मैत्री, जगातील सर्वात सुंदर नात... एखादी गोष्ट घरच्यांनी सांगितली तर ऐकुन न ऐकणारे, मित्राच्या मनातलेही ओळखतात.. असे ते मित्रच असतात...
असेच आम्ही चौघे मित्र.. त्यातला एक म्हणजे अनिल... त्याला माझ्या कथा जाम आवडायच्या , जसा माझा फैनच होता.... पण ही कथा त्याच्या जीवाशी येईल अस स्वप्नातही वाटल नव्हत ...
****
" चला रे... उद्या भेटु.....तशीही बरीच रात्र झालीये.... पाऊसही नाही तोवर निघुया..."
हातातील रिकामा झालेला ग्लास समोर ठेवत मांडी घालुन बसलेला अनिल म्हणाला, आणी
समोरच्या प्लेट मधल चिकनच एक फोड तोंडात घालत सचिन न त्याची खेचायला सुरवात केली...
" का रे आन्या..?फाटली का लेका....?"
" न.... नाही रे..... "
" तुझ्या तोंडावरुनच दिसतेय तुझी हालत... हाssss हाsssss हाssss तोंड तरी बघ साल्याच...."
हसतच सचिन ने विजय ला टाळी दिली... आणी दोघेही खळखळुन हसु लागले...
त्याच्या पाठीवर थाप मारत विजय म्हणाला ..
" कसला घाबरतोस रे.... ह्या संजुला पन काम नाहीत... कायपन भुताच्या गोष्टी सांगतो... आणी आन्याला घाबरवतो..."
" त्याला ऐकायला आवडतात म्हणुन तयार करतो रे... आणी आपला रूल काय...? मित्रासाठी कायपन..."
बोलता बोलता मी ही बियरचा एक घोट घशाखाली सरकवला, तसा दारुचा ग्लास हातात घेत सचिन न माझ्या कडे पाहील..
"संज्या .. काही कर... पन तुझी स्टोरी एक दिवस आपनच तयार करणार..."
" होय काय....! आणी ती कशी....???"
" तुझ्या बियर मधे दारु मिक्स करुन..." तसे ते तीघेही हसु लागले... तशी हातातली बियर बाजुला ठेवत मी म्हंटल.
" हो का....."
"बघशील..."
"ये वाद नको......" अनिल बोलु लागला
" पन तुम्हाला खर सांगु.... आज सांगितलेली स्टोरी पन मस्त होती रे.... म्हणजे तो सुनसान वाटेवरून जाणारा मुलगा, एक जिवघेणी किंकाळी ऐकु येते.. मग त्या मुलाला रात्री रस्त्यावर बाई धावताना दिसते, मग तीच्यामागे तो जातो, मग विहीरीवरच ते चिमचेच झाड, ती विहीरीत पडते आणी त्यालाही विहीरीत खेचते.. मस्त रे.... "
बोलताना अनिलच्या चेह-यावर उत्सुकता दिसत होती...
" काय घंटा मस्त होती...?"
विजय जरा तीरकस पने म्हणाला.
"न्हायतर काय..... काय पन.... म्हणजे अशी भुत कधी विहीरीत असतात का...? उगचच कायपन.."
"सचीन... तुला लय माहीती आहे रे. पन खरच अस असत का.....? म्हणजे चींचेच्या , वडाच्या झाडावर, विहीरीवर अशा शक्ती असतात...?"
"आन्या..... तु गोष्ट सांग म्हणालास , मी विचार केला... मग तयार केला... मग सांगितली.... ती एवढी सिरीयस घेऊ नकोस... ओके..."
" हम्म...... मी निघतो..... तुम्हीपन आवरा...."
उभा राहुन आमच्याकडे पाहिल
तशी त्याची बैग पुढ सरकवत विजय म्हणाला
" आन्या... तु निघ.... आमचे अजुन दोन पेग होतील..."
" च्यायला..... बास करा रे.... नाहीतर उद्या ऑफीसमधेपन असे तरंगत रहाल का जसे अॅस्ट्रॉनॉट स्पेसशटल मधे तरंगतात,"
बोलत अनिल ने आपली बैग पाठीवर निट अडकवली आणी बाहेर पडला...
*****
रात्र बरीच झालेली, त्यातच गर्द काळ्याकुट्ट ढगांनी आसमंत व्यापुन टाकलेला. गाडी स्टार्ट करत अनिल आपल्या घरी जायला निघाला... रस्त्यावरची वर्दळही बरीच कमी झालेली... ओलसर , काळ्या डांबरी रस्त्यावरून त्याची बाईक सामान्य वेगातच धावत होती.. रस्त्याच्या मधले पांढरे पट्टे संथ गतीने मागे पडत चालले. रस्त्याच्या दुतर्फा नगरपालीकेने लावलेल्या झाडांच्या गळून पडलेल्या पानांचा खच पावसाच्या पाण्यासोबत वाहुन कडेला साचलेला, तर उजव्या बाजुला असलेल्या खांबांवरील दिव्यांचा पिवळ्या नारंगी प्रकाशात पावसाच्या पाण्याचे किंचीतसे दुस्कार हवेतून खाली सरसावर होते.. सर्वकाही अगदी स्पष्ट दिसत होत...
मुख्य रस्त्यावरून त्याची बाईक आता कच्च्या रस्त्यावर आली..? खडखड आवाज करत त्या कच्च्या रस्त्यावरून तो जाताना आजुबाजूच्या शांततेला भेदत होता... दुतर्फा गर्द झाडी आणी रातकिड्यांचा किर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज त्यातच अधुनमधून टिमटीमनारे काजवे आज रात्रीचे त्याच्या सोबतीला होते ... रस्त्याच्या कडेला लांबच्या लांब पसरलेल्या ऊसाच्या रानाच्या पट्ट्या जरी रात्रीच्या काळोखात दिसत नसल्या तरी रस्ता नेहमीचा असल्याने ओळखीच्या होत्या... मंद वा-यामुळे पोटात गेलेले अल्कोहोल आता आपला परिणाम दाखवु लागले... म्हणजे डोक किंचीत जड व्हायला सुरवात झाली.. डोळ्यावर नशेचा अंम्मल अगदी स्पष्ट जाणवत होता..
त्या ओबडधोबड कच्च्या रस्त्यावरून खड्डे चुकवत त्याची बाईक सामान्य वेगात पुढे सरकत होती, की अचानक एका स्त्री च्या आर्त किंकाळीने रात्रीची ती निरव शांतता लोप पावली त्या सरशी बाजुच्या झाडावर बसुन शांत निद्रावस्थेत असलेले एक पाखरू आपल्या पंखांची फडफड करत काळ्याकुट्ट आसमंतात झेपावले... आधीच खड्यातुन कसरत करत बाईक चालवणा-या अनिलचा त्या आवाजाने गाडीवरचा ताबा सुटला बाईक खड्यात गेली पन तो सावरला... गाडी तशीच बाजुला थांबवत आवाजाच्या दिशेने पाहु लागला पन आजुबाजूच्या काळ्याकुट्ट अंधारामुळे काहीच दिसत नव्हत... त्यान गाडी सुरू केली तसा तीच्या हेडलाईटचा पिवळसर प्रकाश त्या वाटेवर दुरवर पसरलेला... आजुबाजूच्या परिस्थीतीचा कानोसा घेत तो क्षणभर तसाच उभा राहीला.. कारण ती किंकाळी त्यान ऐकली होता . अगदी स्पष्ट ... पन आता कसलीच हलचाल अथवा आवाज येत नव्हता ... तशी बाईक गेअर मधे टाकत निघु लागला पन लगेच गाडी जागेवर थांबवली .... त्याला कसलीशी चाहुल जाणवत होती... उजव्या बाजुला पसरलेल्या रानातुन ऊसाच्या पात्यांची सळसळ ऐकु येत होती... कोणीतरी धावत येत होत... ऊसाच्या शेतातील बांधावरुन... वेगाने धावत... पानांची सळसळ वाढु लागली आणी कोणीतरी त्या रानातुन बाहेर पडल... झपकन.. अतीशय वेगात... गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात अनिलने पाहील... अगदी समोर जेमतेम पंन्नासएक पावलांवरून एक महीला हुंदके देत रडत रस्त्याच्या दस-या बाजुला जाऊ लागली... मोकळे सोडलेले काळेभोर केस जे कमरेपर्यंत येत होते आणी अंगावर पांढरी साडी... अनिलन आपली बाईक सुरू करुन तीच्या दिशेने गेला पन तेवढ्या वेळेत ती डाव्या बाजुला असलेल्या रानातील पायवाटेने आत शिरली...
" अहो मॅडम... ऐका....."
अनिल न घाईघाईत बाईक थांबवली आणी तो ही तीच्या मागे धावत निघाला...
लख्ख काळोख असल्याने खिशातुन मोबाईल काढुन टॉर्च सुरू केला... शेताच्या चिंचोळ्या बांधावर उगवलेल हिरवेगार गवत , त्यावरुन चालताना त्याचा पाय घसरत होते पन पुन्हा तोल सावरत तो तीच्या मागे जाऊ लागला. एका हातात मोबाईल तर दुस-या हाताने समोर येणारी ऊसाची खरबरीत पाती बाजुला करत तो साद घालत होता.. त्या दाट रानात ती दिसत नव्हती पन तीचे हुंदके स्पष्ट ऐकु येत होते... तो तसाच मागे चालत त्या महिलेला हाक मरत होता पन ती काहीच प्रतीक्रीया देत नव्हती... अनिल तीचा पाठलाग करत एका किंचीत रिकाम्या जागेवर आला... त्याची नजर भीरभीरत होती...
"कुठे गेली ही..."
स्वता:शी पुटपूटत त्या मोबाईलचा टॉर्च आजुबाजूला फिरवू लागला... तीथच आसपास लहान मोठ्या झाडांची गर्दी दिसत होती. गोलाकार कठड्याच पडझड झालेल बांधकाम आणी त्या कठड्याच्या बांधकामाचे दगड उचकटुन स्वता:चा डोलारा सांभाळत उभ अंबट चींचेच झाड अर्ध्याहून अधिक विहीरीत झुकले होते.. पन त्याची नजर तिला शोधत होती.. आणी तशी ती दिसली...
काही अंतरावरच, म्हणजे वीस एक पावलांवर ती पाठमेरी उभी होती... तीचा स्त्रीदेह तो न्यहाळतच होता...
अगदी शांत... मघाचे हुंदके देत रडण बंद झाल होत..
" आहो..... काही प्रॉब्लम झालाय का.....? घरी भांडण वगैरे...."
पन ती काहीच बोलत नव्हती.. तसा अनिल बोलत तीच्या दिशेने निघाला...
"हैलो..... मी तुमच्या बोलतोय....."
पन काहीच उत्तर नाही...
"च्यायला.... ऐकु येत नाही वाटत हीला.."
बडबडत त्यान मोबाईलचा प्रकाश आजुबाजूला परिसर न्यहाळत , पायाखालचे वीथभर उंच गवत तुडवत तो त्या महीलेच्या जवळ पोहोचला , हात पुढे केला तर तीला स्पर्श करता येईल इतक्या अंतरावर तो आला तशी ती म्हणाली..
"तीथच थांब......"
तसा अनिल जागेवरच थांबला पन न रहावून म्हणाला
" इतक्या रात्री अशा भयान एकांतात तुम्ही आलाय पन काहीतरी कारण आसेल ना...." काहीच न बोलता तीन खाली डाव्या बाजुला मान फिरवली तसा तीचा अर्धवट चेहरा दिसला...
खुपच देखणी... अगदी संगमरवरामधे कोरलेले सुंदर निरागस शिल्पच म्हणाव तशी.. बारीक कोरलेल्या सुरेख भुवया, थरथरणा-या पापण्यांमधुन तीचे रेखीव डोळे अधीकच व्याकुळ भासत होते ... सरळ नाक आणी नाजुक गुलाबाच्या कळीसारखे ओठ.... वीशीतली ती तरूणी असावी... अनिलची व्याकुळ पुरषी नजर तीच्या देहावरून अखंड फिरत होती...
तीला पहाताच अनिल देह भान विसरून गेला... तीला स्पर्श करण्याचा मोह त्याला आवरेनासा झाला... फक्त एका हाताच तर अंतर होत.. आणी तस पन इथ ती एकटीच आहे... पन मनात किंचीत भीती होती,
'म्हणजे तीला नाही आवडल तर ...?
आणी तीच्या घरच्यांना तीन सांगितल तर....?
तर काय... सांगायच, जिव देत होती म्हणुन वाचवली...'
थोड धाडस करत त्यान आपला हात पुढ केला तशी ती दोन पावल चालत पुढ गेली...
" पुढ येऊ नकोस...."
तीचा गोड आवाज, निस्सीम सौंदर्य आणी पोटात गेलेल अल्कोहोल या सर्वांच्या संयुगान तो भान हरपला होता... आता झटकन तीच्यावर झडप घालायची या पावित्र्यात त्यान दबक्या पावलांनी चालायला सुरवात केली... आणी झटकन तीचा हात पकडला... तीच्या थंडगार हाताच्या स्पर्शान अनिलच्या अंगावर सर्रर्रर्रर्रर्रर्रर कन काटा आला...
" सांगितल होत ना... पुढ येऊ नकोस म्हणुन ..."
एवढे मोजकेच शब्द तिच्या तोंडातुन बाहेर पडले आणी दुस-याच क्षणी अनपेक्षीत घडल ज्यान अनिल पुरता हदरून गेला...
एक आक्राळ विक्राळ सुरकुतलेला चेहरा, लांब सुळे, लाल रक्ताळलेले डोळ..........???
नाही......
यापैकी काही नाही....
अनिल स्पर्श करताच तीन क्षणात बाजुच्या त्या विहीरीत उडी मारली तसा तीचा पदर अनिलने घट्ट पकडून धरला... पन तीच्या 'या' अनपेक्षीत वागण्याने अनिल पुरता हादरुन गेला.. ती साडीच्या पदराच्या सहाय्याने लटकु लागली अनील तीला वर खेचायचा प्रयत्न करू लागला... पाणी बरेच खाली असल्याने ती पदराच्या सहाय्याने विहीरीतील काठाला लटकत वर पाहु लागली... अंगातली शक्ति एकवटुन अनिल तीला वर खेचायचा प्रयत्न करू लागला तोच त्याला आवाज आला....
" माझा पदर सोड..."
"नाही....."
" सोड म्हणतेय ना..."
आवाज तीचाच होता, पन आवाज विहीरीतुन नव्हता... त्या निरव शांततेत आजुबाजूच्या परिसरातुन ते शब्द एकसारखे घुमत होते...
" माझा पदर सोड..."
" माझा पदर सोड..."
आणी तो आवाज स्थिरावला... आता आवाज
त्याच्या मागुन आलेला.. त्यान पदर घट्ट पकडुन मागे पाहील आणी सुन्न झाला.. मेंदु बधीर झाल्यासारखा डोळे विस्फारून पहाताना त्याच्या अंगावरून झर्रर्रर्रर्रर्रर कन शहारा आला... विहीरीत उडी घेतलेली ती तरुणी त्याच्या मागे उभी होती... त्यान पुन्हा विहीरीत पाहील तर कोणीच नव्हत, त्याच्या हातातही पदर नव्हता ज्याच्या सहाय्यान ती तरुणी लटकत होती... त्यान पुन्हा माग पाहील पन काही बोलण्याच्या आत ती म्हणाली
" माझा पदर पकडु नकोेस...."
आणी तीन त्याच्या समोरच त्या विहीरीत उडी घेतली... काय घडतय हे समजत नव्हत... ती पाण्यात पडताच पाण्याची उसाळ धाडकन वर आली आणी त्याचाही अंग किंचीत भिजल. तोंडावर पाणी उडल तसे गपकन डोळे मिटले... डोळे उघडले तर त्याच अंग कोरडच होत... त्याला आश्चर्य वाटल... एका क्षणापुर्वी ती पाण्यात पडली तेव्हा पाणी वर उडाल, सोबत पाण्यात असंख्या तरंग उठले होते,
पण सेकंदातच ते विहीरीतील पाणी अगदी शांत होत जसे काही घडलेच नाही...
मोबाईल प्रकाशात पाहु लागला पण काहीच नाही .... त्या काळ्याकुट्ट संथ पाण्याकडे पहाताना अंगावर सर्रर्रर्रर्रर्रर्रर कन काटा मात्र अनिल समजुन गेला की हे अमानवीय शक्तिच ठिकान आहे... तो मागे सरकताच बांधावरील ठिसुळ काळ्या मातीत पाय घसरलाच... पडता पडता स्वताःला सावरत त्याची भयभीत नजर आजुबाजूला फिरू लागली. त्या निरव शांततेत एक अस्पष्ट आवाज येऊ लागला तशी काळजाची धडधड वाढत चालली... श्वास रोखुन तो अस्पष्ट आवाज ऐकण्याचा प्रयत्न करु लागला...
'कसला आवाज आसेल...'
कर्रर्रर्रर्रर्रर्रर कर्रर्रर्रर्रर्रर्रर कर्रर्रर्रर्रर्रर्रर
असा आवाज हळुहळू वाढत चालला....
"काय आहे या परिसरात... हे सगळ खरच घडताय की माझ्या पोटात गेलेली दारू आणी त्या संज्यान पीता पीता सांगितलेल्या काल्पनिक भुतांच्या गोष्टीत मी रमलोय आणी तेच घडतय..."
तो स्वता:शी पुटपूटला
लख्ख काळोखात त्यान हातातला टॉर्च समोर धरुन किलकील्या नजरेन पाहील, तर विहीरीच्या काठावरचे त्या निम्म्या विहीरीत झुकलेल्या चिंचेच्या झाडाची एक फांदी कर्रर्रर्रर्रर्रर्रर कर्रर्रर्रर्रर्रर्रर आवाज करत किंचीत हेलकावे घेत होती, जसे कोणीतरी वर बसुन पायांना झोके देत असाव... आणी मनात विचार आला
' इथुन निघायला हव... '
विहीरीजवळचा तो भयान परिसर पहात तो एक एक पाऊल मागे सरकु लागला...
"कोणी मला मदत कराल का...? कोणी आहे का...?"
मदतीसाठी एका स्त्रीचा आवाज त्याच्या कानावर आला... कोणतीही हलचाल न करता अनिल एखाद्या खांबाप्रमाणे तो जागेवर उभा राहील... जशी असंख्य वलय पाण्यात उमटावीत तसा दिर्घ पन अस्पष्ट आवाज त्या खोल विहीरीतुन वर येत होता येत होता... पुढ जायच धाडस होईना पन आवाजातील व्याकुळता त्याला पायात अडकलेल्या बेडीसारखी आपल्या दिशेने खेचत चालली होती... आकाश ही निरभ्र झाल होत आणी चांदणंही पडलेल... चंद्राच्या शितल प्रकाशात आजुबाजूचा परीसर आता स्पष्ट दिसु लागला.. मनावरच दडपन किंचीत कमी झाल्यासारखा तो विहीरीच्या दिशेने चालु लागला... त्याची नजर विहीरीवर स्थिरावला होता , तो आवाज, ती अस्पष्ट ऐकु येणारी हाक अजुनही संथपने घुमत वर येत होती. भय दाटलेली त्याची नजर त्या विहीरीमधील पाण्यावरच रोखलेली... त्या संथ पाण्यातील वलयांवर तरंगणारी चंद्रकोर सुरेख असली तरी तीची गुढता आणखी वाढतच जात होती... त्याची नजर आता त्या हाकेचा वेध घेऊ लागली...
" कोणी आहे काsssssss....?"
ते स्वर आता स्पष्ट ऐकु येत होते ते ही अगदी जवळुन... त्या पाण्यात पाहील आणी काळजाचा ठोकाच चुकला... वडाच्या पारंब्यांसारख काहीतरी होत जे पाण्यात लटकताना हेलकावे घेत होत.. त्यावर मोबाईल च्या टॉर्च चा प्रकाश पाडला तर काळ्याकुट्ट धाग्याचा गुच्छा वरुन लटकत पाण्यात पोहोचलेला... मोबाईल तसाच वर सरकलत पाहील आणी......
विहीरीवर तीरक्या आलेल्या त्या फांदीवर बसलेल ते किळसवाण दृष्य पाहील आणी काळीज जोरजोरात धडधडू लागल... डोळ्याची कवाडे सताड उघडी करुन समोर पाहु लागला..... त्या चिंचेच्या फांदीवर एक बाई पाठमोरी बसलेली, चींचेच्या विरळ फांद्यांमधुन पाझरणा-या चंद्रप्रकाशात तीची काया उजळून नीघालेली...
पांढ-या शुभ्र साडीचा पदर वा-याच्या प्रत्येक झोक्यासोबत हेलकावे घेत होता.. गडद्द हिरव्या बांगड्यांनी भरलेला डावा हात बाजुला फांदीवर ठेवलेला तर काळेभोर मोकळे केस उजव्या खांद्यावरून पुढे घेऊन उजव्या हाताने त्यांना कुरवाळत होता आणी ते केस इतके लांब होते की फांदीवरुन पाण्यात पोहोचलेले...
" शेवटी सापडलास ना....."
तीचा आवाज कानावर पडताच अनिल डोळ विस्फारून पाहु लागला तशी तीनं गर्रर्रर्रर्रर्र कन 180° कोनात मान फिरवली तसा तीचा पांढराफेट चेहरा पाहुन अनिल जोरात ओरडला आणी मागे कोसळताच तीच भयान हास्स चौफेर घुमल....
इssssss हीsssss हीssssss असा आवाज त्याच्या कानाचे पडदे फाडु लागला... दुस-याच क्षणात तीन विहीरीत उडी घेतली... विहीरीपासुन पाच सहा फुट जमीनीवर पडलेला अनिल धडधडत्या काळजान हे सगळ पहात होता... भीतीन तो तसाच रांगत मागे सरकत होताच की अचानक त्या विहीरीतुन कोणीतरी बाहेर येत असल्यासारख वाटु लागल.. 'कदाचीत ते भुत, ते पिशाच्च वर येतय मला न्यायला . ते वर यायच्या आत पळायला हव...'
तो रांगत धडधडत उठुन धावणार तोच त्याला जाणवल की आपले पाय कोणीतरी त्याचे पाय घट्ट पकडुन धरले असल्याच जाणवल... त्याच्या पायांवर ती पकड घट्ट असली तरी त्या पांढ-या पडलेल्या हातांवरील सडलेल ओघळणार मांस पाहुन पोटात जस ढवळून आलेल... आज माझा मृत्यु निश्चीत होणार असच काहीस त्याच्या मनात आल... सर्व अंगावर भीतीन काटा ऊभा राहीला. थरथरत्या नजरेन त्यान खाली पाहील आणी उरली सुरली ताकतही निघुन गेली... झटक्यासरशी त्याचे पाय मागे खेचताच ते जमिनीवर आपटला.. गवतावरून रांगत, सरपटत पुढ सरकण्याचा त्याचा प्रयत्न निष्फळ ठरत होता... ते हात त्याला विहीरीत खेचत होतो.. जिवाच्या आकांतान ओरडत बाहेर पडण्याच्या प्रयत्नात हाताच्या मुठीत येणार गवत उपसुन वर येत होत... पन ते हात त्याला फतफटत वेगाने आत नेत होते.. पुढ सरकण्याचा प्रयत्न करत त्यान किंचीत मान तिरकी करत मागे पाहील आणी एक आर्त किंकाळी त्याच्या तोंडातुन बाहेर पडली...दुस-याच क्षणी त्याला सर्रर्रर्रर्रर्रर्रर कन फरफटत विहीरीत नेल... तशी पुन्हा सर्वत्र निरव , गुढ शांतता कायम झाली...
*****
'काय झालय.....?'
' दारू जास्त प्यायला होत वाटत..'
' हो.. पन दारूचा वास तर येत नाही....'
' ही जागा बेकार आहे राव....'
लोकांची कुजबूज सुरूच होती..
बरीच गर्दी जमलेली
" ए बाजुला सरका...कोणी फोन केला होता..आणी कुठ आहे डेड बॉडी...??"
एका करड्या पुरषी आवाजान सारेच सावध झाले.. एक धिप्पाड , निमगोरा आणी उंच पोलिस कान्स्टेबल चालत पुढे आला.. तसा गर्दीतुन एकजन पुढ आला..
" नमस्कार साहेब... मीच केला होता.."
"हम्म..... ती बाईक ...?" रस्त्याकडेला उभ्या बाईकला पहात म्हणाला
" याचीच असेल साहेब..."
तसे कॉन्स्टेबल त्याच्या जवळ जात खिशात लायसन , ओळखपत्र सापडते का पाहु लागले तोच...
'सायब.... ते जीत्त हाय वाटत.....'
तसे कॉन्स्टेबल उभे राहीले...
अनिलचे डोळे उघडता उघडत नव्हतेपन त्यातुनच आजुबाजूची कुजबूज मात्र ऐकू येत होती. डोक तर जड झालेल जस डोक्यावर एखादा मोठा दगड वाहुन नेतोय. अंगालाही आता किंचीत संवेदना जाणवत होत्या... कोणीतरी तोंडावर पाणी मारल तसा झटकन जागा होत अनिल उठुन बसला...
" मी.......मी... जीवंत आहे....?"
त्याच्या तोंडुन पहील हेच वाक्य बाहेर पडल..
".. म्हणजे मरायला आला होतस काय..?"
कॉन्स्टेबल रागातच म्हणाले...
त्यांच्याकडे पहात अनिल आपल जड झालेल मस्तक एका हाताने दाबत जागेवरून उठला तशी गर्दीतुन कोणीतरी पाण्याची बाटली पुढे केली.. पाण्याची बाटली घेत त्याची नजर आजुबाजूला फिरू लागली...
' हे काय.... म्हणजे रात्री जे घडल ते काय होत... ती तरुणी...? ती विहीर आणी ते चींचेच झाड......?? आणी मला विहीरीत खेचणारे ते पांढरट सडलेले हात...???'
मनात असंख्य प्रश्नांच वादळ उठल तशी पाण्याची बाटली डोक्यावर ओतून घेतली...
*****
भिंतीकडेला असलेल्या लाकडी बेंचवर आकसुन बसलेल्या अनिल न संतापान वर पाहील, डोक्यावरच्या त्या गरगरणा-या पंख्याच्या आवाजान अनिलच डोक अक्षरशा: बधीर होत चाललेल...
"सायब त्याची तब्बेत बरी नसते .. म्हणजे एका अपघातान त्याच मानसिक संतुलन बिघडलय.. ह्या डॉक्टरसाहेबांना विचारा..."
अनिल ची आई इन्स्पेक्टर साहेबांसमोरच्या लाकडी खुर्चीत बसलेल्या, तर सोबत आलेले डॉक्टर जोशी ही बाजुला होतो.. मागे लाकडी बाकावर बसलेल्या अनिल कडे पहात डॉक्टर इन्स्पेक्टर साहेबांशी काहीतरी पुटपूटत होते..
" पन तो म्हणतोय की काल मित्रांबरोबर होता. थोडी घेतली होती आणी नेहमीप्रमाणे मित्राकडुन एक कथा ऐकली, घरी परतत असताना अगदी तसच घडत गेल..."
इन्पेक्टर बोलतच होते की मधेच डॉक्टर म्हणाले ...
" साहेब तो अशीच निरर्थक बडबड करत असतो.."
तसे डॉक्टरांनी एक वर्तमानपत्र आणी काही फोटो आणी मेडीकल रिपोर्ट त्यांच्या समोर ठेवले... तसे इन्स्पेक्टर चक्रावले... डोळे विस्फारून एक एक फोटो न्याहाळताना काही अंतरावरच समोरच्या लाकडी बाकड्यावर बसलेल्या अनिलकडे पाहु लागले... खाली मान घालुन बसलेला अनिल कसल्याशा विचारांत गुरफटलेला... दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंतवून आडक केलेली तर पायची अखंड हलचाल सुरू होती...
इन्स्पेक्टरनी फोटो टेबलवरुन डॉक्टरांच्याकडे सरकवले...
" काहीच समजेनास झालय...."
"साहेब... त्यान पोलिसांना सांगितल होत की दारु घेतली होती , पन त्याच्या मेडीकल रिपोर्टवरुन दारु घेतल्याचा उल्लेखच नाही...."
टेबलवरचा रिपोर्ट बाजुला ठेवत इन्स्पेक्टरांनीही भुवया उंचावल्या..
" हो... ते पन बरोबर आहे.."
"इन्स्पेक्टर साहेब.... अनील तुम्हाला त्या रस्त्याकडेला सापडला. पन या आधीही तो रात्री अपरात्री एकटाच निर्जन ठीकानी गेलेला, आणी सकाळी बेशुद्दावस्थेत सापडला... काहींना माहीती आहे याच्या मानसिक परिस्थीती विषयी... ते घरी सांगतात.."
" तुम्हाला काय वाटतय काय झालय याला...?"
" भीती...सिजोफ्रेनिया, हैल्युसिनेशन.. मी पडताळणी करतोय... मनात खोलवर रुतलेली एक घटना जी तो मान्य करायला तयार नाही..त्याची भीती "
" कसली भिती....?"
" काही लोक खुप हळव्या मनाची असतात. एखादी गोष्ट त्यांच्या मनात घर करुन बसली तर ते त्यातुन बाहेर पडण्यापेक्षा त्यातच गुंतुन जातात..."
आपल्या खुर्चीवर मागे सरकत इन्स्पेक्टर साहेबांनी दिर्घ श्वास घेतला....
" हम्म....."
डॉक्टरांनी डोळ्यावरचा चष्मा काढत इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहील..
" साहेब खरतर भुतं हीच मानसिक आजार आहेत की भुतं खरच असतात हे माहीत माहीती नाही आणी माहीती करुनही घ्यायचे नाही"
डॉक्टरांच बोलण मधेच थांबवत मघापासुन शांतपने ऐकणा-या अनिल च्या आई म्हणाल्या.
" पन माझ्या मुलाला बर करायला भुतांचीही मदत घ्यावी लागली तरी घोईन..."
तसे डॉक्टर आणी इन्स्पेक्टर दोघेही प्रश्नार्थी नजरेन एकमेकांकडे पाहु लागले
" बर ... घेऊन जा याला.... आणी लक्ष द्या...."
*****
तीघेही तसेच घरी आले होते, अनिल च्या आईने दिलेला चहाचा शेवटचा घोट घेऊन कप खाली ठेवत डॉक्टर अनिलला विचारू लागले...
" अनिल.....काय झालेल रात्री ...? तु तर ऑफीसला गेला होतास....? मग तीकडे कसा पोहोचलास..?"
तशी अस्वस्थता लपवण्याचा प्रयत्न करत अनिलन आईकड पाहील ..तसे डॉक्टर आईंना म्हणाले..
" ताई... काहीतरी नाश्ता करता का...? खुप भुक लागली आहे...."
तशा अनिलकडे पहात आई आत गेल्या.
"हम्म.. बोल आता.."
" काका.. हे झाल माझ्या ऑफीस मधल्या मित्रांमुळे.... नेहमी सारखी त्या विजय न जबरदस्ती पाजली... आणी त्या संजुन आणखी एक गोष्ट सांगीतली.."
" तु सांगीतल का नाहीस... मला दारु पाजु नको म्हणुन आणी लहान आहेस का....? भुताच्या गोष्टी ऐकुन घाबरायला....?"
"घाबरलो नाही हो, पन मला ही तसाच अनुभव आला जसा संजुच्या कथेतील त्या मुलाला येतो.. त्या रात्री त्यानच सांगितलेली...."
" ठिक आहे... कधी भेटला होतास त्याला...?"
"परवा....त्या रात्रीच हे घडल..."
"पन याच्या आधी ही हिच कथा सांगितली होती ना..?"
तसा अनिल गप्प झाला.... काय बोलाव त्याला सुचेनास झालं. त्याची अस्वस्थता पाहुन डाॅक्टर म्हणाले
" त्याला सांग दुसरी नवी कथा सांगायला पन ऐकताना जास्त पिऊ नकोस...?"
आई मात्र त्या दोघांच बोलण ऐकत ऊभ्या होत्या... काही वेळात डॉक्टर बाहेर पडले..
*****
अनिलच्या आई माझ्या रुमवर आल्या, आणी भरल्या डोळ्यांनी आपल्या मुलाची ढासळत चाललेली मानसिक परिस्थीती कथन केली.. खुप वाईट वाटल... "अनिल चे मित्र आहोत, या आजारातुन कोणी डॉक्टर नाही तर तुम्हीच बाहेर काढु शकता''
त्यांच बोलण आम्हा तीघांच्याही मनाला भेदुन गेल... पदराखाली झाकुन आणलेल साहीत्य आईंनी बाजुला ठेवल आणी हात जोडुन निघुन गेल्या..
*****
सायंकाळ व्हायला आली. मी , सचीन आणी विजय अगदी गप्पच होतो तोच अनिल रुमवर आला... नेहमीसारख्या लाख विनवण्या करुनही त्याला मी कुठलीच भुताची कथा सांगितली नाही... पन....
" अनिल आज तुला एक दुसरी कथा सांगणार आहे..."
"कोणती...?"
" एक घटना सांगणार आहे, जी खुप दिवसापुर्वी घडली होती..."
अनिलने चॅट करता करता मोबाईल बाजुला ठेवला आणी उत्सुकतेन ऐकू लागला... त्याला पाहून सचिन आणी विजयनेही हातातल वर्तमानपत्र वाचण बंद केलं... त्यापुर्वी मी अनिलला दरवाजा किंचीत उघडा ठेवायला सांगितला तसा होय, नाही करत तो जागेवरुन उठत आपल्या जवळच्या किल्लीने लॉक उघडले आणी दरवाजा किंचीत उघडा केला.....
"बस आता.." मी हातातील वर्तमान पत्राच पान बाजुला ठेवल.
" हम्म.... सांग.."
"अनिल... निट ऐक.... कारण ही 'शेवटची कथा आहे'.. माझी ...."
"काय.....? शेवटची.....?"
अनिल थोडा अस्वस्थ झाला पन जास्त काहीच न बोलता ऐकण्यासाठी अतुर दिसत होता... आणी
मी सांगायला सुरवाच केली...
" रात्रीचे बारा साडेबारा वाजले असतील.. पाऊसही आभाळ फाटाव असा बरसत होता. अशातच एक व्हाईट कलरचा इंडिका रस्त्यावरुन धावत होती..तडतड करत पाण्याचे टपोरे थेंब आभाळातुन बरसत होते.. सगळीकडे पाणीच पाणी झालेल... त्यातच कुssई कुंssssई करत काचेवरुन फिरणा-या व्हायपरने पाणी बाजुला सरकत होते..
गाडीच्या आत बसलेल्या मित्रांमधे गप्पा अगदी रंगात आल्या होत्या की तोच...."
माझ बोलण मधेच थांबवत सचीन म्हणाला
" आणी..... रस्त्यावर पांढरी साडी घातलेली आयटम आडवी आली. ? हो ना....?"
तसा अनिल रागातच म्हणाला
" सच्च्या .... गप ऐक ना यार..... तु सांग रे..."
" हम्म..... ड्रायवर सोडुन बाकी सारेच मित्र खुपच प्यायले होते... पन पुढ होणा-या घटनेची साधी कल्पनाही त्यांचापैकी कोणाला नव्हती..."
बोलता बोलता मी प्रत्येकाच्या चेह-याकडे पहात होतो. तीघेही लहान मुलासारख मनापासुन ऐकत होते... त्यांच्याकडे पहातच मी पुढ सांगायला सुरवात केली...
" काही वेळ गप्पा सुरू होत्या तसा अल्कोहोलचा परिणाम दिसु लागला. एकजन गाढ झोपला तर दोघे झोप आणी दारू मुळे झिंगत होते.. की अचानक ड्रायवरचा गाडीवरला ताबा सुटला..."
माझ्या या वाक्यान अनिलच्या काळजाचा ठोकाच चुकला... कदाचीत त्याला हे समोर घडतय असच वाटत होत... बाजुला ठेवलेल वर्तमानपत्र हातात घेत मी पुढ सांगु लागलो...
" त्या सुनसान रस्त्यावरून सुसाट वेगात धावणारी गाडी आचानक वेडी वाकडी वळण घेऊ लागली... ड्रायवरच्या डोळ्यावरही धुंदी दाटलेली... गाडीचा वेग काही केल्या कमी होत नव्हता .. गाडी रस्त्यावरून खाली आली आणी झटकन वळण घेत पुन्हा रस्त्यावर... त्या झटक्याने गाडीतले सर्वच जागे झाले... पन कोणाला काही समजायच्या आत समोरुन येणा-या भरधाव ट्रकने त्यांच्या इंडिकाला धडक दिली आणी सार काही संपल...
मागच्या सिटवर बसलेला एक मित्र सोडला तर सारेच जागेवर संपले....."
अनिल चा चेहरा भितीन पांढरा पडलेला... सचिन आणी विजय माझ्या शेजारी येऊन बसले.... आधीच हळवा अनिल अधिकच अस्वस्थ झाला... आणी मघापासुन मी हातात घेतलेल वर्तमानपत्र अनिलकड दिलं... तसा तो सुन्नच झाला, डोक गरगरू लागल तशी त्याला भोवळ आली आणी तो बेशुध्द झाला... दरवाजा उघडुन डॉक्टर आणी अनिल ची आई आत आली... त्यांनी माझ्या खोलीत चौफेर पहात भरल्या डोळ्यांनी हात जोडत म्हणाल्या,
" कदाचीत तुझी ही शेवटची कथा माझा मुलगा मला परत देईल...."
एवढेच शब्द त्यांच्या तोंडातुन बाहेर पडले... आणी त्याला गाडीतुन घेऊन निघुन गेले..
ते बाहेर पडताच विजय म्हणाला ...
" मैत्री आहे आपली... अनिल ला आईन सांगितल, डॉक्टरांनी सांगितल, अरे पोलिसांनी सुद्धा सांगितली पन ऐकल नाही...आणी ह्या संज्या न एक स्टोरी सांगितली . लगेच ऐकल.? मित्रासाठी कायपन.."
" हम्म... दोन महीण्यांपुर्वी च्या त्या दिवसांतच तो हरवला होता.. त्या रात्री ट्रीप संपवून गाडीतुन घरी येताना मी विहीरीवरच्या 'हडळी'ची कथा सांगीतली होती, त्यातच त्याच आयुष्य थांबलेल..."
काही वेळ तसेच बसुन होतो की अचानक कोणीतरी किंचाळल्याचा आवाज आला... 'भुत...... भुत.......भुत.....'
अस कोणीतरी ओरडत वेगात पडत धडपडत धावताना त्याच्या पावलांचा आवाज आला... त्या पुरषी आवाजान मी आणी विजय झटकन वर उठलो तसा सचिन दरवाजातुन आत आला....
" सचिन...काय झाल रे..." मी कुतुहलापोटी विचारल
"काही नाही रे.... आपल्या इंडिका जवळ उभा होतो... दोन महीने झाले गाडी सडल्या सारखी झालीय रे...."
" आरे ओरडल कोण ....?"
" ते होय..... जाधवांचा रोहन.... लघवीला उभा होता.. मला गाडीजवळ बघितल आणी....."
" म्हणजे ..... दोन दिवसात जेवण फिक्स तर..."
" जेवण....?"
" 'उतारा' रे भावा....."
" हो...'उतारा'.. ती पन तुझीच कथा...."
माझ्या विनोदान तीघही हसत खिडकीतुन माझ्या स्क्रॅप झालेल्या इंडिका गाडीला पहात होतो तसा विजय अपराधी भावणेन म्हणाला..
" संजु.... सॉरी यार.... त्या रात्री तुझ्या 'बियर' मधे मी 'दारु' मिक्स केली नसती तर तो अपघात घडला नसता. आणी आपनही जिवंत असतो..."
" जाऊदे रे..... पन अशी मस्करी सर्वांसाठी घातकच, कारण एकट्यालाच नाही सोबतच्यांनाही जिवानीशी संपवु शकते... आता समजल, पन उशीरा..."
"हम्म..."
" आणी विजय, सचीन.... अरे अनिल साठी ही शेवटची कथा होता.... तुमच्या दोघांसाठी नाही... "
समाप्त ........!!
No comments:
Post a Comment