#लेकीची_फी
एक कारखाना तिथे काम करणारे तिघे मित्र अमोल..सुनील आणि अजय...6 वाजले नुकतीच त्यांची शिफ्ट संपली होती
"आरं सुन्या चल आज प्यायला आणि जेवायला जाऊया" अमोल आळस देत बोलला
हे ऐकून त्याचा मित्र सुनील जरा रागातच बोलला "गप्प रे मर्दा...परवाच मालकाकडन पैसे ऍडव्हान्स घेतलेत..सारखं सारख देणार नाही त्यो"
हे ऐकून अमोल जरा नाराजीने म्हणाला "व्हय रे..मी पण 4 दिवसआधी पैसे घेतलेत आणि मागितले तर बोंब मारलं मालक"
जरा डोकं खाजवत अमोल बोलला "आरं आज्याने आज पैसे उचललेत मालकाकडन...चल त्याच्याकडे मागूया..आज लई हुक्की उठल्या रे प्यायची"
अजय जरा लगबगीने येत होता त्याला बघून अमोल आणि सुनील धावत गेले आणि त्याच्याजवळ पैसे मागितले
अजय मान हलवत बोलला "नाही बाबा...हे पैसे मी लेकीच्या फी साठी उचलेत....माझी लेक लई भारी गाते...तिला गाण्याच्या क्लास ला पाठवणार आहे बघ...आपण नंतर जाऊया की पण आता नको"
हे ऐकून सुनील हसत बोलला "आरं..संसार मागं लागलायच की...आपल्यासाठी कवा जगायचं मग...आणि कुठं पोरीला पाठवतोस शिकायला..इथं शाळेची फी देईपर्यंत घाम निघतोय...सोड ह्यो नाद"
हे ऐकून अजय जरा रागातच बोलला "गप रे भाड्या...तुम्हाला काय कळतंय? माझी जिंदगी आधी माझ्या बायका पोरांची मग माझी...तुम्ही दुसरीकडन जुळणा करा मी जातो"
तेवढ्यात अजय ला मॅनेजर ने बोलावले...त्यांची चर्चा चालू झाली..कामा विषयी बोलणं चालू होतं...तिकडे अमोल आणि सुनील काही तरी कुजबुजत हसत उभे होते...अजय 10 मिनिटांनी आला आणि ते तिघे चालू लागले
आता अमोल जरा तावातावाने बोलला "हे बघ आज्या तुझं पण बरोबर हाय र्र....तुझ्या मुलीने शिकलं पाहिजे...किती दिवस आस गरिबीत मरायचं...हं"
"व्हय रे...पण आपण करणार काय?आपली हातावरची पोटं" सुनील चा नाराजीचा सूर
"आरं मर्दा...हेच बदलायचं आपण...मला एक आयडिया सुचल्या आपल्या गरिबीवर जालीम इलाज"
दोघे अमोलकडे बघत थांबले तसा त्यांना बघून अमोल बोलला "हे बघा जास्त वाढीचार लावत नाही...माझ्या डोक्यात एक आयडिया आहे आपण त्या स्मशानात जाऊन भुताला बोलवायचं आणि उद्याचा मटक्याचा नंबर त्याला विचारायचा...आणि त्यो आकडा उद्या खेळून पैशे कमवायच"
अजय ह्या वाक्याने चपापला "आरं...येडा हाईस काय तू?? अस कूट असतय व्हय"
सुनील ने अजयच्या खांद्यावर हात ठेवला "आरं..आमल्या बोलतोय ते खरं हाय बघ...त्या मागच्या गल्लीतला पांडू ज्यांन परवा 2 एकर रान इकत घेतलं..त्यानं पण हेच केलं हुत...आणि आपला अमोल त्याचा खास दोस्त परवा त्यांन ती विद्या आमल्याला सांगितल्या...एकदम सोप्पी हाय बघ"
अमोल आणि सुनीलच्या ह्या डोक्याबाहेरच्या बाता ऐकून अजय जरा लांब झाला "नको रे बाबा...मला असल्या गोष्टीची लई भीती वाटते बघ...तुला तर माहीत आहे किती भित्रा आहे मी....आणि मला bp चा पण त्रास आहे रे..नको बाबा हे"तुम्ही त्या भुताला नंबर विचारा आणि मला सांगा की
हे ऐकून अमोल त्याला धीर देत बोलला "अरे त्या विधीला तिघे लागत्यात ..आणि घरचा विचार कर की..पैसे मिळाल्यावर घाल चांगल्या क्लास मध्ये पोरीला
पैश्याची गोष्ट ऐकून अजय ला जरा धीर आला...ते तिघे आता स्मशानकडे जायला तयार झाले...अमोल आणि सुनील ची एकांतात कुजबुज चालूच होती...अमोल ने अजय आणि सुनीलला पुढे पाठवले...तसा तो अर्ध्या तासाने स्मशानात आला...रात्र झाली होती स्मशानात भयाण शांतता होती....अजय जरा घाबरला होता आणि सुनील त्याला धीर देत होता
अमोल एक पिशवी घेऊन आला...8 वाजत होते....सगळीकडे काळोख...अमोल ने कसल्या तरी रक्ताने तिघंभोवती एक रिंगण आखल...4 मेणबत्या पेटवल्या आनी त्या दोघांकडे बघत गंभीर आवाजात बोलला "हे बघा..मी काही मंत्र म्हणणार आणि माझ्या अंगात भूत संचारल...तुम्ही घाबरायचं नाही...आणि ह्या लाल रिंगणातण आजिबात बाहेर पडायचं नाही...बाहेर पडला की खेळ खल्लास"
अमोल च्या ह्या गंभीर आवाजाने अजय जरा घाबरला...अमोल ने समोर काहीतरी कसलीतरी हाडे ठेवली आणि मोठ्या आवाजात बोलला..."इथल्या भुतानो या लवकर या.खा लवकर ही हाडं आणि सांगा मला नंबर...अस बोलून अमोल कसला तरी मंत्र पुटपुटू लागला...अजय जाम घाबरला होता त्याला घाम येऊ लागला...आता अमोल गरगर मान फिरवू लागला
शांत असलेला सुनील म्हणाला "आरं भूत आलं वाटतं"
अमोल चे मुंडी फिरवणे आता शांत झालं...त्याने एक तीक्ष्ण नजर अजय कडे फिरवली आणि एक भयाण कर्णकर्कश आवाजात बोलला "आर आज्या आलास...वळकलं का मला मी तुझ्या बापाच्या दोस्ताच भूत हाय...तुझा बाप माझं पैस देणार व्हता...तू घेऊन आलास काय? दे बाबा लवकर"
अजय प्रचंड घाबरला "आरं..अमोल काय बोलतोस तू? कसलं पैस...गप जरा"
अमोल ने बाजूची माती घेतली आणि आपल्या तोंडाला फासली...तो जोरजोरात गुरगुरु लागला "ए हाराम्या...मी अमोल नाय..मी भैरू हाय...दे माझं पैस..नाहीतर तुझा जीव घेईल म्या"
अस बोलून अमोल अजय च्या जवळ गेला...अजय प्रचंड घाबरला आणि सरपटत सरकू लागला..अमोल जवळजवळ येऊ लागला
अमोल भयाण आवाजात बोलला "बघ तू रिंगणाच्या बाहेर आलास..आता मेलास रे तू मेलास..अस बोलून अजय ला पकडून त्याच्या खिशात हाथ घालू लागला.."काढ माझं पैस...दे माझी उधारी"
अमोल ने अजय ला घट्ट पकडले अजय ने त्याचे भयाण रूप बघून ते फी चे पैसे आपल्या मुठीत आवळले आणि आकांताने ओरडू लागला
"ओ सायेब...सोडा ओ मला...नका घेऊ ओ माझं पैस...माझ्या #लेकीची_फी हाय ती...दया करा ओ...सायेब...सोडा ओ..माझी लेक वाट बघतेय ओ......सोडा ....आई sssss...आ ssss
पण अमोल मोठया त्वेषाने त्याला आवळत होता...शेवटी अजय ची मूठ सैल झाली अमोल ने ते पैसे हिसकवले आणि मागे फिरला...सुनील कडे बघत त्याने तोंडाची माती पुसली....दोघे सुद्धा जोरजोरात हसू लागले...."बघ लेका सांगितलं होतं ना तुला...काय पण करून आज्या कडन पैस घेतो म्हणून...चल आता जाऊया प्यायला...देऊ परत ह्याच पैसे पगाराला"अमोल आनंदित होऊन हसत म्हणाला
दोघांनी अजय कडे मान फिरवली तो अजून तिथंच पडला होता...ते दोघे धावत त्याच्याजवळ गेले
"ए आज्या..आरं चेष्टा केली तुझी...चल आता प्यायला जाऊ..." सुनील त्याची समजूत काढत बोलला
अजय निपचित होता...घामाने त्याच अंग भिजल होत
त्याला बघून दोघे घाबरले...
"आरं...bp चा त्रास हाय त्याला...बेशुद्ध झालाय वाटतं...चल दवाखान्यात नेऊ ह्याला"
दोघे जण तातडीने अजय ला रिक्षात घातले आणि धावत जवळच्या दवाखान्यात पोचले...दवाखान्यात आल्यावर डॉक्टर आला आणि त्याने अजय च्या छातीवर स्टेट्सकोप लावला आणि नस चेक करून जरा गंभीर स्वरात बोलला
"sorry...घरी घेऊन जा ह्यांना...थोड्या वेळापूर्वी आणलं असत तर आम्ही वाचवू शकलो असतो...जबरदस्त हार्ट अटॅक आला होता ह्यांना...sorry"
हे ऐकून अमोल आणि सुनील खाली बसले...आरं काय झालं हे??दोघे एकमेकाला प्रश्न करत रडत होते
अचानक अजय च्या खिशातून फोनची रिंगटोन वाजू लागली...बोबडे बोल होते...बहुतेक ते गाणं त्याच्या मुलीने म्हंटलं होत
"पप्पा सांगा कुणाचे..पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची..मम्मी माझ्या पप्पांची"
हे बोबड्या स्वरातल गाणं ऐकून अमोल रडू लागला..त्याने थरथरत्या हाताने त्याच्या खिशातून फोन काढला आणि कानाला लावला...काही बोलायच्या आता तिकडून त्याची मुलगी बोलू लागली
"अहो पप्पा...कुठे आहात तुम्ही...या लवकर...10 वाजले भूक नाही का तुम्हाला?..या लवकर..ही आई बघा ना सारखी मारते मला तिला जरा येऊन दम द्याना...आणि माझ्यासाठी खाऊ आणलात ना? आज काजूकतली आणणार होता माझ्यासाठी...या लवकर घरी मी सुद्धा जेवली नाही अजून...मला भूक लागलीय हो...या..मी वाट बघते"
हे ऐकून अमोल खाली बसला आणि रडू लागला...त्याच्या मनात विचार आला...
"आरं काय झालं हे?? ह्या चिमुरडी ला आता कसं सांगू तिचा पप्पा तिचा राहिला नाहीय...तो देवाचा झालाय
#शशांक_सुर्वे
No comments:
Post a Comment