पहिला पगार (भयकथा)
राजू घरातून बाहेर पडला आणि म्हातारीनं घर आवरायला घेतलं. आजूबाजूच्यांना जाऊन वर्दी दिली की आज राजूचा पहिला पगार येणार आहे. बाजूची मंडळीही खूप खुश झाली कारण गेली चोवीस पंचवीस वर्ष म्हातारीचे कष्ट ते त्यांच्या डोळ्यांनी बघत होते. म्हातारीला गोधड्या शिवून, पाराच्या इथे फुलं विकून राजूला मोठा करताना बघितलं होतं. राजू तसा तिचा कोणीच नव्हता, एके संध्याकाळी राजू तिला विठ्ठल मंदिराच्या पायऱ्यांवर सापडला होता, कोणीतरी मायबाप जड झालेले पोरगं सोडून पळाले होते. म्हातारीला कोणीच नव्हतं तीनंही राजूचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला. तसं तिचं लग्न वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी झाला पण लग्न होऊन एक महिना उलटला नसेल तर तिचा नवरा ज्या नावेतून रोज नदी पार करायचा ती उलटली, त्याचं प्रेतही मिळाले नाही. तेव्हापासून ती एकटीच उभी होती, जगण्याचे मार्ग तिचे तिने शोधले. शिवणकामाची आवड म्हणून परकर-पोलके शिवुन द्यायला लागली. संध्याकाळचा वेळ जावा म्हणून विठ्ठल मंदिरात जाऊन भजन-कीर्तन ऐकू लागली आणि एकटीचा पांढरा संसार ढकलू लागली. एकदा ओळखीची एक दोघं त्यांच्या बागेतली फुलं,तुळशी, दूर्वा तिला घेऊन जा म्हणाले, तेव्हापासून विठ्ठल मंदिराच्या पुढच्या पाराजवळ ती एका परडीत घेऊन फुलं दूर्वा तुळशी ही विकू लागली. नवरा गेल्यामुळे पोराचं सुख तिला मिळणं शक्यच नव्हतं आणि हे तिने स्वतःलाही बजावूनही ठेवलं होतं की आता मरण येईपर्यंत आयुष्य एकटीनेच काढायचं आहे. पंधरा-वीस वर्ष स्वतःचा गाडा खेचत घालवली. एका संध्याकाळी फुलाची परडी उचलून निघाली तेव्हा विठ्ठलाच्या पायरीवर एका तान्ह्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याच्या आई-बापाला हाका मारून दमल्यावर तिच्या लक्षात आलं की विठ्ठलानंच हे पोरगं तिच्या पदरात टाकलंय. तेंव्हापासून राजू हा तिचा मुलगा आणि ती त्याची माय झाली.जगण्याचा एक उद्देश तिला मिळाला.
राजूनंही कधी त्या बापडीला हा प्रश्न विचारला नाही की माझे आईबाप कुठे आहेत, आजूबाजूच्याकडून म्हातारीने त्याला कसं वाढवलं आणि ती कशी त्याच्यासाठी जगली हेच तो इतकी वर्ष ऐकत आला होता आणि म्हणूनच तीच त्याची माय होती आणि तिथेच त्याचा बापही. त्या म्हातारीला मदत करत करत राजूनंही त्याचं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. सायकलीवरून दूध पोहोचवणे, पेपर टाकणे, म्हातारीनं केलेल्या गोधड्या विकणे, कोणाला एसटीची, रेल्वेची तिकीट काढून आणून देणे, हे करत करत राजू मोठा झाला. दहावीनंतर एका पुस्तकाच्या दुकानात दोन तास काम करून मिळेल त्या पैशात आणि उरलेल्या वेळात त्यानं कसाबसा आयटीआय पूर्ण केला. आयटीआय पूर्ण झाल्यावर दोनच महिन्यात त्याला कंत्राटी कामगार म्हणून नोकरी मिळाली. आत्तापर्यंत त्यानं उद्योग बरेच केले होते, कामंही बरीच केली होती पण पूर्णवेळ म्हणावी अशी ही पहिलीच नोकरी. आणि आज, त्याच्या नोकरीला एक महिना पूर्ण झाला होता ....आज तो पहिला पगार घेऊन घरी येणार होता.
म्हातारीला काय करू आणि काय नको असं झालं होतं, तिनं दोन वेळा आवरलेलं घर पुन्हा आवरून घेतलं, राजुच्या कपड्यांच्या तीन-चार वेळा घड्या करून ठेवल्या. वेळ जाता जात नव्हता, कसेबसे चार घास खाल्ले, पुन्हा दोन-चार जाळी-जळमटं काढली आणि अर्धा तास नुसतीच बसून राहिली. तिला राजूचं लहानपण ते आजपर्यंतचं सगळं अचानक आठवून गेलं, त्यावेळी मन मोकळं करायला कुणीच नव्हतं. स्वतःचंच सांत्वन, स्वतःचंच कौतुक करून ती लगबगीने उठली, चार वाजले होते एक तासाभरात राजू घरी येणार होता. पटकन तिने चहा घेतला आणि राजुला आवडतो म्हणून रव्याचा शिरा करायला घेतला. दारापुढे सडा टाकून छानशी रांगोळी काढली, राजुला आवडतात म्हणून परडीतली दोन गुलाबाची फुलं बाजूला काढून ठेवली. आता पाच वाजत आले होते, ती दारात बसून होती राजू ची वाट पाहत. पाचाचे नुसते साडेपाच झाले तरी तिचा जीव कासावीस झाला, पटकन दाराच्या आड भांडं ठेवून पुन्हा दारावर त्याची वाट बघत बसली. एरवीही त्याला पाचाचे कधी सहा-साडेसहा व्हायचे पण आजची गोष्ट निराळी होती.
चारच्या ठोक्याला राजूही कंपनीतून बाहेर पडला, आज खूप खुशीत होता. दिवसभरात फावल्या वेळात गाणी गुणगुणत, शीळ वाजवत सगळ्यांशी आनंदाच्या गोष्टी करत त्यानं दिवस घालवला. म्हातारीनं डब्यात दिलेली मेथीची भाजी आणि भाकरी आज एकट्यानेच खाल्ली, बरोबरीच्या मित्रांनी मागूनही त्यांना ती दिली नाही. त्यांनीही मनाला लावून घेतलं नाही कारण आजचा दिवस राजू साठी किती मोठा आहे हे त्यांनाही माहीत होतं. कंपनीतून घरी यायला सायकलवरून साधारण एक तास लागतो, बरोबर पाचच्या सुमारास राजू दोन चौक अलीकडं एका सोलापुरी चादरीच्या दुकानात गेला. आयुष्यभर ज्या म्हातारीनं गोधड्या विकून राजूला मोठे केलं, तिच्यासाठी एक सोलापुरी चादर घेऊन जावी असा विचार करून राजू दुकानात शिरला. एक मस्तपैकी गुलाबीसर रंगाची चादर त्यानं घेतली आणि बाहेर पडला. शेजारीच लागून असलेल्या मिठाई वाल्याच्या दुकानात गेला, म्हातारीला जिलेबी आवडते म्हणून पाव किलो जिलेबी घेतली. या सगळ्या गडबडीत पाचाचे साडेपाच होणं सहाजिक होतं. आता दोन चौक ओलांडायचे आणि म्हातारीला जाऊन भेटायचं या आनंदात एका बाजूला चादरीची पिशवी अन् दुसऱ्या बाजूला मिठाई ची बॅग लटकवून सायकलला टांग टाकली. स्वतःच्याच धुंदीत चौक क्रॉस करताना एका ट्रकनं राजुला उडवलं, सायकलचा भुगा झाला आणि राजूच्या डोक्याचा पार चेंदामेंदा, त्याचा चेहराही ओळखण्याच्या पलिकडे गेला होता. त्या ट्रकनं धडक दिल्यावर पडता-पडता ही त्यानं चादरीची पिशवी घट्ट धरून ठेवली होती. त्यात चादरीत बहुतेक त्याला गुंडाळून नेलं असावं.
साडेपाचाचे सहा झाले, राजू अजून आला नाही म्हणून दारा मागं एक एक करत पाच भांडी साठली होती. म्हातारीनं हलकेच दार लोटलं, राजू खाटेवर झोपतो त्या खाटेला डोकं टेकून बसली. तिचा हलकेच डोळा लागला, त्याच सुमारास हळूच दार वाजलं. डोळे उघडले तर कोणीच नव्हतं, नुकत्याच काढलेल्या जिलेबी चा वास मात्र घरात शिरला होता, कढईतला शिराही कोणीतरी खाल्ल्यासारखं वाटत होतं. दारावरच्या रांगोळीतही एक पाऊल उमटलं होतं. गुलाबाची दोन्ही फुलं कुठेतरी हरवली होती.
त्या दिवसानंतर राजू त्या घरात परत कधीच कोणाला दिसला नाही, म्हातारीच्या डोळ्यातलं पाणी त्या दिवसापासून कधीच थांबलं नाही. अजूनही अधून मधून विठ्ठलाच्या पायरीवर राजू आलाय का म्हणून ती बघायला जाते.
पण पगाराच्या दर एक तारखेला मात्र म्हातारीच्या घरचा शिरा कोणीतरी खाऊन जातं, रांगोळी मध्ये पाऊल उमटलेलं असतं. त्या तारखेला म्हातारी अजूनही त्याची वाट बघते, तुम्हाला जर राजू बद्दल काही समजलं तर तिला जाऊन सांगाल का?
(समाप्त)
No comments:
Post a Comment