळ... कोणाला दिसणार नाही अशा जागी घरात ठेवा. सहा महिन्यानंतर च्या अमावस्येला इथेच येऊन हा नारळ न विसरता मला परत द्यायचा. जा आता... तुमचे काम झाले."
रात्रीच्या किर्र अंधारात दिनकर चालत निघाला. सावकाश घरात येऊन त्याने तो नारळ त्याच्या कपाटाच्या खालच्या खणात कापडात गुंडाळून ठेवला. दुसऱ्या दिवशी दुपारी वाड्यापाशी येऊन वाड्याभोवती फिरत दिनकर पुटपुटला. "कुठे आहे ती गुप्तधनाची जागा ?"
"पुढे चल..."
कोणीतरी त्याच्या कानात बोललं. भैरवने आपलं काम चोख बजावलं होतं. दिनकर तसाच पुढे निघाला. वाड्याच्या मागच्या बाजूस आल्यावर त्याच्या कानात आवाज आला, "इथे थांब..."
वाड्याची ती बाजू त्यानं नीट न्याहाळली. तिथल्या पडक्या भिंतीपाशी बरीच काटेरी झुडपं उगवली होती. त्यानं त्या झुडपात हात घातला.
"इथेच भिंतीच्या दिशेने खाली खणायला सुरुवात कर.. छोटं भुयार लागेल... त्यात ठेवलंय."
पुन्हा त्याच्या कानात गुणगुण झाली. त्याला वश झालेले ते कर्णपिशाच्च पुढे बोललं,
"आज रात्री इथेच खणून काढ..."
निजानीज झाल्यावर अकरा साडे अकराच्या सुमारास दिनकर वाड्यापाशी आला. सोबत टॉर्च, कुदळ, फावडे आणि विळा त्यानं आणले होते. छोटा टॉर्च तोंडात धरून, त्या जागेवरची झुडपं आधी त्यानं विळा घेऊन कापून काढली. कापत असताना 'फिसस्स...' असा आवाज करत एक मोठा साप त्याच्या जवळून गेला. दिनकर ची पाचावर धारण बसली. कसबसं त्यानं स्वतःला सावरलं आणि कुदळ घेऊन भिंतीत खणायला सुरुवात केली. मधूनच खणताना निघालेली माती फावड्याने तो बाजूला करत होता.
दोन तास अविरत खणल्या नंतर तो थकला. अजूनही काही दृष्टिपथात येत नव्हते.
"थांबू नकोस... चालू ठेव..." त्याच्या कानात गुणगुण झाली. त्याने परत खणायला सुरुवात केली. आता माती भुसभुशीत लागत होती. आत काही तरी असल्यासारखे वाटत होते. त्याने आणखी दोन तीन घाव घातले आणि... एक अंधारी पोकळी दिसू लागली. दिनकर त्या अंधाऱ्या पोकळीच्या आत वाकून पाहू लागला. डोळ्यांना काही दिसत नव्हते.
"घाबरू नकोस.. थोडा आत सरक.." पुन्हा गुणगुण.
तो आत सरकला. हातांनी चाचपडून पाहू लागला. आणखी थोडं पुढे सरकून त्याने अंदाज घेतला आणि... त्याच्या हाताला थंडगार काहीतरी जाणवलं. नीट पाहिल्यावर लक्षात आलं, तो एक मोठा हंडा होता. त्याने पटकन तो हंडा बाहेर ओढून काढला. कधीकाळी त्या जड हंड्याच्या तोंडावर बांधलेले कापड जीर्णशीर्ण होऊन गेले होते.
दिनकरने तो हंडा बाहेर काढता बरोबर आसमंत किंकाळ्यांनी आणि भयप्रद आवाजांनी भरून गेले. "ताबडतोब इथून निघून जा.."
त्याच्या कानाशी असलेले कर्णपिशाच्च बोलले. दिनकर लगबगीने हंडा सावरत लपत-छपत घरी आला. त्याच्या येण्याची चाहूल लागून नंदा जागी झाली आणि दारातून आत आलेल्या दिनकरच्या अवताराकडे आ वासून पहात राहिली. धुळीने भरलेले कपडे, विस्कटलेले केस, हातात जुन्या काळातील पितळी हंडा...
"हे काय ? कुठे गेला होतात तुम्ही ??"
दिनकरने नंदाला सगळी हकीकत सांगितली.
"अहो ! हे काही बरोबर नाही... असं मिळालेलं गुप्तधन कधी कोणाला लाभत नाही असं म्हणतात..."
"काहीतरीच काय ?? आता तू जास्त विचार करू नकोस. आपल्याला चांगले दिवस येतील याचा आनंद मान."
दिनकरने तो पितळी हंडा सतरंजीवर उपडा केला आणि... त्याचे व नंदाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. वेगवेगळ्या तऱ्हेचे सोन्या-चांदीचे दागिने, रत्न, सोन्याची नाणी यांचा खच त्यांच्यासमोर पडला होता. दिनकर चा आनंद गगनात मावेना. नंदा साशंकपणे एक एक दागिना उचलून पहात होती. दिनकरने परत सगळे जिन्नस हंड्यामध्ये ठेवून हंड्याचे तोंड एका कापडाने बांधून, भैरवने दिलेला नारळ जिथं ठेवला होता, त्याच्याजवळ हंडा ठेवून दिला.
एक मात्र घडले... त्यादिवसापासून दिनकर आणि नंदा एकही रात्र शांत झोपू शकले नाही. झोप लागली की त्यांना चित्रविचित्र भास होत, भयानक स्वप्न पडत आणि जाग येई. कोणीतरी त्यांच्या सोबत घरात वावरत आहे, असे त्यांना वाटे. कधी कोणी पाठीमागे उभे असल्याचा भास होई.
एके रात्री दिनकर झोपेत असताना कोणीतरी त्याला हाक मारत आहे असा त्याला भास झाला.
"दिनकर.. ए...दिनकर" आवाज घराबाहेरून येत होता. त्याने उठून, खिडकीतून बाहेर पाहिले. जुन्या काळातील कपडे परिधान केलेला एक गृहस्थ दाराबाहेर उभा होता. त्याला हा प्रकार विचित्र वाटला. दार न उघडता तो परत येऊन झोपायचा प्रयत्न करू लागला. थोड्यावेळाने कुणीतरी त्याला हलवून जागे करत आहे, असं वाटलं. त्याने डोळे उघडले. तीच दाराबाहेर पाहिलेली व्यक्ती त्याला हलवून जागे करत होती.
"माझ्या मुलीचे लग्न उद्यावर आले आहे. आतातरी तिच्यासाठी केलेले दागिने मला परत द्या..."
दिनकर घाबरून उठून बसला. त्याने समोर पाहिलं. ती व्यक्ती आता तिथं नव्हती. बाजूला नंदा कधी नव्हे ते शांत झोपली होती.
जेव्हा जेव्हा दिनकरने त्यातील काही सोने विकण्यासाठी बाहेर काढले, तेव्हा तेव्हा काहीतरी विघ्न येत गेली. कधी घराबाहेर जाताना तो घसरून पडायचा. कधी तालुक्याला जाणारी गाडी चुकायची किंवा कधी त्याला अथवा नंदाला आजारपण यायचे.
एक दिवस कुठल्यातरी लग्न समारंभाला जाण्यासाठी नंदा तयार होत होती. त्या हंड्यात पाहिलेली एक नथ घालून बघायचा तिला मोह झाला. तिने नथ बाहेर काढली आणि नाकात चढवली. तेवढ्यात... त्या खोलीभर असह्य असा कुचका, सडका दुर्गंध पसरला. नंदाला कळलं नाही काय झालं ते ?
तिनं ती नथ नाकातून काढली. दुर्गंध थोडा कमी झाला. नथ पुन्हा जागेवर ठेवून दिल्यावर दुर्गंध पुरता नाहीसा झाला. आता नंदाची खात्री पटली, हे गुप्तधन घरात आल्यापासून त्यासोबत त्याला चिकटलेल्या वासना, तळतळाट यांचा देखील घरात शिरकाव झाला होता. त्याच दुपारी जेवणानंतर नंदाला डुलकी लागली. अर्धवट झोपेत तिच्याजवळ एक स्त्री येऊन उभी राहिली. रागाने तिच्याकडे पहात, तिचा हात घट्ट धरत तिला म्हणाली,
"माझ्या नवऱ्याने पै पै जोडून माझ्या साठी बनवलेला दागिना हातात घेतलास तर खबरदार...तुला जिवंत सोडणार नाही.."
नंदा दचकून जागी झाली. आजूबाजूला कुणीही नव्हते. मात्र तिच्या मनगटावर कुणीतरी घट्ट आवळून धरल्यामुळे पडलेले बोटांचे लालसर ठसे होते.
सहा महिने झाल्यावर अमावस्येच्या रात्री दिनकरने आठवणीने भारलेला नारळ भैरवला स्मशानात जाऊन विधिवत परत केला.
एक दिवस दिनकरने पक्क ठरवलं, हंड्यातील काही सोन्याच्या मोहरा तालुक्याला जाऊन सराफाकडे विकून, आलेल्या पैशाने काही देणी चुकवायची. त्याप्रमाणे तो सकाळीच तयार झाला. घराबाहेर पडण्याआधी वळचणीत ठेवलेली चप्पल उचलायला त्याने हात घातला आणि तो कळवळून, जोरात ओरडला. वळचणीत दडून बसलेल्या विषारी सापाने त्याच्या हाताला दंश केला होता. नंदा धावली. तिने ओरडून आजूबाजूच्या लोकांना गोळा केले. कोणीतरी गाडी आणायला पळालं. तासाभराने गाडी मिळाली. गाडीत टाकून दिनकरला तालुक्याला नेण्यात आले. पण फार उशीर झाला होता. रस्त्यातच त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. दवाखान्यात पोहोचेस्तोवर सर्व संपलं होतं.
दीपक आईसोबत गावी परत आला. दिनकरचे सर्व दिवस कार्य आटोपले. आताशा नंदाची तब्येतही फारशी बरी नसे. तिच्या पोटात कायम दुखत राही. दिपकने आपल्या आईला तालुक्याला नेऊन सर्व तपासण्या करून घेतल्या. पण कुठलेही निदान होत नव्हते. दिवसेंदिवस ती खंगत चालली होती. आता आपण काही वाचणार नाही असे तिला वाटायला लागले होते.
एक दिवस नंदाने दिपकला जवळ बसवून सगळी हकीकत सांगितली. ती त्याला म्हणाली,
"हे गुप्तधन शापित आहे. ते कोणालाही लाभणार नाही. ते नष्ट केलेलंच बरं"
एके रात्री झोपेतच नंदा गेली. दीपक आता पुरता पोरका झाला. त्याच्या दुःखाला पारावार नव्हता. त्याला कसलाच उत्साह वाटत नव्हता. आई गेल्यावर महिन्याभरानंतर एक दिवस असाच उदास बसलेला असताना, त्याला आईचे शब्द आठवले.
"हे गुप्तधन शापित आहे. ते कोणालाही लाभणार नाही. ते नष्ट केलेलंच बरं."
त्यानं घरात शोधाशोध सुरू केली. कपाटाच्या खालच्या खणात त्याला तो हंडा मिळाला. त्यांच्या घराच्या गच्चीवर एक छोटी सिमेंटची कुंडी होती. पूर्वी कधीतरी त्यात लावलेले झाड न जगल्याने ती कुंडी रिकामी पडली होती. त्याने ती कुंडी साफ केली. बाजारात जाऊन एक लोखंडी पत्रा आणि थोडे सिमेंट आणले. हंड्यातील सर्व जिन्नस त्याने कुंडीत ठेवले. लोखंडी पत्र्याने आणि सिमेंटने त्या कुंडीचे तोंड बंद करून टाकले. दोन दिवस ती तशीच वाळायला ठेवली आणि तिसऱ्या दिवशी गावाबाहेरील नदीच्या खोल पाण्यात नेऊन टाकून दिली. त्या शापित गुप्तधना सोबत घरात शिरलेले तळतळाट, वासना या सगळ्यांनाच जलसमाधी मिळाली.
त्या रात्री खूप दिवसांनी दीपक ला घरात शांत झोप लागली.
********************************************
(कथा पूर्णपणे काल्पनिक असून निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने लिहली आहे. कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला लेखिकेचे समर्थन नाही.)
©कविता दातार
No comments:
Post a Comment