मी घरात जाताच मावशी म्हणाली कुठे गेलं होतास रे मनिष ? चहा गार होत चाललाय कि .. मी म्हणालो कुठे नाही ग मावशे .. इथेच गेलो होतो त्या घराजवळ .. मावशी म्हणाली कोणत्या घराजवळ ? मी सांगणार इतक्यात ती म्हातारी बाई आलीच .. "अगं ए बयो .. कुठं लक्ष आहे तुझं ?.. तुझा पाव्हणा बग कुठे गेला होता .. त्या हाडळीच्या वाड्यावर".. हडळ ?? मी थोडा चरकलोच.. आणि मग मावशी माझयावर कधी नव्हे ती थोडी चिडलीच ..कशा गेलं होता सरे तिथे ? परत जाऊ नकोस .. आणि पटकन ती स्वयंपाक घरात गेली आणि मीठमिरची आणून माझ्यावरून उतरवून टाकली ..
मला परत परत तिथे जाऊ नकोस म्हणून मावशी ताकीद देऊ लागली. मी म्हणालो "तू मला काही सांगत नाहीस ना ..तो वाडा का बंद आहे ? म्हणून म्हंटलं जाऊन जरा बघू तरी काय आहे तिथे ते ? आत्ता ह्या आजी काय बोलल्या ? हाडळीचा वाडा आहे म्हणून ? काय आहे तिथे ? कसली हडळ ? सांग ना .. ""तू ना रात्रीच्या वेळेला कसली पण नावे घेऊ नकोस मनिष.. हे काय तुमचं पुणं नाहीये .. जरा गप्प बस " पण मी काही ऐकण्याच्या तयारीत नाहीये .. हे कळल्यावर मावशी त्या आजीबाईंना म्हणाली .. काकी तुम्हीच सांगा बाई ह्याला काय ते आता .. आजीने माझ्याकडे दोन मिनटे पाहिले.. बाहेर रातकिड्यांचा आवाज वाढत होता .. पाऊस पडून गेल्यामुळे बाहेर जरा शुकशुकाटच होता .. मी आजींना म्हणालो .."आजी सांगाना काय आहे तिथे ?"आजीने मावशीला एक दिवा आणलाय सांगितला. तो दिवा देवाच्या फोटो जवळ ठेवला ..नमस्कार करून ती आजी माझा जवळ येऊन बसली व मला सांगू लागली ..
साधारण ३० ४० वर्षांपूर्वी त्यावाड्यात देशमुख नावाचे परिवार राहत होते.. त्यांना एक सुरेश नावाचा मुलगा होता .. तो चांगला शिकलेला होता . पण नौकरीत काही मन रमत नव्हते .. म्हणून तो परत आपल्या गावी आला व भाताची शेती करू लागला .. जेमतेम उत्पन्न होतं त्यांचं.. मुलाची स्वप्न मोठी होती .. घरी गाडी पाहिजे .. मोठी शेत जमीन पाहिजे... दागदागिने पाहिजे .. पण काय करणार तुटपुंजा जमिनीवर शेती करायची आणि कसंतरी आपलं भगवायचं.. एक दिवस शेतातली पेरणी झाली.. संध्याकाळी सुरेश जेव्हा घरी निघाला तर त्याला एक सुंदर मुलगी शेतातल्या आंब्याच्या झाडा जवळ दिसली .. तिचे मोठे डोळे . .. गोरा रंग .. कमनीय बांधा ..आणि लांब केस .. दोन क्षण तिचाकडे बघून सुरेश आपल्या घरी आला . मग दररोज सुरेशला ती मुलगी दिसत असे ... त्यांची रोज नजरानजर होत असे. बरेच दिवस गेले एक दिवस काढणी सुरु झाली .. संध्याकाळ झाली काम अजून सुरु होतं. नेहमी प्रमाणे ती मुलगी शेतावर फिरायला आली. सुरेशने तिच्या कडे पाहिले. "आज जरा हिम्मत करून बोलून तर बघूया" सुरेश स्वतःलाच म्हणाला.. व हळू हळू ती ज्या दिशेला होती, तिथे असलेल्या मजुरांकडे कामाच्या बहाण्याने सुरेश तिकड़े जाऊ लागला. आता तो तिच्या खूप होता.. ती खूप सुंदर होती .. सुरेश तिच्याकडे बघून स्मितहास्य केलं.. ती हि त्याचा कडे बघून हसली .. थोडी हिम्मत करून सुरेश म्हणाला.."तुम्ही रोज येता का इथे शेतावर फिरायला?" ती ही म्हणाली "हो .. रोजच येते" त्यावर सुरेश म्हणाला "पण तुम्ही राहता कुठे ? इथे तर काही जास्त वस्ती नाहीये ? " ती म्हणाली "ते काय त्यापलीकडच्या शेतजवळच माझं घर आहे ... "बर.. तुमचं नाव काय आहे ?" "मी ?.. मी..अनिता ..आणि तुम्ही ? ""मी सुरेश ... गावात आमचं घर आहे..नदीजवळ देशमुखवाडा ..तिथेच मी आणि माझे आईवडील राहतो .. ""नदीजवळ ? ते सर्वात शेवटचा वाडा आहे तो ? तो तुमचं आहे?" "हो .. का काय झालं ? तुम्ही आला होतं तिथे ?" तर अनिता म्हणाली "वाडयावर नाही .. पण नदीवर येत असते मी अधून मधून कधी तरी फिरायला.. म्हणून माहितीये मला तुमचा देशमुखवाडा" असं म्हणाल्यावर सुरेश मनातून जाम आनंदून गेला.
पुढे सुरेश आणि अनिता रोजच भेटायला लागले ..सुरेशने तिला तिच्या घरच्यांनं बद्दल विचारले तर अनिता म्हणाली कि तिचे घरचे असे कोणीच नाही ... आई वडील होते पण ते पण कसल्यातरी आजारपणामुळे वारले. सुरेशला अनिताबद्दल सहानभूती वाटू लागली तो तिला कसं राहायचं ..काय करायचं ते सांगू लागला .. अधून मधून तो अनिताला मदत करू लागला . अनिता पण त्याचं सगळं ऐकायची..तो सांगेन तसं राहू लागली.. त्यामुळे सुरेश तिच्या प्रेमात पडला. एकदा सुरेश अनिताच्या घरी गेला .. बघतो तर काय तिचे घर म्हणजे एकदम अंधारलेलं .. तिथे कसलीच प्रसन्नता नाही .. अनिता सुरेशसाठी चहा रायला आत गेली .. सुरेश तिचं घर नीट बघत होता.. अनिता आली तिने सुरेश चहा दिला .. चहा पिऊन सुरेशने थोड्या गप्पा मारल्या आणि तो निघाला .. जाताना तो अनिताला म्हणाला, "एक विचारू अनिता ? तुझ्या घरात एक पण देवाचा फोटो नाहीये? तू मानत नाही का देवाला ?" याच्यावर अनिता म्हणाली कि,"ज्या देवामुळे माझे आई वडील गेले त्यामुळे मी पोरकी झाले ..मग कशाला मनू मी त्यादेवाला ? मी नाही मानत.. आणि कधी मानणार हि नाही ..ह्यापुढे तू सुद्धा मला कधी देवांबद्दल किंवा पूजाअर्चांना बद्दल सांगू नकोस .. "सुरेश तिथून निघाला .. जाता जाता तो विचार करू लागला .. कदाचित ती एकटी पडली असेन .. तिचे आई वडील पण लवकरच गेले .. त्यामुळे तिचा विश्वास उडाला असेन देवावरून"
सुरेश घरी आला . अनिता आणि सुरेश रोजच भेटत होते, सुरेश तिच्या प्रेमात पूर्णपणे पडला होता. पण त्याची काय हिम्मत होतं नव्हती तिला लग्नाबद्दल विचारायची . एकदा अनितानेच त्याला विचारले .. लग्न करशील का म्हणून .. मग काय साहेब एकदम खुश .. त्याने त्याच्या घरी सांगितले लग्नाबद्दल.. आणि त्यांना कसेबसे तयार केलेच. पुढे त्या दोघांचं कोर्टपद्धतीने लग्न झालं व त्यांचा संसार सुरु झाला. सगळं काही सुरळीत चाललं होतं. देवपूजा सोडून अनिता सगळं काही करायची. ती कुल्याही धार्मिक गोष्टीमध्ये सहभागी नाही होयची. सुरेश ला वाटलं होईल सगळं पुढे व्यवस्थित व त्याने दुर्लक्ष केले. सुरेशचा गावात एक खूप जवळचा मित्र होता.. गजू नावाचा .. गजूला सुरेश बद्दल सगळं काही माहित होतंच. कधी कधी त्या दोंघांमध्ये अनिता बद्दल पण बोलणं होयचं .. सुख दुःखाच्या चार गोष्टी करी व दोघेही आपल्या कामाला लागे.
लग्नाला आता जवळ जवळ वर्ष होत आलं होतं.. तसं सगळं ठीक चाललं होतं. एक दिवस सुरेश कामावरून आला.. दमल्या असल्यामुळे लवकर जेऊन घेतलं आणि ते दोघे झोपायला गेले. तसं सुरेश रात्री एकदा झोपला कि थेट सकाळीच उठत असे.. पण त्यारात्री त्याला जोरात बाथरूमला लागली होती .. चिडचिड करतच सुरेश उठला .. रात्रीचे डिड दोन वाजले असेन .. बाहेर रात किड्यांचा आवाज सुरु होता.. मधेच कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता..सुरेशने शेजारी आपल्या बायकोकडे पाहिले तर ती जाग्यावर नव्हती ... सुरेशने चाचपडून पाहिले तर ती गादीवर कुठेच नव्हती .. सुरेशला वाटले कि ती पण कदाचित बाथरूमला गेली असेन .. म्हणून तो तिकडे बाथरूमकडे गेला .. पण अनिता तिथे पण नव्हती . सुरेश बाथरूमला जाऊन आला व परत आपल्या बिछान्यावर गेला.. पण अनिता तिथे पण नव्हती.. सुरेशला जरा चमत्कारिक वाटलं .. मी जाऊन आलो तरी हि अजून आली नाही .. असं कसं ? कदाचित ती स्वयंपाक घरात पाणी पिण्यास गेली असेन".. असे स्वतःलाच सांगून तो तिची वाट पाहू लागला .. बराच वेळ गेला पण अनिता काही आली नाही म्हणून सुरेश उठला .. व तिला शोधण्यास स्वयंपाक घरात गेला ... पण ती तिथे नव्हती .. सुरेश परत बाथरूमकडे गेला .अनिता तिथे पण नव्हती .. सुरेशला वाटले काहीतरी भानगड आहे .. तो दबक्या पावलाने अनिताला घरभर शोधू लागला.. अनिता वाडयात कुठेच दिसत नव्हती .. इतक्यात सुरेशला अडगळीच्या खोली जवळ कोणीतरी काहीतरी पुटपुटताना आवाज आला .. अडगळीची खोली वाड्यात सगळ्यात शेवटी होती ... सुरेश फारसा तिथे जात नसे आणि अनिता आल्यापासून तर नाहीच नाही .. ती त्याला घरातली काही जास्त कामे सांगतच नसे.. आज बऱ्याच महिन्यांनी सुरेश इथे आला होता.. जस जसा तो खोली जवळ जात होता तस तसा तो आवाज त्याला जास्त ऐकू जात होता..
सुरेश हळूच त्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करू लागला ..पण दरवाजा आतून बंद होता.. सुरेशला आता मात्र काहीतरी विचित्र वाटायला लागलं.. तो अनिताला आवाज देणार .. इतक्यात त्याची नजर दरवाजाच्यावर असलेल्या छोट्या खिडकीवर गेली ... सुरेश थांबला .. त्याने काहीतरी विचार केला आणि त्यानी बाजूलाच असलेला एक स्टूल घेतला.. तो त्याने हळूच ठेवला आणि त्यावर चढला.. त्याच्या छातीची धडधड वाढली होती .. सुरेशने आत पाहिले .. त्याला आता घामच फुटला... सुरेशने पाहिले .. अनिता संपूर्ण केस मोकळे सोडून बसली होती.. तिचे लांब सोडलेले केस त्याने पहिल्यांदाच पाहिले होते कारण अनिताला केस मोकळे सोडलेले अजिबात आवडत नव्हते. आज तिला असे पाहून तो जरा चरकलाच.. तिचे एवढे लांब केस ..ते पण तिने इतक्या रात्री मोकळे सोडलेले... समोर कसलीतरी पूजा मांडलेली.. तिथे एक कलश .. त्याला लिंबाची माळ आणि त्यावर काहीतरी ठेवलेले ..त्याला नीट दिसत नव्हते .. कारण तिथे एकच दिवा लावलेला .. अनिता त्या कलशाला अधून मधून काहीतरी पुटपुटून डोकं ठेऊन पाया पडत होती .. हाताचे कसले तरी विचित्र हावभाव करत होती .. तिला कसली तरी जणू तंद्री लागली होती .. सुरेशला नीट दिसत नव्हते पण कलाशा समोर दोन गोलाकार लाकडा सारखे काहीतरी होतं, अनिता त्याला अधून मधून हाथ लावत होती.. अचानक अनिताने दिवा उचलला आणि कलशा जवळ नेहला... सुरेशने जे पहिले ते बघून त्याची बोबडीच वळायची बाकी होती .. त्याला दरदरून घाम सुटला .. त्याने पाहिले कि त्या कलशावर एक कवटी होती ..त्यावर हळद कुंकू टाकलं होतं .. शेजारी एक कोंबडं ठेवलं होतं ..अनिताने तो दिवा त्या कवटीवरून फिरवला .. मग तिने त्या कोंबड्याला टिळा लावला .. त्याला त्याकवटी जवळ टेकवला .. एका हाताने त्याचं तोंड घट्ट धरलं आणि त्याला त्याकवटीजवळ खाली जमिनीवर धरला..दुसऱ्या हातात एक चाकू घेतला ..काहीतरी पुटपुटली आणि क्षणात त्या कोंबड्याची मान विचित्र पद्धतीने कापली .. कोंबडं तडफडू लागलं ..अनिताने कोंबड्याची कापलेली मान त्याकवटीवर धरली .. त्याचं रक्त त्याकवटीवर पडत होतं ..अनिताने पटकन अंगठ्याने स्वतःला त्या रक्ताचा टिळा लावला ..आणि जोर जोरात स्वतःची मान गरागरा फिरुऊ लागली तिचे केस त्याबरोबर फिरत होते… खूप विचित्र वाटत होतं सगळं ... अनिताला असं कधी पाहिल ..असं स्वप्नात पण सुरेशला वाटलं नव्हतं. त्याला डबडबून घाम सुटला होता ... इतक्यात अनिताने ते खाली ठेवलेले एक गोलाकार लाकूड हातात घेतले .. लाकूड कसलं ते तर एक हाडूक होतं ..ते तिने त्या मारलेल्या कोंबड्यावरून फिरवलं .. आणि त्या कोंबड्याला उचला .. दोन मिनटे ती त्या खोपडीकडे बघून काहीतरी पुटपुटली. .. तिने ते सांडलेले रक्त स्वतःच्या केसाला लावलं आणि ते कोंबडं कच्चच खायला सुरवात केली .. विचित्रपणे अनिता गुमत होती .. ते सगळं बघून सुरेशला कसतरी होयला लागलं.. पुढे अनिता काय करणार हे बघण्याची त्याची हिम्मत संपली होती .. बघितलं तेवढं खूप झालं .. त्याला आता स्वतःच्या जिवाची भीती वाटायला लागली ..तो हळूच खाली उतरला .. दबक्या पावलाने आपल्या खोलीकडे गेला .. आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला.. पण जे काही त्याने पहिलं होतं ते बघून त्याची झोप उडाली होती. काही वेळाने कोणीतरी बाथरूममध्ये गेलंय हे त्याला कळालं.. सुरेशने घड्याळ पहिलं ४ वाजत आले होते ..अनिताच असणार त्याने विचार केला .. थोड्या वेळाने अनिता खोलीत आली . सुरेश कूस बदलून आधीच भिंतीकडे तोंड करून झोपला होता .. झोपला कसला ? झोपायचं नाटक करत होता. अनिता आली आणि त्याच्या बाजूला गपचूप येऊन झोपली... मधेच ती उसासे टाकायची ..कि सुरेशच्या मनात धस्स होयचं.. काहीतरी पुटपुटत ती झोपली .. सुरेशची हिम्मतच होतं नव्हती तिच्याकडे कुस बदलून झोपायची ..तिला बघायची.. कशी दिसत असेन ती अत्ता ? का तशीच बाहेर आली ? कधी पासून हे सुरु आहे हे? काय आहे हे सगळं ? एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले ..क्रमश : (लवकरच अंतिम भाग २ पोस्ट करतोय.. जर तुम्हाला भाग १ आवडला तर ...)
No comments:
Post a Comment