#पाठराखण*
बुलेटचा वेग हळूहळू कमी करत मी तिथे थांबलो. ती नेहमीसारखीच माझी वाट पाहत होती. मला पाहून तिच्या गोबऱ्या गालांवर हसू फुलले. ऑफिसच्या बॅगमध्ये आठवणीने सांभाळून आणलेला बिस्कीट पुडा मी तिला दिला आणि नेहमीसारखाच वाकलो. तिचे लालचुटुक अन लुसलुशीत ओठ माझ्या गालांवर टेकवले गेले. माझ्या शरीरातून पुन्हा तीच थंडगार लहर फिरून गेली. माझ्याकडे हसून बघत ती निघून गेली.गेल्या चार महिन्यापासून हे असंच चाललंय. ही तीन-चार वर्षाची कमालीची गोड छोकरी माझ्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग बनून गेली आहे. तिला पाहिल्याशिवाय मला चैन पडत नाही. अगदी सुटीच्या दिवशीही ती तिथे उभी असेल, माझी वाट बघत ! या एकाच विचाराने मी अंथरूण फेकून उठतो आणि तडक तिथे पोहोचतो.
ती खरोखर तिथे उभी असते... माझी वाट बघत !!
तिची आणि माझी भेटही मोठी चमत्कारिक म्हणावी लागेल. या शहरापासून जवळच आमचं गाव आहे. पावसाळ्यात मी काही कामानिमित्त तिथे गेलो होतो. परत येतांना सायंकाळ झाली. गावाची वेस ओलांडून मार्गी लागलो. रस्ता जवळजवळ निर्मनुष्य होता. अचानक काहीतरी बुलेटसमोरून ओझरतं गेलं. बहुतेक कुत्रं -मांजर असावं. त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मी... एका बाजूला जाऊन बुलेट घसरली. मी जोरातच आपटलो. सडकून लागलं होतं. वेदनांनी अंग ठणकत होतं. डोळ्यांसमोर अंधारी येत होती. कपाळावर गारगार वाटत होतं. खोक पडून तिथून रक्त वाहत होतं. माझ्यात उभं राहण्याचेही त्राण उरले नव्हते.
काही वेळानं मला हुशारी वाटू लागली. डोळे उघडून मी पाहिलं. एक गोड चेहरा माझ्या चेहऱ्यावर वाकलेला होता. ते निरागस आणि कमालीचे बोलके डोळे माझा चेहरा, त्यावर झालेली जखम पाहत होते. मी काहीसा दचकलो. तेवढ्यात एक चिमुकला हात माझ्या कपाळावरील जखमेवर गेला. अगदी तिथे कोणीतरी बर्फ ठेवल्यासारखं थंडगार वाटलं मला ! त्याक्षणी अशा जादुई स्पर्शाची मला फार फार गरज भासत होती. मी काहीक्षण निवांत पडून राहिलो. उठून पाहिलं तर ती अवखळ बालिका माझ्याकडे एकटक बघत होती.
फार लागलं नाही ना तुला ? तिने विचारलं.
वयाने कितीतरी मोठ्या युवकाला सरळ अरेतुरे करण्याची तिची हिंमत पाहून मला कौतुक वाटलं. अंगावरच्या कपड्यावरून ती कोणा सामान्य शेतकऱ्याची मुलगी दिसत होती.
मी काही बोलणार तोच तिने तोंडावर बोट ठेवत मला गप्प राहण्याची खूण केली. अंगातल्या फ्रॉकच्या एका टोकाने माझ्या गालावर लागलेली माती पुसली.
तू कुठे राहतेस ग ! इकडे कशी आलीस ? मी विचारले.
गावातच राहायचो आम्ही.. आता शहरात राहतो. आईबाबा पुढे गेले. मी हळूहळू चालल्याने मागे राहिली... तिने उत्तर दिले.
चल, तुला घरी सोडतो.. म्हणत मी बुलेट उभी केली. ती काहीच न बोलता अलगद मागे येऊन बसली.
शहराबाहेर नुकत्याच तयार झालेल्या विरळ लोकवस्तीच्या भागातील चौकाजवळ तिने मला थांबवले.
इथून जाईल मी घरी ! म्हणत ती गेलीसुद्धा.. एव्हढीशी पोर. पण वयाच्या मानाने खूपच धीट होती. थांब,, मी सोडतो तुला घरापर्यंत ! हे माझे उदगार तिच्यापर्यंत पोहचलेच नाहीत.
घरी पोहचल्यावर मी हा प्रकार सांगितला. थोरल्या आईच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिने लागलीच माझ्यावरून मीठमिरच्या ओवाळून टाकल्या. धाकटी आई मात्र माझ्या कपाळावर मायेने हात फिरवत शून्यात बघत बसून राहिली.
हो, मला दोन आया आहेत. वडील शेतकरी होते. थोरल्या आईला मूलबाळ होईना म्हणून त्यांनी दुसरी बायको केली. माझ्या आईला थोरल्या आईने पाठच्या बहिणीसारखं सांभाळलं. मी वर्षाचा असेल, तेव्हाच बाबा गेले. शेतातल्या विहिरीत पाय घसरून पडल्याने ते बुडून मरण पावले होते. त्यानंतर माझी आई सैरभैर झाली. वेड्यासारखी वागू लागली. थोरली आई मात्र मोठ्या धीराची ! तिने गावातले, शेतीचे व्यवहार आटोपून एका सकाळी गाव सोडला. मला आणि मानसिक संतुलन गमावलेल्या आणि वाचा हरवलेल्या आईला कसोशीने सांभाळले. माझं शिक्षण पूर्ण केलं. माझ्यावर तिचा कमालीचा जीव होता. म्हणून माझ्या अपघाताचा प्रसंग तिला अस्वस्थ करून गेला.
तिकडे पुन्हा कधीही जायचे नाहीस ! तिने बजावले. मी हो म्हटलो.
दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातांना ती दिसली. सिग्नलजवळच्या चौकात उभी होती. तिला पाहून मी थांबलो. ती लगबगीने माझ्याजवळ आली. मी काही बोलणार तोच माझ्या कपाळाची जखम बघत म्हणाली.
खूप दुखतंय का रे ?
नाही आजीबाई.. आता बरं आहे.. मी हसून म्हणालो.
आजीबाई.. हा शब्द ऐकताच ती खुद्कन हसली. तिच्या गालांवर लोभसवाणी खळी पडली. तिने बुलेटच्या फुटरेस्टवर पाय देऊन वर उभी राहत माझ्या गालांचं चुंबन घेतले. तिचा स्पर्श कितीतरी वेळ तसाच जाणवत होता.. थंडगार !
पुढेपुढे ती मला रोजच तिथे दिसू लागली. मग तिच्यासाठी मी आठवणीने खाऊ नेऊ लागलो. तिला बिस्किटे अधिक आवडतात हे माझ्या लक्षात आले. मग वेगवेगळ्या व्हरायटीची बिस्किटे मी तिच्यासाठी नेऊ लागलो. ऊन असो वा पाऊस.. मी तिचा देणेकरी असल्यागत ती त्या चौकात उभी असायची.
लहान असली तरी ती बडबडी नव्हती. तिला वाटेल तितकच बोलायची. नाहीतर गर्रकन पाठ वळवून निघून जायची. एक मात्र होतं. तिच्या डोळ्यात माझ्याविषयी कमालीची माया दिसायची. मला एकदा तरी स्पर्श केल्याशिवाय तिचा पाय निघत नव्हता.
त्यादिवशी माझ्या अंगात कणकण जाणवू लागली. थोडावेळ पडलो की बरं वाटेल अशा विचाराने मी ब्लॅंकेट पांघरून पडलो. थोरल्या आईने मला हलवून जागं केलं तेव्हा टक्क दुपार झाली होती. पण माझ्यात उठण्याची शक्तीच उरली नव्हती. आणखी थोडा वेळ झोपू दे, मग डॉक्टरकडे जाईल असं सांगून मी पुन्हा झोपलो.
एखादा तास गेला असावा. कोणीतरी माझ्या केसातून हात फिरवत होतं. तोच थंडगार स्पर्श ! खूप खूप बरं वाटत होतं.
काय रे आज आला नाहीस ? कानावर आवाज पडताच मी उठून बसलो. पाहिलं.
माझ्या उशाजवळ ती बसली होती.
मी लगबगीने उठून बसलो. हिला घराचा पत्ता कसा सापडला असावा ?
हो..गं ! सॉरी आज आलो नाही. खूप अंग दुखतंय.. मी कण्हत म्हणालो.
तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझ्या तोंडावरून हात फिरवत ती म्हणाली.
घाबरू नको. लवकर बरं वाटेल तुला !
पण तुला माझं घर कसं सापडलं ? मी विचारलं. ती काहीच बोलली नाही.
थांब, मी तुझ्यासाठी खायला काहीतरी सांगतो ! म्हणत मी धडपडत उठून किचनमध्ये गेलो. तिथे भांडी विसळणाऱ्या थोरल्या आईला म्हणालो.
आई, काहीतरी खायला दे !
अरे, अरे. मग आवाज द्यायचा ना मला ! उठून का आलास ? म्हणत आईने डब्यातले शंकरपाळे प्लेटमध्ये टाकले. माझ्यामागे चालत आली.
दे तिला.. मी बाथरूमला जाऊन येतो. मी म्हणालो.
अरे कुणाला देऊ ? तुलाच हवेत ना ! थोरली आई आश्चर्याने म्हणाली.
आता काय म्हणावं हिला ? वयासोबत दृष्टी अधू होत चाललीय हिची ! पलंगावर बसलेली ती दिसत नाही होय !
अगं आई, ती काय पलंगावर बसलीय.. तिला दे ना ! मी काहीसा रागावूनच बोललो.
आईचा चेहरा पांढराफटक झाला. ती घाबऱ्यागुबऱ्या स्वरात म्हणाली.
बाळा.. बाळा ! असं काय करतोस ? भास होताहेत तुला.. अरे घरात कोणीही नाही आपल्याशिवाय !
मी पलंगाकडे पाहिले. थोरल्या आईकडे अविश्वासाच्या नजरेने बघत होती ती ! आणि आई मात्र माझ्याकडे पाहून बडबडत होती.
तरी सकाळपासून सांगतेय की जा डॉक्टरकडे म्हणून ! आता मी म्हातारी बाई.. असं वेड्यासारखं बरळशील तर जीव जाईल ना माझा. जा तोंड धु आणि आधी डॉक्टरकडे जा कसा !
मी पलंगाजवळ पोहचलो आणि म्हणालो..
बघ, माझ्या आईलाच वेड लागलय.. तू दिसत नाहीयेस तिला !
तिने पुन्हा माझ्या कपाळावर हात फिरवला. गालावर ओठ टेकवून ती निघून गेली. घडल्या प्रकाराने हतबुद्ध होऊन मी मटकन खालीच बसलो. अंगातला ताप, दुखणं कुठल्याकुठे पळालं होतं. पण मन मात्र अस्थिर झालं होतं.
थोरली आई देवघरातला अंगारा घेऊन परतली. माझ्या कपाळावर लावून म्हणाली.
काय झालं बाळा ? कसले भास होताहेत तुला ?
मी तिला सर्व हकीकत सांगितली. तिच्या चेहऱ्यावर चिंता दाटू लागली होती. डोळे कशाचा तरी अर्थ लावू पाहत होते. तरी वरकरणी तसं भासू न देता ती म्हणाली.
तुला माझी शपथ आहे.. आता भेटू नकोस तिला ! काहीतरी वेगळा प्रकार दिसतोय.
ते कसं शक्य होतं. पण तिचं मन राखण्यासाठी मी हो म्हणालो.
त्यानंतरचे दोन दिवस थोरल्या आईने हट्ट धरून मला घरी थांबणे भाग पाडले. ती मात्र रोज येत होती. मात्र बोलत काहीच नव्हती. मी अधिकच अस्वस्थ होत होतो. थोरली आई आसपास नसल्याचे पाहून मी तिला विचारलेच.
हा काय प्रकार आहे ? तू आईला दिसत नाहीस का ?
तिने काहीच न बोलता माझा हात धरून आतल्या खोलीत नेले. तिथे धाकटी आई नेहमीसारखीच शून्यात नजर लावून बसली होती.
आम्ही पोह्चल्याबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे भाव झपाट्याने बदलू लागले. दोन्ही हातानी खुणावत ती आम्हाला जवळ बोलावू लागली. अनेक वर्षांपासून त्या मानसिक विकृतीखाली दडवलेली तगमग जणू ती बाहेर काढू पाहत होती. इतकी वर्षे हरपलेली माया उधळण्यास ती सज्ज झाली होती. आम्ही दोघेही तिच्याजवळ पोहचलो आणि माझ्या डोक्यावर आभाळ कोसळतेय की काय, असे मला वाटू लागले.
तिला कवेत घेऊन धाकटी आई तिचे मटामटा मुके घेऊ लागली. इतकी धीराची ती, पण तिच्याही डोळ्यातून अखंड आसवांच्या धारा बरसत होत्या. तिने मलाही जवळ घेतले. आम्हाला दोघांना उराशी कवटाळून आई धाय मोकलून रडू लागली.
थोरली आई केव्हा खोलीत आली ते कळलेच नाही. रडण्याचा भर ओसरला तेव्हा आम्ही भानावर आलो..
हे काय चाललंय ? थोरल्या आईने करड्या आवाजात विचारले.
आई, ही बघ.. अगं, धाकट्या आईला ती दिसतेय. तिला जवळ घेऊन ती रडतेय आणि तू म्हणतेस तुला दिसत नाही ? मी खिजावून बोललो.
आता थोरल्या आईचे अवसान गळाले. ती थरथर कापू लागली. माझ्याजवळ येऊन म्हणाली.
बाळा, तू म्हणतोस त्या मुलीला घेऊन बाहेर येतोस ?
मी तिचा हात धरून बाहेर आणले. या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावणे आता गरजेचे झाले होते.
थोरल्या आईने आतल्या खोलीत जाऊन तिची पत्र्याची जुनाट पेटी उघडली. त्यातला एक फोटो घेऊन ती बाहेर आली. तो माझ्यासमोर धरून तिने विचारले..
बाळा, हीच दिसतेय का तुला ?
मी त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोकडे निरखून पाहिले. तेच ओठ, तेच गाल आणि तीच निरागस खळी. तेच निरागस डोळे आणि,, आणि हातात गच्च पकडलेला बिस्किटचा पुडा !
आता थक्क होण्याची पाळी माझी होती. मी हैराण होऊन ओरडलोच!
आई, हा फोटो तुझ्याकडे कसा ?
आईच मात्र माझ्याकडे लक्षच नव्हतं. ती अखंड बडबडत होती.
ती परत आलीय.. ती परत आलीय !
काही वेळाने ती सावध झाली. मला जवळ घेऊन हमसून हमसून रडू लागली.
शोधलं रे तिने तुला.. शोधलंच बाळा !
कोणी आणि का शोधलं मला ! मी कातावून विचारलं.
आईने पदराने डोळे पुसले. भरल्या सुरात सांगू लागली.
तुझ्या आईचं तू काही पहिलं लेकरू नाहीस. तुझ्याआधी एक मुलगी झाली होती तिला ! पण तुझ्या वडिलांना मुलगी नको होती. म्हणून त्या मुलीवर त्यांचा कायम राग होता. मला ते पुरतं कळून चुकल होतं. म्हणून तिला मी नजरेआड होऊ देत नसे. माझ्या पदराखाली ती पोर.. भारीच गोड होती ती ! साडेतीन वर्ष पाखरासारखी वाढवली. तुझ्यावर तिची भारीच माया... खेळण्याऐवजी तुझ्याशीच खेळायची ती ! सारखा मुका घेत बसायची तुझा... पण बापाच्या डोळ्यात ती सारखी सलत होती. त्यादिवशी मी आजारी पडले आणि त्याने संधी साधली. तिला बिस्कीट देण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेला आणि वेशीबाहेरच्या जंगलात तिचा गळा आवळून संपवली. तिथेच खड्डा खणून तिला पुरली. तिला कोणीतरी उचलून नेल्याची अफवा पसरवली आणि हा प्रकार जिरवला. पण काही दिवस गेले. त्याला तिचे भास होऊ लागले. सारखी बाबा, बाबा करत ती त्याला बोलवायची. वेड लागल्यासारखा झाला तो ! त्या भरातच त्याने हा प्रकार मला सांगितला.. त्या दिवशी विहिरीच्या काठावर उभं राहून ती त्याला बोलावत होती. तो धावतच तिच्याकडे गेला आणि विहिरीत पडून संपला. पट्टीचा पोहणारा असूनही त्याने हातपाय मारले नाहीत. बुडून नाही, पश्चातापाने मेला तो !
तिची तुझ्यावरची माया मात्र कायम राहिली. तू त्यादिवशी गावाला गेलास आणि तिने तुला पाहिले. तिचा आत्मा आता इथे आलाय. तुझ्या पाठराखणीसाठी ! बाळा, मेल्यावरही तुझ्या काळजीने ती इथेच राहिली आहे ! पोरी, मी तुला वाचवू शकली नाही ग.. मला माफ कर ! म्हणून थोरली आईने पुन्हा हंबरडा फोडला.
मी मान वर करून तिच्याकडे पाहिले. तिचेही डोळे आसवांनी डबडबले होते. आईच्या मांडीवर तिने डोके ठेवले. मात्र तिला त्याची जाणीव झाली नाही.
ताई,, म्हणून मी ओक्साबोक्शी रडू लागलो. इतके दिवस अपार माया देणारी माझी बहीण या भौतिक जगात नाही ही कल्पनाच माझ्यासाठी प्रचंड वेदनादायी होती. पण पुढचे सोपस्कार उरकणे भाग होते..
थोरल्या आईला सोबत घेऊन मी ती जागा हुडकून काढली. त्या खड्ड्यातल्या अवशेषांना विधिवत मूठमाती दिली. कर्तव्यपूर्तीचे समाधान वाटत असले तरी माझ्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते !
काही दिवस उलटले. ऑफिसला जायला उशीर झाला म्हणून मी भरधाव निघालो होतो. रस्त्यातल्या वाहनांना ओव्हरटेक करीत झपाट्याने पुढे जातांना एका ठिकाणी अंदाज चुकला. तोल जाऊन मी आपटणार तोच कोणीतरी खांदे धरून मला सावरले. माझ्या कानाजवळ येऊन ती पुटपुटली..
हळू रे.. तू असा जोरात चालशील तर मी कशी शांत बसणार ? अजून तुला माझी फार गरज आहे.
गालावर ओठ टेकवून ती दिसेनाशी झाली...
समाप्त-
सचिन पाटील
हळू रे.. तू असा जोरात चालशील तर मी कशी शांत बसणार ? अजून तुला माझी फार गरज आहे.
गालावर ओठ टेकवून ती दिसेनाशी झाली...
समाप्त-
सचिन पाटील
इतक्या गोष्टी वाचल्या. करमणुक झाली. पण ही गोष्ट वाचून टचकन डोळ्यात पाणी आलं
ReplyDelete