सीता भवन - Marathi Story -Part 6 |
चिरतारुण्याची लालसा मानवजातीला नवी नव्हे. कित्येक शतके ती अभिलाषा पूर्ण करण्यासाठी मनुष्यजात धडपडते आहे. सौंदर्य प्रसाधने, औषधे, शस्त्रक्रिया, त्वचारोपण अशा कृत्रिम बाबी एका बाजूला आहेत...
आणि दुसरीकडे ?
काही अघोरी तंत्रे..
त्यांनाही फार मोठा इतिहास आहे. मानव, प्राण्यांच्या अवयवांचा वापर करून स्वतःचे तारुण्य, रुपसंपदा, शरीरसौष्ठव कायम राखण्याचे प्रयत्न अनेक संस्कृतीमध्ये होते आणि आहेत.
मानवीय नैतिकतेच्या दृष्टीने तो अत्यंत घृणास्पद अपराध म्हणावा लागेल..
एखाद्याचं तारुण्य नष्ट करून आपलं तारुण्य अबाधित ठेवायचं..शुद्ध अमानुष कृत्य !
निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेली ती कृती..
मानवाचा दुर्दैवी अपवाद वगळला तर कोणताही प्राणी हे अघोरी कर्म करायला धजावत नाही..
मानव.. निसर्गाची सर्वाधिक देखणी, सर्वात बुद्धिमान आणि सर्वाधिक क्रूर रचना...
ती सर्व क्रूरता जयेशच्या डोळ्यात एकवटली होती. स्वतःचे प्रतिबिंब आरशात बघत बेडवर नागिणीसारखी सळसळणाऱ्या उषाला पाहून त्याच्या ओठांवर छद्मी हास्य उमलले.
त्या कोपऱ्यातूनही त्याच्या नजरेची दाहकता तिला जाणवली. ती सावरून बसली.
तो सरसर तिच्याजवळ पोहचला. आता तिची हनुवटी त्याच्या ओंजळीत होती. तिचे ओठ, डोळे, नासिका, कपाळ....
प्रत्येक अवयवाचे तो एकाग्रतेने निरीक्षण करत होता. किती प्रमाणबद्धता म्हणावी ?
परफेक्ट!
आपला निर्णय चुकला नाही म्हणायचे !
आणि तिचा तरी कुठे विरोध होता ?
पापात कुणीतरी वाटेकरी आहे ही जाणीव पापाची टोचणी कमी करते..
तो पुन्हा स्वतःशी हसला.
तिच्या चेहऱ्यावरचे हात त्याने काढून घेतले.
तिचे डोळे मात्र निराळ्याच धुंदीत असल्यागत झाले होते. त्यांच्याकडे पाहतांना एक हिंस्त्र छटा त्याच्या चेहऱ्यावर उमटली.
तिच्या नजरेतली ती बेहोशी !
ती निश्चितच धोक्याची सूचना होती.
बेडरूमचे दार खाडकन उघडून तो बाहेर पडला.
फ्लॅटच्या मोकळ्या भागात सीताक्का थरथरत उभी होती. तिचे दोन्ही हात छातीशी जोडले होते. डोळ्यात याचना होती आणि भयाने चेहरा व्याकुळ झाला होता.
तिचे ते रूप त्याच्यासाठी नवे नव्हते.
त्या अमंगल प्रकारात जे काही अंशी मांगल्य शाबूत होते, ते अशा वेळी सीताक्काच्या चेहऱ्यावर पाहता येत असे.
पण त्या प्रकारात अशा संकल्पनाना काडीचीही किंमत नव्हती. मानवता, दया, करुणा...त्या सर्व त्यांच्यालेखी निषेधार्ह होत्या.
म्हणून सीताक्काला तशा अवस्थेत पाहून त्याचा चेहरा कमालीचा कठोर झाला. डोळ्यात क्रोध दाटू लागला. तसतशी ती आणखी मोडल्यासारखी झाली. तो फिस्कारला.
असंच सुरू राहिलं तर संपेल सर्व ! कसलाही अनुभव नसलेली ती दोघे वाचलीत कशी ? काहीतरी गफलत झाली सीताक्का !
त्याच प्रश्नाने तिचा मेंदू आधीच कुरतडला होता. पण अगदी खोल, आतून कुठेतरी समाधान वाटत होतं.
मी तर नेहमीप्रमाणेच कृती केली. आता ती दोघे प्रसाद खाणार नाहीत ते मला तरी कुठे ठाऊक होते... सीताक्का कळवळून बोलली.
कुठेतरी, काहीतरी चुकतंय सीताक्का ! तू मनापासून या विधीत सामील होत नाहीस हे मला माहित आहे. पण तू जबाबदारी टाळत नाहीस हेसुद्धा तितकंच खरं..पण मग ती वाचली कशी ? या वास्तूत त्यांना पाठीशी घालणारं कोण वावरतेय ? त्याच्या आवाजात चिंता होती.
जयू, काही दिवसांपासून मला जाणवतंय..त्या सानेची दोन मुलं इथं फिरताहेत. खोल्यांमध्ये खूप गोंधळ ऐकू येतो. ही लक्षणे काही बरी नाहीत.. सीताक्का म्हणाली.
त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. सीताक्काचे म्हणणे खरे मानले तर..
तर मग काहीतर तातडीचे उपाय केले पाहिजेत..त्यासाठी आता स्वतःच पुढाकार घ्यायला हवा.
जयू, लेकरा...सोड रे हा नाद. बघ, आपण खूप पापे केलीत. कुठेही लांब निघून जाऊ, कसेही राहू पण इथे नको आता.. नाही सहन होत..अरे, त्याची भूक न मिटणारी आहे... सीताक्का विनवण्या करत होती.
तो गडगडाटी हसला..
सीताक्का...तू हे सांगतेस..पाटीवर मुळाक्षरे गिरवण्याच्या वयात मला या पंथाला कोणी लावले, तूच ना ! आता तुला परमार्थ, पाप यांच्या जाणिवा होऊ लागल्यात ? ते ही कधी तर माझ्या सर्व उपासनेची फलनिष्पत्ती काही घटकांवर आली असतांना ! नाही सीताक्का, मी आता मागे हटणार नाही...आणि माझ्या वाटेतही कोणाला येऊ देणार नाही..
त्यापुढचे त्याचे शब्द सीताक्कासाठी जणू अग्निवर्षाव करणारे ठरले..
बस्स, थोडे दिवस सीताक्का..मग तो मानवी रूपात प्रकटणार आहे. त्याच्या मानवी प्रगटनाचे निमित्त ठरणार आहे मी ! त्या मोबदल्यातच कितीतरी अफाट शक्तींचा मालक होईल मी! हे..हे सीता भवन..त्याच्या अवताराने पुनित होईल. या सृष्टीतील नव्या पर्वाचा आरंभ या वास्तुतून होणार आहे.. सीताक्का, तोपर्यंत मी माघार घेणार नाही.
पाशवी अट्टाहास करीत तो निघून गेला. सीताक्का मात्र सुन्न होऊन बघत राहिली.
आपण तळहातावर वाढवलेल हे लेकरू! बघता बघता किती उलट्या काळजाच झालं..तो कोणाला या जगात आणू पाहतोय..ते नेमकं काय असेल..जयेश त्याची निर्मिती करेल म्हणजे नेमकं काय करेल.. या प्रकाराला कुठेतरी थांबवता येईल का, कोण थांबवणार..आपण...
तशा अवस्थेतही ती खिन्नतेने हसली.
आपल्यापासून तर या अघोरी प्रकाराची सुरवात झाली. त्यादिवशी जर आपण सूज्ञपणे वागलो असतो तर...
तिला तो दिवस लख्ख आठवला ! असा दिवस विसरायचा म्हटला तरी विसरता येत नाही. काळजातल्या जखमेसारखा तो अखंड भळभळत असतो..
आणि तिथून तर सुरवात झाली होती...
(क्रमशः)
No comments:
Post a Comment