UrbanHorrorLegends रामनराघव
सिरियल किलर्स माझ्या दृष्टीनं सैतानापेक्षा कमी नसतात. मानसिक विकृती तर असतेच पण तरीही थंड डोक्याने, एकामागोमाग एक जीव निर्घृणपणे संपवत जाणं...ते ही इतक्या हुशारीने की पोलिसांना मागमूस लागू नये. अमानवी नाही तर काय?
१९६४ ते १९६८, वयात आलेली मुंबई एका निर्घृण आणि तितक्याच गूढ हत्याकांडाने हादरली. आधी होणारे खून हे गरीब, बेघर लोकांचे असल्याने त्यातला पॅटर्न मुंबई पोलिसांच्या लक्षात आला नाही. मात्र परिसरातील एका संशयिताला त्यांनी ताब्यात घेतलं होतं. पण पुराव्याअभावी त्याला सोडून देण्यात आलं. ही चूक पोलिसांना आणि पुढच्या बळी जाणाऱ्या जीवांसाठी घातक ठरली. कारण त्या संशयिताचा नाव होतं "रामन राघव".
रामन राघव उर्फ सिंधी दलवाई उर्फ अंना उर्फ थंबी हा निव्वळ एक विकृत सिरीयल किलर नाही. कायदा, वस्तुनिष्ठ पुरावे या पलिकडे सैतानी, पाशवी असा aura या साधारण दिसणाऱ्या व्यक्तीकडे होता याबद्दल त्याला पकडणारे अधिकारी, कबुलीजबाब घेणारे अधिकारी खात्रीनं हो म्हणतील. एकच उदाहरण. राघव ला दुसऱ्यांदा १९६८ मध्ये पोलिसांनी पकडल्यानंतर आधी त्यानं दोन खूनांची कबुली दिली पण मग मात्र तो काहीच सांगायला तयार होईना. मार, दबाव कशालाही भिक घालेना. मग एक दिवस त्याने पोलिसांकडून खायला चिकन, प्यायला दारू, तेल आणि कंगवा मागितला. एरवी अशा मागणीला टायर मध्ये घालणारे पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांनी का कोण जाणे परवानगी दिली. राघव ने व्यवस्थित अंघोळ केली, केस तेल लावून विंचरले. चिकन आणि दारू फस्त केलं आणि मग सहज सुरात म्हणाला, "विचारा काय विचारायचं आहे"
त्यानंतर दिलेल्या ४१ हत्यांच्या भयानक कबुलीजबाबात या क्रुरात्म्याने निष्पाप, गरीब स्त्री पुरुषांच्या इतकंच नव्हे तर लहान अर्भक यांच्या केलेल्या हालांच वर्णन ऐकून पोलीसही थिजले. त्याकाळात रामन राघव कडे अतींद्रिय शक्ती असल्याचं म्हटलं जायचं. रामन राघव हा विकृतपेक्षा एक evil soul ने झपाटलेला किंवा कुठल्यातरी अघोर पंथाच्या नादी लागलेला होता कारण त्याच्या कडे सापडलेली विचित्र आकडेमोड वाटणारी कागदपत्रं, आणि एक भयानक कबुली... पोयसर भागात एका झोपडीत त्याला एक स्त्री आणि तिचं लहान बाळ दिसलं. रात्र होईपर्यंत राघव तिथंच दबा धरून बसला...त्या स्त्रीने जेवण केलं व मुलाला भरवून त्याला झोपवून ती ही आडवी झाली. लपलेल्या राघवने त्याची आकडी (त्याने बनवलेलं खास हत्यार, एका लोखंडी सळी ला टोकाला U सारखा बाक देऊन तो झोपलेल्या लोकांच्या कानशिलावर प्रहार करायचा) वापरून त्या बाईचा, त्या बाळाचा खून केला. तिने केलेलं जेवण खाल्लं आणि तिच्या प्रेताबरोबर.... इतक्या सैतानी जनावराला तुरुंगात अनेक वर्षांनी किडनी विकाराने मृत्यू येणं... नॉट फेअर असं वाटतं.
राघव पकडला गेल्यानंतरही त्याच्या अपवित्र, शिसारी आणणाऱ्या व्यक्तिमत्त्वात मुंबई शहर अद्याप वावरतय असं वाटतं. त्याच्या वर काही नाटकं, शॉर्टफिल्म्स आता अनुराग कश्यपचा रामन राघव २.O हा सिनेमा, कादंबऱ्या खूप साहित्य निर्माण झालं पण निव्वळ माथेफिरू या पलीकडे त्याच्या काळया, अमानवी अंतरंगात खूप कमी लोकांनी डोकावून पाहिलं असेल. ज्यांनी पाहिलं त्यांनी on the records काही नमूद करण्यास नकार दिला.
रामन राघव एक सैतान होता, आहे आणि कुठूनतरी त्याची खुनशी नजर मुंबईला न्याहाळत आहे असं वाटतं...
रामन राघव एक सैतान होता, आहे आणि कुठूनतरी त्याची खुनशी नजर मुंबईला न्याहाळत आहे असं वाटतं...
No comments:
Post a Comment