घोस्ट रायटर - a writer of ghost |
घोस्ट रायटर - a writer of ghost
म्हणजे कसं असतं माहिती आहे का ?काही नाही.. अगदी सोप्प असतं. तुम्ही एकदाचे प्रसिद्ध झालात या एकाच कारणावरून तुमचा छळ सुरु होतो. घरी, दारी, बाजारी लोक तुमच्या मानगुटीवर बसण्यासाठी सज्ज असतात. तुमची साधी कृतीही चर्चेचा विषय होते.
उदाहरणार्थ, मी एखाद्या दुकानात खरेदीसाठी गेलो तरी काय म्हटले जाते..
अलीकडे याला कोणीच विचारत नसेल बरं ! तद्दन रिकामटेकडा झाला असावा म्हणून दुकानात फिरण्याइतका वेळ आहे हाताशी..
साधं बायकोसोबत बाहेर पडलो तरी कितीतरी भुवया उंचावतात.. बोलत नाही कुणी पण त्यांची नजर मात्र बोलत असते. च्यायला, याला बरा वेळ मिळाला आज भटकायला !
सारांश काय तर, माझा धंदा वाईट आहे. मी लेखक आहे. साधंसुधा नव्हे हो.. घोस्ट रायटर !
म्हणजे काय आहे, बऱ्याच लोकांना स्वतःच आत्मचरित्र वगैरे लिहायचं असतं. पण लेखन कौशल्याच्या नावाने ठणठणाट ! मग ते मला बोलावतात. मी जातो. त्यांची जन्मापासून आतापर्यंतची हयाती एकटाकी उतरून काढतो. मग ते बाड घेऊन घरी येतो. माझ्या शैलीत ते उतरून आत्मचरित्र सिद्ध करतो. मग ते छपाईला पाठवतात. छापून वाटतात. माझं नाव कुठेही नसतं. त्याबदल्यात मी चांगली बिदागी वसूल करतो. या सर्व प्रकरणात माझा रोल काय ? तर भूत लेखक म्हणजे घोस्ट रायटर.. कुणालाही न दिसता काम फत्ते करणारा आणि निघून जाणारा पोटार्थी प्राणी...
असले लेखक दुर्मिळ आहेत असे नाही. उलट आताशी त्यांची संख्या कितीतरी वाढली आहे. मात्र मी नाव टिकवून आहे. त्याची सॉलिड करणेही आहेत. . त्यांच्यामुळेच तर मला डिमांड आहे.
काय आहे, मी जिवंत लोकांऐवजी मृत लोकांची आत्मचरित्रे खूप चांगली लिहितो. हे माझे मत नाही, ज्यांच्यासाठी मी ती लिहिली त्यांचे म्हणणे आहे. ती लोक जिवंत असती तरी स्वतःबद्दल इतकं चांगलं लिहू शकली नसती हा सर्वांचा अभिप्राय आहे.
आता हे कस साध्य होतं तेव्हढं मात्र विचारू नका.. ते ट्रेड सीक्रेट आहे.
पण एक मात्र सांगता येईल.. मृत लोकांची आत्मचरित्रे लिहिताना मी पुरता गुंगून जातो. त्यांच्याविषयी जमवलेली माहिती, छायाचित्रे, नोंदी, डायऱ्या, लोकांचे अनुभव आदी कशालाही हात न लावता मी लिहीत असतो. सारं काही नजरेसमोर घडलंय अशा बेताने मजकूर जमून येतो. भन्नाट मजा येते. एक चूक मात्र घडते !
त्या मृत व्यक्तीला स्वतःलाच माहित असतील इतक्या खाजगी बाबीसुद्धा माझ्या लिखाणात प्रकटतात. उदाहरणार्थ, थोर शिक्षणमहर्षी ****** यांनी वयाच्या १४ व्या वर्षी सालगड्याच्या मुलीचा हात पकडला होता. आणि त्याबद्दल तिच्या बापाने चाबकाने त्यांच्या बुडावर फटकारे ओढले होते. त्या घटनेनंतर ते बिचारे कुटुंब रात्रीतून परागंदा झाले. तो चाबकाचा वळ मात्र शिक्षणमहर्षींच्या बुडावर कायम राहिला.
असं भलतंसलत सिक्रेट लिखाणाच्या कच्च्या मसुद्यात असलं की मी मृताच्या वारसाला दाखवून देतो. ते लाजून अर्धमेले होतात. मी तेव्हढा भाग तिथेच खोडतो. शेवटी काय, तर माणूस मेला कि त्याचे अपराधही मातीआड गाडून टाकायचे असतात. शिवाय बिदागीत वाढ होते ती वेगळी. शिवाय प्रामाणिकपणा म्हणून जगात काही आहे कि नाही !
आता परवाचीच गोष्ट घ्या..
पश्चिम महाराष्ट्रातील एका दिवंगत साखर सम्राटाचे चरित्र लिहीत होते. कच्चा भाग पूर्ण झाला. ५५ वयाच्या ज्युनियर साखरसम्राटाने वाचला. त्यात लिहिलं होतं... पुण्यातल्या एका सहकारी बँकेत त्यांचे १२ कोटी रुपये होते. त्याची ठेवपावती, पासबुक उसाच्या मळ्यातल्या बंगलीत पलंगाखाली होतं. ज्युनियर चमकलेच की !
मायला,, आबांनी तर मला, आईला कोणालाच सांगितलं नव्हतं राव...
कसं सांगणार, ठेव ठेवली आणि तिसऱ्या दिवशी तर त्यांना झटका आला.. ते काय पान नंबर ७८ वर लिहिलंय... मी माहिती दिली.
त्याने माझे पायच धरले. म्हणाला..
बाबा (माझी दाढी पांढरीधोप झाली आहे. म्हणून बाबा), अहो हे १२ कोटी फक्त तुमच्यामुळे मिळणार.. बोला तुम्हाला काय देऊ ?
मला नको काही, तूच या पैशांचा वारस आहेस. तुझे तुला मिळाले विषय संपला... मी म्हणालो.
असं कसं.. तुम्हाला काहीतरी घ्यावाच लागेल.. थोडेतरी घ्या.. त्याने विनंती केली.
नको रे ! या पैशातून एक रुपयाही घेतला तर मला फार त्रास होईल.. मी कारण सांगितलं.
कोण त्रास देईल, नाव तर सांगा..त्याच खानदानच छाटतो. त्याची गुर्मी उफाळून आली होती.
त्याच कोणी काहीच बिघडवू शकत नाही. मी म्हणतोय तेव्हढं कर.. जातो मी ! म्हणून मी निघालो.
त्याने शेवटी घरी गड्यासोबत लाखभर रुपये पाठवून दिले. पैशांची बॅग अंगावर टाकून गडी निघून गेला.
ती रक्कम मी अन्नछत्राला देऊन टाकली. नाव कोणाचं टाकू पावतीवर. ?
मी त्या साखर सम्राटाच नाव लिहून परत आलो.
तेव्हापासून नवा त्रास वाढला आहे...
अब्जोपती, करोडपती, नेतें, अभिनेते, उद्योगपती मेले रे मेले की उत्तरकार्य आटोपून त्यांची मुलेमुली, बायका माझ्याकडे धाव घेतात. माझ्या घराचं इवलंसं अंगण महागड्या गाड्यांनी भरून जातं. लोकांना मग आणखी चर्चेला आयता विषय मिळतो.
आत्मचरित्र कुणालाच नको असतं. बापाने कुठे, काय आणि किती लपवून ठेवलय हेच प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. आता मला लिहिल्याशिवाय ते सांगता येत नाही. मग ती लोक आदळआपट करतात, धमक्या देतात. त्यांचे नातलग त्रास देतात ते वेगळेच !
पण मला आता सवय झालीये. बायकोला मात्र खूप त्रास होतो..
तिला यातलं काहीच माहित नाही.. आपला नवरा रात्री-बेरात्री उठतो. लिहिण्याच्या खोलीत जातो. त्या खोलीतून वेगवेगळे आवाज येतात. एव्हढंच तिला कळतंय. पण बिचारी काहीच बोलत नाही.
चला.. बराच वेळ झालाय.. एका उद्योगपतींच चरित्र हाती घेतलंय
रात्री मी लिहिण्याची खोली उघडली. खिडकीचा पडदा बाजूला केला. कागद मांडून पेन सरसावून बसलो. एक मंद सुगंध वाऱ्याच्या हलक्या लहरीसोबत आत आला.
आलात आपण... मी विचारलं..
हो.. आणि बसायला आरामखुर्ची नाही का ? त्या धुरकट वलयाने विचारले.
नाही..आरामखुर्चीत बसला को झोप लागेल.. आपल्याला रात्रीत काम संपवायचय ! मी म्हणालो.
हं.. मग करा सुरुवात ! आज माझ्या मृत्यूला मोजून एक वर्ष पूर्ण होतंय.... त्याने सांगायला सुरुवात केली.
पाहिलंत.. घोस्ट रायटर होणं सोपं नसत !
समाप्त
-सचिन पाटील
No comments:
Post a Comment